Wednesday, December 24, 2008

तो......आणि......ती

(तो ः पुणे कृषी महाविद्यालयाचा एक कृषी द्विपदवीधर, खासगी कंपनीत कृषी विभाग प्रमुख म्हणून पुण्यात कार्यरत. वय सुमारे 25.

ती ः त्याचीच वर्गमैत्रीण, कृषी द्विपदवीधर, एका बहुराष्ट्रीय कंपनीत अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी. त्याच्याच वयाची.)

ती ः काय ठरवलं आहेस मग तू?

तो ः कशाचं ?

ती ः लग्नाचं...

तो ः मी पडलो फकीर. कधी या गावात तर कधी त्या. आमच्याबरोबरच कोण लग्न करणार ? पाहू... दोन वर्षांनी संन्यास घ्यायचा म्हणतोय.

ती ः पाणचटपणा करू नकोस. खरं सांग ना... लग्न कधी करणार आहेस.

तो ः आणखी किमान दोन वर्षे करणार नाही. मनासारखी मनात रुतून बसणारी मुलगी भेटल्याशीवाय.

ती ः माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळं पाहत आहेत. काल अमरावतीचा एक मुलगा मला पाहून गेला. इंजिनिअर आहे. घरच्यांना आवडलाय.

तो ः वा छान ! जब्बरदस्त ! म्हणजे या उन्हाळ्यात तुझं वाजणार तर, ही गुड न्युज पक्‍याला सांगायला पाहिजे.

ती ः तुला काहीचं कसं कळत नाही रे... मला लग्न करायचं नाही.

तो ः घरच्यांनी ठरवलं, मुलगा चांगला असला तर काय हरकत आहे. दोघांचा पगार महिन्याला खोऱ्याने ओढावा लागेल तूला. सुखात राहशील. मला वाटतं छावा बरा असला, तर तू हो म्हण.

ती ः तू मुर्ख आहेस का ? मी तूला 15 दिवसांची मुदत देते. तुझा निर्णय मला सांग !

तो ः तुझ्या लग्नाशी माझा काय संबंधं. लग्नात नाचायचं म्हणशील तर सगळ्यात पुढे असेल.

ती ः मी तुला घोड्यावर बसायला सांगतेय, आणि तूला नाचायचं वेड लागलंय.

तो ः गप यार टिंगल बास झाली. म्हणे मी तूला घोड्यावर बसायला सांगतेय.

ती ः टिंगल नाही रे. मला खरच तुझ्याशी लग्न करायचं आहे. गेली 7 वर्षे वाट पाहिली. तु काहीच बोलला नाहीस. आता माझ्यासमोर पर्याय नाही. आपण कधी लग्न करायचं.

तो ः हे बघ आपण गेली सात वर्षे चांगले मित्र आहोत. इतपर्यंत ठिक आहे. पण आता लग्नाचा विषय कुठे आला. मी तुझ्याकडे फक्‍त माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणून पाहतो. तुझ्याशी लग्नाचा विचार मी कधीच केला नाही.

ती ः मग आता कर.

तो ः हे बघ बाई, मी तुला कारणे सांगत नाही. पण मी खरच तुझ्याशी लग्न करु शकत नाही.

ती ः का, माझ्यात काय कमी आहे.

तो ः तुझ्यात कमी नाही रे बाबा. बीएस्सी व एमएस्सीला विद्यापीठात प्रथम आलेल्या तुझ्यासारख्या टॉपर मुलीला माझ्यासारख्या बारावीत दोन वर्षे काढलेल्या मुलाने कमीपणा दाखविणे शक्‍य आहे का... प्रश्‍न तो नाही. माझं मन तुला माझी बायको म्हणून स्विकारायला तयार नाही.

ती ः दुसरी कुणी मनात बसली आहे का ?

तो ः दुसरी नाही. पण त्या अर्थाने तू सुद्धा नाहीस.

ती ः एखाद्या अनोळखी मुलीशी नंतर अरेंज मॅरेज करण्यापेक्षा तुझ्यासाठी मी काय वाईट आहे.

तो ः हे बघ. मी घरच्यांच्या मनाविरुद्ध खासगी नोकरी करतोय. मला जग पहायचंय. अनुभवायचंय. पण घरची अडचण आहे. घरी 50 एकर बागायती शेती. शेतीकडे पहायला कोणी नाही. माझ्या बायकोला गावाला राहून शेती करावी लागेल. मी बाहेर फिरतीवर असणार.

ती ः माझी तयारी आहे. मला नोकरीची गरज नाही. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी गावाला राहिल. आपण आपली शेती आधुनिक करु. जिल्ह्यात सर्वात यशस्वी आणि आधुनिक अशी आपली शेती असेल. तु सुट्टीच्या दिवशी घरी आलास, तरी मला पुरेसं आहे. मी तुझ्या आई वडीलांना काहीही त्रास होऊ देणार नाही. तुझी कमी जाणवू देणार नाही.

तो ः हे बघ नसंत्या गोष्टीला डोकं लावू नको. माझ्या मनात माझ्या बोयकोची प्रतीमा ठरलेली आहे. त्यात तु कोठेही बसत नाहीस.

ती ः तुला कशी बायको हवी आहे.

तो ः 1- ती माझ्यापेक्षा वयाने किमान तीन वर्षे लहान असेल. 2 - तिची उंची किमान पाच फुट पाच इंच असेल. या दोन्ही गोष्ट्रीत तु बसत नाहीस. तु माझ्याच वयाची आहे. फक्त 20 दिवसांनी लहान. आणि तुझी उंची कमी आहे. आणि तुला नाही म्हणण्याचं आणि ही कारणं सांगायचं मुख्य कारण म्हणजे मला तुझ्याबद्दल आतून तसं वाटतं नाही.

ती ः मी लहान नाही आणि उंची कमी आहे. यात माझा काय दोष. आज नसेल तसं वाटंत, पण उद्या वाटू शकतं ना...

तो ः हे बघ तुला माझ्यापेक्षा 10 जण चांगले भेटतील. माझा विचार सोड. शिवाय मी लगेच लग्न करु शकत नाही.

ती ः तू तयार असशील तर मी आणखी दोन वर्षे थांबायला तयार आहे. घरच्यांना मी समजावीन. ते तुला चांगले ओळखतात.

तो ः मी तुला शेवटचं सांगतो. मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. तुझी तयारी मी समजू शकतो. पण मनाविरुद्ध मला काहीही करावं वाटत नाही. तेव्हा प्लिज माझा त्या दृष्टीने विचार करु नकोस. आपण चांगले मित्र आहोत. चांगले मित्र राहू.

ती ः मित्र म्हणतोय आणि शत्रुसारखा वागतोस. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. दुसऱ्याचा विचार मी करु शकत नाही. मी तुला आणखी 15 दिवसांची मुदत देते विचार कर... घरी विचार आणि मला सांग. त्यानंतर मात्र मला घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. पुन्हा मी तुला संधीच दिली नाही असं म्हणू नकोस.

तो ः बाई, मला 15 दिवसांच्या मुदतीची आवश्‍यकता नाही. मला मान्य आहे, की तु माझ्यासाठी काहीही करु शकतेस. पण तू तसे करावेस, असं मला वाटत नाही. एखाद्या चांगला मुलगा बघ आणि त्याला हो म्हण. आपली मैत्री सुरु राहील.

ती ः तु फक्त तुझा स्वार्थ पाहतोस. ठिक आहे. पण तू विचार कर. शेवटचं सांगते. तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मला तुझ्या मैत्रीची गरज नाही. मला माहित आहे. तुझा विचार बदलू शकतो. बघ विचार कर आणि 15 दिवसांनी मला सांग.....

(या संभाषणानंतर 17 व्या दिवशी "ती'चे लग्न ठरले. 35 व्या दिवशी अत्यंत साधेपणाने तिचा त्याच "इंजिनिअर'शी नोंदणी विवाह झाला. लग्नाला "तो' जाऊ शकला नाही. त्याच्या कंपनीचे महत्वाचे "सादरीकरण' होते.)

No comments: