Wednesday, July 22, 2009

भासमान जगणं....

"मॅट्रीक्‍स' पाहिला का ? पाहिलाच पाहिजे, असं नाही. पण कल्पना छान आहे. माहितीच्या महाजालात वावरणाऱ्यांना "भासमान जग' नवं नाही. कृष्णाने अर्जुनाला दाखविलेलं विश्‍वरुपदर्शन वा पुराणकथांमधील दाखल्यांनुसार आणखी कोणाकोणाला झालेला "मायेचा' साक्षात्कार फारसा वेगळा असेल, असे वाटत नाही. आपल्या (?) पुराणांतील मायेचे प्रताप ध्यानात घेतले आणि मग मॅट्रीक्‍स पाहिला तर तो बालिश वाटू शकतो. मॅट्रीक्‍समध्ये दाखविलेलं संगणकाच्या मायाजालातील भासमान जगणं किंवा पुराणकथांमधील मायारुप आणि आजचं आपलं वास्तवातील जगणं यात काही फरक आहे का... निदान मला तरी तसं वाटतं नाही.

पुराणात एक आख्यायिका आहे. कोणी एक साधू वाणी (सत्यनारायणातील नाही) व्यापाराला बाहेर पडतो. त्याला लुटारु लुटतात. मोकळ्या हाताने घरी जाण्यापेक्षा मरण बरे, म्हणून जीव देण्यासाठी तो नदीकडे (कुकडी नदी असावी बहुधा) धाव घेतो. नदीचा काळाशार की निलाशार डोह पाहून स्वतःला त्यात झोकून देतो. थोड्या वेळाने त्याचे डोके पाण्याबाहेर येते. समोर एक वेगळेच जग असते. नदीच्या काठावर एक बाई (लग्न झालेली स्त्री) धुणे (धुण्यासाठीची कपडे) धुत असते. तो पाण्याबाहेर पडतो. चालत चालत जवळच्या नगरात येतो. तेथे मोठी मिरवणूक चाललेली असते. एका हत्तीच्या सोंडेत फुलांची (मंत्राभारीत आणि महागड्या...हे आलेच) माळ असते. तो हत्ती ती माळ या गरीब बिचाऱ्या साधू वाण्याच्या गळ्यात घालतो. वाणी राजा होतो. शब्द राजाज्ञा होतात. राज्य मिळते. आयत्या 8 - 10 राजकन्या बायका म्हणून मिळतात. मागचं सारं काही विसरुन तो नवं जग जगू लागतो. रमतो.

एक दिवस नामी संधी पाहून शेजारचा क्रुरसिंग राजा आक्रमण करतो. साधु वाणी त्याच्या भितीनं सारं राज्य सोडून गपचूप पळून जातो. जंगलात वणवण फिरतो, पुन्हा नवी आशा वाटते. अनेक संकटं येतात... संकट आलं की आशेच्या आशेनं पळत राहतो. मध्येच एक बाई भेटते. ती यालाच तिचा पळुन गेलेला नवरा म्हणते. याच्यावर दुसऱ्या राज्यात गुन्हा दाखल होतो. राजदरबारी केस चालते. निकाल बाईच्या बाजूने लागतो. आता तो तिचा नवरा म्हणून अधिकृतपणे तिथे राहतोय. पुन्हा एकदा त्याला कंटाळा येतो. एव्हाना तो पळण्यात निष्नात झालेला असतो. येथूनही कसाबसा सटकतो. पळापळ करत फिरत राहतो. शेवटी एकदाचा त्याला त्याचे घर सापडते. पण याचा अनेक वर्षे पत्ता नसल्याने त्याच्या बायकोने याच्याच वर्गमित्राशी (बहुधा..आश्रममित्राशी) लग्न केलेले असते. मुलं मोठी होऊन याला विसरलेली असतात. हा कोसळतो. तोंड झोडून घेतो. पुन्हा समोर प्रश्‍न उभा राहतो, आता जगायचं कशासाठी ? ठरलं ! जीव द्यायचा. पिसाळलेल्या कुत्र्याच्या वेगाने तो नदीकडे धाव घेतो. काळ्याशार की निळ्याशार डोहात स्वतःला झोकून देतो. थोड्या वेळाने त्याचे डोके पाण्याबाहेर येते. त्याला दिसतं की एक बाई नदीच्या काठावर धुणे (धुन्याची कपडे) धुत आहे. सारं काही पुन्हा सुरु होतं, पुढच्या क्रमानं... मागच्यासारखं.

माया काय असते. तर एखादी गोष्ट तुमच्या समोर येते. तुमच्या मनात तिच्या प्राप्तिची इच्छा निर्माण होते. त्यापुढे जावून तुमच्या मनातील इच्छेचे आसक्तीत रुपांतर होते, आणि मग तुम्ही तिच्या भजनी लागता. त्यापाठीमागे ओढले जाता. खुल्या नदीच्या एखाद्या डोहात भोवरा असतो. त्याच्या कक्षेत जे येईल त्याला तो आपल्यात ओढून घेतो. घुमवत ठेवतो. भवरे जास्त असतील तर त्यात सापडलेला एका भवऱ्यातून दुसऱ्यात फिरत राहतो. फसतं राहतो. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत आणि श्‍वास थांबल्यानंतरही. तसंच हे ही.

एखादी गोष्ट तुम्हाला दिसली आवडली इथपर्यंत ठिक आहे. पण जेव्हा तुम्ही तिच्याकडे झुकता तेव्हा ही माया सक्रीय होते. तुम्ही मायाजालात फसता. वास्तववादी विचार करण्याची क्षमता आणि अन्वयार्थ लावण्याची बुद्धी दिवसेंदिवस क्षिण होत जाते. मायेची गुलामगिरी आवडू लागते. आणि मग टिव्ही पाहिल्याशिवाय आपल्याला जेवण जात नाही. 21 इंची टिव्ही लहान वाटतो. त्यानंतर होम थिएटर हवे असते. शासकीय नोकर असाल तर कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही. स्वतःची दुसऱ्याशी तुलना केल्याशिवाय, मनातल्या मनात कुढत तणतण झाल्याशिवाय दिवस जात नाही. एकातून दुसरी, त्यातून तिसरी, चवथी... आपलं आयुष्य संपत येतं, पण मागण्या, अपेक्षा आणि हाव संपत नाही. एकदा मायाच्या मायाजालात आपला प्रवेश झाला की आपली स्थिती या साधु वाण्यासारखी होती. त्याला मरणाची हाव आणि संकटांची भिती होती. आपलीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. हाव आणि भिती वेगवेगळी आहे, एवढेच.

आजचं माझं जगणं हे वास्तवातील नसून मायाजालातील नाही कशावरुन? सत्ययुग, द्वापारयुग ते आजचे कलीयुग असे युगांचे प्रकार की कालखंड अनेक आहेत, असे म्हणणारे म्हणतात. युगं, धेय्य, उद्दीष्ट, जगणं, मरणं हे सारं हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावतोय. शब्दांच्या गोणी भरतोय आणि त्या दुसऱ्यावर लादतोय. विशिष्ट चश्‍म्यातून जग पाहण्यापेक्षा आणि ते माझ्या चश्‍म्यातून दिसतं तसंच असावं असा अट्टहास धरण्यारपेक्षा ते आहे तसं पाहणं आणि स्विकारणं अधिक वास्तववादी नाही का ? इथे प्रश्‍न हा ही आहे की, आपल्याला वास्तववादी जगायचेय का ?

काही महिन्यांपूर्वीचे उदाहरण सांगतो. एमआयटी कॉलेजला एमबीए करत असतानाची गोष्ट. आम्हाला "पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऍण्ड टाईम मॅनेजमेंट'ला एक अतिथी प्राध्यापक होते. त्यांचे नाव "एक्‍स' समजू. या माणसाचीच ही गोष्ट. हे गृहस्थ एकदम हुश्‍श्‍शार. कमी वयात भरपूर बौद्धीक, आर्थिक प्रगती केली. बहुधा ते "फायनान्स'मध्ये एमबीए झाले. त्यानंतर एका कंपनीत नोकरी स्विकारली. आणि मग रात्रं-दिवस कामात झोकून दिलं. कामाशीवाय आणि दर महिन्याला घरी येणाऱ्या लाखो रुपयांपेक्षा वेगळं जगंच राहीलं नाही. जगण्याचा घाणा झाला. तासामागून तास दिवसांमागून दिवस चक्र सुरु राहीलं. एक दिवस हे चक्र अचानक बंद झालं. कोणताही आजार नसताना आमचे गुरुवर्य कोमात गेले. हु नाही की, चू नाही. कोमातील जगणं सुरु झालं.

एक वर्षांच्या अथक वैद्यकीय प्रयत्नांनंतर ते मानसात आले. आणि मग खरं जगणं सुरु झालं. घाणा बंद झाला. सर्वांगसुंदर जगण्याचा अट्टहास सुरु झाला. जगणं बदललं. सुंदर झालं. त्यांच्याप्रमाणे वास्तववादी जगण्याची दुसरी संधी प्रत्येकालाच मिळेल असं नाही. म्हणून सध्या ते कॉर्पोरेट जगाला जगण्याचे धडे देत आहेत. जगावं कसं सांगत आहेत. अनावश्‍यक, अनाकलनिय, आवाक्‍याबाहेरील गोष्टी, इच्छा किंवा "टारगेट'च्या मागे धावून जगणं विसरु नका. हा त्यांचा धडा ते स्वतःच्या अनुभवावरुन, उदाहरणावून ते पटवून देतात. व्याख्यानात जेव्हा ते तुम्हाला तुमच्या गत आयुष्यातील तुम्ही समरसून जगलेले क्षण आठवायला लावतात. तेव्हा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ढसढसा रडताना मी पाहिलंय. काय आहे हे सारं...

जगण्यापेक्षा जगण्याच्या साधनांची हाव हीच माया. त्यात जो फसला तो थेट भोवऱ्याच्या तळाला. असे भोवरे भेदून बाहेर पडले ते वाल्मिकी झाले. होत आहेत. आपणच ठरवायचं आपण कसं, कशासाठी, कुणासाठी जगायचं ते...

1 comment:

Sachin said...

sundar lekh ....