Tuesday, December 2, 2008

जगदिशचंद्र बोस ते गजानन नामपूरकर... व्हाया पुणे

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी वनस्पतींना संवेदना असतात, हे शेकडो प्रयोगांनी दाखवून दिले. वनस्पती सजिव व संवेदनशिल असून त्यांच्यावर बाह्य घटकांचा परिणाम होतो, त्यांना दुःख, काळजी, भिती, निराशा, चिंता यांचे आघात सोसावे लागतात, हे यामुळे सिद्ध झाले. डॉ. बोस यांच्या संशोधनाला पृष्टी देणारे प्रयोग अनेक शास्त्रज्ञांनी केले. परंतु या संशोधनाचा शेतीसाठी अजून योग्य वापर झालेला नाही. नैसर्गिक व मानवी आघातामुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात व पिकांच्या मनोवैज्ञानीक उपचारांसंदर्भात पुरेसे संशोधन झालेले नाही. सध्या आयुर्वेद, मनःशक्ती याबाबत जागरुकता वाढत आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र माणसाप्रमाणेच पिकांचे आरोग्यही मनस्वास्थ्याशी कसे थेट संबंधीत असू शकते हे अजून अनेकांना उमगलेले नाही. मलाही.

डॉ. बोस यांचे संशोधन व आयुर्वेदातील मनस्वास्थ्य कल्पना यावरून पुण्यातील कृषी संशोधक (की अभ्यासक) गजानन नामपूरकर यांनी पिकांची मनोशारिरिक उर्जा सहनशक्ती, प्रतिकार व पोषणशक्ती कशी वाढविता येईल, या दिशेने गेली 10 वर्षे संशोधन सुरू आहे. यासाठी त्यांनी आजवर सुमारे 50 पिकांवर चाचण्या घेतल्या आहेत. असे त्यांचे सांगणे आहे. नामपूरकर (वय 80) हे कृषी खात्यातून माहिती उपसंचालक पदावरून निवृत्त झालेले आहेत.

मी आधी ते काय करत आहेत ते सांगतो, आणि मग माझे मत मांडतो......झाडाची अंगभूत प्रतिकरक्षमता वाढविण्यासाठी नामपूरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. आजवर त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर सुमारे 200 हून अधिक प्रयोग केले आहेत. केंद्र सरकारकडून (वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग) अधिक संशोधनासाठी नामपूरकर यांना 50 हजार रूपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. पिकाला सशक्त करण्यासाठी त्याची पोषणक्षमता वाढविण्यासाठी ते औषधे तयार करतात. पिकातील चैतण्य जागृत केल्यावर नैसर्गिक शक्तींनी झाड कणखर झाल्यावर त्याच्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही, असे ते म्हणतात.

त्यांचे मत त्यांच्या शब्दात ः गेली 10 वर्षे मी सेंद्रीय शेतीला उपयुक्त पर्यायी अभिनव सेंद्रीय पद्धतीचे संशोधन करित आहे. प्रचलित कृषीशास्त्रानुसार पिकांच्या वाढिसाठी 16 अन्नद्रव्यांची गरज आहे. मात्र याव्यतीरिक्त सिलिकता हे फायदेशीर परंतु उपेक्षित अन्नद्रव्य आहे. त्यामुळे पिकाची पोषण शक्ती वाढते. मात्र अजून कोणीही कृषी शास्त्रज्ञांनी सिलीकाची शिफारस केलेली नाही. पिकांना स्वयंपोषणाची, स्वरक्षणाची आणि स्वसंवर्धनाची अशा तिन्ही शक्ती जन्मतःच प्राप्त झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना मानसांप्रमाणेच वागविले पाहिजे. नैसर्गिकपणे वाढलेल्या वनस्पतिंना सहसा किड रोग होत नाहीत. जनावरांनी खावू नये म्हणून यांना काटे असतात. खोडावर बारिक केस असतात. ज्वारीत लहानपणी विषारी द्रव्य असल्यामुळे जनावरे खात नाहीत. पिकात रोगाविरूद्ध लढण्यासाठी प्रथिने तयार होतात. प्रत्येक पिकात स्वसंरक्षणाचे सामर्थ्य असते. नैसर्गिकपणे वाढलेल्या वनस्पती काटक असतात, परंतु मशागत केलेली पिके मात्र अनेक रोगांना बळी पडतत. वनस्पतींच्या मज्जासंस्थेच्या कार्यातील पचन, श्‍वासोच्छवास, अभिसरण आणि प्रतिकारशक्तीवरही त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.नैसर्गिक आघात व दाट लागवड, जास्त पाणी, रासायनिक खते व किटकनाशकांचा अति वापर या मानवी हस्तक्षेपामुळे पिके रोगांना बळी पडत असतात. या आघातांमुळे, ताणतणावांमुळे पिकांचे मनस्वास्थ्य बिघडते. त्यांची जिवनशक्ती, प्रतिकार पोषण, ंवर्धन शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे पिकाची मनोशारिरीक अवस्था खालावते. व पिके रोगांना बळी पडतात. माझ्या मते किड किंवा रोग हे या आजाराचे मुळ कारण नाही. अनावस्था व त्यातून येणारी दुर्बलता, अशक्तपणा हे पिकांचे आजारी पडण्याचे कारण आहे. त्यामुळेच पिके रोगांना बळी पडतात.

पिकांची प्रकृती निसर्गतः काटक कनकर केली, त्यांना समर्थ केले तर सहसा किड व रोग होणार नाहीत. त्यामुळे रोगराईवर उपाय करण्यापेक्षा झाडाला प्रतिकारक्षम करणे ही माझ्या संशोधनाची दिशा हे. यासाठी वनस्पतींची संवेदना त्यांच्यातल चेतना जागृत करण्यासाठी खते व औषधे बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात त्यांनी दोनशेहून अधिक प्रयोग केले आहे. या प्रयोगांचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. ---

आता माझे निरिक्षण ः गेल्या वर्षी खेड शिवापूर येथिल मुरलिधर दिघे व रमेश शिंदे यांच्या अंजिराच्या बागेत पिकविकृतीतज्ज्ञ डॉ. निवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नामपूरकरांच्या औषधांचे प्रयोग करण्यात आले. अंजिराची संवेदनशिलता व प्रतिकारक्षमता जागृत करून तांबेरा रोगापासून बचाव करण्याचा उद्देश होता. मी या सर्व शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्या बागांची पहाणी केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही बागा पाहिल्या. रोगाचे नमुने गोळा केले. या शेतकऱ्यांच्या बागांवर तांबेरा नियंत्रणासाठी नामपूरकरांचे औषध व काही सेंद्रीय खते देण्यात आली. मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बाविस्टिन हे आंतरप्रवाही बुरशीनाशकही फवारले होते. त्यामुळे अंजिरावरील संपुर्ण करपा केवळ नामपूरकरांच्या औषधामुळे नियंत्रणात आला हा दावा चूकीचा ठरतो. शेतकरी मुरलिधर दिघे यांना ते मान्य नाही. ते म्हणतात की, नामपूरकरांच्या औषधामुळे झाडाला फुटवा, फळांची संख्या व जोम चांगला आहे. पण तांबेरा या औषधामुळे थांबला असं म्हणता येणार नाही. तांबेऱ्यासाठी आम्ही बाविस्टिन फवारले होते.

नामपूरकर यांचे प्रयोग अजून शेतकऱ्यांच्या व शास्त्रज्ञांच्या पसंतीस पूर्णपणे उतरले नाहीत. त्याला कारणेही आहेत. नामपूर प्रयोगशिल अभ्यासक आहेत. त्यांनी स्वतः कधीही शेती केलेली नाही. शेतीचा अभ्यास मात्र चांगला आहे. त्यांनी प्रयोग केले ते दुसऱ्याच्या शेतावर. शिवाय ते औषधे कशी तयार करतात. त्यात नक्की काय मिसळतात. की ाजारातीलच ग्रोथ रेग्युलेटर, हार्मोन दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरून देतात. हे मात्र ते सांगत नाहीत. त्याबद्दल चुप्पी साधणे त्यांना आवडते. सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉन्ट आणि यासारखी अनेक पुस्तके नामपूरकर संदर्भ साहित्य म्हणून वापरतात. त्यामुळे ही जुन्या बाटलीत नवी दारू नाही ना अशीही मला शंका आहे.

शेतकरी सहज फसतो, त्याला फसविणे सोपे असते असे अनेकांना वाटते. त्यामुळे कोणी सेंद्रीय खताच्या नावाखाली गोणींमध्ये माती भरुन विकतो. तर कोणी सेंद्रीय, जैविक किडनाशकांच्या नावाखाली लुबाडतो. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि काही प्रमाणात अन्याय सहन करण्याच्या वृत्तीचाही फायदा घेतला जातो. राजकारणी व प्रशासन आपल्या परिने शेतकऱ्यांना पिळत असताना गोंडस नावाखाली त्याच्या खिशाला कात्री लावणारे अनेक जण नव्याने उदयाला येत आहेत. अशांमधले एक नामपूरकर नसावेत अशी माझी अपेक्षा आहे. अर्थात एक वर्ष उलटूनही अजून माझा त्यांच्याबद्दलचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. सुरु आहे. त्यांचा उद्देश काहीही असो. त्यांच्या संशोधनाच्या दिशाही मला योग्य वाटते. वयाच्या 80 व्या वर्षीची त्यांची कामावरील निष्ठा आणि तळमळ आपल्यासारख्या तरुणांना स्वतःची लाज वाटावी अशी आहे.

श्री. गजानन नामपूरकरबहार,

39/ 10, आदर्शनगर,

मार्केटयार्ड रोड, पुणे 37.

9423233592.

No comments: