Saturday, June 12, 2010

तरी लंगडं....

दिस आल्यात कसं हो रांगडं
आंधळं म्हणतंय फुटलं तांबडं
चापसून हातानं, चालतंय बेतानं
उरफाटं घालून आंगडं... (2)
तरी लंगडं, मारतय उडून तंगड (2)

येतो उन्हाळ्यात नदीला पूर
बायकोम्होरं रखेलीचा जोर
कापडं पोरींची घालत्यात पोरं
सासुबाईला चूलीचा धूर

बहिरं कानानं, भलतंच ऐकून
आथरुन आलंय घोंगडं (2)
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (2)

मुका धरतंय गाण्याचा सुर
बर्फ पेटलाय निघतोय धुर
छक्का काढतोय नदीला जोर
बायको पुढं पैलवान गार

वाकड्या बोटानं मलई काढून (2)
बांधलंय नोटांचं चुंबडं
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (2)

दत्ता रामाचं बोल हे न्यारं
रॉकेल डिझेलची टंचाई फार
मालक घेतोय गड्यापुढं हार
मांजर गुरगुरतंय कुत्र्यावर

इथं रेडा गाभण, अंडीही घालून
दुध देतंया पाटीखाली कोंबडं
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (3)

(दत्ता महाडिक पुणेकर यांचं हे गाजलेलं लोकगित. दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ हा तमाशा माझ्या गावचा. सुमारे 25 वर्षापूर्वी अण्णांनी (दत्ता महाडिक) तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारी ही रचना केली. सुरेल चाल आणि सुरेख गळा यांच्या जोरावर उभ्या महाराष्ट्राला या गितानं वेड लावलं... अण्णा हे गाणं सुरु केल्यावर अण्णांवर नोटांचा पाऊस पडायचा, अत्यानंदाने फेटे टोप्या हवेत झेपावत रहायच्या. आज अण्णा हयात नाहीत. महाविद्यालयीन जिवनात अनेक बैठकांमध्ये आम्ही हे गित सादर करुन टाळ्या मिळवत असू. मध्यंतरी मी हे गित विसरुन गेलो होतो. परंतु माझा ज्युनियर व या गिताचा पट्टीचा गायक प्रा. विपूल (बाबा) शिंदे (महाळुंगे पडवळ) याच्यामुळे ही गित मला पुन्हा मिळाले. ही रचना वाचण्यापेक्षा ऐकण्यात खरी मजा आहे. पाहू कधी योग जुळला तर... )

(संतोष. 12 जून 2010, पुणे.)

1 comment:

pravin gunjal said...

हो हे मला प्रतेक्ष आन्नांच्या सुरात ऐकायला व बघायला मीळाले हे आमचे भाग्य आहे़