Monday, February 2, 2009

एक संवेदनशील दुरुस्ती

माझ्या "एक संवेदनशिल खांदा' या पोस्ट मध्ये डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कवितेचा संदर्भ दिला आहे. ही कविता कानोकानी माझ्यापर्यंत पोहचल्याने त्यात काही चुका झाल्या आहे. डॉ. राऊत यांनी याबाबत तात्काळ प्रतिक्रीया दिली. याबाबत मी त्यांच्या ऋणाईतच राहू इच्छीतो...

श्री संतोष डुकरे’

स.न.

‘एक संवेदनशील खांदा’ या लेखात आपण माझी ‘गुलाल’ ही गझल उद्धृत केली.त्याबद्दल मी आपला आभारी आहे. गझल उद्धृत करताना काही शब्द चुकले. काही वगळल्या गेले. ती गझल अशी आहे

-माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;

तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;

तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही

-श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;

निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्मग

सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;

कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.

वरीलप्रमाणे तिला दुरुस्त करावे,ही विनंती. आपल्या ब्लॉगला मन:पूर्वक शुभेच्छा.

आपला,

डॉ.श्रीकृष्ण राऊत

No comments: