Thursday, December 2, 2010

सिंहगडावर...

स्थित ताऱ्यांचा खडा पहारा
रातकीड्यांचे अखंड गायन
धुक्‍या धुक्‍यांची अंगभर गोधडी
अन्‌ रानफुलांचा मंद धुंद गंध...

कथा व्यथांची अलगद पानगळ
दवाश्रूंची पाल्हाळ टपटप
गात्र गात्र गोठवणारे
कड्‌याकपारी अस्वस्थ चिरमौन...

घोरपडीची आल्हाद सळसळ
टिटवीची कर्कष टिवटिव
अन्‌ मशालींचे भडभडते टेंभे
मनभर सरसर, ऊरभर थरथर...

सिंहगडावर...

(संतोष, 1 डिसेंबर 2010, रात्री 9, सिंहगड, पुणे)

हे सिंहगडा...

चांदण्यात दवानी भिजला,
न्हाला माखला थिजला,
तान्हासखा सिंहगडा तू
भवानीसम भासला...

चांदण्यात निजला बुद्ध,
की शेषशय्यी चक्रधर,
तू दुधावर तरली साय,
हे सिंहगडा शुभांकर...

ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं,
दातांनी स्वराज्य रक्षिले,
तान्हा खंडीभर रक्तानं,
तुज तट बुरुज शिपिले...

कळीकाळाचे सुटले भान,
कड्याकपारी घुमते शिळ,
गड्या तुह्या पाषानाला,
जिजाऊच्या ह्दयाचा पिळ...

कोंढाण्या कोंडून जरी तु,
मौनात क्षण साधिले,
पानं पानं पाती गाती,
मावळ्यांचं गौरव गानं...

हे सिंहगडा आमची तरीही,
सुनसान ललकारी आज,
सोडूनी जनांची लाज,
डफ तलवारी चढू दे साज...

(संतोष, 1 डिसेंबर 2010, रात्री 8.30, सिंहगड, पुणे)

Sunday, November 14, 2010

रात्र खुळी एकली...

चांदण्यांची किरकिर
मोरांच्या बांगा
आणि झडलेला उंबर...

लाव्हरांची फडफड
वटवाघळांची चिरचिर
आणि चंद्र रापलेला...

सप्तर्षीचं रात जागणं
खुळा गुरु, शुक्र, शनी
आणि धृव एकटा...

दवानं झुकली पानं, फांद्या, कळ्या
पन्हाळी नव्हाळी चिंबलेली, थिजलेली
आणि दवाचं तृप्त ओथंबणं...

मी उंबर रापलेला, की धृव चिंबलेला
शुक्र झुकलेला, की दव ओथांबला
ही रात्र खुळी एकली, मी जन्म भोगलेला...

(संतोष, 17 ऑक्‍टोबर 2010, रात्री 2.30, अंगणातल्या चांदण्यात, पारगाव मंगरुळ, जुन्नर)

Thursday, October 7, 2010

प्रेमधुंदी

तु लब्धूनी मज झुकावे
मी शब्दात तुज गुंफावे
नाते वृक्ष वेलीचे
तुझ्या माझ्यात फुलावे...

यावी गाली आरक्ती लाल
ओठांचा रक्तिमा गोड
तु उसने उसासे द्यावे
मी चिंब तुला उसवावे

घन्या कुरुळ्या बटीने
तु मजला जखडावे
तुज ओठांच्या चंबुने
अमृत कुंभ उपडावे

मी साद नभाने द्यावी
तु धरती परी भिजावे
कुंभ रिते रिते भरुनी
तन मन अंकुरुनी यावे

मी तुझ्यास्तव झुरावे
तु माझ्यास्तव सुकावे
तुझे-माझे उरले जगणे
प्रेमधुंदीत सरावे...

(संतोष, सायंकाळी 5.30, 9 सप्टेंबर 2010, मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे कार्यालय, पाचवा मजला, ब्लॉक 1, सचिवालय, नवीन इमारत, गांधीनगर, गुजरात)

Wednesday, October 6, 2010

तुह्या झोक्‍या झोक्‍या संगं

तुह्या झोक्‍या झोक्‍या संगं
रान तरारलं सारं
नातं घामा पावसाचं
तुला समजंल सारं...

रानं उभ्या हिरवाईचं
वाढं पेराची पेराची
गाभं पोटरतो कसा
दाणं भरत्यात कसं...

रुजं वावरात घाम
माती भिजतीया कशी
फाळ घुसं काळजात
हाडं पिचत्यात कशी...

कधी बाजारी मरण
कधी झोडीतं आभाळ
रक्त आटवून रोज
जन्मा घालतोय जिनं...

घामा अमृताचे मोल
जिद्द हजार दान्यांची
कथा शेंडा बुडख्याची
नाळ मातीशी नभाशी...

(संतोष, 11 जुलै 2010 ते 5 ऑक्‍टोबर 2010, ऍग्रोवन, पुणे.
पहिल्या चार ओळी 12 जुलैच्या ऍग्रोवनमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध)

Tuesday, October 5, 2010

फासले

फासले ऐसे भी होंगे
कभी सोचा न था...
दूरी दिल मे भी होगी,
कभी सोचा न था...

राह ही राह मे
पांव खो जायेंगे
सपने खो जायेंगे
सांस थम जायेगी

कभी सोचा न था...

वफा, कसमो की रसमे
फासलो मे खो जायेगी
खिल रहे थे जो गुल
खुशबू खो जायेगी...

कभी सोचा न था...

जिंदगी ना रही अब
जिंदगी हमसफर
रह गये फासले अब
रह गयी जुस्तजू हमसफर

(Santosh.... For 1 friend ! 5 oct 2010, shaniwarwada, 8 pm)

Sunday, September 19, 2010

हुंदका

घरंदारं ओकी बोकी
रानं सुनी सुनी सारी
मुक्‍या भिंती सांगतील
कथा भेगाडली सारी...

वझ्यानं गेला कना
डोकं गेलं, पाठ गेली
आवरु कसा हुंदका
बळी माझा बळी गेला

घाला घालतोय काळ
ऐन उभारीच्या पारी
जगण्याची झाल्यावं गोची
वाट सरणाची का सोपी ?

( संतोष, 17 सप्टेंबर, रात्री 10.30, शनिवारवाडा)

Sunday, August 22, 2010

खरीपाच्या कळा

खरीपाच्या कळा, डोईला झळा
खरपुस उन्हानं, रापला मळा

उठं पाऊस भिडला, शिवार बी अडला
वाफसा येईल मातीला, मुठं धरायची चाड्याला...

कंबर कस तू, नेटानं लढ तू
दाणं टपोरं येतील घामाला...

खरिपातच बघ खुलखुळलं खळं
धाटा धाटाला माळा मोत्याच्या...

(संतोष, 31 मार्च 2010, स. 11.00, सकाळ, पुणे)

(1 जून 2010 च्या दैनिक ऍग्रोवन मध्ये पान नं 2 वर प्रसिद्ध)

Thursday, August 12, 2010

तुह्या घामाचं मोती दाखव रं...

भावड्या,
पाठीचा इळा, कुरपाचं पाई... चालत नाईत आता !
आता बास झालं शिकणं तुव्ह, तु यकदाचा घरी यं रं...

वझी लापलाप करत्यात पाठीवं
चमाकत्यात खवाटं, पाठाड, कंम्बर, गुडघं
कॉपरांच्या वर हात बी जात नाय
घर दार वावार वाऱ्यावं सोडून
लॉकाच्या चाकरीत काय राम ?
मंग तुपल्या आज्या बापाची वावरं
काय गावावं ववाळून टाकायची का ?

मपल्या पाठीच्या इळ्यावरलं वझं
तुह्या तरण्या खांद्यांवर टाकायचं
माव्हं सपान, माही उभारी, माही जिद
सगळं पुसाट व्हायला लागलियं रं...

यकुलता येक ल्येक, रमलाय श्‍यहरात
आता तिकडचीच फटाकडी बघंल,
मग कसली येतायेत राजा राणी गावाला...
म्हातारा म्हातारी बसतील इथं ढुंगाण खरडत
आन्‌ वावरांनी माजलं कांगरेस, हाराळ
झुंबरी-हौशीचं टोमणं जाळत्यात रं...

काय शिकायचं ते शिक
शिकायचंय तव्हर शिक
पण यकदाचा घरी यं रं...

तुह्या डोक्‍यात यईल तसं वावरं पिकू
म्या बांधाचं गवात कापील, तू वझी वहा
म्या खुरपिल, तू पाणी भर, फवारा धर
तु म्हणशील तसं करु
काहीही कर,
पण डोळं मिटायच्या आत
म्हतारा म्हातारीच्या गौऱ्या नदीवर जायच्या आत
भावड्या,
एकदा का व्हयना
पण तुह्या घामाचं मोती दाखव रं...
तुह्या घामाचं मोती दाखव रं...

(संतोष, 12 ऑगस्ट 2010, रात्री 9.45, शनिवारवाडा, पुणे)

(20 ऑगस्ट 2010 रोजी दै. ऍग्रोवनच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध)

Sunday, August 8, 2010

उपराळा

जुन्या निपचित वाटंवर
अवचित तुझा पायरवं
पायधुळंच्या ताज्या खुना
आणि उद्धस्त घराची आठवण...

उरापोटात आटलाय पान्हा
आटल्या पापण्या आटले ओठ
रितं कपाळ, रितं हात, रितं पोटं
रित्या आठवांची खाटी मोट...

रोज त्याच वळणावर
आठवणींचं मोहळ पुन्हा
हजारदा भोकसून भाले
जुन्याच जखमा ताज्या पुन्हा...

नको नको म्हणता म्हणता
त्याच क्षणांचा उपराळा पुन्हा
रात्र रात्र तळमळती
ओल्या कुशीतलं जळणं पुन्हा...

काळ्या पांढऱ्याचा भुलभुलय्या
बऱ्यावाईटाचा हिशेब पुन्हा
रोजचं मरण, रोजचंच सरण
घंट्याच्या जगण्याचा घोळ पुन्हा...

(संतोष, 8 ऑगस्ट 2010, शनिवारवाडा, रात्री 9.00)

Sunday, July 11, 2010

लाटांचा भर ओसरल्यावर

लाटांचा भर ओसरल्यावर
श्‍वासही केलास परका
तु तरीही हसते आहेस
आणि मी सुन्न माझ्यात...

तु भाळी चुंबिलेल्या
त्या चुंबनांची शपथ
तुझ्या पापण्यांच्या वादळानं
पान फुलं सारी झडलीत

आता उरलाय फक्त देठ
तू ओरंबडलेला...

Thursday, July 8, 2010

चिंब पापण्यांत तुझ्या...

तुझी वाट पाहत
माझं झुरत रहाणं
उनाड चाल आठवत
माझं मुकं पहाणं

रोजचेच तुझे बहाणे
आणि रोजच्याच थापा
रुपयातील चार आणे
बाकी साऱ्या वाफा

बंद कर ओठ
आणि बोलू दे शब्दांना
म्हणू नकोस,
पुण्यातील हवा गरम आहे
फक्त टिपत रहा शब्द
कागदावरील...
ओठांवरील...

बोटांचा थांबव चाळा
मान वर कर थोडी
पण लाजू नकोस पुन्हा
हाय SSS
तुझी ही अदा
जीव दहा वेळा फिदा...

तू मुकी राहिलीस
की डोळे छान बोलतात
मनातील भाव मग
पापण्यांतून सांडतात...

डोळ्यांचेही डोळ्यांना
बरेच कळते काही
ह्यदयाचे भाव जाणायला
शब्दांवर ताण नाही

बोलत रहा पापण्यांतून
बरसत रहा पापण्यांतून
मला भिक्त भिजू दे...
भिजू दे,
चिंब पापण्यांत तुझ्या..

(संतोष, 16 जानेवारी 2007, सारसबाग, पुणे.)

फक्त एक गर्लफ्रेन्ड दे...

देवा,
देवा मला फक्त एक गर्लफ्रेन्ड दे

एमपीएस्सीचा अभ्यास करणारी
स्टडी सर्कला असणारी
स्टडी रुम मध्ये ध्यान लावून बसणारी
फक्त एक G. F. दे...

वाचता वाचता झोपणारी
दंड बैठका मारणारी
आणि एका दमात सिंहगड चढणारी
फक्त एक G. F. दे...

पंजाबी ड्रेस घालणारी
जिन्समध्ये रमणारी
आणि साडी मध्ये खुलणारी
फक्त एक G. F. दे...

माझ्याकडं चोरुन पाहणारी
खुद्‌कन गाली हसणारी
आणि फक्त माझ्यासाठीच झुरणारी
फक्त एक G. F. दे...

"मंगला'ला पिक्‍चर पाहणारी
माझ्यासोबत पुणं फिरणारी
आणि फक्त माझ्यावरच मरणारी
फक्त एक G. F. दे...

शेतात काम करणारी
दोघांच्या आई बापाला जपणारी
आणि घराचं घरपण वाढविणारी
फक्त एक G. F. दे...

चहाचे फुरके मारणारी
चिकन रस्सा चापणारी
आणि चुलीवर भाकरी थापणारी
फक्त एक G. F. दे...

थोडी फार लाजणारी
हळूच मला बिलगणारी
आणि मलाच I Love You म्हणणारी
फक्त एक G. F. दे...

'Z' Bridge वर भेटणारी
खांद्यावर डोके ठेवून बोलणारी
आणि हळुच कुशीर शिरणारी
फक्त एक G. F. दे...

