Friday, July 24, 2009

कणाकणाने जिवंत राहण्यासाठी...

चित्रपट आणि जिवन याबद्दल तुमचं काय मत आहे ? त्यातही तो चित्रपट हॅरी पॉटर सारखा पूर्णतः काल्पनिक असेल तर. गेल्या आठ दिवसांतील दोन घटना. एक - मी हॅरी पॉटर पाहीला. आणि दुसरी - माझ्या सोलापूरच्या एका ए निगेटिव्ह रक्तगटाच्या मैत्रिणीने तब्बल दोन लिटर रक्तातील पांढऱ्या पेशी दान केल्या. आता या दोन टोकाच्या घटनांमधील साम्य काय ? सांगतो.

हॅरी पॉटर मालिकेतील नवीन चित्रपट "हॅरी पॉटर ऍण्ड हाफ ब्लड प्रिन्स' सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. यातील कथेचे मुख्य कल्पना वेधक आहे. हिंदु धर्मात आत्मा हा अमर, अभंग, अविनाशी मानला जातो. पुर्नजन्म आहे. आत्मा शरिर बदलतो. आदी तत्वज्ञान आपण शतकानुशतके पाजळत आहोत. या तत्वज्ञानाचा आधार घेत तंत्र विद्या (?) जादू टोणा (?) यांच्या आहारी जात अमरत्वासाठी किंवा पुर्नजन्मासाठी अघोरी कृत्ये केल्याचे अनेक गुन्हे जगापूढे आले. मात्र अद्यापही आपली मरणाची भिती आणि मरणानंतरही जिवंत राहण्याची हाव संपलेली नाही. हॅरी पॉटर मालिकेतील नवीन चित्रपटात मला हेच सुत्र सापडले.

या चित्रपटाचा खलनायक हा अतिशय प्रतिभावंत जादूगर. मात्र ही प्रतिभा तो लोककल्याणाविरुद्ध वापरत असतो. त्याला अमर व्हायचे असते. त्यासाठी तो आपल्या शिक्षकाच्या मदतीने एका काळ्या जादूचा प्रयोग करतो. स्वतःच्या आत्म्याचे तुकडे करायचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवायचे. यामुळे आत्म्याचा एखादा तुकडा मृत झाला, किंवा शरीर सोडावे लागले तरी तंत्र मंत्राच्या सहाय्याने उर्वरीत तुकड्यांच्या आधारे तुम्ही अमर राहू शकता... अशा आशयाची ही काळी जादू. संबंधीत खलनायक ही क्‍लुप्ती यशस्वी करतो. आणि मग त्याचे विनाशसत्र सुरु होते. हे रोखण्यासाठी हॅरी पॉटर त्याच्या आत्म्याचे तुकडे गोळा करण्याच्या व ते नष्ट करण्याच्या कामगिरीवर निघतो, असे काहीसे चित्रपटाचे सुत्र.

माझ्या मैत्रिणीविषयी... कन्या एमबीए आहे. त्यामुळे रक्तदानाचे महत्व तिला ठावूक होते. कॅम्पमध्ये एकदा रक्तदान केले होते. सोलापूर शासकीय रुग्नालयातील एका 15 वर्षाच्या रुग्णाच्या जिवनाचा प्रश्‍न होता. त्यासाठी ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटातील पांढऱ्या पेशी हव्या होत्या. कोठेच मिळेनात. शेवटी कॅम्पमध्ये केलेल्या रक्तदानातील माहीतीच्या आधारे रक्तपेढीने हिच्याशी संपर्क साधला. घरच्यांचा, ऑफिसचा विरोध डावलून ती पेशीदान करण्यास गेली. दोन तास संबंधीत मशिनशी ती जोडलेली होती. एका बाजूने शिरेतून रक्त घेतले जात होते, आणि दुसऱ्या शिरेतून रक्त पुन्हा शरिरात सोडले जात होते.

मुळात मुलींच्या रक्तात लोहाचे प्रमाण कमी. त्यात त्यांच्या रक्तवाहिन्या त्या मानाने (म्हणजे पुरुषांच्या मानाने) कमकुवत. यामुळे मुली रक्तदानास पात्र ठरण्याचे प्रमाण कमी. त्यात पुन्हा पेशीदानासाठीचा दोन तास ताटकळा (एकाच एवस्थेत बराच काळ राहील्याने होणारा त्रास) सहन करणे अवघड. या पार्श्‍वभुमीवर माझी मैत्रिण ए निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी दान करणारी महाराष्ट्रातील पहिली मुलगी असण्याची शक्‍यता पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रक्तपेढीचे संचालक जयंत आपटे यांनी व्यक्त केली.

रक्तदान हे सर्वोत्कृष्ट दान मानले जाते. त्यातही दुर्मिळ रक्तगटातील दुर्मिळ पेशींचे दान हे त्याहून श्रेष्ठ. म्हणून हीची कृती मोलाची ठरते.तुम्ही बरोबर म्हणा वा चूक... पण मला वाटतं की माझी मैत्रीण पेशीदान करुन अमर झाली आहे. नव्हे आपल्यातील कितीतरी जण अशा प्रकारे जिवंत राहणार आहेत. मरणानंतरही कणाकणानं जगणार आहेत. दुसऱ्यांना जगविणार आहेत. कसं ते एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलचं.

वंशसातत्य, पिढ्या, रक्ताचे नातेसंबंध हे आपण जाणतो. रक्ताच्या नात्यांनी आपले कण काही काळ पृथ्वीवर रेंगाळतात हे ठिक आहे. पण याही पुढे जाऊन रक्तदान आणि पेशीदानाच्या माध्यमातून आपल्याला आपलं जगणं वैष्विक करणं शक्‍य आहे. कदाचित श्रीकृष्णाच्या तोंडी सांगितलं जाणारं ""या विश्‍वाच्या चराचरात मीच सामावलेलो आहे'', हे वाक्‍यही त्यांनी रक्तदान केल्यानंतरच काढलं असावं, असे माझं मत आहे. रक्तदान हेच जिवनदान हे वास्तव गेल्या दोन पिढ्यांनी स्विकारलं. आता त्याच्या पुढची पायरी पेशीदानाच्या रुपाने चढण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. पेशीदान हे फक्त जीवनदान नाही, तर आपण आपल्या स्वतःला दिलेलं अमरत्वाचं दान आहे, असं मला वाटतं. त्यामुळे हॅरी पॉटरमधील खलनायकाने स्वतःच्या आत्म्याचे तुकडे करुन ते लपविण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ पेशीदान केले असते, तर तो खरेच अमर झाला असता.

राज्यातील बहुतेक सर्व रक्तपेढ्यांना निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तदात्यांची व पेशीदात्यांची कमतरता आहे. ऐनवेळी दाते न मिळाल्याने रुग्न दगावल्याच्या अनेक घटना राज्यभर घडल्या आहेत. यामुळे निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तींनी पेशीदाते म्हणून पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आपणच पुढाकार घेण्याची गरज आहे. आमरत्व आपल्यापासून फक्त हाकेच्या अंतरावर आहे.

*अधिक माहीती, संदर्भ ः

(अभय कुलकर्णी (गोपाबाई दमाणी रक्तपेढी, सोलापूर 0217 2722106, 2726858) ः आमच्या रक्तपेढीत यापुर्वी अनेक महिलांनी पेशींसाठी रक्तदान केले आहे. येथिल जयवंत सुरवसे यांनी 100 हून अधिक वेळा पेशींदान केले आहे. पेशींची आवश्‍यकता वारंवार भासते. मात्र पुरेसे दाते मिळत नाहीत. रक्तदात्यांनी पेशीदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.

जयंत आपटे (संचालक, दिनानाथ मंगेशकर रुग्नालय, पुणे. 020 4015007) ः रक्तामध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण सर्वात कमी (0.1 टक्के) असते. सर्व निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ आहेत. सुमारे 4 ते 8 टक्के लोक निगेटिव्ह रक्तगटाचे असतात. त्यामुळे या गटाचे दाते खुप कमी मिळतात. दर 72 तासांनी पेशी दान करता येवू शकते. निगेटिव्ह रक्तगटाच्या अधिकाधीक रक्तदात्यांनी रक्त व पेशी दानासाठी पुढे येण्याची गरज आहे.

रक्‍तामध्ये प्लेटलेट, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्रोटीन, पाणी व प्लाझ्मा असे घटक असतात. यातील पांढऱ्या पेशी या संरक्षक पेशी आहेत. शरीराबाहेरील जंतूना शरीरात प्रवेश रोखण्याचे काम या पेशी करतात. काही आजारांमध्ये या पेशी एकदम कमी होतात. किंवा संपतात. शरीरात पुरेसे रक्त असते, मात्र संरक्षक पेशी नसतात. या अवस्थेत रुग्नाला रक्त दिलं, तर जादा रक्ताचा दाब त्याच्या ह्दयावर आणि फुफुसावर पडतो. यामध्ये धोका असतो. यामुळे रक्ताऐवजी फक्त पेशी देणे आवश्‍यक असते.

रक्तातून पेशी वेगळ्या करण्यासाठी "सेल सेपरेटर' (पेशी विभाजक) हे उपकरण वापरले जाते. सध्या राज्यातील सुमारे 25 रक्तपेढ्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. मुंबईत सुमारे दहा तर पुण्यात अंदाजे पाच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. सेंट्रीफुगल फोर्सच्या सहाय्याने या यंत्रात पेशी वेगळ्या केल्या जातात, आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जाते. हे यंत्र अमेरीकेवरुन आयात करावे लागते. त्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. प्रत्येक सेपरेशनला 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो.)

No comments: