Wednesday, November 11, 2009

बाजारवाट

पहाटं तिनच्या सुमारास कोंबड्यानं पहिली बांग दिल्याबरोबर झुंबराबाईनं चुलीत काडक्‍या सरकवायला सुरवात केली. रात्री राखेत गाडलेल्या विस्तवाला फुकणीनं फुकर मारुन चुल पेटविण्याची तिची नेहमीचीच धडपड सुरु झाली. दगडूनं एव्हाना शेणकूर आवरुन बैलं जोगवायला सुरवात केली होती. फुंकणीचा आवाज ऐकून भाऊ जागा झाला आणि थेट चुलीपुढं जावून बसला. ""भावड्या उठ, इथं डुलक्‍या नको घेऊ. न्हाई तर बाजाराला उशीर व्हईल. उठ आन्‌ गोधाड्यांच्या घड्या कर पहिल्या.'' आईनं बाजाराचं नाव काढताच भाऊचं कान टवकारलं. काही न बोलता पालथ्या मुठीनं डोळं चोळत तो आंथरुण-पांघरुणांच्या घड्या करायला उठला. ""बाह्येरच्या चुलीवर पाणी तापलंय. आंघुळ करुन घे लगेच आणि तुझ्या बापाला तप्यालं भरुन ठेव तापाया.'' आईच वाक्‍य संपेपर्यंत भावड्यानं तपेलं बादलीत उपडं केलं होतं.

आज बैल बाजाराला न्यायचा असल्यानं दगडूच्या घराला नेहमीपेक्षा दोन तास आधिच जाग आली होती. गेल्या दोन बाजारी टाळलं, पण आता भाऊ हट्‌टाला पेटल्यानं दगडूनं त्याला बाजारला न्यायचं कबुल केलं होतं. पहिल्यांदाच बाजार बघाया मिळणार म्हणून भावड्या खुशीत होता. याच खुशीत त्यानं काल संध्याकाळीच बैलासाठी वझंभर घास आणि दोन कवळ्या मका कापून आणली. बैल काथ्याने घासून धुवून काढला. मांगाच्या सदूला बोलावून शिंगं साळून घेतली. त्यांना सोनेरी लावली. भावड्या वयानं 12-13 वर्षाचा. काळा सावळा पण तरतरीत. पठ्ठ्या घरी नेहमी खाकी हाप चड्डी आणि बनियानमध्ये असायचा. शाळेत जाताना त्याच हाफ चड्डीवर पांढरं शर्ट चढवलं म्हणजे झालं. कामाला वाघ. चार बैली नांगर एकट्यानं हाकायला तो नुकताच शिकला होता. चाव्हरी आसुड आणि गोफण वाजविणारा मळ्यातील तो एकमेव पोरगा होता. वावरात दारी धरणं आणि औत काठी करण्यात भावड्या लहान वयातच तरबेज झाला होता. पाचवीत असलेल्या भावड्याला शाळेत कोंडल्यासारखं व्हायचं. बरोबरीची पोरं गोट्या, विटी दांडू आणि क्रिकेट खेळत असताना हा गाई बैलांसाठी गवत कापत असायचा. कामाला माणसंच कमी असल्यानं दुसरा पर्यायही नव्हता म्हणा.

नेहमी चार बैल झुलत असलेली दगडूची दावण आता राजा आणि थैमान्या या दोन बैलावर आली होती. त्यात उन्हाळ्यात थैमान्यानं बसकण मारली आणि दगडूचं धाबं दणानलं. बैल आत्ताच इकावा तर उन्हाळ्यात गिऱ्हाईक कमी, शिवाय भावात मंदी. त्यामुळं आगुठीला थैमान्याला बेल्ह्याचा बाजार दाखवून नवाट गोऱ्हा आणण्याचा दगडूचा विचार होता. उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यावर दोघं बापलेक बैलाचं नाक मुसक्‍या दाबत नागरणीला जुंपले. नागरणी झाल्यावर महिना दोन महिनं बैलाला आराम मिळाला. त्यामुळे आगुठीला बसणार नाही अशी दगडूची अटकळ होती. मात्र थैमान्यानं धरलेली खोड जायचं नाव घेईना. त्यामुळं आता ऐन आगुठीत दगडूच्या बाजारवाऱ्या सुरु झाल्या होत्या.

दगडूच्या मळ्यातून वाहणारी कुकडी नदी व तिच्या पलिकडचं फारिस्ट ओलांडलं की दिड तासावर बेल्ह्याचा बाजार. दर सोमवारी भरायचा. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार ही त्याची ओळख. याशिवाय म्हशीं, घोडे व गाढवं, शेळ्या मेंढ्या, किराणा व भाजीपाला असे बाजाराचे अनेक भाग आहेत. आजूबाजूच्या आठ दहा तालुक्‍यातील लोकांची तेलामिठापासून कपडालत्त्यापर्यंतची खरेदी याच बाजारात होते. बैल बाजारातील नेहमीच्या व्यापाऱ्यांनी मोक्‍याच्या जागा बळकाविल्यानं शेतकऱ्यांना बैल विकायचा असेल तर दिवस उगायच्या आत बाजारात पोचून मोक्‍याची जागा मिळवणं जिकिरीचं असतं. नाही तर मग वाऱ्या कराव्या लागत. गेली दोन बाजार दगडूनं हा अनुभव घेतला होता. त्यामुळं आज भाऊला बरोबर घेवून त्यानं तांबडं फुटायच्या आतचं कासरा सोडला.

बैलाला पुढं घालून दोघं बाप-लेक रस्ता कापू लागले. वाट अंधारी असली, तरी पावलाखालची होती. बैलालाही वाटंचा अंदाज होता. रातकिड्यांच्या, कोल्ह्यांच्या आणि कुत्र्यां भुपाळीत पावलं पडतं होती. अधी-मधीच कोंबडं सुर लावत होतं. एखाद्या घराजवळून एकदोन कुत्री रात्रभराच्या जाग्रणानं तारवान्या सुरात भैरवी आवळंत मागं यायची आणि गप निघुन जायची. चाबूक भावड्याच्या हाती देवून दगडूनं थैमान्याला पुढं घातला. बाप लेक भराभर पावलं उचलू लागले. नदीच्या काठालाच शेजारचा गंगाराम बुवा दत्त म्हणून उभा होता.

""काय रं दगडू आज परत बेल्ह्याला का? आनं भावड्याला साळा नाय का आज. ध्यान दे याच्याकडं. काल बळीराम हाकताना पाह्यला. प्वार साळंत जातंय, पण भुमिती काय बरुबर नाय त्याची ! नांगराचं तास वाकडं-तिकडं व्हतयं आजून.'' तंबाखूचा बटवा दगडूच्या हाती देत गंगारामानं बैल थोपटला. ""आरं तात्या भुमीती चांगली हाय त्याची, पण बैलानं सगळं गणितच बिघडवलंय. दोन चार मुलडाणं झाली की बसकण मारतंय. नाक त्वांड दाबल्याशिवाय उठायचं नाव घेत नाही. वैताग आणलाय पार त्यानं. आगुठी हातची चाललीय. दोन बाजार केलं. पण लईच पडून मागितला. म्हणलं पुढच्या बाजारी बघु. आज इकूनच येणार हाय'' गंगारामाला बटवा परत करत दगडूनं बैलाला चाबकाच्या दांडीने ढुशी मारली.

आत्तापर्यंत गप्प असलेलं भावड्याचं तोंड फॉरेस्ट ओलांडून पक्का रस्ता सुरु झाल्याबरोबर मोकळं झालं.
""दादा, थैमान्या इकल्यावर लगेच नवा बैल घ्यायचा ना आपल्याला?''
""आधी हा तर खपू दे...'' दगडू.
""आन्‌ नाय खपला तर...'' भावड्या.
""सकाळी सकाळी नाट लावू नको. त्वा एवढा सजवलाय त्याला बाजारात पोचल्याबरुबर खपलं असं वाटतंय आज. बाकी यपाऱ्याच्या हातात''"

"बैल आपला, इकणार आपण, घेणार दुसरा शेतकरी मंग यापाऱ्याच्या हातात काय?''"
"बाळा, यपाऱ्याच्या हातात बाजार असतूय. आपण जाणार वर्षा दोन वर्षानं बाजारात. त्यांचा रोजचा राबता. आपल्याला यापाऱ्यांचे छक्के पंजे यपाऱ्यालाच माहीत असत्यात. त्यामुळं यापाऱ्याकडून बैल इकल्याला बरा पडतो. आणं आपण स्वतः इकाय गेलं की कमी भावात मागणत्यात बैल.''"

"यपारी बैल कसा काय इकितो?'' भावड्या.
बाजारगावातील माणसं आणि इतर बाजारातील यपारी बाजारात आसतात. त्याबरुबर दलाल पण असत्यात. पुर्वी बारा बलुतंदार लॉकं दलालीत लई असायची. आता अस्वलं पाळायची बंद झाल्यापासून ते पण दलाली करत्यात. आपल्या भागात जोशी, नंदीवाले, घिसाडी अशा समाजातील जास्त लॉकं दलालीचा धंदा करत्यात. बाजारातलं काय माहीत नसंल तर दलाल लई कामा यतो. तो जनावराला गिऱ्हाईक सापडून आणतो. त्यांन्ला आपला बैल निट दाखवितो. यव्हारात मध्यस्ती करतो. बैल घ्यायचा आसंल तर पाहिजे तसा आणि तेवढ्या किमतीचा बैल सापडून देतो. सौदा जूळून देण्याचं आणि पैसं देण्याघेण्याची हमी घेण्याचं काम दलाल करतो. त्याला 100-200 रुपये दलाली दिली म्हणजे झालं. सगळा यव्हार गुपचूप रुमालाखाली नायतर फेट्याखाली व्हतो.

पण दादा रुमालाखालचा यव्हार नक्की कसा व्हतो. भावड्या.
यपारी आणि दलाल एकमेकांच्या हातात हात घेतात. त्यावर रुमाल, फेटा, उपारणं नायतर नेहरुचा घोळ टाकून हात लपवत्यात. एकमेकांची बोटं दाबून किंमत सांगून सौदा होतो. बोटांची भाषा प्रत्येक बाजारात वेगळी असते. जेव्हा व्यवहार हजारात चालला आसंल, तेव्हा बैल बाजारात रुमालाखालची चार बोटं म्हणजे चार हजार रुपये, दहा हजारात वार्ता चालू असेल तेव्हा दोन बोटं म्हणजे 20 हजार रुपये व चार बोटं म्हणजे 40 हजार रुपये. शेळ्यांच्या बाजारात दोन बोटं म्हणजे दोन हजार आणि म्हशींच्या बाजारात चार बोटं म्हणजे 40 हजार रुपये आसं समजायचं. चार बोटं दाबून बोटांच्या मध्ये आडवे बोट दाबले म्हणजे 45 हजार रुपये. नक्की काय सौदा झाला ते आपल्याला काय कळत नाही. मग आपला दलाल सांगेल तसं झालं, असं समजायचं.

मग, दलाल आपल्याला फसवणार नाही का? इति. भावड्या.
""दलाल मधिच पैसं खाऊ शकतो, पण त्याला इलाज नाय. भरवशाचा, वळखीचा दलाल पाह्यचा हाच इलाज. सगळ्याचं बाजारात असाच व्यवहार व्हतो. ह्य फायद्याचं पण हाय म्हणा. यवहार गुपचुप झाल्यानं बाजारात बैलाचा भाव नक्की काय चाललाय हे कुणाला समजत नाय. समजा सौदा जुळला नाही तर दुसऱ्या गिऱ्हाईकांना नक्की कितीवर सौदा फसला हे समजत नाही. त्यामुळं पुढचं गिऱ्हाईक पहिल्या गिऱ्हाईकापेक्षा जास्त किंमत दिऊ शकतं. एखाद्यानं 10 हजाराला मागितल्याला बैल दुसरा मानुस पंधरा हजारालाही मागू शकतो. यामुळं उघड किंमत सांगून बैल विकता येत नाही. दलाल हुशार आसंल तर बैल दाखवीताना दात तुटलेला आसंल तर तुटक्‍या दातावर अंगठा दाबून दात दाखवतो. अंगाला, मानंला कुठं लागल्यालं आसंल, त्याला काही खोड असंल तर अंगावर गुलाल टाकत्यात. त्यामुळं लागल्यालं लक्षात येत नाही. मारका बैल आसंल तर त्याला आदल्या दिशी संध्याकाळी बेदम मार देत्यात मार खाल्लेला बैल बाजारात गरीब गाईसारखं उभा राहतो. व्यहारांत फसविल्याचं लक्षात येईपर्यंत यवहार पूर्ण झालेला असतो. ठरलेला यवहार मोडता येत नाही. पुन्हा त्याला बाजाराला घेवून जावं लागतं. त्यामुळं वळखीचा दलाल मधी असलेल्या फायद्याचा आसतं.

''पण, यव्हार करताना यपारी बोलत नाहीत का?
बोलत्यात ना. पण मराठीत नाय. बेल्ह्याच्या बाजारातंल यपारी याकाम्याकांशी पारशिक भाशेत बोलतात. "पारशी' भाशेतील शब्द जास्त वापरत्यात म्हणून पारशीक. आपल्याला पारशीतला ओ की ठो कळत नाही, म्हणून पारशीक. डल्ला म्हणजे तीन हजार, "नाकी' म्हणजे चार हजार, म्हणजे 10 हजार, एम म्हणजे 11 आन्‌ 15 हजार म्हणजे गिरी पंजा असं ठोकताळं हायंत.

तुम्हाला कसं काय माहीत हे सगळं... भावड्या.
आपल्या गावच्या जोश्‍यानं सांगितलं व्हतं. आज तोच आपला बैल इकूव देनार हाये.लई बैल आसतील बाजारात?सिजन नुसार गर्दी आणि भाव असतात बाबा. साखर कारखाने सुरु होतात तव्हा भाद्या बैलांचे भाव जोरात आसत्यात. पुशी पुनवंला कोकणातील म्हशाची यात्रा आसती. तव्हाच्या बाजारात तिकाडलं शेतकरी लहान बैल विकात घेत्यात त्यामुळं लहान बैलांना लई भाव असतो. आगुठीला, पेरणीच्या काळात सगळंच बाजार कडाक आसत्यात. एक चांगली बैल जोडी घ्यायची म्हणलं तर 50 हजार रुपये पुरत नाहीत. एका बैलाला कमीत कमी 20 हजार रुपये लागतात. टायर गाडीचं, शर्यतीचं, औताकाठीचं बैल यगळं यगळं आसत्यात. नवाट बैलांना कायमचं उठाव आसतू. म्हताऱ्यांना कसाबी घेतो.

पण दादा, म्हातारा बैल कसा वळकायचा...
भावड्याबैलाचं दात पाह्यलं की त्याचं वय लगेच कळंत. त्याच्या तोंडात खालच्या बाजूला आठ दात असतात. वरच्या बाजूला दात नसतात. खालचं आठ दात चार चारच्या गटात असतात. मध्यभागी फट असते. दुधाचा एकही दात पडला नसंल तर त्या बैलाला "आदत' म्हणायचं. दुधाचं दात बारीक आसत्यात. नंतर उगविलेले दात मोठे आसत्यात. खालच्या जबड्यातील मध्यभागचे दोन दात पहिल्यांदा पडल्यालं असलं तर त्या बैलाला "दुसा' म्हणतात. चार दात पडले की त्याला "चौसा' म्हणतात. चौसा बैल गाई लावायला सगळ्यात चांगला असतू. चौशा बैलाकडून लावली तर गाई शक्‍यतो उलटत नाही. सहा दात पडलेल्या बैलाला "सायदाती' बैल म्हणतात. बैलाला सायदाती म्हणजेच अंडील झाल्यावर चाप देतात. चाप दिलेला बैल गाईवर उडत नाही.

मग दादा, आपल्या घिसाड्याचा बैल चौसा नाय का? त्याच्याकडून दोनदा लावूनपण कौशी उलाटली.
भावड्यांनं दगडूला मधीच थांबवत आपला प्रश्‍न रेटला.
आरं, तो भडवा एकाच दिवशी 15-20 गाया लावतो. सगळ्याचं थोड्या गाभण राहतील. ज्याची गाई सकाळी लवकर जाती ती राहती गाभण. तुला लौकर उठाया नको, पाच सहा गाया लागल्यावर आपली गाई कशी गाभण राहील. म्हणं घिसाड्याचा बैल चौसा नाय का? जातो मी उद्या त्याचं दात बघायला.''

भावड्यानं गाई उलटल्याची आठवण करुन दिल्यावर त्याला फटकारुन दगडू पुन्हा बैलाच्या दातांबद्दल सांगायला लागला, ""बैल दोन वर्षाचा व्हायच्या आत त्याचं दात पहिल्यांदा पडतात. एकादा टाळूला निबार आसला तर जास्त टाईम लागतो. त्यानंतर दर सहा महिन्यांनी दोन दात पडतात, आणि नवीन उगवत्यात. 15 - 16 वर्षाचा होईपर्यंत बैल औताची काम चांगली करतो. गंगातात्याच्या बैलासारखी रगाट बैलं असतील तर 18-19 वर्षापर्यंतही चांगलं काम करतात. 20-22 वर्षाचा झाल्यावर बैल म्हातारपणानं मरतो.''

मग आपला थैमान्याचं वय किती आसलं ?
या मढ्याला काय झालंय. आसलं 12 -13 वर्षाचा. एवढ्यात याच्या आंगावरची माशीही उडत नाही. आरं औताला बैल कसा गुलाम पायजे.

पण दादा, गुलाम बैल वळकायचा कसा ?
गुलाम बैलाची कात पातळ आसती, शेपूट वरपासून खालपरयत बारीक असती. शेपंचा कांदा लांबट आणि भरिव असतो.शेपंचा कांदा म्हणजे ? हे बघ, शेपटाच्या सगळ्यात खालचा शेपटीचा काळा गोंडा हाये ना त्याच्या आतल्या भागाला जिथं शेपटी संपती आणि फक्त केसं आसत्यात त्या काळ्या भागाला शेपंचा कांदा म्हणत्यात. गुलाम बैल तरतरीत आसतो. आपला लठ्ठ्या बघ अंगावर कासरा टाकला तरी थिर चाललाय. गुलाम बैल असता तर अंगावर कासराच काय पण माशीला पण बसू देत नाही. खडा मारल्याबरोबर बैलाची कात कशी थरथरा हालली पायजे. बाजारात बैल चालून दाखवावा लागतो. त्याच्यात काही खोट हाये का ते पाहतात. गुलाम बैल चालायला लागला तर त्याचा मागचा पाय पुढच्या पवलाच्या पुढं पडतो. बैलाचा खुर भक्कम, आटोपशिर पाहीजे. पसराट खुराच्या बैलाला वेगात चालता येत नाही. खुर जेवढे बारीक असतात तेवढी बैलाला गती जास्त असते. नख्या जुळून पाहीजेत.

दादा, बेल्ह्याचा बाजार क्वॉनचा हाय ?
क्वॉनाचा म्हणजी. बाजार समितीचा. बाजार समिती सरकरची आन्‌ सरकार आपलं हायं, असं म्हणत्यात. कशाचं काय भोंगळ्याला नागडं करायचा धंदा सगळा. बाजारात बैल उभा करायच्या जाग्येचं भाडं 5 रुपय द्यावं लागत्यात... आपल्याला. बैल इकल्यावर बाजार समितीकडं पावती कराया लागती. विकत घेणाऱ्यांनं बाजार समितीला यव्हाराच्या एक ट्‌क्‍का कमीशन दयावं लागतं, असा नियम हाय म्हणत्यात. पण ते कमीशन वाचविण्यासाठी यापारी निम्याच किमतीचा व्यव्हार झाल्याचं दाखवतो. त्याचा तोटा आपल्याला व्हतो. पावती फाडणाऱ्याला 50 रुपडं दिलं की यापाऱ्याचं काम व्हतं. आपण जाणार वर्षातून एकदा, मंग आपलं कोण अैकणार. आपण फकस्त गप बसायचं. यापारी लइदा पावती फाडल्याइनाच बैल बाजारातून बाहेर काढत्यात. पुन्हा पावती फाडणारानं आडवलं तर त्याला 100 रुपडं द्याचयं. आशा यव्हारात यपारी लइदा पैसं बुडवत्यात, पुढच्या बाजारी पैसं देण्याचं वायद करत्यात. आन्‌ इसरुन जात्यात. आपण बसायच्या ख्याटा घालत. त्यामुळं आत्ताच निट ध्यान दिवून बाजाराच्या गमजा शिकून घ्ये. रोज रोज काय आपण बैल इकाया यनार नाय, आन्‌ मी काय 10-10 याळा सांगत बसणार नाय.

दादा, नंग्या म्हणत व्हता बाजारात पिक्‍चरमधी आसत्यात तसं पुलिस आसत्यात. मला दाखवशिल...
आता भावड्याच्या मागण्या सुरु झाल्याचं दगडूनं ताडलं. पोलिस दाखवल्यावर तो एक एक मागणी करुन डोकं खाईल, हे ध्यानात घेवून दगडू गप्प बसला. एव्हाना ते बाजारात दाखल झाले होते. दिवस हातभर वर आला होता. दगडूनं बाजारात मध्यावर उंचावट्याची जागा बघुन खुटी ठोकली. व्यापाऱ्यांचं मोहोळ बैलाभोवती फेर धरु लागलं होतं. प्रत्येक व्यापाऱ्याला बैल फिरवून दाखवण्याची कसरत भावड्याच्या अंगावर पडली होती. ये पोरा... सोड कासरा... हॅ... र्थ्ब्र... र्थ्ब्र.... हॅ... दोन तिन व्यापारी आपले भगवे फेटे उडवत बैलामागं धावत... एखादा हातच्या चाबकाचा जोरदार फटका बैलाच्या पायाखाली ओढी, नखीवर वादीचा जोरदार फटका बसल्यानं पाय झाडं बैल मुसंडी मारी आणि मग भावड्याची अधीकच तारांबळ होई. दिवसभर असंच चालू राहीलं.

संध्याकाळपर्यंत दोन डझन व्यापाऱ्यांना बैल दाखवून दाखवून भावड्या थकला. रडकूंडीला आला. दगडूचाही नाईलाज झाला होता. गेल्या वेळेपेक्षाही यावेळी बैल पाडून मागीतला जात होता. दगडू खोट खायला तयार नव्हता. चाल ढकल करता करता संध्याकाळी सहाला बाजार उठला. दगडूनं खुटीचा कासरा सोडला. बैलानं घराची वाट धरली. बापलेकांचे धुळमाखल्या नजरा थैमान्याच्या शेपंवर थिरावल्या आणि मुकी प्रश्‍नचिन्हं वाढत गेली. बाजारवाट पुन्हा सुरु झाली होती.