Friday, November 28, 2008

गुरु, पिता, बंधू... सखा ऍग्रोवन

गुरु, पिता, बंधू... सखा ऍग्रोवन

मी ऍग्रोवनचे ऑफिस सोडून फिरायला बाहेर पडलो. आनंद सर किंवा हणमंतला बरोबर न घेता. कसबा चौकात शनिवारवाड्याशेजारी आलो. समोर पाहतो, तो एक रंगतदार पाटी... "बोन्साय, औषधी वनस्पती, शेती सल्ला मिळेल''. हिरव्या रंगात रंगविलेली पाटी. म्हटलं बघावं, काय भानगड आहे ते.

गळ्यातील "सकाळ'चा बिल्ला शर्टच्या आत टाकला आणि गेलो.दुकानदाराला मी म्हणालो, ""आमची सासवडला जमीन आहे. नुकतीच घेतली. डेव्हलप करायची आहे. सल्ला हवाय. तुम्ही काय सल्ला देऊ शकता.'' त्या दुकानात कुड्या, रोपे, माती, पुस्तके होती. दुकानदार साधारण साठीचा होता. त्यांचं नाव (आड) कडू. ते म्हणाले, ""जमीन कशी आहे हे पाहून आंबा किंवा चिकू लावा. पुण्यातून शेती करणार असाल तर फळबागा सर्वोत्तम''

काकांनी तोंड उघडल्यावर मी माझ्या पोतडीतून एक एक प्रश्‍न काढत गेलो. आणि गप्पा रंगल्या. (ओळख विसरून जगलं, अंगावरची झूल उतरवून फेरफटका मारला, की वास्तविकतेच्या अधिक जवळ जाता येतं. नजरेचे, विचारांचेडायमेन्शेन्स बदलतात. याची पुन्हा एकदा जाणीव झाली.)

कडू काका कृषी पदवीधर नाहीत. त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्‍यातील आंबेगाव. पानशेत धरणाच्याजवळ. 12 एकर शेती आहे. केशर आंबा लावला आहे. वांगी आहेत. आता बटाटा लावणार आहेत. ते 50 वर्षांपूर्वी पुण्यात आले. शनिवार पेठेत कन्या शाळेसमोर पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला. आता मुलगा व मुलगी व्यवसाय सांभाळतात. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याची आवड आणि हौसही. त्यामुळे पेंटिंग बरोबरच त्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांचे, बालसाहित्याचे दुकानही सुरू केले आहे. बालसाहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतःची "कलम' प्रकाशन संस्था सुरू केली. शेतीची आवड, आणि त्यात पुणेकरांचा सहवास. त्यामुळे पुणेकरांची गरज आणि ऐपत ओळखून त्यांनी आपल्या दुकानात पुस्तकांबरोबर कुंड्या, माती, रोपे, पूजेचे साहित्य, गांडूळ खत असे विविध साहित्य विकायला ठेवले आहे. आठवड्यातून दोन दिवस गावाला जातात. शेतीचे काम पाहण्यासाठी मजुरांची 2 जोडपी ठेवली आहेत. बागा असल्यामुळे सर्व व्यवस्थित आहे. जमीन विकण्याचा विचार नाही. शेतीवर ध्यान देणार आहेत.

कडू काकांनी मला सांगितलेला एक कानमंत्र फार महत्त्वाचा आहे. हे सर्व लिहिण्याचा उद्देशही या कानमंत्राची चर्चा करणे हाच आहे. ते म्हणाले ""मी माझ्या शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, आंबा, चिकू व इतर फळे पुण्यातील दुकानांमध्ये विकतो. येथील किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आणायला हडपसर,उरुळीकांचन, दौडला जावे लागते. येण्या जाण्याचा खर्च वाढतो. मी आता इथल्या किरकोळ विक्रेत्यांना थेट माल पुरविणार आहे. पुण्यातील फेरीवाल्यांना आपल्या ब्रॅन्डचा माल पुरवून त्यांच्या आधारे शेतकरी आपला माल विकू शकतात. हाच प्रयोग करण्याचा माझा विचार आहे. पुण्यातील सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येक शेतकरी पोचू शकत नाही. पण फेरीवाले, किराणा दुकानदार यांच्यापर्यंत तर पोचू शकतो. मग अडचण काय आहे. तुमचा शेतमाल तयार होण्याच्या एक महिना आधी मार्केट शोधायला बाहेर पडा. नियोजन करा व माल विकार चांगली किंमत मिळवा.'' कडू काकांना मी शेवटपर्यंत माझी ओळख सांगितले नाही. त्यांनीही विचारली नाही. मला शेतीत रस आहे, एवढेच त्यांना पुरेसे होते. त्यांनी पोटतिडकीने माहिती दिली. काहीही अडचण आली, मदत लागली तर या म्हणाले.

शेवटी मी न राहवून विचारले, ""काका तुम्ही कृषी पदवीधर नाही, पुण्यातून तुमच्या शेतीचे व्यवस्थापन करत असला तरीही लौकिक अर्थाने तुम्ही शेतात राबणारे शेतकरी नाही, मग एवढी बारीक सारिक माहिती कशी ??? ""मी दररोज ऍग्रोवन वाचतो.'' ते म्हणाले. आणि मला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. सकाळ पेपरचा ऍग्रोवन हा स्वतंत्र शेतीविषयीचा पेपर आहे. खूप महत्त्वाची माहिती असते. ऍग्रोवनचा कोणताही कार्यक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन, कार्यशाळा मी चुकवत नाही. त्यात तज्ज्ञांचे, शास्त्रज्ञांचे, शेतकऱ्यांचे फोन नंबर असतात. त्यामुळे लगेच फोन करून माहिती घेता येते. त्यामुळे शेतीशी थेट नाळ जुळलेली नसतानाही मी शेतीबद्दल बिनधोक बोलू शकतो.''कडू काका ऍग्रोवनबद्दल बोलत असतानाही मी त्यांना माझी ओळख सांगू शकलो नाही. भीती वाटली नंतर. कदाचित मी ऍग्रोवनची ओळख सांगितली असती तर ते माझ्याशी मोकळेपणाने बोलले नसते. आणि ओळख हवी कशाला तो काही ऍग्रोवनचा प्रतिनिधी आणि दुकानदार किंवा शेतकरी असा संवाद नव्हता. तो होता एका निनावी, बीन चेहऱ्याच्या आणि शेतीविषयी माहिती नसलेल्या कोऱ्या शेतकऱ्याचा आणि पुण्यातील एका व्यापारी, कलाकार शेतकऱ्याचा. मात्र या संवादात माझ्याही नकळत शेतकऱ्यांच्या जीवनातील, नव्हे जगण्यातील महत्त्व अधोरेखित करत "ऍग्रोवन'च भाव खाऊन गेला. आणि मला पुन्हा एकदा मी निवडलेल्या माध्यमाचा अभिमान वाटला. काकांनी त्याच्याही नकळत मला माझ्या जबाबदारीची, माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. निरोप घेऊन (मनात त्यांच्या शेताला भेटीची योजना सुरू होती) मी थेट ऑफिसला आलो. आणि बातम्यांना झोंबलो.

1 comment:

Datta said...

Chhan post hoti....!!! Tumhi Saswadche aahat ke kalalya nantar Aankhi aanand watala...!! Agrowon jevha suru zala tevha pasun mi Agrocha chahata aahe!! Ek formality sangat nasun manapasunche udgar aahet...!!!