Friday, December 26, 2008

...एक संवेदनशील खांदा

प्रसंग 1 ला

शहरातील एका प्रथितयश महविद्यालयातील मुलींचे वसतिगृह...

रात्री 9 चा सुमार, मूळच्या सोलापूरच्या एका मुलीचा मोबाईल खणाणतो... मोठा भाऊ अपघातात ठार... मैत्रिणींच्या खांद्यावर भार सोडून तिने फोडलेला हंबरडा आणि संपूर्ण खोलीतील रडारड ...

प्रसंग 2 रा

स्वारगेट बसस्थानक ... फलाट क्रमांक 4,

पुणे-नाशिक गाडी नाशिकच्या दिशेने रवाना होण्यास काही सेकंदाचा अवकाश ... जिवलग मित्राला निरोप देण्यास आलेल्या मित्रांचा उदास चेहरा, उराऊरी भेट, थोपटले जाणारे खांदे... आणि मूक अश्रू...

प्रसंग 3 रा

डेक्‍कन जिमखाना मैदान ...

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतील हॉलिबॉलचा सामना ... जोरदार फटका मारून गुण घेतल्यानंतर मुलांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून रिंगण करणं आणि डोक्‍याला डोकं लावून एका सुरात ओरडणं ... गणपती बाप्पा मोरया

प्रसंग 4 था

"झेड' ब्रीजचे पहिले वळण ... (संपूर्ण ब्रीज म्हटंलं तरी चालेल)

एकमेकांच्या खांद्यावर डोकं टेकवून भविष्याचं स्वप्नरंजन करण्यात हरवलेली प्रेमी युगुलं ... आणि पुलाखालून वाहणारी नदी ...

आता शेवटचा प्रसंग -

वैकुंठ स्मशानभूमी...

शहरातील एक प्रतिष्ठित नागरिक .... वाजत गाजत आगमन, तोबा गर्दी, फुलांच्या माळा, हार, तुरे, नामांकितांची भाषणे आणि काहींचा जोराचा आक्रोश व थोडे मूक हुंदके ... कारण साहेब चौघांच्या खांद्यावर ...

या पाचही प्रसंगातील समान सूत्र एकच आहे. निर्वाणीच्या क्षणाला मदतीला येणारा, साथ देणारा खांदा.. मग तो कुणाचाही असो. मानसाचं आयुष्य किंवा जगणं सारखं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर हस्तांतिरत होत असतं. बालपणात आई-वडिलांच्या कडे-खांद्यावर, तरुणपणात मित्र-मैत्रिणींच्या, पुढे प्रियकर-प्रियसीच्या किंवा नवरा-बायकोच्या आणि शेवटी मुलांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात वेळोवेळी साथ देणारे खांदे बदलत राहतात, परंतु अपेक्षांचे आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदारीचे ओझे मात्र बदलत नाही. ते तसेच राहते, थेट चौघांच्या खांद्यावर जाई पर्यंत. तोवर आपले खांदे पिचत राहतात... पुन्हा हक्‍काच्या दुसऱ्या खांद्यांचा आधार घेण्यासाठी.

एकमेकाच्या आनंदात, सुख-दुखाःत सहभागी होण्यासाठी विसंबून राहण्यायोग्य दोन खांदे आपल्या हक्‍काचे असावेत. अशी इच्छा प्रत्येकाच्या सुप्त मनात असते. प्रत्येक वेळी ती इच्छा व्यक्‍त होईल किंवा आपण ती व्यक्‍त करू असे नाही.. आयुष्याचा एकाकी एकलकोंडा प्रवास सुखकर होण्यासाठी असे खांदे मोलाची मदत करत असतात. सुख-दु:खात साथ देणारा नि:स्वार्थी खांदा ज्यांना मिळाला, ते खरे भाग्यवंत. मग त्या खांद्यांवर डोकं कुणाचंही असो. पालकांच, मित्राचं, मैत्रिणीचं, नवऱ्याचं किंवा एखाद्या जीवा-भावाच्या पाळीव प्राण्याचेही.

जीवाला जीव देणारे आश्‍वासक आणि मुख्य म्हणजे आपली स्वंदने अचूक झेलणारे खांदे किती जणांना मिळतात, आपला खांदा असा कुणाच्या उपयोगास येतो. सध्याच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणा किंवा आपण स्वीकारलेल्या कातडीबचाव धोरणाचे एक आवरण, पण मानसाची संवेदनशील, भावनिकता झपाट्याने कमी होत आहे. तिचं दर्शन दुर्दम्य होत आहे. सार्वजनिक जीवनात संवेदनशीलता व भावनिकतेचं प्रदर्शन म्हणजे मूर्खपणा मानला जातो. परीणामी, भर गर्दीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात मदतीचा हात पुढे करणारा संवेदनशील मनाचा एकही खांदा पुढे येत नाही. आणि अपघातग्रस्त व्यक्‍ती भर गर्दीत आधारविना प्राणास मुकते. केवळ योग्य वेळ, योग्य आधार, योग्य मदत न मिळाल्यामुळे अशा शेकडे दुर्घटना दरवर्षी घडत असतात. मदत करणारा समाज, लोक, नागरिक म्हणजे तरी कोण, आपणचं ना, मग आपणच आपल्याच भावना आपण समजून घेण्याऐवजी एकमेकांना आधारासाठी खांदा पुढे करण्याऐवजी भावना शून्यपणे पुढे निघून जाण्याचं लज्जास्पद कृत्य आपण करू लागलो, तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ?

संकट काळात बिकट परिस्थितीत प्रत्येक वेळी श्रीकृष्ण-सुदाम्याचे, शोलेमधील जय-विरूचे किंवा अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे तर "फायर' मधील शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्यासारखी संवेदनशील मने आणि बळकट खांदे आपल्याला उपलब्ध होईल असे नाही. आपण आपले जीवन जगताना अनेकदा आपल्या कल्पनेतील सुखाच्या मागे धावत असतो. जीवन कसं जगावं आणि जगणं कसं पेलावं याबाबत बोलताना असं म्हटलं जातं की, तुमच्या वाट्याला आलेलं जीवन आणि त्यातील सुख-दु:खाचा प्रत्येक क्षण समजूण जगा. त्यातील पराकोटीचा आनंद आणि पराकोटीचे दु:ख मुळापासून शोषून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या संवेदन शीलतेच्या जोरावर जगण्याचा महोत्सव करा. जगण्याचा महोत्सव करायचा तर आयुष्यातील प्रत्येक क्षण वेध घेणारं संवेदनशील मन आणि त्या मनाचे धुमारे कवेत घेणारे आणि आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही आयुष्याचा महोत्सव करणारे बळकट खांदे आपण निर्माण करायला हवेत आणि अर्थात सुरुवात स्वतःपासून करावी लागेल.

जीवनाच्या प्रवासात योग्य वेळी आश्‍वासक, विश्‍वासार्ह खांदा न मिळाल्यामुळं वाहवत गेलेल्या भग्न, उद्‌ध्वस्त झालेल्या संवेदनशील मनाचे मर्मस्पर्शी चित्रण कवी श्रीकृष्ण राऊत यांनी केले आहे. ते म्हणतात.

""माझी भकास शिल्पे,

शोधीत काल होता..

कोण्या व्यथेचा,

ऐने महाल होता.

ठेऊन काळजाला,

शिंक्‍यावरी धरियाण...

सांत्वनास आला,

माझ्या रूमाल होता.

स्वस्तात फार ज्याने,

विकले मला अवेळी...

गव्हाळ कातडीचा,

कोण दलाल होता..

सौभाग्या रेखनारे,

कुंकूच भासले जे...

कोण्या तरी मढ्याचा,

तोही गुलाल होता.

अशा परिस्थितीत आपलीही एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर चाललेली वाटचाल नक्की कोणत्या दिशेने आहे, कधी संपणार कुणालाच ठाऊक नसतं. आयुष्याच्या या प्रवासात आपल्या हक्काच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करता आली, तसे भाग्य लाभले तर जीवनाच्या वाळवंटातही सुखद क्षणांची कारंजी फुलतात, असे क्षण अनुभवण्यासाठी आपणही आपला खांदा एखाद्या हातासाठी पुढे करायला हवा.

--संतोष

1 comment:

डॉ.श्रीकृष्ण राऊत said...

श्री संतोष डुकरे’
स.न.
‘एक संवेदनशील खांदा’ या लेखात
आपण माझी ‘गुलाल’ ही गझल उद्धृत केली.
त्याबद्दल मी आपला आभारी आहे. गझल उद्धृत करताना काही शब्द चुकले. काही वगळल्या गेले. ती गझल अशी आहे-


माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.

वरीलप्रमाणे तिला दुरुस्त करावे,ही विनंती.

आपल्या ब्लॉगला मन:पूर्वक शुभेच्छा.

आपला,

डॉ.श्रीकृष्ण राऊत
श्री संतोष डुकरे’
स.न.
‘एक संवेदनशील खांदा’ या लेखात
आपण माझी ‘गुलाल’ ही गझल उद्धृत केली.
त्याबद्दल मी आपला आभारी आहे. गझल उद्धृत करताना काही शब्द चुकले. काही वगळल्या गेले. ती गझल अशी आहे-


माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.

वरीलप्रमाणे तिला दुरुस्त करावे,ही विनंती.

आपल्या ब्लॉगला मन:पूर्वक शुभेच्छा.

आपला,

डॉ.श्रीकृष्ण राऊत,
http://mazigazalmarathi.blogspot.com

://