Thursday, February 5, 2009

ही रांग कुठे जाते...?

देहू-आळंदीहून पंढरपूरला दिंडी, वारी जाते. अनेक लोक त्यात सामील होतात. एकमेकांच्या हातात हात, गळ्यात गळा घालून एका सुरात मार्गक्रमण करतात आणि उद्दिष्ट पूर्ण झाले की, आपापल्या मार्गाने वेगळे होतात. शतकानुशतके ही दिंडी सुरूच आहे. काळ बदलला, माणसं बदलली. मात्र, दिंडी सुरूच आहे. तिचा मार्ग ठरलेला आहे. आपलं आयुष्यही अशीच एक दिंडी असते. सभोवतालच्या लोकांबरोबर आपल्या आयुष्याची दिंडी सुरू असते. पावलोपावली येणारे अनंत अनुभव आपले आयुष्य घडवत असतात. मुखातून कधी हर्षातिरेकाच्या आरोळ्या बाहेर पडतात, कधी दु:खाचा हुंदका आणि उन्मादाचे हुंकारही.

----असे अनेक क्षण आपल्या जीवनाला रूपेरी किनार आणि चंदेरी झालर लावून जातात किंवा सरऴ आपला कान धरून जीवनाची दिशाच बदलून टाकतात. मात्र, एवढं सगळं घडत असताना एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालत असतानाही प्रत्येकाचा पांडुरंग वेगळा असतो. प्रत्येकाचे ध्येय, उद्दिष्ट वेगळे असते. संपूर्ण आयुष्य सोबत काढलेल्यांच्या जीवनाचे सूर जुळले असतीलंच असे म्हणता येत नाही. दिंडी मात्र सुरू असते. या दिंडीत आयुष्याच्या एखाद्या वळणावर अचानकपणे अनेकदा नदी आटल्यासारखं, आभाळ फाटल्यासारखं वाटतं. मला नक्की काय करायचंय, मी कुठं चाललोय, आयुष्य भरकटत तर चालले नाही ना... बरं, आता चाललोच आहे, तर महत्त्वाचं काय? रस्ता की ध्येय, तत्त्व की पैसा. प्रश्‍नांची अशी एक न संपणारी मालिका उभी राहते आणि मग चूक काय आणि बरोबर काय, हा प्रश्‍नच मागे पडतो. मनाच्या वादळात सापडून विवेक पाचोळ्यासारखा उडून जातो आणि हाती राहतं आपलं आशाळभूतपणे जगत राहणं... निरर्थक... भरकटल्यासारखं... वाट चुकलेल्या जहाजाप्रमाणे सुरू असलेला प्रवास. किनारा दिसेपर्यंत सुरू राहणारं रहाटगाडगं...

----मनात तत्त्वनिष्ठेची, एकनिष्ठेची, विवेकबुद्धी आणि संस्कारांची पणती सोसाट्याच्या वाऱ्यात तेवत ठेवायला तर हवी, पण रोजच्या जगण्यात पावला पावलावर होणारे भावनिक बलात्कार कसे सहन करायचे... आशेचे दिवे विझत असताना अस्तित्व नष्ट होण्याच्या जाणिवेने होणारी जिवाची तडफड मुर्दाड डोळ्यांनी कशी सहन करायची...मंगेश पाडगावकर म्हणतात-

खबरदार...प्रश्‍न नको,

जो प्रश्‍न विचारील...

त्याची पटकन नोकरी जाईल.

माणसाला बायको असते,

बायकोला पोरे होतात,

पोरांना भूक लागते,

नोकरीला मनाचे मढे लागते.

ही रांग कुठे जाते...

ही रांग कुठे जाते...

सावधान... खाली मान,

बंद डोळे... बंद कान.

तरीपण... ही रांग कुठे जाते...?

----असाच एक प्रवास आशुतोष गोवारीकरने स्वदेस चित्रपटामध्ये दाखविला आहे. माणसांनी गच्च भरलेल्या एका होडीमधून शाहरुख खान नदी ओलांडत आहे. नदी, होडी आणि शाहरुखचं मन सर्व काही काठोकाठ भरलेलं आहे. नदी तिच्यातील पाण्याने, होडी तिच्या भाराने, तर शाहरुख त्याच्या शांत मनातील घोंगावत्या वादळाने. मात्र, किनाराआल्यावर चित्र वेगळे असते. नदीचे, होडीचे आणि शाहरुखचेही, कारण तिथे या तिघांनाही त्यांचा पांडुरंग सापडतो आणि ही रांग कुठे जाते हा प्रश्‍नही संपतो. आयुष्याची दिंडी सुरू असताना उघड्या आभाळाखाली अचानक उघडे पडल्यावर काय करायचं, असा प्रश्‍न ज्यावेळी उद्भवतो त्या प्रत्येक वेळी ज्याचा त्याचा पांडुरंग मार्ग दाखविण्यासाठी उभा असतो. तुम्हाला फक्त त्याचा बोध व्हायला हवा. असंही म्हणतातकी, आपण फक्त आपलं उद्दिष्ट, ध्येय ठरवायचं आणि बाहेर पडायचं... रस्तेच स्वतःहूनच आपला मार्ग आखत असतात. आपण फक्त आपल्या पांडुरंगावर विश्‍वास ठेवून चालत राहायचं असतं. आपल्या आयुष्याच्या प्रवासाचं अंतिम स्थानक एकदा ठरविलं की, मार्गाचा आणि त्यात येणाऱ्या अडथळ्यांचा बाऊ होत नाही आणि ही रांग कुठे जाते हा प्रश्‍नही राहत नाही.

No comments: