Saturday, November 29, 2008

कुत्र्याचं मरण, बातमीदार आणि संशोधन

आज लोणावळ्याला गेलो होतो. कृषी संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी. 1958 साली लोणावळ्यात त्या काळी गावाबाहेर भातावरील करपा रोगाच्या संशोधनासाठी खास संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. कृषी विभाग, कृषी संशोधन संस्था यामार्गे ते सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे भाताच्या रोगांवर संशोधन करणारे हे देशातील प्रमुख संशोधन केंद्र आहे. या केंद्रात भाताच्या जातीने आपली रोगप्रतिकारकता सिद्ध केल्याशीवाय ती जात देशात कुठेही प्रसारीत केली जात नाही. लोणावळ्याचे हवामानव खास करुन केंद्राची जागा ही भात पिकावरील सर्व रोगांसाठी अत्यांत पोषक आहे. सर्व प्रकारचे रोग येथे वेगाने वाढतात. म्हणून संशोधनासाठी ही जागा निश्‍चित करण्यात आली.

साधारणतः वर्षभरापुर्वी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांनी संशोधन केंद्रांच्या दुरावस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांच्या बळकटीकरणाची आवश्‍यकता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर लोणावळा येथिल संसोधन केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या केंद्राची पहाणी करण्याचा माझा उद्देश होता.

लोणावळ्यातील साडेसहा एकर जमिनीवर हे संशोधन केंद्र नेटाने काम करत आहे. नेटाने या साठी की एक काच गृह (ग्लास हाऊस) वगळता इतर कोणतीही आधुनिक साधने येथे नाहीत. तरीही दर वर्षी सुमारे 1200 जातींची चाचणी या ठिकाणी घेतली जाते. त्यांच्या नोंदी ठेवण्यात येतात. व रोगांनी बळी पडणाऱ्या जाती नष्ट करण्याचे अहवाल दिले जातात. अहवाल समाधानकारक नसेल तर ती जात नष्ट करण्यात येते. गेल्या पन्नास वर्षात रोगांना बळी पडणाऱ्या सुमारे 30 हजाराहून अधिक जाती या केंद्राने तपासून रद्द ठरविल्या. तसेच विविध रोगांवर शिफारसी देऊन शेतकऱ्यांना रोगनिदान व रोगनियंत्रणासाठी मोठी मदत केली.

देशाच्या भात पिक विकासात या केंद्राचे स्थान मोलाचे आहे. मात्र तरीही पन्नास वर्षे उलटूनही अद्याप हे केंद्र विकसित होऊ शकलेले नाही.या संशोधन केंद्राला स्वतंत्र प्रयोगशाळा नाही. पारंपारिक पद्दतीने भाताची मळणी केली जाते, यामुळे वेगवेगळ्या जातीचे बियाणे एकत्र मिसळण्याची शक्‍यता वाढते. मळणीयंत्र नाही. केंद्रामध्ये मुनष्यबळही पुरेसे नाही. कृषी सहायक व वरिष्ठ संशोधन सहायकाच्या जागा रिकाम्या आहेत. स्थानिक मजूरांना कंत्राटी पद्धतीने भात लावणी, कापणी, वाहणी व मळणीचे काम देण्यात येते. गेल्या पावसात केंद्रातील बैलांचा गोळा व गांडूळ खताचे शेट मोडले आहे. मात्र अद्यापही ते तशाच अवस्थेत आहे. केंद्राच्या प्रक्षेत्राला व्यवस्थित कुंपन नाही, त्यामुळे अनेकदा संशोधन प्रक्षेत्रात मोकाट कुत्री उच्छाद मांडतात. नवीन अत्याधुनिक स्वयंचलीत वेधश याचा परिणाम केंद्राच्या कामावर होत आहे.

केंद्राच्या दुरावस्थेविषयी विचारले असता तेथिल सुत्रांनी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. आम्हाला वरिष्ठांकडून काहीही अडचण नाही. संशोधन केंद्राच्या बळकटीकरणाविषयीचा प्रस्ताव आम्ही विद्यापीठाला पाठविला आहे. विद्यापीठाने येथे प्रयोगशाळा उभारणीसाठी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाला सुरवात होणार आहे. असे सांगितले.

येताना मी मुद्दाम वडगाव मावळ संशोधन केंद्रात न कळविता गेलो. तेथे भात काढणी अद्याप बाकी आहे. इंद्रायणीच्या काढणीला सुरवात झाली आहे. हे भात संशोधन केंद्र आहे. नवीन जाती तयार केल्या जातात. लोणावळ्यापेक्षा इथे यंत्रसामग्री भरपूर आहे. एवढी की जुनी यंत्रे (पावर टिलर इ) गंजून टायर फुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वयंचलीत वेधशाळा गेली काही महीने (मी 6 महिने बंद आहे का म्हटल्यावर तेथिल कर्मचाऱ्याने त्याचे डोके हो.. असे हलविले.) बंद आहे. संशोधन केंद्रांच्या वेधशाळा बंद असतील तर बाकीच्यांचा विचारच केलेला बरा.... असो, आपलेच दात आणि आपलेच ओठ... कुणी कोणाला धाकात ठेवायचं...

(एक संवाद ऑफ दे रेकॉर्ड सांगतो. कोण बोलले विचारू नका, आणि कुणाला सांगू नका. ओके. ---सुत्रधार ः कृपा करुन या केंद्रातील तृटींविषयी काहीही वाईट लिहू नका.---मी ः वाईट म्हणजे कसे. जे नाही ते लिहिलं तर त्यात वाईट काय ? त्याचा चांगला परिणाम होऊन विद्यापीठ सुधारणा करणार नाही का...---सुत्रधार ः अहो तसं नाही हो, पण केंद्राविषयी काही उलटं छापून आलं की वरीष्ठ नाराज होतात. पत्रकारांनी आम्हीच माहिती पुरविली असा त्यांचा समज होतो. मग आम्हाला धारेवर धरले जाते. त्रास होतो. त्यातच वेळ जातो. काम रहाते बाजूला. मागे वडगाव मावळ संशोधन केंद्रात असेच झाले. तेथे एक बातमीदार येऊन गेले. त्यांना कोणी काही चूकीची माहिती दिली नाही. मात्र त्यांनी तेथिल अवस्थेबद्दल लिहील्यानंतर विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. पत्रकारांचा उद्देश चांगला असतो हो. पण त्याने काही फरक पडत नाही. उलटा आम्हालाच त्रास होतो. आणि कामही बिघडते. त्यामुळे केंद्राचे काम चांगले चालले आहे. असेच लिहा. आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे घाला बातमीत. नावं छापून आल्यावर त्यांना बरे वाटते.)
-----------------------------
ता. क. ः जाताना माझ्या मोटार सायकलसमोर 50 फुट अंतरावर एका जीपने कुत्र्याला उडविले. कुत्र्याला गाडीचा गंध नव्हता. गाडीने उडविल्याची जाणिव आणि त्याच्या शरीरातून आत्मा हरविण्याची घटना एकाच क्षणात घडली. किंबहून धडकेची संवेदना त्याच्या मेंदुपर्यंत पोहचविण्यास त्याच्या मज्जसंस्थेलाही संधी मिळाली नसावी. एवढ्या वेगात ती घटना घडली. कुत्र्याचा आवाजही बाहेर पडला नाही. माझ्या डोक्‍यात त्यावेळी मुंबईतील अतीरेक्‍यांचा विचार सुरु होता. ताजवर हल्ला करणारे अतिरेकी, शहीद झालेले पोलिस अधिकारी, बचावलेले नागरीक, माझ्यासमोर मेलेला कुत्रा, त्या गाडीचा चालक आणि या सर्व घटना शुन्य नजरेने पहाणारा मी....... प्रत्येकाचे मिशन वेगळे, जबाबदारी वेगळी, ती पेलण्याची क्षमता वेगळी आणि उध्वस्त होण्याची पद्धतही वेगळी. पण तरीही, मला कुत्र्याचं मरण मरायचं नाही....

1 comment:

Datta said...

Ek kadu aani vidarak satya.....