Saturday, March 14, 2009

पीएचटी आडातच नाही...

कृषी शिक्षण आणि "पीएचटी' यांच्यातील दुराव्यावर प्रकाश
-----------------

---काढणीपश्‍चात तंत्रज्ञान प्रसार, शिक्षण व संशोधनाचा वेग धीम्यागतीने सुरू आहे. या कामाला योग्य दिशा देण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग निर्माण करण्याची गरज आहे.
---"अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उत्पादन व उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे; मात्र उत्पादकता वाढीमुळे निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या प्रक्रियेचे काय, हा प्रश्‍न अजून कोणीही उपस्थित करत नाही.''
---""देशात हरितक्रांती व धवलक्रांतीमुळे उत्पादन वाढले; मात्र त्या गतीने काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत पुरेसे संशोधन झाले नाही. केंद्र शासनाचे अनेक संशोधन प्रकल्प कृषी विद्यापीठांनी गुंडाळून ठेवले आहेत.''

-----------------
सध्या पदवी पातळीवरील कृषी अभ्यासक्रमात काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाशी संबंधित दोन विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये काढणीपश्‍चात हाताळणी, प्रक्रिया करून बनविण्याचे पदार्थ व काढणीपश्‍चात यंत्रसामग्री याबाबत प्राथमिक माहिती देण्यात येते; मात्र या विषयाची सखोल व नवीन संशोधनाचा या अभ्यासक्रमात समावेश नाही. हा अभ्यासक्रमही फळे, भाजीपाला व बियाणे इथपर्यंतच मर्यादित आहे. काढणीपश्‍चात तंत्रज्ञान शिक्षणाची बहुतेक जबाबदारी कृषी अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. सध्या कृषी विद्यापीठांमधून खासगी अन्नशास्त्र (फूड सायन्स) पदवी महाविद्यालये नव्याने सुरू होत आहेत; मात्र तेथेही काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर किती जोर दिला जातो, हा वादाचा मुद्दा आहे. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबतची ही उदासीनता पदव्युत्तर पदवी शिक्षणातही कायम आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काढणीपश्‍चात तंत्रज्ञानासंबंधी पदव्युत्तर पातळीवर स्वतंत्र अभ्यासक्रमांची रचना काही महिन्यांपूर्वी केली; मात्र तरीही हा अभ्यासक्रम अजून प्रत्यक्षात आलेला नाही. आता काढणीपश्‍चात अभ्यासक्रमाऐवजी विद्यापीठाने कृषी उद्योग व्यवस्थापनावर जोर दिला आहे.

राज्यातील काही कृषी विद्यापीठांनी स्वतंत्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभाग व महाविद्यालये सुरू करण्याचा प्रयत्न नुकताच केला. त्याविषयीची सर्व कागदी कार्यवाही पूर्णही झाली होती; मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानापेक्षा अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची जास्त आवश्‍यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत झाल्याने या अभ्यासक्रमाचे रूपांतर अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमात करण्यात आले. सध्या राज्यात अनेक ठिकाणी खासगी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयांमध्ये काढणीपश्‍चात तंत्रज्ञान हा विषय अनेक विषयांपैकी एक म्हणून शिकविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेअंतर्गत पदवी अभ्यासक्रमात बेकरी उत्पादने, अन्नाची साठवणूक, फिश प्रोसेसिंग टेक्‍नॉलॉजी, यंत्रसामग्री यासंबंधीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. देशात कोइमतूर येथील "पोस्ट हार्वेस्ट टेक्‍नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट' व म्हैसूर येथील "सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट' या दोन संस्था अन्नधान्य प्रक्रिया संशोधनामध्ये आघाडीवर आहेत. अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धन या संदर्भात पायाभूत संशोधन या ठिकाणी सुरू असते. यासंबंधातील काही प्रशिक्षण वर्ग आणि अभ्यासक्रमही लोकप्रिय आहेत.


--बदल आवश्‍यक...

या पार्श्‍वभूमीवर सरकारने अमेरिकेच्या धर्तीवर राज्यात काढणीपश्‍चात शिक्षण, संशोधन व विस्तार हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची गरज आहे. अमेरिकेतील विद्यापीठांत काढणीपश्‍चात तंत्रज्ञान शिक्षण, संशोधन व विस्तार हा स्वतंत्र विभाग आहे. या विभागामार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्‍टरेट दर्जाचे अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन आणि विस्ताराचे कामही याच विभागामार्फत केले जाते. स्वतंत्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभाग आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये सुरू केल्यास या क्षेत्रात पायाभूत काम होऊ शकते. अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उत्पादन व उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे; मात्र उत्पादकता वाढून निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या प्रक्रियेचे काय, हा प्रश्‍न अजून कोणीही उपस्थित करत नाही. सरकारच्या अन्नप्रक्रिया विभागाचेही याकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत (आयसीएआर) कृषी विद्यापीठांमध्ये सन 2004 पासून समन्वित काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत राहुरीला अखिल भारतीय समुचित भाजीपाला संशोधन योजना व कोल्हापूर येथे गूळ प्रक्रियेवर संशोधन सुरू आहे. या दोन प्रकल्पांचा अपवाद सोडला तर अकार्यक्षम अंमलबजावणीमुळे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबतच्या कृषी विद्यापीठांच्या इतर सर्व योजना प्रभावहीन झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील कृषी महाविद्यालयात सुरू असणारा उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्प काहीसा आशादायक म्हणता येईल. याठिकाणी कृषी पदवीधर विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही हरितगृहातील भाजीपाला, फुले उत्पादन व प्रक्रीयेबाबत प्रशिक्षण दिले जाते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतः हरितगृहे उभारून फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. मात्र या शेतकऱ्यांची काढणी पश्‍चात तंत्रानाबाबतची समस्या पूर्णपणे सुटली असे छातीठोकपणे म्हणता येत नाही.

सध्या अनेक कंपन्या कृषी महाविद्यालयात येऊन पदवीधरांची थेट भरती करत आहेत; मात्र या कंपन्यांमध्ये विविध बॅंका, विमा कंपन्या, खते, औषधे उत्पादक व वितरण कंपन्यांचा समावेश आहे. प्रक्रिया उद्योग, आयात निर्यात कंपन्या यांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. तरीही या कंपन्या विद्यापीठांपासून दूर आहेत, कारण त्यांना आवश्‍यक असलेल्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती असलेले विद्यार्थी उपलब्ध नाहीत. यासंबंधी कोणतेही स्वतंत्र अभ्यासक्रम सध्या विद्यापीठांकडे उपलब्ध नाहीत. शिक्षणसुविधा वाढविण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व निधी उपलब्ध नाही, या कारणाखाली कृषी शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा सपाटा कृषी विद्यापीठे व कृषी परिषदेने सुरू केला आहे; मात्र खासगी शिक्षण संस्थांना मान्यता देत असताना उद्यानविद्या, कृषी, कृषी तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान शाखांचा योग्य समन्वय राखण्यात आलेला नाही.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी "मागे वळून पाहताना' हा वर्षातील कामांचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवाल दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठात एक वर्षाच्या कालावधीत अनेक परिसंवाद, चर्चा, मेळावे, शिवार फेऱ्या व प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या; मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानासंबंधी एकही परिसंवाद किंवा कार्यशाळा घेण्यात आली नाही. वर्षभरात पुण्यातून विक्रीस ठेवलेल्या काढणीपश्‍चात हाताळणी अवजारांपैकी फक्त एक चतुर्थांश अवजारांची विक्री झाली आहे. त्यात भेंडी तोडणी यंत्रे पाच, आंबा झेलण्या सात, 86 वैभव विळे व 38 मका सोलणी यंत्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त काढणीपश्‍चात तंत्रज्ञानासंदर्भात विद्यापीठाने आंबा, केळी व अंजिरासंदर्भात फक्त चार शिफारशी केल्या आहेत. यावरून विद्यापीठाच्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत सुरू असलेल्या कामाचा अंदाज येण्यास हरकत नाही.

काही अपवाद वगळता विद्यापीठे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत उदासीन आहेत. विद्यापीठांचे सर्व लक्ष उत्पादनवाढ, तणनियंत्रण, कीडनियंत्रण या बाबींकडेच आहे. शिवार फेरी, एकात्मिक कीडनियंत्रण प्रात्यक्षिके, सिंचन सुविधा प्रात्यक्षिके मोठ्या संख्येने होत असताना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान प्रसार प्रात्यक्षिकांबाबत अवाक्षरही काढले जात नाही. त्यामुळे लागवड, उत्पादन त्याचा काही प्रमाणात प्रसार एवढ्यावरच विद्यापीठांचे काम थांबत आहे. त्यामुळे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान शिक्षण व संशोधनाची अवस्था खोल समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे.

--प्रक्रियेविषयी स्वतंत्र संशोधन केंद्राची गरज

अन्नधान्य व तेलबिया आदी अन्नधान्य पिकांबाबत विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे आहेत. त्यातही फलोत्पादन पिकांची संशोधन केंद्रे खूपच कमी आहेत. प्रक्रियेविषयी स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्याची दूरदृष्टी अद्याप राज्यातील कोणत्याही विद्यापीठाने दाखविलेली नाही. शिवाय सुरू असलेल्या संशोधन केंद्रामध्ये पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे फलोत्पादक पिकांबाबत व प्रक्रियेबाबत आशादायक संशोधन फार कमी झाले आहे. यासंबंधी विद्यापीठांचे कोणतेही निश्‍चित धोरण नाही हे विशेष. भारतीय कृषी संशोधन परिषदेची राज्यात काही संशोधन केंद्रे आहेत; परंतु या केंद्रांशी राज्यातील कृषी विद्यापीठांचा विशेष संबंध असल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी एकट्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला फलोत्पादन व प्रक्रिया विकासासाठी 72 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर येथे भाजीपाला बियाणे प्रक्रिया मूभूत सुविधा प्रकल्पाचा समावेश आहे. काढणी पश्‍चात तंत्रज्ञान विकास व विस्तारासाठी निधीची कमतरता नाही, गरज आहे ती दूरदृष्टीने योग्य दिशा देण्याची व प्रभावी अंमलबजावणीची...

1 comment:

Oracle Developer said...

PHT or PHE is also a separate course in IIT Kharagpur for PG course and they award M Tech degree for the same. There are Indian Grain Storage Institues in India under ICAR and they do some work on localisation of technology. I am not sure what is happening in MPAU regarding PHT but its definately on radar of govt of Maharashtra.