तुझ्या राधे पेक्षा न्यारी
रामाच्या सितेपेक्षा भारी
माझी Special Identity वाली
फक्त एक G. F. दे...

(संतोष, 5 ऑक्‍टोबर 2006, स्टडी सर्कल पुणे, बिराजदार सरांचे लेक्‍चर सुरु असताना.)

राणी गं...

कासराभर दिस बाकी
मी जाणार राणी गं..
प्रेमाला सांग आपल्या
जपशील का राणी गं..

घडोघडी पोरं जोडी
बदलत्यात राणी गं..
जन्मोजन्मी साथ तुझी
देशील का राणी गं..

जग लई वंगाळ बघ
झालया राणी गं..
जरा जपुन माझ्या मागं
चाल राणी गं..

सावली देहाची माझ्या
झालिस राणी गं..
आई-वडलांना माझ्या सांग
भरवशिल का राणी गं..

माझ्या लाडाचे राणी
पुस डोळं तुझं गं..
पदराआडून बघ कोण
बघतया राणी गं..

हळुहळु दुडूदुडू
पळंल ते राणी गं..
फौजदार मग सांग त्याला
करशिल ना राणी गं..

इवल्या इवल्या पावलांना
चालव राणी गं..
तुच त्याची आई
आता तूच बाप राणी गं..

सरणाहून माझ्या जरा
थांब लांब राणी गं..
धग सरणाची सांग तुला
सोसल का राणी गं..

शपथ हाये माझी तुला
जिवाला जप राणी गं..
तुझ्या जिवातच जिव माझा
गुंतलाय राणी गं..

जगणं मरणं हाये एक
खेळ राणी गं..
माझ्याईना संसाराचा आता
घाल मेळ राणी गं..

(संतोष, 5 ऑक्‍टोबर 2006, झेड ब्रिज, पुणे)

(पदरात 6-7 महिन्याचे लहान मुल असलेल्या माझ्या एका जिवलग मित्राचे निधन झाले. काही वर्षे तो पुण्यात स्टडी सर्कलमध्ये पी.एस.आय. होण्यासाठी स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करत होता. त्याने प्रितीविवाह केला होता. पण डाव अर्ध्यातच थांबला.)

Wednesday, July 7, 2010

50 ची नोट विठ्ठल आणि मी

परवाचा, 6 जुलैचा सायंकाळी साडेपाच सहाचा किस्सा आहे. दिंडी पुण्यात होती. संध्याकाळी हनुमंतचा फोन आला. पालिकेत विशेष काही नाही. तुला भेटायला येतोय. भूक लागलीये. काही तरी खाऊ. माझी झाली पंचायत. मी सकाळी घाईत घरी पाकीट विसरलो होतो. बफर स्टॉक होता. पण त्याला मी शक्‍यतो आपत्कालीन परिस्थितीशिवाय हात लावत नाही. त्यामुळे मी हनमाला सांगितलं. सर, माझ्याकडे आज पैसे नाहीत. खायचा नाश्‍ता पाण्याचा वांदा आहे. पण तुम्ही या आपण मार्ग काढू....

माझ्या डोक्‍यात वेगळाच मार्ग होता. गेली चार वर्षे मी पुण्यात दिंडीच्या काळात माझी मेस बंद करतो. शहरभर भक्तांसाठी प्रसादालये सुरू असतात. बातमीदारी करता करता पोटपूजाही त्यात होते. चार दिवस प्रसादाने (खिचडी, केळी, राजगीऱ्याचे लाडू इ) पोटाची काळजी नसते. शिवाय खानावळीचे पाणी चपाती खाण्यापेक्षा बरं ना. यंदा नवीन घराजवळच्या मावशीकडून सकाळी घरून बाहेर पडतानाच डबा घेत असल्याने दिंडीत प्रसाद घेण्याची वेळ आली नव्हती. म्हटलं चला हनमा जोडीला आहे, खिशात पैसाही नाही तर मग पांडुरंग कधी कामाला येणार. जय जय राम कृष्ण हरी.

हनमा आला. आम्ही शनिवारवाड्याच्या समोर गेलो. बोलायचं होते आणि खायचंही होते. शनिवारवाड्याच्या उजवीकडं लाल महालाच्या बाजूच्या गेटवर पीर बाबाचा दर्गा आहे. त्याच्या शेजारी कठड्यावर वारकऱ्यांमध्ये जाऊन बसलो. या जागेवर कायम 2-3 पोलिस बसलेले असतात. आज नव्हते. थोड्या वेळाने दोन लोकांनी राजगिऱ्यांचे लाडू 2 गोणी भरून आणल्या. पण वाढी आमच्यापर्यंत येण्याआधीच लाडू संपले. गप्पा मारून आम्ही कंटाळलो होतो. म्हटलं पाटील चला आता... आपण फक्त पाटील राहिलो. चला तुम्ही तुमच्या वाटेला लागा, मी माझ्या लागतो. पांडुरंग काय पावत नाय आज आपल्याला. असं म्हणून मी सहज मान खाली गेली. बुटांकडे पाहत होतो. तेवढ्यात माझं लक्ष कठड्याला खेटून धुळीत पडलेल्या 50 रुपयांच्या नोटेकडं गेलं. पहिल्यांदा खरंच वाटलं नाही, की ते पैसे आहेत. दुसऱ्यांदा वाटलं खोटे आहेत. तिसऱ्यांदा वाटलं फाटलेले असतील. म्हणून नीट तपासून पाहिले. एकदम ओके नोट होती.

डोक्‍यात विचार आला कुणाचे असतील. नोटेला तीन आडव्या घड्या होत्या. आम्ही अर्धा तास तेथे बसलो होतो. तेवढ्यात तीन दिंड्या तेथे विसावा घेऊन पुढे गेल्या होत्या. त्यामुळे कुणा वारकऱ्याचे पैसे असतील तर परत करणं अशक्‍य होते. आणि नेहमी इथे बसणाऱ्या पोलिसांचे पैसे असतील तर ते त्यांना परत करण्यात काही पांडुरंग नव्हता. आता माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक - ती नोट पांडुरंगाचा प्रसाद म्हणून जपून ठेवायची. दोन - ती नोट खर्च करायची.

नोट देवाचा प्रसाद म्हणून जपायची तर मी देव मानत नाही. त्याऐवजी महात्मा फुल्यांची निर्मिकाची कन्सेप्ट मला भावते. दिवसभर मी पालखीच्या पावलांनी.... ट्रॅफिक केलं जाम सारं.... असं गाणं गुणगुणत मी फिरत होतो. कारण शनिवारवाड्यापासून सेंट्रल बिल्डींगला जायला मला दीड तास लागला होता. पावसाच्या रिपरिपीत गाडीचं हॅंडल, क्‍लच, ऍक्‍सिलेटर दाबू दाबू दोन्ही हात लाल झाले होते. वारकऱ्यांविषयी आत्मीयता असली तरी का कोण जाणे पण वारीचं फारसं सुखःदुखः नाय वाटत मला. मला कशाचं सुख दुःख वाटतं हे अजून मलाच समजलेलं नाही.

माझा सख्खा मावसभाऊ मी कॉलेजला असताना वारला. मला सख्खा भाऊ नाही. पण तो सख्ख्या भावाहून जवळचा होता. आम्ही दोघांनी किती तरी धिंगाणा केला होता. पुण्यात प्रत्येक दिवाळी,उन्हाळ्यात तो मला भरपूर पिक्‍चर दाखवायचा. फिरवायचा. तो गेल्याचं कळलं, पण मला अजिबात रडू आलं नाही. जाऊन त्याचं शेवटचं दर्शन घ्यावं असंही वाटलं नाही. उलट त्या संध्याकाळी मी कॉलेज ग्राऊंडवर जाऊन कब्बडी खेळत बसलो. त्याच्या दहाव्याला गेलो तेव्हाही मला रडू आलं नाही. मला रडावासं वाटलंही नाही. लाजेखातर मी खालचा ओठ दाताने जोरात चावला. तेव्हा कुठे माझ्या डोळ्यातून पाणी आलं. पण त्यानंतर आठच दिवसांनी मी कॉलेजमध्ये बसलो होतो. लेक्‍चर सुरू होते. मी दारातून बाहेर पाहिलं. लांबवर भाताची शेतं पसरलं होती. आणि कॉलेजसमोरच्या खाचरात एक कोकणी म्हातारा अंघोळ करत होता. काळाकुट्ट. त्याची हाडं न काडं मला लांबूनही मोजता येत होती. चेहरा पार खपताडात गेला होता. मला एकदम गलबलून आल. आणि भर क्‍लासमध्ये माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या संततधार धारा वाहू लागल्या. थांबता थांबेनात. मी तसाच ओघळत्या डोळ्यांनी क्‍लासबाहेर पडलो. तेव्हापासून मला माझं कोडं पडलंय. सख्खा भाऊ मेला, रडलो नाही... आणि कोण कुठला जखापडा म्हातारा... त्याला पाहून रडतो बसलो. अजून कोडं सोडवतोय.

पांडुरंगाचंच काय पण तसं मला कोणत्याच देवाचं वावडं नाही. वेडही नाही. आईमुळे मारुती मनात बसलाय आणि आता तो माझा मित्र झालाय. त्यामुळे त्याला नाही टाळू शकतं. पण बाकी सर्व देव मी फाट्यावर मारून फिरतो. मी घरी कधीही देव पुजत नाही. देव्हाऱ्यात धुळीचा थर साचतो. आई कधी कधी मेटाकुटीला आली की सणावाराला तिच्या समाधानासाठी देवावर तांब्याभर पाणी ओततो. तेवढंच.

जेजुरीचा खंडोबा आमचं कुलदैवत. पण गेल्या 10-15 भेटीत मी फक्त एकदा तळी भरली. ती सुद्धा आईची आठवण आल्याने, तिला वाईट वाटेल, एकदा तरी भरावी म्हणून. बाकी मला देवापेक्षा त्याच्या भक्तांच्या भावना व देहबोली वाचण्यात जास्त रस असतो. प्रत्येक माणूस न बोलता खूप काही सांगत असतो. त्याच्या न कळत त्याला समजून घेण्यात वेगळाच आनंद असतो. त्यामुळं कधी कधी कंटाळा आल्यावर मी शिवाजीनगर एस टी स्टॅंड वर जाऊन माणसं वाचत बसतो. जेजुरीगडावर मी फक्त एकदा गाभाऱ्यात गेलोय. मी देवाचे लांबून थेट दर्शन घेण्याची एक जागा शोधलिये. दिपमाळेजवळ सर्वांत बाहेरच्या बाजूला एक जागा अशी आहे, की जेथून गाभाऱ्यात कितीही गर्दी असली तरी थेटपणे खंडोबाच्या पाया पडता येत. त्याच्या नावाने भंडारा लावला, की आपण माणसं वाचायला मोकळे.

अशा पार्श्‍वभूमीवर ही नोट देवाचा प्रसाद म्हणून मी सांभाळून ठेवणं शक्‍य नव्हतं. हनंमंतालाही ते पसंत नव्हतं. कुणा गरजवंताला नोट दान करावी, तर या क्षणी सर्वांत जास्त गरजवंत आम्ही दोघे होतो. आणि दान तिच गोष्ट करावी, ज्यात तुमचा घाम आहे. त्यामुळे आम्ही उठलो. शनिवारवाडा चौपाटीवर गेलो. दोन ओली भेळ आणि एक कांदा उत्तप्पा खाल्ला आणि आमची पावले आपापल्या हापिसाच्या दिशेने चालू लागली. माझ्याच नकळत माझी पाचवी दिंडी पांडुरंगाच्या पाया न पडताही त्याच्या प्रसादाने पूर्ण झाली होती.

(ता. क. - त्याच रात्री बफर स्टॉकमधून "अलका'ला स्टॉर्म वॉरिअर्स हा चित्रपट पाहिला.)

Tuesday, July 6, 2010

चंद्र म्हणू की चांद तुला मी...

चंद्र म्हणू की चांद तुला मी...
तू अंकुरत्या भूईचा भास
स्वप्न म्हणू की सत्य तुला मी...
चैत्र म्हणू की चैत्राली बास

उडती पापणी डोळ्यांवरती
लवली भुवई बोलण्याकाही
वेड्या बटीचा अल्लड चाळा
अन्‌ कर्णफुलांची अस्वस्थ थरथर

ओठ लपवती दंतपंक्तींना
गाल खुलवती तव नयनांना
नाकी चमके चमकी छान
गळा तुळशी माळेचं भान

मी सांभाळू किती डोळ्यांना
नजरा लोकांच्या झाल्यात द्वाड
काजळ तिळभर रोव गाली
अन्‌ घरी जाऊन दृष्ट काढ

चंद्र म्हणू की चांद तुला मी...
चैत्र म्हणू की चैत्राली बास

(संतोष, 6 जुलै, 10ः30 pm)

Monday, July 5, 2010

चारोळ्या आणि सारोळ्या (2003-05) 1

1) प्रीती

चंद्र चांदणे, सुर्य तारे

बस्स आता थकलो आहे...

चांदण्यात चंद्राच्या

प्रीतीसच मुकलो आहे...

  • तीन चार वर्षे माझी एक डायरी हरवलेली होती. काल-परवा घर बदलताना ती सापडली. तिच्यातील चारोळ्यांनी आठवणींचा जुना खजिना पुन्हा एकदा खुला झाला. या चारोळ्या-सारोळ्या (सहा ओळींच्या कवितेला मी सारोळी म्हणतो) माझी 2003 ते 2005 या काळात कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाची स्पंदनं आहेत. यातील अनेक स्पंदनं कॉलेजच्या "स्पंदन' या पाक्षिकात प्रसिद्ध झालीत. (मी काही काळ त्याचा संपादक असल्याने म्हणा हवं तर). आता या चारोळ्या, सारोळ्या वाचल्या की माझं मलाच हसू येतं. कधी कधी माझ्या वैचारीक दारिद्रयाची लाजही वाटते. पण या प्रत्येक चारोळी किंवा सारोळीसोबत कॉलेजमधील किस्से, कहाण्या, गोष्टी धांगडधिंगा आठवल्या की बरं वाटतं. आपण असेही होतो, हे पचायला अवघडही जातं. पण ईलाज नाही. जरा आहे तसा आहे. पटलं तर घ्या... नाही तर आपली वेवलेंथ वेगळी आहे... असं समजा !

  • 2) ऍग्री

तु म्हणतेस तुझी माझी

जोडी काय न्यारी आहे...

मला मात्र माझी

बीएस्सी ऍग्रीच प्यारी आहे...

  • 3) अंत

एकदाच घ्यावा छंद

आरंभ अंत सौख्याचा

एकदाच व्हावे धुंद

आरंभ अंत सुखाचा

एकदाच व्हावे अंध

आरंभ अंत जिवनाचा

  • 4) सरण

जेवण झाल्यावर ढेकर कुणीही देतं

मी जेवणाआधी दिलाय

दिवसभर तर कुणीही जागतं

मी रात्री जागवल्यात

मेल्यावर तर कुणीही जळतं

मी तर जिवंतपणी जळतोय...

  • 5) अर्धा डाव

तू असं कुणाकडं

पुन्हा कधीही पाहू नकोस

आशेचं मृगजळ दावून

अर्ध्यावरती सोडू नकोस

  • 6) गुलाबाचा काटा

गुलाबाचा काटा

कधी कधी जास्तच अडतो

पाकळीचा सुवास मग

फुलालाच नडतो...

  • 7) धोतरा

तुला विसरता विसरता

मी मलाच विसरुन गेलो

गुलाब गंधाच्या आशेने

धोतऱ्यात अडकून गेलो

  • 8) ह्दयाचे काटे

तिच्या मोहक हास्यासाठी

गेलो प्रेमाचिये वाटे

बोचतात मला आता

माझ्या ह्यदयाचे काटे

  • 9) काटा

तुझ्या सरड्या प्रेमाला

सापासारख्या हजार वाटा

मग मलाच का समजतेस

बाभळीचा जहाल काटा

  • 10) पालवी

प्रत्येकाच्या आयुष्यात

नेहमी असंच होतं का

पालवी फुटण्याआधी

झाडंच जळून जातं का

चारोळ्या आणि सारोळ्या (2003-05) 2

11) नशिब
माझं स्वतःचं नशिब
माझीशीच का खेळतं...
पाहिलेलं प्रत्येक स्वप्नं
मृगजळ का ठरतं..

12) मुक्ती
तुला माझ्याशी बोलण्याची
माझी काही सक्ती नाही
पण एक लक्षात ठेव
तुझ्या माझ्या प्रेमाला
मरणाशिवाय मुक्ती नाही

13) फरक
तुझ्या माझ्या प्रेमात
फक्त एकच फरक आहे
तुला प्रेमभंग करण्याची
तर मला सहण्याची हौस आहे

14) लायकी
माझ्या प्रेमभंगात
तुझा काही दोष नाही
मीच माझी लायकी विसरलो
तुझ्यावर काही रोष नाही

15) आठवण
तू जेथे असशिल तेथे
नेहमी अशीच सुखी रहा
आम्हा दुर्जनांच्या आठवणी टाळून
तुझ्या धेय्याकडे चालत रहा

16) नशा
तुझ्यासाठी झुरण्यातही
एक वेगळीच नशा आहे...
माझ्या प्रेममय जिवनाची
तिच खरी दशा आहे...

17) चेहरा
माझा चेहरी मी
आरश्‍यात कधी पाहिलाच नाही
बरे झाले तु सांगितलेस
आता मी आरशात कधी पाहणारच नाही

18) मध
फुलाकडे पाहताना
काट्यात कधी अडकू नका
मधाच्या गोड आशेनं
विष कधी चाटू नका

19) माफी
सुखाच्या आशेनं
मी तुला दुखःच दिलं
शक्‍य असेल तर माफ कर
तुला विचारल्याशिवायच प्रेम केलं

20) अंधार
रात्रीच्या अंधारात
प्रकाशाची आशा आहे
ह्दयाच्या अंधारात
स्वप्नाची आशा आहे
पण माझ्या जिवनाची
आशाच अंधार आहे

चारोळ्या आणि सारोळ्या (2003-05) 3

  • 21) पाखरु

दारुच्या एका ग्लासा ग्लासात

पाखरु खोल बुडून गेलं

पिलं तोवर पिलं

नी पिऊन झाल्यावर उडून गेलं...

  • 22) प्राण

मला नक्की काय होतंय

माझं मलाच कळत नाही

जिवात जीव नसूनही

प्राण काही ढळत नाही

  • 23) जीवनाच्या रस्त्यावर

जिवनाच्या रस्त्यावर

तुझ्या माझ्या पायवाटा

कधी जुळंच नयेत... कारण

मला खड्यात पडायचं नाही !

  • 24) बरे झाले

बरे झाले देवा

तिने केला माझा हेवा

तिला आठवून आता

नाही झुरणार केंव्हा

  • 25) मुकी वाट

मी थांब म्हटल्यावर

तू काही थांबणार नाहीस

म्हणून तुझ्या मुक्‍या वाटेकडं

मी कधी पाहणार नाही.

  • 26) तुटता तारा

पौर्णिमेच्या चांदण्या रात्री

एक तारा ओघळला

कुण्या निष्ठूर चांदणीसाठी

त्याचाही जीव पाघळला

  • 27) चार खांदे

माझ्या जिवनाची नौका

लागो केव्हाही नदी पार

पण नक्की भेटतील का

मला हक्काचे खांदे चार

  • 28) दगा

दिवा जळत असताना

जळणारे खुप असतात

पाणी वाहत असताना

वाहणारे खुप असतात

प्रेम कसंही असू द्या

दगा देणारेही खूप असतात

  • 29) थेंब

माझ्या आसवांच्या थेंबा थेंबात

चार सोनेरी क्षण आहेत

दोन तुझ्या भेटीचे

तर दोन विरहाचे आहेत...

  • 30) दिवस

जो दिवस माझ्यावर आला

तुझ्यावर कधी येऊ नये

जिव लावून अर्ध्यावरती

तुला कोणी सोडू नये

चारोळ्या आणि सारोळ्या (2003-05) 4

31) फास
दलालांच्या तोंडी
शेतकऱ्याचा घास आहे
कुणब्याच्या मानेला
बाजारातच फास आहे

32)महायुद्ध
शांत शांत म्हणता म्हणता
जग अशांत झाले...
महायुद्धाच्या अग्नीत
न्हाऊन निघाले....

33) लोकशाही
निवडणूकीच्या काळात
साम, दाम, दंड, भेद...
गांधी नेहरूंच्या स्वराज्यात
लोकशाहीच्याच ह्‌दयाला छेद...

34) असाही देव
देवाऱ्याही देवळात
माणूसकी बाटू लागली
पुजाऱ्याची काळी आई
सत्तेलाच चाटू लागली

35) त्सुनामी
कोण म्हणतं त्सुनामी
फक्त समुद्रच ढवळतात
जरा माझ्याही मनात पहा
त्या मनही जळतात

36) संधी
जिवनाच्या रस्त्यावर
जर कधी काळोख दाटला
तर फक्त दिवा जप
संधी त्याच किरणांनी येईल
तू फक्त चालत रहा

37) भेट
आयुष्यात एखाद्या वळणावर
जरुरी नाही आपण भेटलंच पाहीजे
पण जेथे असाल तेथे असे रहा
की भेटावसं वाटलं पाहीजे

38) स्वप्नं
आयुष्यात अशी अनेक वळणं येतील
की काहीतरी गमवावं लागेल
त्या प्रत्येक वळणावर
जीव सोडला तरी चालेल
पण स्वप्न कधी सोडू नकोस...

39) ओळख
आयुष्यात पुन्हा भेटल्यावर
ओळख देण्याच्या लायकीचा वाटलो
तरच ओळख द्या...
नाही तरथुंकून गेलात तरी चालेल

40) डोळे
जिवनाच्या रस्त्या रस्त्यावर
तुम्हा सर्व ओळखतील... असं नाही
सर्व विसरतील... असंही नाही
तुम्ही फक्त चालत रहा
चार डोळे तुमची वाट पाहतील
दोन आईचे, दोन वडीलांचे...

चारोळ्या आणि सोरोळ्या (2003-05) 5

41) मैत्री (रुपा, अस्मी, पद्मा, शिल्पा, प्रिया, शुभांगी व स्मितासाठी)

वाटलं नव्हतं कुणी असा
मैत्रीचा हात देईल
जिवनाच्या रस्त्यावर
दुःखातही साथ देईल

हिच आपली सप्तरंगी साथ
अशीच कायम राहो
इंद्रधनुष्य खुलतच जावो
मी तुटता तारा झालो तरी....

42) (सागर कवडेसाठी-त्याच्या डायरीत)


सागरात यशाच्या
सागर तू पोहत raha
milalach कधी वेळ तर
माझ्याही घरी डोकावून पहा

43) मासळी (शैलेश घुले यास)

शैलेश तू तर
सुमडीत कोंबडी मारलीस
वाटवंटात चालता चालता
मासळी कशी धरलीस

44) तुझ्यासाठी (संतोष धायगुडे, रियाज इनामदार)
तुझ्या एका हाकेसाठी
माझे कान आतुर आहेत
तु फक्त मागुन बघ
माझे पंचप्राणही हजर आहेत

45) दोन गोष्टी
जगात फक्त दोनच गोष्टी तुमच्या आहेत.
तुमच्या ह्दयातील माणसं आणि तुमची स्वप्नं
दोन्हींना जिवापाड जपा...
कारण,ती तुटल्यावर जीवन उद्धस्त होतं...

चारोळ्या आणि सारोळ्या (2003-05) 6

  • 46) आसू

काश हम आपकी जगह होते

तो आज इस बेबसी के

काबील ना होते

आप जैसा चले तो जाते

मगर आँखो मे आसू ना होते

  • 47) मुलाकात

जिंदगी की राह में

जिंदगीया चलती रहेंगी

आप सिर्फ चलते रहो

मुलाकाते होती रहेंगी

  • 48)

या परवरदिगार बजरंगबली

मेरे दोस्तो को

सदा खुश रखना

उन्हे कभी मायुस मत होणे देना

क्‍योंकी वो मेरा...

पैसा उधार लेके जा रहे है...

  • 49) जुदाई

काश खुदा के पास

थोडी भी खुदाई होती

तो एक ही राह पर

हमारी जुदाई ना होती

  • 50) शाम

न जाने जिंदगी की किस शाम

आपसे फिर मुलाकात होगी

पता तो ये भी नही की,

शाम होने तक हम होंगे या नही

  • 51) जुदाई

जीवन की राह में

काश हर मंजिल पास होती

तो इस तरह दोस्ती से रुकसत होकर

जुदाई हमारे पास ना होती

  • 52) कमाई

मेने सारी जिंदगी

क्‍या खोया क्‍या पाया

जब जागा तब जागा

नही तो सारी रात सोया

  • 53) जाम

मोहब्बत के ख्वाब मे

तडपती शाम है

दिल से दिल मिलकर भी

हातो मे जाम है

  • 54)

समुंदर के बिच मे

पाणी क्‍या चिज है

दिल आया हडळ पे

तो परी क्‍या चिज है

तीन चार वर्षे माझी एक डायरी हरवलेली होती. काल-परवा घर बदलताना ती सापडली. तिच्यातील चारोळ्यांनी आठवणींचा जुना खजिना पुन्हा एकदा खुला झाला. या चारोळ्या-सारोळ्या (सहा ओळींच्या कवितेला मी सारोळी म्हणतो) माझी 2003 ते 2005 या काळात कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाची स्पंदनं आहेत. यातील अनेक स्पंदनं कॉलेजच्या "स्पंदन' या पाक्षिकात प्रसिद्ध झालीत. (मी काही काळ त्याचा संपादक असल्याने म्हणा हवं तर). आता या चारोळ्या, सारोळ्या वाचल्या की माझं मलाच हसू येतं. कधी कधी माझ्या वैचारीक दारिद्रयाची लाजही वाटते. पण या प्रत्येक चारोळी किंवा सारोळीसोबत कॉलेजमधील किस्से, कहाण्या, गोष्टी धांगडधिंगा आठवल्या की बरं वाटतं. आपण असेही होतो, हे पचायला अवघडही जातं. पण ईलाज नाही. जरा आहे तसा आहे. पटलं तर घ्या... नाही तर आपली वेवलेंथ वेगळी आहे... असं समजा !

झेड ब्रीज'वरुन

पुण्यात मी पहिल्यांदा एमपीएस्सीची तयारी करण्यासाठी दाखल झालो. स्टडीला अभ्यास करायचो. रहायला लकडी पुलाच्या कॉर्नरला मोरेंच्या बिल्डींगमध्ये होतो. संतोष धायगुडे, रियाज इनामदार, किशोर खरात, एकनाथ अमुप आणि मी. त्यावेळी झेड ब्रीज हा माझा फिरण्याचा, पाय मोकळे करण्याचा, भाषणांची तयारी करण्याचा, पाठांतर करण्याचा आणि टाईमपास करण्याचा अड्डा होता. त्यावेळच्या काही करतूती....

1)
तुझ्या मोहक हास्यामागे
स्वार्थ कधी दिसला नाही
तुझ्या मधाळ डोळ्यांमागे
कपट कधी दिसले नाही

तुझ्या लाल ओठांमागे
मत्सर कधी दिसला नाही
पण तुझ्या नजरे मागे
तुझा चालुपणा कधी लपला नाही...

2)
रामायण राम-रावणामुळे नाही
तर सितेमुळे घडलं
महाभारत कौरव-पांडवांमुळे नाही
तर द्रौपतीमुळे घडलं

माझ्या मित्रांनो जरा सावध रहा...
आता काळ-वेळ आपली आहे

3)
मैत्रिणीच्या खांद्याआडून
तुझं चोरुन पहाणं
मला चिंब भिजवून
तुझं कोरडंच रहाणं...

4)
अचिंब कमळ पाण्यात
कोरडे भाव डोळ्यांत
नाही तुज्या मनात
मग का हसतेस गालात

5)
वाहता वारा उनाड ओढणी
आणि माझं ह्दय कातर
अल्याड मी, पल्याड तू
आणि आपल्या मधील अंतर

6)
ढळला खांद्यावरुन पदर
वाऱ्याचा गुन्हा
की तुझाच निर्लज्जपणा
ऑन दं झेड ब्रीज...

7)
स्वतःच्या धुंदीत
जो तो आहे दंग
पुण्यातील माणसांना
ना रुप ना रंग

8)
झेलीत साऱ्या उष्ट्या नजरा
मुठेत वाहिला काल
एक सुगंधी गजरा
पण... सुकलेला, चुरगळलेला

9)
पुलावरील तुझं वागणं
सारं जग पाहत होतं
तुला त्याची जाणीव नसेल
पण पुलावरुन पाणी वाहत होतं...

10)
प्रवास संपला साथ संपली
सारं आता थांबणार का
भेट क्षणाचीच आपली
आठवण पुन्हा काढणार का

11)
वठलेलं झाड आज
गदागदा हललं
ना ऊन ना वारा
पण श्रावणाला भुललं

12)
खांद्यावरील मोकळे केस
आणि भुवयांमधील बिंदी
श्‍वेत वस्त्र अंगावर
धिरगंभिर योगिनी

13)
अपरे केस
टपोरे डोळे
आणि भांगातील कुंकू
अबोल चेहरा
रुक्ष डोळे
आणि तुझा निरोपाचा हात

14)
तुझा चेहरा सुकलाय
डोळे निस्तेज झालेत
हे कशाचं लक्षण
मला कळतंय...
कदाचित....
नाही...
मीच वेडा आहे.

Sunday, June 13, 2010

तुझ्या स्वप्नांची ओंजळ

--- एक दिवस असाही येईल
तुझ्या स्वप्नांची ओंजळ
आणि अपेक्षांची गाठोडी
सुखा सुखी रिती होतील
आज फक्त भरत रहा
तुझ्या स्वप्नांची ओंजळ
आणि बांधून ठेव गाठोडी
झगडण्याच्या आठवणींसह

फक्त पाहत रहा वाट
अविरत अविश्रांत...

एक दिवस असाही येईल
तुझी स्वप्न तुझ्या ओंजळीत
अन्‌ अपेक्षा होतील रित्या कुशीत
तु फक्त सोसत रहा
झेलत रहा क्षण
येतिल तसे येऊ दे
भिजलिस तर भिजत रहा
होरपळलिस तर पोळत रहा
पण, डोळ्यांच्या पापण्या
सदा खुल्या असू दे आशेसाठी
अन्‌ ओंजळ खुली असू दे स्वप्नांसाठी
आज फक्त झेलत रहा
झेलत रहा क्षण
जगत रहा हावऱ्यासारखी
जशी आहेस तशी...

गरज नाही बोलायची
शब्दांना झुलवायची
ओठ खोटं बोलतील कदाचित
फक्त भाषा कळू दे डोळ्यांची
ओंजळ सदा खूली ठेव
अन्‌ गाठोडी उघडी
क्षण फक्त झेलत रहा
क्षण फक्त जगत रहा
जशी आहेस तशी...


फक्त एक काळजी घे
ओंजळ हाती धरताना
बोटांतील फटीला विसरु नको
नकळत सैल सोडायला
तुझ्या स्वप्नांचे कवडसे
झरु दे, पाझरु दे...
तनामनात, श्‍वासाश्‍वासात
अन्‌ धुंद होऊ दे जगणं...
जसं आहे तसं
क्षण फक्त जगत रहा
जसे येतिल तसे
पाऊस आला भिजत रहा
वनवा लागला जळत रहा
विश्‍वास ठेव आशेवर
अन्‌ ओंजळीखालच्या ओंजळीवर
तुझी स्वप्नं शाबूत राहतील
जिवंत राहतील सदा...
भिजलेल्या पानापानातून
होरपळलेल्या काडाकाडातून
अन्‌ अवचित त्यांचा फिनिक्‍स होईल...

(संतोष, 11 जून 2010, 10.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

तु फक्त जगत रहा

विसरलेत शब्द आता...
भाव त्यांच्या जगण्याचा
तु वाचून बघ एकदा
अर्थ त्यांच्या भंगण्याचा

मुके शब्द वाचशिल कसे
ओठ शांत असताना
श्‍वास कधी खोलणार नाही
बंद पापण्यांच्या भावनांना

वाच हळू हळू
अन्‌ बघ समजतोय का अर्थ
थोडं तुला समजलं तर
थोडं मलाही सांग जमलं तर

गरज नाही शब्दांना
आता अर्थ सांगण्याची
प्रत्येक वेळी घासून पुसून
तोच भाव उगळण्याची

शब्द म्हणजे भाव
शब्द म्हणजे स्वप्नं
शब्द म्हणजे अपेक्षा
अन्‌ शब्द म्हणजे "दुःख'ही

शब्द म्हणजे वणवा
शब्दाने शब्दाला भिडणारा
शब्दांनेच पेटणारा
अन्‌ ओठांनी विझणारा


तु फक्त पाहत रहा
वनवा माझ्या शब्दांचा
अन्‌ चढू दे झालर नवी
तुझ्या स्वप्नांच्या साजाला

तु फक्त पाहत रहा
तु फक्त पेटत रहा
तु फक्त भोगत रहा
तु फक्त जगत रहा
येईल त्या क्षणाला
मिळेल त्या सुखाला...

जगता जगता जगत रहा
भोगता भोगता भोगत रहा
तुझ्या कवेतील आकाशाला
तुझ्या स्वप्नातील ताजव्याला

प्रत्येक पावलाची होईल मोहोर
आणि आज्ञा प्रत्येक श्‍वासाची
फक्त पाऊल पडू दे पुढं
द्याया फाटक्‍या नभा छाया

जगत रहा, झगडत रहा
लढत रहा, मढत रहा सदा
फक्त रिती असू दे ओंजळ
आणि जोडीला खुलं गाठोडं


(संतोष, 11 जून 2010, 10.15 PM, शनिवारवाडा, पुणे)

अजून थोडं चालत राहू

खरं सांगतो
तुला तूच ठावूक नाहीस
जसा मला मी
अजून वाट संपली नाही
अन्‌ दिवस बाकी कासराभर


अजून थोडं चालत राहू
कदाचित, त्या तिथं...
लाल रक्तिमेच्या इथं
सापडेल आपल्याला
माझ्यातील तू... अन्‌ तुझ्यातील मी...

अजून थोडं चालत राहू
अजून थोडं चालत राहू

(संतोष, 11 जून 2010, 11.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

नात्याचं नको नातं

हात असू दे पाठी

अन्‌ शब्द माझ्या ह्‌दयाशी

नात्याचं नको नातं

फक्त श्‍वास बांधू दे गाठी

Santosh, 12 jun 2010, Shaniwarwada.

तु बोल ना...

तु बोल ना...

तु बोलणार म्हणून
सारं जग थांबलंय
पानं फुलं ऊन वारा
काळजानं नभ पांघरलंय

ओठ थोडे हळूच उघड
वेडं दव पाझरलंय
थेंब मोत्याचे झेलाया
माझं मन मोहरलय

मान वेडावू नको अशी ही
तना मनात चांदणं फुललंय
तुझे शब्द सोसणार नाही
मी शब्दगंधात चिंबलोय

तुझा नाद भिनलाय कानी
अन्‌ गंध हदयाच्या कुपीत
गात्र गात्र गुणगुणतंय
तुझ्या सयीच्या खुशीत

(संतोष, 11 जून 2010, 12.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

बात

बात,
बात तर खूप आहे...
पण जाऊ दे...
तु सांग...
असं मी म्हणणार
अन्‌ तू बोलायला लागलीस की
माझीच बात होणार...

आता थांबावसं वाटतंय...

मी थांबतो आता

खरंच आता थांबावसं वाटतंय
अनवाणी चालनं...
भुकेलं राहनं...
सगळंच झेंजाट,
आता सोडावसं वाटतंय....

खरंच,
आता थांबावसं वाटतंय


अन्‌ चालावं कुणासाठी
वाट पाहणारंही कोण आहे
चिमण्याची घरट्याला
त्या पिंपळाची साथ आता
सदाची सोडाविशी वाटतेय
खरं सांगतो
आता थांबावसं वाटतंय...

बास झालं हे सॅंडीचं
रोज नवं जगणं
कुणाच्या तरी नावानं
क्षण क्षण रडणं
पालथ्या घड्यावरचं पाणी
आता मोडावसं वाटतंय
खरं सांगतो
आता थांबावसं वाटतंय

पण साली ही आशा खूप भिक्कार आहे
नाद जडला सुटत नाही
नशा काही उतरत नाही
तुच सांग
मी काय करु
दमलोय, थकलोय, विरघळलोय कनाकनानं
खरंच आता थांबावसं वाटतंय...


(संतोष, 11 जून 2010, 11.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

माझ्या मढ्याची मिरवणूक

हुशSSSSSH

गेला एकदाचा म्हणून
त्यांनी माझी तिरडी सजवली
अन्‌ उचलायची वेळ आल्यावर
माझ्या बायकोलाही मढवली...

तिरडीला माझ्या
नवे बांबू, नवी सुतळी
अंगावर नवी शाल
आणि नाकात नवा कापूस
यांनी मला जाळल्यावर
कोणाचा कोणाला पायपूस...

माझ्या मढ्याची मिरवणूक
टाळ मृदुंगानं गाजली
चितेवर निजवल्यावर
मांगाची हलगीही वाजली
काळ्या बाजाराचं घासलेट
त्यांनी सरणावर ओतलं
फक्त चार आण्याच्या काडीनं
माझं मढं पेटलं...

गेली जाळून मला
सगळी नाती गोती भिकारी
जन्म गेला झुंजण्यात
मी सरणावर राखारी

मनु,
निदान तिने तरी
मागं वळून पहायचं होतं
कपाळावरील कुंकवाला
माझ्यासाठी जपायचं होतं
तु म्हणशील हा मेला
अन्‌ ती झाली विधवा...
आता "फट्ट' कवटी फुटल्यावर
काय अर्थ कुंकवाला
पण खरं सांगू मनु
तिचं उघडं कपाळ
मला मी मेल्याची आठवण देईल
रडेल मी दवांनी
हरवतील अश्रू धुक्‍यात

राहू द्या कपाळी तिच्या
ते कुमकुम रेखलेले
नाहीतर,
माझं मढं रोज मरेल
ते पुन्हा तिरडी सजवतील
अन्‌ उचलायची वेळ आल्यावर
माझ्या बायकोला मढवतील...

(संतोष, 11 जून 2010, 10.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

माझ्या मनच्या पाखरा

माझ्या मनच्या पाखरा,
शांत हो...
डोळे पुस,
आणि झटकून टाक पिसं...


वळवाच्या पावसानंतर,
जशा जमिनीला भेगा...
तुझी वाट एकटी पाखरा,
नको साद कोरड्या नभा...


फिरवू दे पाठ जगाला,
नवं आभाळ शोध...
तोडू दे नातं जात्यांना,
नवं रान शोध...


जळलं जरी सत्व सारं,
जळत नाही पिळ...
सुत नवं धरण्याआधी
झटक भाळीची धूळ...


माझ्या मनच्या पाखरा,
शांत हो...
डोळे पुस,
आणि झटकून टाक पिसं...


संतोष, 12 जून 2010, रात्री 12.50, कोथरुड, पुणे

हवं कशाला कोण

ही सारी माया आहे,
वयातल्या कायेची...
सागरानं कधी साठवलीत का,
कंपनं प्रत्येक लाटेची...

हवं कशाला कोण तुला,
सुकले अश्रू पुसायला...
ह्दय स्वतःचच ठेव खुलं,
सुख दुःखाच्या कंपनाला...

या बाजारी रित आगळी,
लेची पेची वाट नाही...
पाणी इथं गेल्यावर डोई,
आई पायी पोर घेई...

ह्दय, कंपनं, आपलंपण
जपून ठेव मनात बाई...
इथं सारा व्यवहार
अश्रूंचे कुणाला मोल नाही...

(संतोष 13 जून 2010, 12.00, कोथरुड, पुणे)

आमचं घोडं पेंड खातं...

12 महिने 365 दिवस झुरल्यावर
ती वाह म्हणते...
आन्‌ त्या एका शब्दानेच,
आमची पालखी उठते...

दरवर्षी पावसाळा येतो,
सरींमागून उन पडतं...
हिरव्यागार गवतावर,
आमचं घोडं पेंड खातं...

दर वर्षी सालं असंच होतं,
पावसानं पालवी फुटते...
अन्‌ ती वाह म्हटल्यावर
आमची पालखी उठते...

(संतोष, 12 जून 2010, रात्री 11.30, कोथरुड, पुणे)

बदललाय पावसाळा...

पाऊस आज पुन्हा आला,
तुला मला खिजवायला...
पेटलोच चुकून पाण्याने,
जळण्याआधी विझवायला...


पाऊस म्हणतोय साथ दे,
ह्दयाच्या भाषेला...
झाकशिल कशी बहरात या,
उमलत्या कळीच्या गंधाला...


पण, त्याला तरी काय माहीत,
आपला बदललाय पावसाळा...
आता खिडकीतूनच पाहिन मी,
तुला पावसात भिजताना...


तुझी चिंब पन्हाळी,
कमरेवर त्याचा हात...
तू झेलत राहशील पाऊस
नव्या पावसात नवी बात


माझा पाऊस कौलावर
मी कोरडाच घरात
तुला भिजलेली पाहिन मी
ओल्या पापण्यांच्या आत....

(संतोष, 12 जून 2010, रात्री 9.30, कोथरुड, पुणे)

Saturday, June 12, 2010

अंत नको पाहू...

हा चंद्र तुलाच स्मरतो
चांदण्यावर कुरबुरतो
फक्त तुझ्या सईने माऊ
रात्र रात्र तळमळतो...

चांदण्या आज तप्त लाल
होतेय लाही लाही
तू नसताना गे माऊ
मी चांदण्यात जळूनी जाई...

वाऱ्याने चंद्रही हलतो
नजरेने शुक्र निखळतो
ढग अवचित आभाळी विरतो
मी ही तसाच मौनात मरतो...

सखे माझ्या माऊ...
अंत नको पाहू...

(संतोष, 11.45 pm, 16 मे 2010, पारगाव.)

Friday, May 7, 2010

असेन मी नसेन मी

अर्धी वाट, अर्ध ताट अन्‌ अर्धी बात
सोडून कधी जाऊ नको
दिस आजचाच आपल्या हाती
मान मोडूनी वळू नको...

असेल मी नसेल मी
क्षण माझे टिपण्या भूलू नको...

चिमटीत वारा धुंद थरारा
क्षण हातचा सोडू नको
दवबिंदूचा सहस्त्रकण मी
ओठांनी टिपण्या भूलू नको

असेन मी नसेन मी
क्षण माझे टिपण्या भूलू नको...

(संतोष, 4 मे 2010, सकाळी 1.00, कोथरूड, पुणे)

Thursday, May 6, 2010

ऍग्रोवन आलाय साथिला

पाऊस पडला, शिवार फुलला
सुटलाय गंध मातीला, आरं मातीला
ऍग्रोवन आलाय साथिला
बघ, ऍग्रोवन आलाय साथिला...

खरीप तोंडावं आलाय, बसलाय का ?
रब्बी धरायचा हाय ना, थांबलाय का ?
आरं, उन्हाळ्यातबी फुललं मळा
नि धाटाला धाटाला लागतील कळा...

उठ्‌ ऍग्रोवन आलाय साथिला
चल, ऍग्रोवन आलाय साथिला

तू ज्ञानानं नडला, पुढं हाये आम्ही
तु अन्यायानं पिडला, संगं हाये आम्ही
आता मनगटाला भिडव मनगट,
ग्लोबल भरारी घ्यायाला...

चल ऍग्रोवन आलाय साथिला
उठ ऍग्रोवन आलाय साथिला...

(संतोष, 6 मे 2010, कोथरुड, पुणे)

Wednesday, May 5, 2010

मिस्‌ करतोय, अन्‌ तुला... ह्‌ट

तुला काय वाटतं...
मी मिस्‌ करतोय तुला... ह्‌ट
आठवण येते थोडी बस्स
बाकी काही नाही...

सकाळी उठल्यापासून, झोपेपर्यंत
तू मला अजिबात आठवत नाहीस
आरशात एकट्याला पहायला
त्रास होतो थोडा, बस्स
बाकी काही नाहीय...

दुपारी जेवायला बसल्यावर
घास थांबतो ओठांजवळ
पण भाजी बरोबर नसते यार खानावळीची,
तोंड अळणी होतं थोडं, बस्स
खरंच तुला मिस्‌ नाय करत मी...

खरंय आता एकट्याला
रफी, गिता नको वाटतात...
पण लाऊडस्पिकर लावतो मी रात्री
जीव दंगला गुंगला ऐकताना,
थोडी हूरहूर होते बस्स !
बाकी काही नाही...

माझा मोबाईल गंडलाय
डब्बा झालाय त्याचा
हे आता तु न सांगताच समजतंय मला
साला, कधी पण तुझी रिंग वाजवतो
तो गंडलाय, पण मी नाय गंडलो
मेमरी थोडी विक झालीय, बस्स !

रात्री न जेवता उंबऱ्यात गेल्यावर,
काहीतरी आठवतं..
बंद दारापुढे डोळेही बंद होतात...
परत जातो मी डेक्‍कन चौपाटीवर
तुला माहीतीये,
भूक सहन नाही होत यार मला, बस्स !

तुला अजिबात मीस नाय करत मी...
रात्री बेडवर पडल्यावर
उशीवर पापण्या भिजतात पाण्यानं...
अलिकडं घरातही दव पडू लागलंय बहुधा

मी खरंच सांगतोय,
अजिबात मिस नाही करतये तुला...

तुला काय वाटतं...
मी मिस्‌ करतोय तुला... ह्‌ट
थोडी आठवण येते बस्स !
बाकी काही नाही...

(संतोष, 5 मे 2010, पुणे)

मी शांत राहीन

तुम्ही म्हणाता ना... शांत हो !
चालेल, होईल मी शांत
आणि शांतच राहील अखेरपर्यंत

मोकळा झालो तरी
पोरका झालो तरी
माझं घर लूटलं तरी

शांतच राहील मी...
अजिबात त्रागा करणार नाही

आहे मी शांत आणि संयमी
गातील लोक माझ्या संयमाच्या गाथा
म्हणतील आहे स्थितप्रज्ञ यासम हा
होतील माझ्या गितेची पारायणे
शांतपणे... संयमाने... घराघरात

परिस्थिती न बदलता, संयमानं
निर्जिवपणे जगल्याबद्दल...
उभारतील माझे पुतळे,
चौका चौकात, गावा गावात

मग मानसांनी शोधलेल्या माझ्या कर्तृत्वावर
विष्ठा करतील संयमी कबुतरं
अन्‌ माझ्या स्वाभिमानाच्या पिंड पडेल नदीवर

तरीही मी शांत राहीन,
तेव्हाही मी शांत राहीन
खरंच मी शांत राहीन... अखेरपर्यंत

(संतोष, 5 मे 2010, शनिवारवाडा, पुणे)

गर्भपात

काही चाललेलं नाही माझं
सगळं कसं शांत आहे
समुद्रासारखं... तळ्यासारखं...
फक्त लाटा उसळताहेत,
पोटातल्या पोटात...
होताहेत गर्भपात आतल्याआत

समुद्र, तळ्यातलं पाणी
डोळ्यात भरती येतेय
आणी लाटांचे होतायेत हुंदके

थोपवलाय मी समुद्र
पापण्यांच्या जाळ्याने
एखादा थेब पाझरतोय
बुबुळांतून आतल्या आत...
थेट घशात... कंठापर्यंत...
न्‌ि रेंगाळलीये जिभेवर...
थेंबा थेंबाची कडवड चव

काही चाललेलं नाही माझं
सगळं कसं शांत आहे
समुद्रासारखं... तळ्यासारखं...

(संतोष, 5 मे 2010, पुणे)

लव्हाळे...

आमची मुळं, उन्मळून गेलीत वादळानं

आणि तुम्ही, लव्हाळ्याच्या गोष्टी सांगताय...

महापूरी झाडांभागी, वहायचे भाग्य

लव्हाळी दुर्भागी, मातीची माया जड...

वहावयाच्या सुखासाठी, आज लव्हाळं रडतंय

जगण्याच्या पूर्णतेसाठी, पुन्हा ढग फोडतंय

त्याच्या घनान विटून, आभाळं फाटलं...

झाली पुन्हा दलदल, लव्हाळं त्यातंच फसलंय

कोण म्हणतं ? झाडे जाती, लव्हाळे वाचती !

जरा मातीमुळं पहा, लव्हाळं कधीच मेलय...

उरलाय फक्त सांगाडा... आमच्यासारखाच...

(संतोष, 5 मे 2010, पुणे)

बस्स...

तू बस्स म्हणालीस,

अन्‌ मी थांबलो

श्‍वास थांबले

क्षण थांबले

अन्‌ मग तू अवचित निघून गेलीस

थांबलेल्या ह्दयातून...

आता बस्स म्हणायलाही कोणी नाही

डोळ्यातील पाण्याला....

(संतोष, 5 मे 2010, शनिवारवाडा, पुणे)

Tuesday, May 4, 2010

वादळांचं चांदणं...

लाख वादळं झेलून,
जेव्हा तू मला भेटलीस...
तू दुर्गा होतीस,
क्रोधाग्नीत न्हालेली...

तुझ्या कोरड्या धगीनं,
मी धगधगलो...होरपळलो...
जळून गेलं मी पण,
अन्‌ पुन्हा मोहरलो...

आज सारी वादळं पचवून,
तु टिप्पूर चांदणं झालिस...
आणि मी मोजतोय चांदण्या,
तुझ्या कुशीत शिरुन....

यापुढे आयुष्यातील प्रत्येक वादळात,
मी तुझ्या पुढे असेन...
कारण,
मला चांदणं व्हायचंय,
अन्‌ तुला कुशीत घ्यायचंय...

(संतोष, 4 मे 2010, सायंकाळी 4ः30, शनिवारवाडा)

Saturday, April 10, 2010

प्रश्‍न

तिला वाटतंय तिच्या जाण्यानं,
प्रश्‍न सारे चटकन सुटतिल...
पण गालिब, वेडीला अजून माहीत नाही,
उत्तर पुसल्यानं प्रश्‍न कधी मिटतो का?

(संतोष, 10 एप्रिल 2010, दु. 1.00, शनिवारवाडा)

Friday, April 9, 2010

प्रेम

गालिब, तु म्हणाला होतास...
संत्या... प्रेम खूप वाईट असतं, करु नकोस !

पण मी ऐकलं नाही...
आता मी आहे, ती आहे... आणि डोळ्यात पाणी.

(संतोष, 10-4-10, 1 am, कोथरुड)

हिरवं सपान

बा,
मला फक्‍त यवढंच सांग,
माती खाटी झाल्यावं
तु ताटी का बांदली नाय...

मला दिसायची
पाहटं तुह्या हाती इळा दोरी
डोक्‍यात सदा औताची गणगण
कधी बळीचा तुटका फाळ
तर कधी पिचाकल्यालं फारुळं

तुला कधी खुपली नाय का?
आखरावरली हाडकी जनावरं
वावरातली बारमाय भॅगाडं
बायकुच्या डोई शेणकुराची पाटी
आण्‌ लेकराची फाटकी बंडी

मातीइनाबी जिता यईल
नदीइनाबी पोहता यईल
आसं तुला वाटलंच नाय का ?

शॅजारचा हिऱ्या ममयला ग्याला
गोदीवं का धक्‍क्‍यावं, मुकादम झाला
त्याचा करकरीत सदरा पाहून
मुंगीनं मुतात बुडण्यापेक्षा
ताठ मानंचा हमाल व्हावं
आसंबी तुला वाटलं नाय ?

कोरड्या घामाच्या रापल्या मुठीत
संसाराच्या भाग्यरेघा बुडविताना
तुला कायचं कसं वाटलं नाय ?

का कोरड्या मातीत निजून तुला
हिरवं सपान पडलंच नाय...

मला फक्‍त एवढंच सांग,
माती खाटी झाल्यावं
तु ताटी का बांधली नाय...

(संतोष, 10-4-10, 11 pm शनिवारवाडा)

Thursday, April 8, 2010

आज्या तुला सलाम....

डोळं उघडायच्या आत मायबाप गेल्यावर
आजीचा इटल्येला वला पदर चोखून जगलास

इट्टी दांडू, निंगुरच्या ख्यळायच्या दिसात
बापजाद्यांच्या कर्जापायी सालं काढलीस

वाण्याघरी राबलास बैलावाणी घाण्यावर
भरलं ताट सारून लीद भरलीस घोड्यांची

मनगटाला धुमारं फोडलंस नेकीनं, घामानं
तुझी गाणी गात्यात सुरकुतल्यालं गळं आजून

तुपल्या हातचं नाडं, सौंदर, घंट्या न्‌ बाशिंगं
आजून हायेत खिरपाळात, आजीच्या फुकणीसह

आज्या तुपल्या ताठ कण्यावरच उभाय गॉतावळा
तुझं बी आज वड व्हवून लगडलंय पारंब्यांनी

दोन यकराच्या खळगाटावर 35 यकरावर हिरवाळंलय
तुपल्या माळं आन्‌ बुक्‍क्‍या शप्पत आज्या,
तुव्ह्या घामाचा दिवा जळत राहील पिढ्यानपिढ्या

तुपल्या घामेजलेल्या मातीत उगलेलं मोती पाह्यला
आज्या तु जित्ता हवा होतास...
आज तु जित्ता हवा व्हतास !!!

(संतोष, 9-4-10, 12 pm. डेक्कनचौपाटी)

Tuesday, February 16, 2010

गाभ

जातीच्या दाव्यानं गाभडलेली
माझी कविता,
तुझ्या दारी आली,
थांबली, लवली.

आणि, तुझ्या नाजूक स्पर्शानं
पुन्हा गाभ राहिला,
धुमारे फुटले, वाढले आणि फोफावलेही

आज सारा गाव पाहतोय
त्याच्याकडं कौतुकानं

पण त्यांना माहीत नाही,
या गाभाचं गोत्र वेगळंच आहे ते...

(संतोष, 16 फेब्रुवारी 2010, पुणे)

Sunday, January 17, 2010

पांढरी

ताड ताड फुटाणे फोडत चुल जळत होती. माझी नजर गेल्या तासाभरापासून जाळावर स्थिरावलेली. बुबुळं जिव्हाळणाऱ्या आगीच्या तालावर नाचत होती. कानात भाकरी थापण्याचा थप थप थप थप आवाज घुमत होता. मी मान वर केली. माय चुलीशेजारच्या वट्यावर दोन्ही पायाच्या अंगठ्यात काठवट धरुन भाकरी थापत होती. पिठाळलेल्या हातानं बांगड्या मागं सारत ती काठवटीतल्या पिठात पाणी टाकायची. मळून मळून भाकरीच्या मापाचा गोळा करायची. लईच झाला तर तेवढा कमी करुन काठवटीच्या कानाला लावून ठेवायची. पुढच्या गोठ्यात घेण्यासाठी. मग गोळ्याखाली कोरडं पिठं पसरुन दोन्ही हातांनी काठवटीत गोल गोल फिरवत बडवत बसायची. थप थप थप सुरु रहायची. भाकरीचा तव्याच्या मापाचा चंद्र झाला, की तो तव्यावर पालथा व्हायचा. मग तापलेला तवा आणि फुललेला विस्तव त्यांची कामं चोख करायचे.

चूलीत काडक्‍या सारीत होतो. बारिकशी पेटती काडी हाती घेऊन गोल गोल फिरवणं, हा माझा चुलीपुढचा उद्योग. माय त्याला कोलत्या खेळणं म्हणती. माझा खेळ सुरु झाला की, ""कोलत्या नको ख्यळू... नाय तर चड्डीत मुतशील रातचं.'' हे मायचं बोलणं ठरलेलं असायचं. आत्ता मात्र ती कसल्या विचारात आहे, कोणास ठावूक. माझ्या कोलत्या खेळण्याकडं तिचं अजिबात लक्ष नाही. हातची कोलती खाली न टाकता मी तिला विचारतो, ""ंमाय वो... आपल्या घराच्या भिती कधी लिपायच्या ? पोपडं निघालत सगळं. भुई उखानलीये. धाब्याची पांढरी गळाया लागली आता. ""यडा हाईस का?'' माय माझ्यावरच उखडली. ""आरं, इथं काय आपूण कायमचं राहणार का आता. ह्य घर जुनं झालं. आण्‌ गावात तरी क्वॉनाचं धाब्याचं घर ऱ्हायलंय का आता? आता आपल्याला शिमिटाच्या, सिलॅपच्या घरात ऱ्हायला जायचं. काच नको श्‍यान ग्वाळा करुन सारवायचा आण्‌ पोचारा फिरवत बसायचा.'' पण घराच्या इटा उघड्या पडाया लागल्यात. लिपाया पायजेत ना. ""आभाळं फाटलंय. कुठं कुठं लिपणार हायीस तु. बाप ह्य घर पाडायचं म्हणतोय, आण्‌ ल्येक निघालाय भिती लिपाया. बघ तुझं तुच.'' असं म्हणून माय पुन्हा खाली मान घालून भाकरी थापायच्या नादी लागली.

माझं घर. माझ्या बापाचं आन्‌ त्याच्याही बापाचं घर. मारुतीच्या देवळाजवळंच. कौलारु. दुमजली. पांढऱ्या मातीचं. बाहेरुन पूर्णपणे शेणा मातीच्या काल्यानं सारवलेलं. एखाद्या मोठ्या देवळासारखं. पिढ्यान पिढ्याच्या सुख दुःखाचं साक्षिदार. गाभाऱ्याच्या ठिकाणी झोपायच्या खोल्या. त्याच्या शेजारीच स्वयंपाकघर. मंडपाच्या ठिकाणी दिवाणखाना आणि प्रवेशद्वाराच्या जागी मोठा ओटा. बाहेरुन कोणी आलं की पहिल्यांदा ओट्यावरचं टेकणार. मग तो कोणी सोयराधायरा असो की एखादा भिक्षूक. घराच्या मागच्या बाजूला मोठी बाग. आईला स्वयंपाकाला पुरेल एवढा भाजीपाला पिकतो त्यात. घराच्या चारी बाजूला मोकळीच मोकळी जागा आणि वर निळं आभाळ... आमचं घर सोडलं तर खेडेगाव असूनही आजूबाजूला सिमेंटच्या इमारतींचे जाळं वाढू लागलेलं. दाटी वाढत असतानाही आमचं घर मात्र आत्तापर्यंत ऐटीत ताठ उभं होतं. एखाद्या जुन्या पुराण्या लेण्यासारखं. स्वतःच्याच कस्तूरी गंधात मग्न. पण आता इथून पुढंच काय खरं नव्हतं. तसं पाहिलं तर मारुतीचं मंदीर गावाच्या वेशीवर किंवा वेशीबाहेर असतं. पण तीन-चार दशकांपूर्वी गावच्या वेशीवरुन नारायणगाव-शिरुर तालुका महामार्ग गेला आणि गाव हळूहळू रस्त्यावर आला. आमचं मळ्यातंल शेत आणि घर गावाला भिडलं. वेशीवरला मारुती आता गावात राहतो.

एवढ्यात मला बाजूलाच काही तरी उकरण्याचा आवाज आला. हात्तीच्या, हिला काय अवदसा आठवली. या बाईनं चक्क माझ्या घरातंच माती उकरायचं काम चालवलंय. स्वतःचं घर पोचारायला ही माझ्या घराची माती उकरतेय म्हणजे काय. घर अजून पाडलेलं नाही आमचं. जिवंत उभं आहे. मी इथं उखनलेली भुई, भितीचं पोपचं, विटा लिपायच्या गोष्टी करतोय आणि ही माती उकरतेय. कोलती तशीच टाकून तिच्या दिशेने झेपावलो. तोपर्यंत तीनं माती उकरुन भिंतीला खिंडार पाडलं होतं. तिचं डोकं आणि हात त्या खिंडारात होते. मी मोठ्या जोमानं तिच्या कमरेला विळखा घालून बाहेर खेचलं. अरे बापरे, ही तर अगदी माझ्या माय सारखीच दिसती. मी चाट पडलो. माय तर भाकरी थापतेय. मग ही कोण. मी निरखून पाहिलं. तिच्या अंगाखांद्यावर पांढरी सांडली होती. मी रागानं लाल झालो. चुलीकडं पाहिलं. भाकरीची थपथप सुरुच होती. ""माय वो... लवकर ये. ह्यो बघ ही काय करती.'' माय ओट्यावरुन उठली आणि माझ्या हातातील त्या बाईचा चेहता झरझर बदलू लागला. क्षणात रापला. म्हातारा झाला. ""आरं, ही तर तुपली मोठीमाय. मपली सासु. तुपली आजी रं. पाया पडते सासुबाय.'' म्हणत माय तिच्या पाया पडाया लागली. मी अचंबित. हाताची पकड सैल. आजी तर माझ्या जन्माआधीच मेलेली. मग आता कोठून उपटली. असो माय म्हणतेय आजी तर आजी. मला काय. ""आरं कधी मधी दिसत्यात त्या घरात माती उकरताना... सगळं कसं सपान वाटातं. पण पाया पडलं की झालं. ती तिच्या वाटंनं आन्‌ आपण आपल्या. पाय पड तिच्या आन्‌ यं इकडं जाळ म्होरं साराया.'' माय पुन्हा भाकरी थापाया बसली. माझ्या हातीतील पांढरीने माखलेली आजी लहान लहान होत चालली होती. मोठ्या फुग्यातील हवा सोडावी तशी. आता तर ती चार वर्षाच्या मुलीएवढी झालीये. एकदम डिक्‍टो निरमाच्या जाहिरातीतील मुलीसारखी. गोंडस. फ्रॉकही तसाच घातलाय तिनं.

आजी माझा हात धरुन चुरचुरत म्हणाली, ""मला आपलं घर दाखिव... घरभर फिरुन आण मला.'' मी तिच्या बगलेत दोन्ही हात घालून तिला उचललं. कडेवर घेतलं. आता ती माझ्या छातीशी मुडपलेल्या उजव्या हातावर निवांत बसली आहे. तिचे पाय माझ्या पोटाला, कमरेला टोचताहेत. डाव्या हाताचा विळखा माझ्या मानेभोवती टाकून ती घर न्याहाळतेय. आमचा फेरफटका सुरु झालाय. आजी मला घरातील एका एका जागेच्या भिंतीच्या तुळयांच्या, दगडा विटांच्या गोष्टी सांगतेय. आत्तापर्यंत कधी माझ्या नजरेलाच पडले नाही, असं माझं घर ती मला नव्याने दाखवतेय. जे मला पूर्णतः अपरिचित आहे. मी आता अनोळखी होत चाललोय या घरात. नव्याने ओळख करुन घेतोय. उत्सुकतेनं, नवलाईनं तिला प्रश्‍न विचारतोय. ती प्रत्येक उत्तरासाठी माझ्याच हातावर बसुन माझे गालगुच्चे वसुल करतेय.

आम्ही आता दिवाणखान्यात आलोय. गेल्या चार पाच पिढ्यांच्या कर्त्या पुरुष व महिलांच्या जोड्यांचे फोटो तिथं लावलेत. माझ्या आई-बापाचा फोटो तिथं अद्याप लागलेला नाही. ""इथंच तुपल्या माय बा चं लगिन झाले.'' (लग्न आणि दिवाणखान्यात असा प्रश्‍न मी आजीला विचारु शकलो नाही.) ""रातभर वरात चालली व्हती इथं. म्या नववारी शालू आन्‌ मोत्याच्या दागिण्यानं मढले व्हते नुसती. वटीत गहू आन्‌ खोबऱ्याच्या वाट्या. लखलखाट व्हता नुसता. आता बघ कसं झालंय. पोपडं निघालंत पार घराचं. त्याकडं पाह्यला तुपल्या बा ला यळ नाय. श्‍यानामातीच्या भिंतींना इसरला तो. चल बाह्यर दावते तुला, काय चालंलय इथं त्ये.''आता आम्ही घराबाहेरच्या रस्त्यावर होतो. घराकडे बोट दाखवत ती मला म्हणाली, ""पाय काय दिसतंय तूला त्ये.'' मी पाहिलं, आता आमचं घर आमचं राहिलं नव्हतं. त्याच्या दोन्ही बाजूने दोन मोठ्या इमारती उभ्या राहील्या होत्या. एका इमारतीचे मोठे सिमेंटचे खांब माझ्या मातीच्या घरात घुसलेले होते. छप्पर कौलांना खाली दाबत होतं. दोन्ही इमारतींवर एकावर एक मजले चढविण्याचं काम सुरु होतं. सारा परिसर इमारतींनी दाटीवाटीनं व्यापला होता. आमच्या जुन्या घराचा काळ जवळ आल्याचं स्पष्ट होतं. गावातील मातीच्या शेकडो घरांवर सिमेंटच्या, लोखंडी जाळ्यांच्या, सळया, गजांच्या घरांनी आक्रमण केलं. एखाद्या टोळधाडीसारखं. तेच आक्रमण आता आमच्या घरावरही झालं होतं. ते थोपवायला आजी अपूरी पडत होती.

""तुपला बा इथं शिमिटात लोखंडाच्या कांबा घालून पैशाचं मजलं उभारणार हाय. लोखंडाचं पिंजरं करणार आन्‌ त्यात भाड्याची माणसं भरणार. बिचारं साळंतलं मास्तर, परगावची पोरं, तलाठी, वायरमन, भैयं अशी माणसं खुराड्यामधी येऊन आडाकणार. खुराड्यांना ना रंग ना रुप. तुपल्या बा ला फक्त पैका हवाय. कलिचा भस्म्या रोग झालाय त्याला. आपलं कौलामातीचं घर पाडून शिमिटाचं ठोकळं मांडून खिसा भरायचाय त्याला. तो पोटात ऱ्हायला तव्हा माती खायचं डव्हाळं लागलं व्हतं मला. घराच्या भितीची पांढरी खाल्ली म्या. भुई चाटली. वावरात तुपल्या आजाची नजर चुकवून शाळूच्या ताटाच्या बुडाला आडाकल्याली काळी माती जिभंची सालटं निघंस्तोवर चाकली. त्या मातीवं तुपला बा नऊ म्हैनं नऊ दिस पोसला. आन्‌ आता...

आजीनं आता मला इमारतीच्या आत चलण्याचा हुकूम केला. मी तिला हातावर घेऊन जिना चढण्याची कसरत करु लागलो. आत जिकडं तिकडं सिमेंटचे काळपट ढिग पडलेले. वाळूचे डेपो लागलेले. वर वर जाईल, तसा जिना अरुंद होत गेला. दुसऱ्या मजल्यावर तर जेमतेम एक माणूस निट चालू शकेल एवढाच रस्ता होता. इमारतीची बांधणी सुरु आहे की, पाड्याचं काम सुरु आहे असा प्रश्‍न पडण्यासारखी अवस्था होती. पाऊल टाकणंही असह्य झाल्यावर मी परत फिरलो. हातावरील आजी मान वळवून त्या ढिगाऱ्याकडं पाहत होती.

""पयली आपल्या घरात महिना न्‌ महिना लॉकं राहून जायची. पावसाळ्यात नंदीवालं, मरियाईवालं मुक्कामी असायचं. तुपल्या आजानं कधी धंदा मांडला नाय भाड्याचा. दुनीया बदलली म्हून काय आपूण बी आपलं संस्कार, वागणं आन्‌ इचार बदलायचं. ज्यानं माती चाखली त्यालाच फरक कळणार माती आन्‌ शिमिटातला. सारावलेल्या भितीची माय तुमच्या शिमिटाच्या ठोकळ्यांना कशी येणार. शिमिटाच्या भितींवर मायंचा हात फिरणार हाय का कधी. जुन्या घराच्या कणाकणात मपल्या हाताल्या रेघा मिसळल्यात. जित्या जागत्या घरावं नांगर कसा फिरवणार तुपला बा... कसं व्हायचं त्याचं त्यालाच म्हाईत.'' आजी अशी अवचीत आली तशीच कुठं तरी गडापली. पण तिचं शेवटंच वाक्‍य बराच वेळ माझ्या डोक्‍यात घुमत राहीलं. त्यापाठी मी ही घुमत राहीलो. घराभोवती. मातीभोवती.

माझ्या बापानं आमचं जुनं घर पाडायचं नक्की केलं. पाडलं. आम्ही आता नव्या घरात रहायला गेलोय. अजून मी त्या घराला घर म्हणत नाही. म्हणावसंही वाटतं नाही. एव्हाना नव्या इमारतींचे पहिले चार पाच मजले भाडेकरुनी भरलेत. बारा गावची बारा बेणी त्यात गोळा झालीत. मजले अजूनही वाढत आहेत. मी इमारतीच्या बाहेर उभा आहे. उपग्रहाच्या नजरेनं तिच्याकडं पाहतोय. गावभर इमारतीच इमारती झाल्यात. एकीलाही बाहेरच्या बाजूने गिलावा नाही. साऱ्या कशा उघड्या, नागड्या, बोडक्‍या. सिमेंटचे ठोकळे उघडे पडलेल्या. मारुतीचं देऊळ आता हरवलंय. जिकडं तिकडं फक्त इमारतीच इमारती. सगळ्या कशा अपूर्ण. अधुऱ्या. अधाशी. आकाशाच्या दिशेनं वाढत चाललेल्या. आकाशाच्या पोटात सळया खुपसू पाहणाऱ्या.

अचानक मला भास झाला. माझ्या बापाच्या इमारती जमीनीकडं कलू लागल्यात. माझी आजी इमारती पाडण्यासाठी त्यांना विरुद्ध बाजूने जोरजोरात धडका देतेय. दोन्ही हातांनी धरुन जोरजोरात हलवतेय. आजीच्या धक्‍क्‍यांनी इमारतीला चिरे जाताहेत. ती आता इरेला पेटलीय. इमारत कलत चाललीये. तिच्या गॅलरीत आरामखुर्ची टाकून पेपर वाचत पडलेले आमचे चितळे मास्तर, तळाशी काळ्या भगुल्यात पाणी तापवण्यात मग्न असलेले भय्ये आणि सर्वात वरच्या मजल्यावर भाडे गोळा करत असलेला माझा बाप... कुणालाच त्याचा गंध नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. त्यांच्या डोळ्यांवर सिमेंटचा पडदा चढलाय. मग त्यांना कळणार तरी कसं, आपली खुराडी पडताहेत ते. इमारतीनेही ते त्यांना का सांगावं, तिचं आणि त्यांचं नातं तरी काय ?

कासराभर. जवळजवळ कासराभर लांब मी उभा आहे. माझ्या बापाच्या इमारती आता सात आठ मजल्यांच्या झाल्यात. विरुद्ध बाजूने एक पांढरी आकृती इमारतींना जोरजोराने ढकण्याची पराकाष्ठा करत आहे. गिलाव्यानं, सिमेंटनं आता आपली जागा सोडायला सुरवात केलीय. कोण म्हणतं सिमेंटमध्ये जीव असतो. तसं असतं तर त्यानं निर्णायक क्षणी विटांची साथ सोडली असती का. लोखंडी यंत्रांनी भट्टीतून चुरुन काढलेल्या, आगीत जाळलेल्या आणि ते कमी म्हणून की काय त्यात सळ्या खूपसून तयार केलेल्या वस्तूंमध्ये जिव असेलच कसा. मग त्या तुमच्या जगण्याशी समरस कशा होणार. इथं मातीच पाहिजे. माणसाच्या जगण्याशी, झगडण्याशी आणि शरीराशी नातं सांगणारी. आपलं नातं, इमान मातीशी आहे. माती म्हणजे धर्म, इमान आणि आईपण. सिमेंट म्हणजे व्यवहार. फक्त व्यवहार. ज्यात भावना नाही तो व्यवहार.

इमारत झुकू लागली होती. पोटच्या मातीचा जोर लावून आजी तिला ढकलत होती. मी हतबल होतो. मातीची ओढ होती. पण त्याच वेळी बापाचं भविष्य इमारतीसोबत झुकताना दिसत होतं. तो मात्र भाडं गोळा करण्यात मग्न होता. आई सिमेंटच्या घरात नेहमीप्रमाणं मान खाली घालून स्टीलच्या परातीत भाकरी थापून एलपीजी गॅसवर टाकत होती. तिला आता शेण माती गोळा करुन भिंती सारवण्याची गरज राहीली नव्हती. इमारतींचे मजले वाढतंच होते. 10 वा झाला. 12 वा झाला. मी पुन्हा हतबल. ना माझ्या मातीच्या भिंती वाचवू शकलो, ना आता या सिमेंटच्या पडत्या भिंती सावरु शकत होतो. मजले वाढतंच होते.

इमारतीचा शेंडा पूर्णपणे आडवा व्हायला आला होता. आभाळ भरुन आलं होतं. विजांच्या कडकडाटात ढग एकमेकांवर आदळत होते. मी लोकांना ओरडून सांगतोय... बिल्डींग पडायला लागलिये, पळा पळा. पण कोणाचंही लक्ष माझ्याकडं नाही. कोणी पेपर वाचतंय. कोण क्रिकेट खेळतंय. तर कोणी भाजी निसता निसता भान विसरून कुजक्‍या काजक्‍या गप्पांचे उकीरडे चाळत आहेत. मी मोबाईलवरुन सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण नेहमीप्रमाणं सर्वांचेच फोन व्यस्त. व्यस्तपणामुळं स्वतःचं मरण जिवंतपणे अनुभवण्याचंही नशीबी नाही यांच्या. यांना शेवटानंतरही कळणार नव्हतं, शेवट कसा झाला ते.

आजूबाजूच्या सर्व इमारती कोसळणाऱ्या इमारतींकडं पाहून टाळ्या वाजवत होत्या. छिन्न विछिन्नपणे हसत होत्या. भांडवलदारांचीच पिलावळ ही, यांना काय... माझ्या बापाच्या इमारती सळणार म्हणजे यांच्या मालाला तेजी येणार. ढिगारा उचलण्याचे कंत्राट निघणार, मेलेल्या शेकडो लोकांना जाळायचं म्हणजे मैताच्या सामानाचा तुटवडा. मग बाजारात पुन्हा तेजी. पुन्हा नव्या इमारतीचे पुर्ननिर्माण. त्यासाठी सिमेंट हवं, लोखंड हवं. तथाकथीत गृहनिर्माण उद्योगाला पुन्हा एकदा चालणा मिळणार. बांधकाम उद्योगात बुम येणार. टाळ्या वाजवणार नाहीत तर काय करणार या. माती थोडीच आहे, मृत्यूनं शहारायला...

इमारतींनी आता शेवटचा आचका दिला. सिमेंटचा चुरी, विटा, ठोकळे, लोखंडी गॅलरी धडाधडा कोसळू लागल्या. वरच्या मजल्यावरील माणसं खाली भिरकावली गेली. आजीचं तांडव सुरु झालं होतं. गोंधळ नाही. आरडाओरडा नाही. सर्व काही पूर्वनियोजित. सुत्रबद्ध. माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही भूईसपाट होत होतं. भाकरी थापणारी आई, भाडं गोळा करणारा बाप आणि भाडेकरुही. पण मी काहीच करु शकलो नाही. की, मुद्दामच काही केलं नाही. अंगावर जोराच्या जलधारा बरसू लागल्या. आणि मी भानावर आलो. सुसाट वेगानं इमारतींच्या ढिगाऱ्यांकडं पळत सुटलो. तोपर्यंत ढिगाऱ्यांचा गाळ व्हायला सुरवात झाली होती. सर्वत्र सळ्या, सिमेंट, विटांचा खच पडला होता. सिमेंटचा गाळ पाण्यात वाहण्यास सुरवात झाली होती. माझी चार वर्षाची आजी त्या गाळात खेळत होती.

Sunday, January 10, 2010

पाणगळ

गद्धे पंचविशी ते पस्तीशीतील तरुणांचं जगणं एखाद्या पाणझडी जंगलाप्रमाणे असतं. एकादा का एखादं पान गळालं की, सगळीच झाडं बोडकी. मग हाती राहत फक्त कडाक्‍याच्या झळा झोसत पडून राहणं. तापणं. आतल्या आत कुजणं. शेड्यापासून देठापर्यंत कणाकणानं चुरा होणं. आणि अवचीत कुठून एखादी आशेची सर आली की, याच तावून सुलाखून निघालेल्या चुऱ्याचे खत वापरुन तरारुन उठणं. जंगलाचं तरी बरं... त्याची झडण्याची, तापण्याची, कुजण्याची आणि तरारुन उठण्याची काळ वेळ ठरलेली असते. वयाचा दोष असा की कोणता दिवस पाणगळीचा आणि कोणता अंकुरण्याचा हे सांगता येत नाही. माझा तो दिवस मात्र पाणगळीचाच होता.

खुप कंटाळा आला होता धावपळीचा. रोज नवी सुरवात आणि त्याच दिवशी शेवट. रोज उठतोय आणि पळतोय. कशाच्या मागे, कशासाठी ते ठावूक नाही. स्पर्धा करतोय. लढतोय. सगळ्यांशीच. जगाविरुद्ध लढण्याचं काही वाटतं नाही... पण स्वतःविरुद्धच लढण्याची वेळ आल्यावर काय करायचं. स्वतःला कोणाच्या फुटपट्टीनं मोजायचं. बरं, मोजायचं तरी का ? एक ना हजार सवाल... त्याला कारण काय काहीही पुरतं. मी कोणत्या निराशेत होतो, लक्षात नाही पण ध्यान वेगळंच होतं एवढं खरं. तशातंच ते तिघे भेटले.

रमेश पानसरे. माझा पहिली ते चवथीपर्यंतचा वर्गमित्र. त्यानंतरच्या आमच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास भिन्न वाटांनी झाला. मात्र मैत्री कायम राहीली. अडीच वर्षांपूर्वी तो पुण्यातील प्रसिद्ध आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेवून वकिली जगाच्या बाजारपेठेत दाखल झाला. सध्या एका नामांकित "लिगल फर्म' मध्ये नोकरी करतोय. पगार किमान महिना 20 हजार रुपये. वय वर्षे 26 पूर्ण. 27 सुरु. परवा रात्री अचानक भेटला. भरभरुन बोलला. बोलतच राहीला. पानगळ आणखी वाढली.

कसं आहे ना संतोष, आपण फक्त पळतोय. थांबायला, मागे वळून पहायला वेळचं नाही. अरे, काही नाही... फक्त पळतोय. लहानपणापासून शिकायचं, शिकायचं आणि उर फाटेस्तोवर शिकायचं. कशासाठी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. पुण्यात राहून जगायचं म्हटलं... तर ते सर्वात महत्वाचंही आहेही म्हणा. इथं महिन्याला 15-20 हजार रुपये कमवायलाच लागतात. एकदा नोकरी सुरु झाली की गाडी आणि फ्लॅटचे वेध लागतात. मग वन बिएचके अपुरा वाटू लागतो. गावावरुन चार लोकं आली तर काय करायचं? त्यासाठी फ्लॅट दोन बिएचकेच पाहिजे. महिन्याला पाच हजार आणखी कमवले तर दोन बिएचके नक्की घेता येईल. मग होतात फ्लॅटचे हप्ते सुरु. काही काळ गेला की चारचाकी गाडी हवी. ती सुद्धा पाच लाखाच्या आतली नको. गाडी काय पुन्हा पुन्हा घेणार का आपण? उशीरा घेऊ हवं तर. पण घेऊन घ्यायची तर 15 लाखाच्या आसपासचीच हवी. अजून भरपूर काही. लक्षातच येत नाही आपल्या की ये सगळं मायावी, व्यर्थ आहे. नक्की कशाच्या मागे धावतोय रे आपणं?

संतोष, माणसाची जात अशी आहे ना... त्याला "थोडं' मिळालं, की लगेच "लई'ची हाव सुटते. गरजा आपोआप फुगतात. मग त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला फुगावं लागतं. नाकी तोंडी फेस येई पर्यंत धावावं लागतं. आपल्याच डोळ्यांसमोर आपली फरपट होत असतानाही संवेदना मारुन सहन करावं लागतं. विसरुन जातो की आपण कोण आहोत. कशासाठी जगत आहोत. किंबहूना जगायचं कसं हेच नेमकं विसरतो. आपलं जगणं आपलं राहत नाही. ते होतं "आपल्या' हप्त्याच्या फ्लॅटचं... हप्त्याच्या गाडीचं... मुलांच्या शाळेच्या फी चं. आयुष्याच्या एका वळणावर हे सगळं लक्षात येतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. आयुष्याच्या उतारवयात या पद्धतीने उद्धस्त, उद्विग्न झालेली अनेक लोकं मी गेल्या अडीच तीन वर्षात पाहिलीत. नको वाटतं हे पावलो पावली उध्वस्त होत जाणं.

सालं, हे शहरातील जगणं म्हणजे एकाद्या चक्रव्युहात फसल्यासारखं आहे. एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला की तुमचं आयुष्य तुमचं राहत नाही. ते खेळणं होतं दुसऱ्याच्या हातातलं. मानकुट मोडल्याशिवाय त्यातून सुटका नाही. अशी शहरी मानमोडी झालेल्या लोकांना निवृत्त (की, बाद) झाल्यावर गावच्या मातीची आणि मोह माया विरहीत जगण्याची ओढ लागते. तुला एक ताजं उदाहरण सांगतो. आपल्याच कॉलेजचे एक माजी विद्यार्थी. अतिशय हुशार. पहिली सहा वर्षे एकही "केस' मिळाली नाही. किरकोळ कामे करत न्यायालये बदलत दिवस काढत होते. शेवटी सात वर्षांनी केस मिळाली. तोपर्यंत त्यांच्या आयुष्याची केस वाचविण्याचे दिवस उलटले होते. अविवाहीत राहीले. आज पंचेचाळीशीत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी खिशात फक्त कायद्याची पदवी घेऊन फिरणाऱ्या या माणसाकडे आज पुण्यात मोठा प्रशस्त बंगला, चार पाच अलिशान कार आणि भरपूर काही आहे. शहरातील एक अग्रगण्य वकील म्हणून त्यांची ओळख आहे. महिन्याची कमाई किमान विस लाखांच्या पुढे असावी. सगळं काही असूनही आज त्यांना थांबावंसं वाटतंय. सध्या सर्व संपत्ती दान करुन हिमालयात जाण्याचे त्यांचे नियोजन सुरु आहे. त्यांचं म्हणंणही हेच आहे. नकळत चक्रव्युहात अडकलो. फसलो. आत्ता कुठे जाग आलिये. त्यामुळे चक्रवुह तोडण्याची ही संधी मला वाया घालवायची नाही. संतोष, आता तु मला सांग... तु आणि मी काय करायचं ? कसं जगायचं ?

शैलेश देशमुख याची व्यथा रमेश पेक्षा वेगळी नाही. वेगळा आहे त्याचा प्रश्‍न. शैलेस माझ्याबरोबरच दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर काही काळ त्याने पुण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. एमपीएससी, युपीएससीचा अभ्यास केला. परिक्षा दिल्या. सर्व काही करुन झाल्यावर आता घरी पूर्णवेळ शेती करतोय. प्रगतीशिल शेतकरी आहे. वय 26.

काल त्याचा फोन आला. मला लग्न करायचे आहे. आई आणि बहिनीची संमती आहे. शेजारच्या गावची मुलगी पण पाहीली आहे. बी.ए. आहे. दिसायला एकदम चुनचुनीत. तिचा बाप म्हणतो की, आधी गंध लावून लग्न नक्की करा. पण माझा बाप तयार नाही. त्यांचा विरोध आहे. एवढ्यात लग्न नको म्हणतात. आत्तापर्यंत तालुक्‍यातील शेकडो पोरापोरींची लग्न लावली पण स्वतःच्या मुलाचं मन त्यांना कळत नाही. भाऊ तु काहीही कर पण त्यांना समजावून सांग. लग्नाला तयार कर. उद्या माझ्या हातून काही वेगळं घडलं तर मला नाव ठेवू नको.

शैलूचे वडील माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना समजावून सांगावे ही त्याची अपेक्षा चुकीची नव्हती. मात्र या वेळी समस्या नाजूक होती. त्याच्या वडीलांच्या भुमीकेशी मी समरस होतो. कारण, नवरदेव अजून स्वतःच्या पायावर ठामपणे उभा नाही. याच्या हातात एखाद्या मुलीचा हात देणं म्हणजे तिला जाणून बुजून दरीत लोटल्यासारखं होतं. याला माझी तयारी नव्हती. मी त्याला म्हणालोही.. शैलू, तुझ्या पप्पांचं म्हणणं बरोबर आहे. तुला आणखी एक दोन वर्षे दम धरायला काय हरकत आहे. तुझं शेतीतलं करीअर आता कुठे मार्गी लागतंय. एक दोन हंगाम यशस्वी कर मग ते स्वतःहून लग्नाचा विषय काढतील. मी त्यांना समजावू शकत नाही. आणि एवढाच उताविळ झाला असशील, तर तुच समजाव ना.

ते ही करुन पाहीले. दोन्ही गाल आणि हात सुजले आहेत माझे. पुन्हा ती चुक करणार नाही. राहीली गोष्ट करीअरची. ती फुटपट्टी लावली ना, तर माझ्या बापानं तरी कुठं अजून स्वतःचं करीअर घडवलं आहे. आयुष्य शेतीत काढलंय. पण एक पिक धड नाही. तीन वर्षात डाळिंबाची निम्मी झाडं मेली. यांच्याच्यानं एकही सांधता आलं नाही. दर वर्षी डोळ्यांसमोर हजारो रुपयांचं नुकसान होतं. गावच्या राजकारणात मोठा मान आहे म्हणे यांना. पण अजून साधा आमच्या आळीचा ग्रामपंचायत सदस्य होता आलेलं नाही. तुला काय कळणार... दिवसभर शेतात हाडं मोडून घाम गाळल्यावर संध्याकाळी कसं वाटतं ते. प्रश्‍न फक्त लैगिंक समाधानाचा नाही. शंभराच्या दोन तीन नोटा फेकल्या की कुठंही मिळते ते. मला माझ्या स्वतःच्या मानसाचा "सपोर्ट' हवा आहे. आत्तापर्यंत ज्यांना माझं समजायचो तेच परक्‍यासारखी वागू लागल्यावर दुसरं काय करणार. मला नवं नातं हवंय. विश्‍वासाचं. तुला तरी माझं दुखः कसं कळणार म्हणा. पुण्यात सदानकदा पोरींच्या घोळक्‍यात फिरतोस. इथं ढेकळांमध्ये मला दिवस काढावे लागतात. अवघड झालंय सगळंच. एक दिवस तुलाही कळंल, आपण काय गमावलंय ते. मग हळहळ करत बसू नको म्हणजे झालं. बघ, घरी ये आणि सांग बापाला समजून जमलं तर

शैल्याचा फोन बंद झाला तरी त्याचं शब्द मेंदू कुरतडत होते. त्याच्या गनगणीतून बाहेर येतोय न येतोय तोच कर्णपिशाच्च (मोबाईला डॉ. आनंद यादव सरांनी दिलेले मराठी नाव) पुन्हा एकदा घुमू लागले. विशाल तुपे बोलत होता. मी कोथरुड डेपोला आहे. मुलाखत चांगली झाली आहे. खुप भुक लागलिये. दहा मिनीटात कावेरीला ये. विशाल पाडुरंग तुपे. मु. पो. सटाणा, जि. नाशिक. कृषी पदवी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी (बीएस्सीऍग्री, एमबीए). गेल्या दोन वर्षात सहा कंपन्या बदलल्या. कारणं वेगवेगळी. कधी कंपनीची प्रॉडक्‍ट भंगार तर कधी बॉस. ""साली अपनी जिंदगी झॉंट बन गई है'' हा त्याचा स्वतःचं जगणं सांगण्याचा एका वाक्‍याचा फंडा.

वैताग आलाय यार भाऊ या नोकऱ्यांचा आता. पण केल्याशिवाय पर्याय नाही. विशालनं चिकन करीचा "सिप' घेता घेता सांगायला सुरवात केली. एमबीएसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते मागे लागले आहेत. पाच सहा वर्षे 25-30 हजाराची नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. वर्षाला 4-5 लाख मिळायलाच पाहिजेत. जवळ पैसे साचले तर स्वतंत्रपणे काही तरी करता येईल. सध्या मी टाय घातलेला सुटा बुटातला भिकारी आहे. डोक्‍यात ज आहे, नाही असं नाही. पण ते विकायचं तर जगाच्या बाजारात सध्या मंदी आहे, असं म्हणतात. तुच सांग काय करणार. मुली सांगून येतात. घरच्यांचा आग्रह आहे. मलाही लग्न करावं वाटतं. नाही असं नाही. पण तरीही आणखी चार पाच वर्षे विचार करु शकत नाही. माझ्या वडीलांच लग्न 21 व्या वर्षी झालं. मी 31 व्या वर्षी करणार.

तू बरं केलंस. नोकरीला प्राधान्य देऊन अधी मधी शेतीपण पाहतोस. सगळीकडं बट्‌टयाबोळ आहे. नोकरी वाल्याला वाटतं, शेती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. एक दाणा पेरला की त्यातून हजार मिळतात. शेतकऱ्याला वाटतं नोकरदाराचं जगणं अलिशान, ऐशोआरामी आणि मान सन्मानाचं आहे. सगळं फालतू आहे यार. मी दोन्हींकडून पोळून निघालोय म्हणून सांगतो. काहीच सुखाचं नाही. सदा टांगती तलवार. नोकरीत "बॉस' पावलोपावली गांड मारण्यास टपलेला, तर शेतीत निसर्ग. ज्याचा कोडगेपणा आणि सहन करण्याची क्षमता जास्त तोच टिकणार. नाही तर आहेच रोजचीच झवझव.

आपला मुख्य दोष काय माहीत आहे का? तो हा की आप मध्यमवर्गीय ते कनिष्ट मध्यमवर्गीय घरांमध्ये जन्माला आलो. कधी कधी वाटतं टीना अंबानीचा कुत्रा म्हणून जन्माला आलो असतो तरी बरं झालं असतं. आपली जगण्याची पातळी आणि जिवघेण्या संघर्षाचं नशीब सटवीनं कपाळावर "परमनंट मार्करनं' कोरुन ठेवलंय. आपण फक्त लढत, झगडत रहायचं. मलो तरी एक नंबर लढलो म्हणायचं. सकारात्मक विचारांची, शुन्यातून गडगंज संपत्ती गोळा केलेल्यांची पुस्तक घोकायची आणि त्यांच्यामागून आपणही आपलं आयुष्य घडवू अशी जिद्द (?) धरुन धावत रहायचं. लढत रहायचं संधी मिळविण्यासाठी... स्वतःविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, बॉसविरुद्ध, कंपनीविरुद्ध, समाजाविरुद्ध आणि बऱ्याच कशाकशाविरुद्ध. महाराजांचे मावळे ना आपणं. लढायचं. लढण्यातील आणि त्यातील जगण्यातील सौंदर्य भोगायचं. जगण्यावर बलात्कार झाले तरी.

खोलीवर आलो. आत्तापर्यंत झाली एवढी पाणगळ खूप झाली होती. दररोज संध्याकाळी असतं त्यापेक्षाही अधिक डोकं सुन्न झालं होतं. राहून राहून कावेरीवाल्याच्या कोंबडीची आठवण होत होती. बिचारी आमच्यासाठी आज फुकाची बळी गेली. माझ्या तीन मित्रांपाठोपाठ ती माझा चवथा मित्र किंवा मैत्रीण असती तर तिची पाणगळ कशी असती? तिनेही तिच्या जगण्याची अतृप्तताच घोकली असती का आमच्यासारखी. की पक्षी म्हणून स्वतःचा अल्पजिवीपणा स्विकारुन काही नवी दिशा असती तिची? पुन्हा विचार आला... अरे ती कसले दुखः करणार. तिच्या आयुष्याचा तर महोत्सव झाला. कदाचीत आपण नाही तर दुसऱ्या कुणी तरी खाल्लीच असती ना. नाहीतर तिचा "चिकन करी' ऐवजी "भुर्जी मसाला' झाला नसती कशावरुन. कारण काही का असेना... ती जन्माला आली. तिच्या वाट्याला आलेलं भलं बुरं आयुष्य धुंद होऊन जगली. कोणापुढं रडली नाही की दुसऱ्याला दोष देत बसली नाही. बरं... मेली तरी अजून माझ्या डोक्‍यात अजून कलकलाट करतेय. पाणगळ आणि अंकुरणं हाच जर जगण्याच्या उत्सव आणि महोत्सव असेल तर हे तरी वेगळं काय आहे. रमेश, विशाल, शैलेश आणि कोंबडीला अंकुर फुटले होते. कदाचीत आता माझी वेळ आहे...