Friday, March 20, 2009

अनाहत... निवडणूक प्रचाराचा आढळराव पॅटर्न

पुर्वीच्या खेड आणि सध्याच्या शिरुर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या "अनाहत' आत्मवृत्ताचे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नुकतेच मंचर येथे प्रकाशन झाले. या पुस्तकास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रस्तावना लाभली आहे.

शिवाजीदादांनी आपले विश्‍व शुन्यातून उभे केले. लांडेवाडीतील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या हजारो मुलांप्रमाणे त्यांनी सहा किलोमिटर चालत जाऊन, उपाशी राहून आणि भूक अनावर झाल्यावर चमचमित अन्नाच्या नुसत्या वासानं तृप्तीचा ढेकरं देत शिक्षण घेतले. यशस्वी उद्योगपती आणि राजकारणी म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागाला शिवाजीदादांचे विशेष कौतुक आहे. यामुळे सर्वच पक्षातील लोकांना, विशेषतः तरुणांना त्यांच्या आत्मवृत्ताबद्दल मोठ्या अपेक्षा होत्या.

शिवसेनाप्रमुखांनीही पुस्तकाच्या प्रस्तावनेत हीच भावना व्यक्त केली आहे.शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, शिवाजीरावांनी सभोवतालच्या काळोखाची पर्वा न करता स्वतःसाठी प्रकाश किरणे शोधली. "अनाहत' ही तरुणांना प्रेरणा देणारी संघर्ष गाथा आहे.शिवाजी भाजी विकता विकता सिनेमागृहात डोअरकिपर, डोअरकिपरचा शिपाई झाला. शिपाई म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्यांना सलाम ठोकत न बसता लोकांनी आपल्याला सलाम ठोकावा, म्हणून नोकरी सोडून विक्री प्रतिनिधी झाला. त्यानंतर केवळ सहा महिन्यात स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि मालक झाला. नव्या पिढीला मार्ग दाखविणारा हा प्रवास आहे. हे आत्मचरित्र असंख्य धडपडणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

मात्र शिवसेनाप्रमुखांच्या या विश्‍वासाचा फुगा फुटल्याचे हे पुस्तक वाचल्यानंतर जाणवते. गरीबीत रापलेल्या मात्र संघर्षाची, नव्या वाटा जोखण्याची इच्छा आणि धमक असलेल्या शेतकरी व ग्रामिण तरुणांनांमध्ये यातून संघर्षाची ज्योत पेटेल, अशी अपेक्षा होती. मात्र "अनाहत' मध्ये दादांनी हे सर्व बाजूला ठेवून गेल्या निवडणूकीत यशस्वी ठरलेल्या "निवडणूक प्रचाराच्या आढळराव पॅटर्न'ची पुढची आवृत्ती सादर केली आहे. हे पुस्तक म्हणजे दादांची स्वच्छ प्रतिमा घराघरात पोहचविण्याचा राजकीय प्रयत्न असल्याचे जाणवते.--प्रचाराचा आढळराव पॅटर्नआत्मकथनात आढळरावांनी काही गोष्टींचा मुद्दाम ओझरता उल्लेख केला आहे, तर काही गोष्टींकडे कानाडोळा केला आहे.

निडणूक प्रचारात घेतलेल्या मेहनतीबाबत त्यांनी "प्रचाराच्या आढळराव पॅटर्नचा' उल्लेख केला आहे. काय होता हा आढळराव पॅटर्न. गेल्या निवडणूकीत आढळरावांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता. एकट्या मंचर भागात दोन जिप गाड्या भरुन नोटा वाटण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. याव्यतीरीक्त शिवसेनेच्या प्रत्येक शाखेला एक क्वालिस किंवा तत्सम गाडी, प्रत्येक गावाचा आदर्श ग्राम विकास आराखडा, त्यासाठीचे सर्वेक्षण व त्याआधारे प्रत्येक गावाला देण्यात आलेली आश्‍वासने यातून त्यांनी खेडमतदार संघ ढवळून काढला होता. चाकण झालेली बाळासाहेब ठाकरे यांची सभा न भुतो न भविष्यती अशीच मानली जाते. निवडणूक प्रचाराची अभिनव धडक मोहीम त्यांनी राबविली. तशी ही पद्धत नवी नाही. यापुर्वी जनता दलाचे खासदार किसनराव बाणखेले यांनीही घरोघर हिंडून आपल्या डायरीमध्ये लोकांच्या समस्या लिहून घेतल्या होत्या व त्या पुर्ण करण्याचे आश्‍वासन दिलेच होते. त्याची सुधारीत आवृत्ती दादांनी गेल्या वेळी सादर केली.

यंदा आत्मकथनाच्या माध्यमातून शिवाजीरावांनी आपला संभाव्य प्रतिस्पर्धी निश्‍चत होण्याआधीच कोसभर मजल मारली आहे. आता यापुढील काळात हे आत्मवृत्त शिवसेनेच्या शाखांमार्फत शिरुर मतदारसंघातील घरोघर पोचविले जाण्याची आणि त्यातून दादांची प्रतिमा उभी जाण्याची शक्‍यता आहे. किंबहूना एव्हाना पुस्तकाच्या वितरणास सुरवातही झाली असेल. पुस्तकाच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर दादांचे छायाचित्र आहे. आतील पानांवर शिवसेनाप्रमुखांच्या चाकण येथिल भरगच्च सभेच्या प्रचंड जनसमुदायाच्या छायाचित्राचा जाणिवपुर्वक मुक्तहस्त वापर करण्यात आला आहे. कौटुंबिक छायाचित्रांमुळे दादांच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक संग्राह्य ठरेल.

--राजकीय वाटमारी

चालता चालता काट्याने काटा काढायचा हे आपल्या राजकारण्यांचे वैशिष्य. आढळरावांनी या आत्मवृत्तातून आपले ऐकेकाळचे मित्र व सध्याचे प्रतिस्पर्धी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार यांच्यावर धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते बहुतांशी यशस्वीही ठरले आहेत. ठिणगी या भागात त्यानी वळसे पाटलांशी झालेल्या संघर्षाची माहिती दिली आहे. मित्राने कसे फसविले, कसा विश्‍वासघात केला, तरीही मी वेळोवेळी त्याला कशी मदत केली, शरद पवारांनी कसे डावलले याचा पाढा त्यांनी त्यात वाचला आहे. मात्र त्याचे हे चित्रण पुर्णपणे एकतर्फी वाटते. टाळी एका हाताने वाजत नाही, हे दादांनी सोईस्कररित्या कानामागे टाकले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी दिलीप वळसे पाटलांबाबत मांडलेल्या भुमिकेबाबत वळसे पाटील यांनीही मौन बाळगले आहे. कदाचीत "प्रचाराचा आढळराव पॅटर्न' चांगलाच माहित असल्याने हा वाद वाढून त्याचा फायदा आढळरावांना मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न असावा.

No comments: