Sunday, December 28, 2008

कुंपन

एकूलता साकव....
वाहती नदी,
तिचाच सोबती
नागमोडी रस्ता,
दूरवर....

दूरवर...
एकांतच साधणारं,
पुणेरी जोडपं
वाहतं पाणी,
वाहत्या भावणा
आपल्याच नादात,
पाण्यात...

पाण्यात...
झेंडूचा हार,
मिरच्यांची माळ
शिकारी खंड्या,
आणि चोचितील
तडफडता मासा... साकवावर...

साकवावर...
सारीचं यंत्र,
काही सजिव काही निर्जिव,
व त्यांचं मरण येईपर्यंतचं
जगत रहाणं.... आजूबाजूला...

जाहिरातीच्या बोर्डवर,
हसणारी बाई,
फिरत्या घारी आणि
चरख्यावरील गांधी
निराधार एकाकी अस्वस्थ... नदीकाठी..

नदीकाठी... तिच दलदल,
तेच कावळे आणि
तेच सडाऊ शेवाळ
कागदाचे कपटे आणि
बरच काही... तळात...

नदीच्या तळात...
पश्‍चिम लाली,
साकवी सावली,
काठावरील कुंपन
नदीच्या... साकवाच्या... आणि माझ्याही...

कुंपन...
नदीला... मलाही...
तरीही शांत, तरीही गप्प
अवचित एखादा हुंदका
आणि थरथर ह्दयाची
फक्त क्षणभर...

Santosh Dukare (Z Bridge, Pune, 2006)

Friday, December 26, 2008

गर्दी

गर्दीत सुरक्षित वाटणं साहजिक असतं. पण एकदा ही सुरक्षितता आवडू लागली, अंगात भिनू लागली की आपलं आयुष्यच या गर्दीबरोबर वाहू लागतं. भरकटू लागतं. शिड नसलेल्या जहाजासारखं, इतस्तत...

गर्दी, हजारो लोकं चालत असतात. खांद्याला खांदा लावून. आपणही त्यातलेच एक. रोजचं जिणं जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या केविलवाण्या धडपडीत आपण हरवून, हरखून गेलेलो असतो. कधी आपल्या अल्पजिवी आणि अवास्तव स्वप्नांच्या, तर कधी दुसऱ्यांनी व्यक्‍त केलेल्या अपेक्षांच्या वाटेने चालताना आपलं स्वतःचं आभाळच हरवून जातं. गर्दीचे सुरक्षित वातावरण, संकटांपासून बचाव होण्याची खात्री आणि मी संकटातही एकटा नाही, याचं एक कल्पित समाधान हेच आवडू लागतं. पण सावधान ! इथच खरी मेख आहे.

एकदा का तुम्हाला ही गर्दीतील सुरक्षितता आवडू लागली, की आपल्याच नकळत आपण गर्दीच्या आत आत ओढले जातो. आपली अवस्था मोटारसायकलच्या पाठीमागे निरर्थक धावणाऱ्या कुत्र्यासारखी होते. क्षणिक मोहालाबळी पडून आपण आपल्याला विसरतो आणि तथाकथित भासमान चौकटीत अडकतो. निरर्थक, आभासमान गोष्टींच्या मागे धावत राहतो. एखाद्या खाऊन सुस्त झालेल्या अळीप्रमाणे स्वतःच्याच कोशात गुरफटत जातो. एखादी ठेच लागल्यानंतर हा कोश फाडून बाहेर येणं आणि बाहेरील जगाकडे बदललेल्या नजरेनं पाहणं, खूपच थोड्या सुरवटांना जमतं. ज्यांना जमतं ते भाग्यवंत.

जगाच्या रहाटगाडग्यात मिसळून आणि त्यानंतर घुसळून मार्गक्रमण करताना आपल्या जीवनरुपी जहाजाची एक अदृश्‍य दोरी ध्येयरूपी, संस्काररूपी खुंट्याला घट्ट बांधलेली असली, तर जहाज भरकटत नाही. असं माणसशास्त्रज्ञ सांगतात. रोजच्या भाऊगर्दीतून मार्गक्रमण करताना आपला खुंटा वेळोवेळी हलवून बळकट करावा लागतो. स्वतःच्याच कसोटीवर स्वतःला घासून घ्यावं लागतं. जीवनाच्या प्रवासात आपले ध्येय, उद्दिष्टं आपली स्वतःची असली तरी गर्दीतून मार्गक्रमण करताना जुळणारे आणि तुटणारे भावबंध त्यांना सोनेरी, रुपेरी किंवा काळी झालर लावत असतात.ठेच लागल्यानंतर, गर्दीतून बाहेर जाऊन सिंहावलोकन केल्यास गर्दीचा खरा चेहरा आ वासून आपल्यापुढे उभा राहतो.

गर्दीचं बाहेरून दिसणारं विश्‍वरूपदर्शन फार वेगळं असतं. ओळखीचे चेहरे अनोळखी बनतात. कठीण प्रसंगात साथ देण्याचे वचन दिलेले हातही लोकरीच्या मऊ उबदार खिशांमध्ये जाऊन बसतात. यावेळी जाणीव होते आपल्या असाहाय्यतेची. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे प्रसंग येतील असे नाही आणि " प्रत्येक अनुभव स्वतःच घ्यायला हवा,' असेही नाही. दुसऱ्याच्या अनुभवावरुनही आपण खुप काही शिकू शकतो. (कथा, कादंबऱ्या आणि कविता आपल्याला हेच तर शिकवतात ना...) शेवटी, वेदनेतील बोचऱ्या दु:खाला कवटाळून त्याला गोंजारत जगायचं की, त्याला आपल्या पायाखाली घेऊन आपली उंची वाढवायची, हे आपणच ठरवायचं.

गर्दीचे स्वरूपच असते वाहत राहण्याचे. आपल्यात सामील होईल त्याला वाहून नेण्याचे. ही वाहती गर्दी जेव्हा चुकीच्या मार्गाने जाते, तेव्हा तिला झुंडीचे स्वरूप येते. या झुंडीच्या प्रत्येक चालीचे बरे वाईट परिणाम समाजाला (व्यक्ती, व्यक्तीसमुहाला) भोगावे लागतात. रोजच्या जगण्याच्या स्पर्धेत तुमच्या बरोबर धावणारे आणि स्वतःचा चेहराच हरवून बसलेले असे कित्येकजण सभोवताली दिसतिल. असं असलं तरी गर्दीचा खरा चेहरा कोणता? गर्दीचा चेहरा पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी तुम्ही स्वतःभोवतीचा कोश तोडायला हवा. गर्दीतून बाहेर यायला हवं. निष्पक्षपातीपणे तुलनात्मक परीक्षण करण्याची इच्छाशक्‍ती आणि दृष्टी तुमच्याकडे हवी. या दृष्टीने पाहिल्यास दिसणारी गर्दी ही बहुमितीय (मल्टीडायमेन्शनल) असेल.

मानवी स्वभावाचे गुण-दोषाचे, प्रेमाचे, राग - लोभाचे टोकाच्या प्रत्येक भावनेचे विनामूल्य आकलन, अनुभव गर्दीतच पाहता येतो. काही नाही, गर्दीतून बाहेर पडायचं आणि तिऱ्हाईतपणे गर्दी न्याहाळत बसायचं. जे दिसेल त्याचा अन्वयार्थ लावायचा. समोरची गर्दी कुठलीही का असेना, गणपती पाहणासाठी रस्त्यांवर फिरणारी, राजकारण्याच्या सभेला वा शोकसभेला जमलेली किंवा बस स्थानकावर स्वतःची धुंदी कायम राखत लय पकडण्याच्या प्रतीक्षेत असलेली, त्यातील प्रत्येक चेहरा बोलत असतो. जुनी कोडी सुटत असतानाच नवीन तयार होत असतात. माणूस वाचायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर गर्दी समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही.

तुमची इच्छा असो वा नसो, गर्दीच्या कोणत्या ना कोणत्या वर्तुळात तुमचा सहभाग होत असतो. गर्दी तिच्या स्वतःच्या वेगात, स्वतःच्या मस्तीत आपल्या बटा आणि छटा उडवीत धावत असते. आपण फक्‍त प्रयत्न करायचा, तिच्या हदयाची कंपने पकडण्याचा. आणि तिच्या अचूक विश्‍लेषणाने आपली उंची वाढविण्याचा. पण हे करत असताना आपले पाऊल गर्दीत भरकटणार नाही; याचीही खात्री असायला हवी.

शाही कभी परवाझसे
थककर नही गिरता ...

तुटे भी कभी तारा
तो जमी पर नही गिरता

गिरते है शौकसे समुंदर मे दरिया
पर समुंदर किसी दरीयामें नहीं गिरता

(गरुड कधी झेप घेतल्याने थकून पडत नाही, तारा तुटला तरी कधी जमिनीवर पडत नाही. समुद्रामध्ये अनेक नद्या स्वतःहून सामील होतात; परंतु समुद्र कधी नदीमध्ये सामील होत नाही.) तेव्हा गरुड, तारा आणि सूर्याप्रमाणे गर्दीतही तुमचं वेगळेपण तुमच्या वैशिष्ट्यांसह जपा, हाच अन्वयार्थ लक्षात घेऊन थोडं थांबा... गर्दीतून जरा बाजूला व्हा... आणि सिंहाच्या नजरेनं पुन्हा तिच्याकडे पाहा, आपली चौकट निश्‍चित करा... खुंटा हलवून पाहा आणि मग पुन्हा गर्दीत सामील व्हा... एक नवी झेप (परवाझ) घेण्यासाठी उद्याच्या सोनेरी पहाटेसाठी...

- संतोष डुकरे

Thursday, December 25, 2008

शापीत

काट्याला खेटून काटा
काट्याशेजारीच उभा
कोवळ्या कोमल आशेची
कुठे आलिय मुभा...

दिवस महिने साल
ऋतू मागून ऋूतू गेले
आणि मग आभाळ फाटले
निसर्ग भोग का कुना चूकला

जन्म झाला काट्या कुट्यात
जन्माने मी शापीत
तरीही हसले, तरीही फुलले
उमललेही हळूहळू

पण, खुडले मला स्वार्थ्यांनी
यात माझा काय गुन्हा ?
सरणावर पसरविल्यावर
मी शापीत पुन्हा....

---संतोष.
(ऑगस्ट 2004 - येगाव, ता. चिपळून, जि. रत्नागिरी)

मुकी माती

कधी काळी मुक्‍या शब्दांशी
तो नेहमीच भांडायचा,
त्याचे शब्दन शब्द
धाटा धाटातून डुलायचे...

सांज सकाळी
काळ्या कागदावर
तो रेघोट्या मारत बसायचा
कधी आईकडं,
तर कधी बापाकडं
नुसतं पाहत राहायचा...

आई रुसली,
बाप कोपला,
पण हार कधी मानली नाही,
चूल कधी विझली नाही...

अखेर...
उन्हाळ्यामागून उन्हाळे गेले
पण ऊन कधी सरलंच नाही
नियती कधी फिरलीच नाही....

नशिबाच्या भोगापूढं
घाम गाळून थकला
दाही दिशा फिरून फिरुन
काळापूढे टेकला...

आयुष्याचा लेखाजोखा
पेपरात दोन ओळीत आला...
कर्जाला कंटाळून
शेतकऱ्याची आत्महत्या...

(Jan 2003, Saralgaon, Tal - Murbad, Dist - Thane.)
--संतोष

Tuesday, December 2, 2008

पाणावले डोळे...

काही नाही काही नाही
सखे माझ्या माझ्या ग घरात
तव्यावर लाही लाही
सदा पालथी परात

सखे माझ्या आयुष्याला
सदा दारिद्य्र्‌ाचे कोडे
काळे फुटके नशीब
पायी कर्जाचेही तोडे

माझ्या कुणबी मनाला
नाही ऐश्‍वर्याचा ध्यास
आळे बळे पोटी जातो
चार दाण्यांचा तो घास

माझ्या रापल्या हातांना
सदा घामाचा ग वास
नको सोडू माझ्यासाठी
सूर्या चंद्राची तू आस...

तू ग शुक्राची चांदणी
मी कुणबी चाकर
माझ्या शेणाच्या भिंतीत
कशी खाशिल भाकर

माझी शेवटची इच्छा
एक सखे ग बावळे
माझ्या साठी नको चाखू
तू ग विषाचे आवळे

नको पाहू नको पाहू
सखे माझ्या गं डोळ्यांत
माझा ग जीव भोळा
प्राण डोळ्यांतच गोळा

जा विसरून मला
माझा रस्ता ग काटेरी
जळी स्थळी तुझ्यासाठी
वाट होईल रुपेरी

भेट क्षणांची आपूली
मनी आसवांचे खळे
जा फिर तू माघारी
पूस पाणावले डोळे...

संतोष (BVB, Kothrud, Pune. 2007)