Sunday, February 1, 2009

आठवणींच्या पोतडीतून - संतोष गावशेते

संतोष रामदास गावशेते. मु. पो. पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे. सध्या नोकरीच्या निमित्ताने सहकुटुंब मुंबईत स्थायीक. संत्या आणि मी पाचवी ते बारावी आठ वर्षे एकत्र शिकलो. माध्यमिक शाळेतील मित्रांपैकी संत्याबरोबर माझा सर्वाधीक काळ गेला. आणि त्याच्याकडून शिकायलाही भरपूर मिळाले. अजूनही शिकतोय...

मी संत्याला पहिल्यांदा पाहिला पाचवीला पिंपरखेडला गेलो तेव्हा. श्री. दत्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय पिंपरखेड येथे. तो मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला असला तरी अभ्यासात मात्र उच्च मध्यमवर्गीय होता. आमच्या सर्व मित्रांच्या कोंडाळ्यात गावशेत्यांचा संत्या म्हणजे अवलिया कारटं. प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायाचा भांडणांमध्येही. खोखो म्हटले... की संत्या आहेच. गॅदरिंग म्हटले की संत्या आहेच. हत्तीची सोंड खेळायचं ते तेथेही संत्या हत्ती पुढे पळायला मोकळा. बहुधा आम्ही 9 वी ला असू. शाळेच गॅदरिंद होतं. त्यात संत्याची दोन गाणी जब्बरदस्त गाजली. लाडला चित्रपटातील "मॉ मै तेरा लाडला' आणि साजन मधील "देखा है पहली बार साजन के आँखो मे प्यार' ही दोन गाणी. त्याचा आवाजही एकदम छान होता. आता बरेच दिवस झाले त्याचे गाणे कानावर आले नाही. त्याची सामाजीक जाण आणि आकलन जब्बरदस्त आहे. लहानपणी काही चटके बसल्यामुळे असेल कदाचित. संत्याने त्याच्या वागणूकीने मला लाज वाटावी असे अनेक प्रसंग माझ्यावर आणले. म्हणून तो मला सर्वाधिक आवडतो. तो स्पष्टवक्ता आहे, एवढा की एकाद्या मुलीचा राग आला (तिने जास्त नखरे दाखविल्यावर) तर तो तिला तोंडावर... ए कारटे ! नको सांगू तुझं भुषाण.... असं ऐकवायला मागे पुढे पाहणार नाही.

संत्या शाळेत खोखो खेळायचा. हाफ चड्डी, त्यावर पांढरा शर्ट आणि केसांचा कोंबडा. वर्ग बदलले, शाळा बदलल्या, मास्तर बदलले मात्र संत्याच्या केसांचा कोंबडा कधी बदलला नाही. नववीला असताना एनसीसीचे सांबारे सर त्याचा कोंबडा धरून त्याला गोल गोल फिरवायचे. हा ओरडायचा. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा कोंबड्यासह वर्गात हजर. एकदा सरांनी पीटीच्या तासाला त्याचा कोंबडा कापायला न्हाव्याला वर्गात बोलावून घेतले. तेव्हा कोठे त्याने कटींग केली.

संत्या, लिंबाजी बोंबे आणि मी आम्ही तिघे दहावीनंतर अकरावी सायन्सला मंचरला महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. तीनही घोड्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पेंड खाल्ली. तीघांमध्ये समान फटका देणारी गोष्ट म्हणजे इंग्रजीची भिती. इंग्रजीने आमचा घात केला. तीघेही 11 वीला काठावर पास झालो. बारावीत मी फिजिक्‍स आणि गणितात नापास झालो तर संत्या काठावर पास. लिंबाजी बारावीला मंचर कॉलेज सोडून मुंबईला गेला. त्यालाही कमी मार्क पडले. शिक्षणाची परवड सुरु राहिली. मात्र आमच्या सर्व उद्योगांची बित्तबातमी आमच्या शाळेत पोहचत होती. मी व लिंबाजी पिंपरखेडला जात नव्हतो. संत्या रोज एसटीला बसायला गावात जायचा. त्याला रोज एखादा मास्तर भेटायचा. जास्त करुन प्राचार्य शेळके सर आणि शेळके बाई. बिचाऱ्याला त्याच्याबरोबरच आम्हा दोघांच्या वाट्याच्या शिव्याही त्यालाच खाव्या लागत. तुम्ही तिघांनी शाळेचे नाव बदनाम केले आदी... त्यानंतर तो जेव्हा भेटेल तेव्हा पहिल्‌े शेळके बाई आणि सरांचे कोरडे बोल सांगत बसायचा. आणि आणखी जिव काढायचा... त्या प्रत्येक वेळी त्याची तळमळ असायची टॉपर लोकांपेक्षा यशस्वी होण्यासाठी.

मी नापास झाल्यानंतर पुन्हा बारावीला बसलो. पुन्हा नव्या दमानं संधी घेतली. तर या बहादराने पास झालेला असताना बोर्डाने त्याला नापास करावं म्हणून रीचेकिंगचा अर्ज भरला. पुन्हा बाराविला बसून चांगले मार्क मिळविण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या दुदैवाने त्याचा निकाल नो चेंज म्हणून आला. आणि त्याचा नाविलाज झाला. एक वर्षे घरी शेती केल्यानंतर त्याने नारायणगावला बीएस्सीला प्रवेश घेतला. तीन वर्षांनी रसायणशास्त्राची पदवी घेवून जगाच्या घावूक बाजारात दाखल झाला. या पाच वर्षांत संत्याचा आणि माझा जास्त संबंध आला नाही. कधी मधी तो मला नारायणगावला एसटीत भेटायचा अभ्यासाविषयी, आई-वडीलांच्या कष्टाविषयी आणि वर्गातील मुलींविषयी भरभरुन बोलायचा.

11 वी व 12 वीला असताना संत्याने काय केले नाही. त्याचे आजोबा (मामाचे वडील) मंचरजवळील एकलहरे येथिल "यस सर" मिनरल वॉटर कंपनीत रात्री वॉचमन म्हणून काम करत. हा रात्री तेथे कामाला जाई. आजोबांचा डबा नेई. आजोबांना विश्रांती देवून स्वतः राखण करत बसे. (रात्री येताना एखादी पाण्याची बाटली आणत असे... संत्याने मला आयुष्यातील पहिल्यांदा मिनरल वॉटरची चव चाखविली. मात्र त्यापेक्षा आमच्या कुकडी नदीचे पाणी चांगले होते हा भाग वेगळा.) तो दर रविवारी मंचरच्या बाजारात पावत्या फाडायचे काम करायचा. त्याचे त्याला पैसे मिळायचे. त्याचं पाहून माझ्या मनात आमच्या मळ्यातील दुध डेरीवरील दुधाची पिंप (कॅन्ड) धुवून महिना दोनशे रुपये कमविण्याचा विचार केला. मात्र हा विचार तिर्थरुपांपुढे मांडल्यावर ""दुध डेअरीचा चेअरमन व्हायचं सोडून तुला कॅंडं धुन्याची स्वप्न पडायला लागली का'' असं ऐकावं लागल. वडिलांचं बरोबर होतं, हे योग्य वेळी कळंलं. संत्या दर पंधरा दिवसांन महिन्यानं घरी शेतात जास्त काम निघाल्यावर गावाला जायचा. त्याच्या मामाच्या घरी मी दोम वेळा गेलो होतो. मंचरच्या जवळ एक वाडी आहे. निघुटवाडी असावी बहुधा. तेथे त्याच्या आजोबांचे घर होते. तेथे राहून तो शिकत होता.

दोन वर्षे झाली. संत्याचे लग्न झाले. गावचीच मुलगी केली. त्याच्या संसारवेलीवर एक गोंडस कळी उमलली आहे. सध्या मुंबईत कोणत्या तरी केमिकल लॅब मध्ये नोकरी करतोय. सुखी आहे. आणि हो... मुख्य राहिलंच त्यांचं आमच्या क्‍लासमधील टॉपर मुलांपेक्षा चांगलं काम करण्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. (असं मला वाटतं.). कौटुंबिक, आर्थिक, सामाजिकआणि भावनिकदृष्या तो स्थिर झाला आहे. कदाचीत आमच्या बॅचमध्ये सर्वार्थानं यशस्वी तोच असावा. गाणी ऐकण्याची आवड हा संत्याचा आणि माझा विक पॉईंट. कॉलेजला असताना त्याच्याकडे वॉकमन होता. साजन, धडकन, सिर्फ तुम आणि आशिकी बस्स.

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे संत्या आहे तसा राहीला. काळाबरोबर बदलला नाही. त्याचा अवखळपाणा, औलादीपणा, जिवनाकडे आणि मित्रांकडे पाहण्याची दृष्टी तशीच निकोप राहिली. त्यामुळे तो मला आजही तेवढाच जवळचा आहे... जेवढा तो आणि मी साऱ्या गावात अर्ध्या चड्डीत गळ्यात हात घालून फिरताना होता.

1 comment:

santosh said...

thanks gondya,for our friendship junya aathavani jagya karun ugach ka dolyat paani anaty? june divas gele pan barech kahi shikavun gele ani tya mulech aaj changale jivan jagat aahe.