Sunday, January 17, 2010

पांढरी

ताड ताड फुटाणे फोडत चुल जळत होती. माझी नजर गेल्या तासाभरापासून जाळावर स्थिरावलेली. बुबुळं जिव्हाळणाऱ्या आगीच्या तालावर नाचत होती. कानात भाकरी थापण्याचा थप थप थप थप आवाज घुमत होता. मी मान वर केली. माय चुलीशेजारच्या वट्यावर दोन्ही पायाच्या अंगठ्यात काठवट धरुन भाकरी थापत होती. पिठाळलेल्या हातानं बांगड्या मागं सारत ती काठवटीतल्या पिठात पाणी टाकायची. मळून मळून भाकरीच्या मापाचा गोळा करायची. लईच झाला तर तेवढा कमी करुन काठवटीच्या कानाला लावून ठेवायची. पुढच्या गोठ्यात घेण्यासाठी. मग गोळ्याखाली कोरडं पिठं पसरुन दोन्ही हातांनी काठवटीत गोल गोल फिरवत बडवत बसायची. थप थप थप सुरु रहायची. भाकरीचा तव्याच्या मापाचा चंद्र झाला, की तो तव्यावर पालथा व्हायचा. मग तापलेला तवा आणि फुललेला विस्तव त्यांची कामं चोख करायचे.

चूलीत काडक्‍या सारीत होतो. बारिकशी पेटती काडी हाती घेऊन गोल गोल फिरवणं, हा माझा चुलीपुढचा उद्योग. माय त्याला कोलत्या खेळणं म्हणती. माझा खेळ सुरु झाला की, ""कोलत्या नको ख्यळू... नाय तर चड्डीत मुतशील रातचं.'' हे मायचं बोलणं ठरलेलं असायचं. आत्ता मात्र ती कसल्या विचारात आहे, कोणास ठावूक. माझ्या कोलत्या खेळण्याकडं तिचं अजिबात लक्ष नाही. हातची कोलती खाली न टाकता मी तिला विचारतो, ""ंमाय वो... आपल्या घराच्या भिती कधी लिपायच्या ? पोपडं निघालत सगळं. भुई उखानलीये. धाब्याची पांढरी गळाया लागली आता. ""यडा हाईस का?'' माय माझ्यावरच उखडली. ""आरं, इथं काय आपूण कायमचं राहणार का आता. ह्य घर जुनं झालं. आण्‌ गावात तरी क्वॉनाचं धाब्याचं घर ऱ्हायलंय का आता? आता आपल्याला शिमिटाच्या, सिलॅपच्या घरात ऱ्हायला जायचं. काच नको श्‍यान ग्वाळा करुन सारवायचा आण्‌ पोचारा फिरवत बसायचा.'' पण घराच्या इटा उघड्या पडाया लागल्यात. लिपाया पायजेत ना. ""आभाळं फाटलंय. कुठं कुठं लिपणार हायीस तु. बाप ह्य घर पाडायचं म्हणतोय, आण्‌ ल्येक निघालाय भिती लिपाया. बघ तुझं तुच.'' असं म्हणून माय पुन्हा खाली मान घालून भाकरी थापायच्या नादी लागली.

माझं घर. माझ्या बापाचं आन्‌ त्याच्याही बापाचं घर. मारुतीच्या देवळाजवळंच. कौलारु. दुमजली. पांढऱ्या मातीचं. बाहेरुन पूर्णपणे शेणा मातीच्या काल्यानं सारवलेलं. एखाद्या मोठ्या देवळासारखं. पिढ्यान पिढ्याच्या सुख दुःखाचं साक्षिदार. गाभाऱ्याच्या ठिकाणी झोपायच्या खोल्या. त्याच्या शेजारीच स्वयंपाकघर. मंडपाच्या ठिकाणी दिवाणखाना आणि प्रवेशद्वाराच्या जागी मोठा ओटा. बाहेरुन कोणी आलं की पहिल्यांदा ओट्यावरचं टेकणार. मग तो कोणी सोयराधायरा असो की एखादा भिक्षूक. घराच्या मागच्या बाजूला मोठी बाग. आईला स्वयंपाकाला पुरेल एवढा भाजीपाला पिकतो त्यात. घराच्या चारी बाजूला मोकळीच मोकळी जागा आणि वर निळं आभाळ... आमचं घर सोडलं तर खेडेगाव असूनही आजूबाजूला सिमेंटच्या इमारतींचे जाळं वाढू लागलेलं. दाटी वाढत असतानाही आमचं घर मात्र आत्तापर्यंत ऐटीत ताठ उभं होतं. एखाद्या जुन्या पुराण्या लेण्यासारखं. स्वतःच्याच कस्तूरी गंधात मग्न. पण आता इथून पुढंच काय खरं नव्हतं. तसं पाहिलं तर मारुतीचं मंदीर गावाच्या वेशीवर किंवा वेशीबाहेर असतं. पण तीन-चार दशकांपूर्वी गावच्या वेशीवरुन नारायणगाव-शिरुर तालुका महामार्ग गेला आणि गाव हळूहळू रस्त्यावर आला. आमचं मळ्यातंल शेत आणि घर गावाला भिडलं. वेशीवरला मारुती आता गावात राहतो.

एवढ्यात मला बाजूलाच काही तरी उकरण्याचा आवाज आला. हात्तीच्या, हिला काय अवदसा आठवली. या बाईनं चक्क माझ्या घरातंच माती उकरायचं काम चालवलंय. स्वतःचं घर पोचारायला ही माझ्या घराची माती उकरतेय म्हणजे काय. घर अजून पाडलेलं नाही आमचं. जिवंत उभं आहे. मी इथं उखनलेली भुई, भितीचं पोपचं, विटा लिपायच्या गोष्टी करतोय आणि ही माती उकरतेय. कोलती तशीच टाकून तिच्या दिशेने झेपावलो. तोपर्यंत तीनं माती उकरुन भिंतीला खिंडार पाडलं होतं. तिचं डोकं आणि हात त्या खिंडारात होते. मी मोठ्या जोमानं तिच्या कमरेला विळखा घालून बाहेर खेचलं. अरे बापरे, ही तर अगदी माझ्या माय सारखीच दिसती. मी चाट पडलो. माय तर भाकरी थापतेय. मग ही कोण. मी निरखून पाहिलं. तिच्या अंगाखांद्यावर पांढरी सांडली होती. मी रागानं लाल झालो. चुलीकडं पाहिलं. भाकरीची थपथप सुरुच होती. ""माय वो... लवकर ये. ह्यो बघ ही काय करती.'' माय ओट्यावरुन उठली आणि माझ्या हातातील त्या बाईचा चेहता झरझर बदलू लागला. क्षणात रापला. म्हातारा झाला. ""आरं, ही तर तुपली मोठीमाय. मपली सासु. तुपली आजी रं. पाया पडते सासुबाय.'' म्हणत माय तिच्या पाया पडाया लागली. मी अचंबित. हाताची पकड सैल. आजी तर माझ्या जन्माआधीच मेलेली. मग आता कोठून उपटली. असो माय म्हणतेय आजी तर आजी. मला काय. ""आरं कधी मधी दिसत्यात त्या घरात माती उकरताना... सगळं कसं सपान वाटातं. पण पाया पडलं की झालं. ती तिच्या वाटंनं आन्‌ आपण आपल्या. पाय पड तिच्या आन्‌ यं इकडं जाळ म्होरं साराया.'' माय पुन्हा भाकरी थापाया बसली. माझ्या हातीतील पांढरीने माखलेली आजी लहान लहान होत चालली होती. मोठ्या फुग्यातील हवा सोडावी तशी. आता तर ती चार वर्षाच्या मुलीएवढी झालीये. एकदम डिक्‍टो निरमाच्या जाहिरातीतील मुलीसारखी. गोंडस. फ्रॉकही तसाच घातलाय तिनं.

आजी माझा हात धरुन चुरचुरत म्हणाली, ""मला आपलं घर दाखिव... घरभर फिरुन आण मला.'' मी तिच्या बगलेत दोन्ही हात घालून तिला उचललं. कडेवर घेतलं. आता ती माझ्या छातीशी मुडपलेल्या उजव्या हातावर निवांत बसली आहे. तिचे पाय माझ्या पोटाला, कमरेला टोचताहेत. डाव्या हाताचा विळखा माझ्या मानेभोवती टाकून ती घर न्याहाळतेय. आमचा फेरफटका सुरु झालाय. आजी मला घरातील एका एका जागेच्या भिंतीच्या तुळयांच्या, दगडा विटांच्या गोष्टी सांगतेय. आत्तापर्यंत कधी माझ्या नजरेलाच पडले नाही, असं माझं घर ती मला नव्याने दाखवतेय. जे मला पूर्णतः अपरिचित आहे. मी आता अनोळखी होत चाललोय या घरात. नव्याने ओळख करुन घेतोय. उत्सुकतेनं, नवलाईनं तिला प्रश्‍न विचारतोय. ती प्रत्येक उत्तरासाठी माझ्याच हातावर बसुन माझे गालगुच्चे वसुल करतेय.

आम्ही आता दिवाणखान्यात आलोय. गेल्या चार पाच पिढ्यांच्या कर्त्या पुरुष व महिलांच्या जोड्यांचे फोटो तिथं लावलेत. माझ्या आई-बापाचा फोटो तिथं अद्याप लागलेला नाही. ""इथंच तुपल्या माय बा चं लगिन झाले.'' (लग्न आणि दिवाणखान्यात असा प्रश्‍न मी आजीला विचारु शकलो नाही.) ""रातभर वरात चालली व्हती इथं. म्या नववारी शालू आन्‌ मोत्याच्या दागिण्यानं मढले व्हते नुसती. वटीत गहू आन्‌ खोबऱ्याच्या वाट्या. लखलखाट व्हता नुसता. आता बघ कसं झालंय. पोपडं निघालंत पार घराचं. त्याकडं पाह्यला तुपल्या बा ला यळ नाय. श्‍यानामातीच्या भिंतींना इसरला तो. चल बाह्यर दावते तुला, काय चालंलय इथं त्ये.''आता आम्ही घराबाहेरच्या रस्त्यावर होतो. घराकडे बोट दाखवत ती मला म्हणाली, ""पाय काय दिसतंय तूला त्ये.'' मी पाहिलं, आता आमचं घर आमचं राहिलं नव्हतं. त्याच्या दोन्ही बाजूने दोन मोठ्या इमारती उभ्या राहील्या होत्या. एका इमारतीचे मोठे सिमेंटचे खांब माझ्या मातीच्या घरात घुसलेले होते. छप्पर कौलांना खाली दाबत होतं. दोन्ही इमारतींवर एकावर एक मजले चढविण्याचं काम सुरु होतं. सारा परिसर इमारतींनी दाटीवाटीनं व्यापला होता. आमच्या जुन्या घराचा काळ जवळ आल्याचं स्पष्ट होतं. गावातील मातीच्या शेकडो घरांवर सिमेंटच्या, लोखंडी जाळ्यांच्या, सळया, गजांच्या घरांनी आक्रमण केलं. एखाद्या टोळधाडीसारखं. तेच आक्रमण आता आमच्या घरावरही झालं होतं. ते थोपवायला आजी अपूरी पडत होती.

""तुपला बा इथं शिमिटात लोखंडाच्या कांबा घालून पैशाचं मजलं उभारणार हाय. लोखंडाचं पिंजरं करणार आन्‌ त्यात भाड्याची माणसं भरणार. बिचारं साळंतलं मास्तर, परगावची पोरं, तलाठी, वायरमन, भैयं अशी माणसं खुराड्यामधी येऊन आडाकणार. खुराड्यांना ना रंग ना रुप. तुपल्या बा ला फक्त पैका हवाय. कलिचा भस्म्या रोग झालाय त्याला. आपलं कौलामातीचं घर पाडून शिमिटाचं ठोकळं मांडून खिसा भरायचाय त्याला. तो पोटात ऱ्हायला तव्हा माती खायचं डव्हाळं लागलं व्हतं मला. घराच्या भितीची पांढरी खाल्ली म्या. भुई चाटली. वावरात तुपल्या आजाची नजर चुकवून शाळूच्या ताटाच्या बुडाला आडाकल्याली काळी माती जिभंची सालटं निघंस्तोवर चाकली. त्या मातीवं तुपला बा नऊ म्हैनं नऊ दिस पोसला. आन्‌ आता...

आजीनं आता मला इमारतीच्या आत चलण्याचा हुकूम केला. मी तिला हातावर घेऊन जिना चढण्याची कसरत करु लागलो. आत जिकडं तिकडं सिमेंटचे काळपट ढिग पडलेले. वाळूचे डेपो लागलेले. वर वर जाईल, तसा जिना अरुंद होत गेला. दुसऱ्या मजल्यावर तर जेमतेम एक माणूस निट चालू शकेल एवढाच रस्ता होता. इमारतीची बांधणी सुरु आहे की, पाड्याचं काम सुरु आहे असा प्रश्‍न पडण्यासारखी अवस्था होती. पाऊल टाकणंही असह्य झाल्यावर मी परत फिरलो. हातावरील आजी मान वळवून त्या ढिगाऱ्याकडं पाहत होती.

""पयली आपल्या घरात महिना न्‌ महिना लॉकं राहून जायची. पावसाळ्यात नंदीवालं, मरियाईवालं मुक्कामी असायचं. तुपल्या आजानं कधी धंदा मांडला नाय भाड्याचा. दुनीया बदलली म्हून काय आपूण बी आपलं संस्कार, वागणं आन्‌ इचार बदलायचं. ज्यानं माती चाखली त्यालाच फरक कळणार माती आन्‌ शिमिटातला. सारावलेल्या भितीची माय तुमच्या शिमिटाच्या ठोकळ्यांना कशी येणार. शिमिटाच्या भितींवर मायंचा हात फिरणार हाय का कधी. जुन्या घराच्या कणाकणात मपल्या हाताल्या रेघा मिसळल्यात. जित्या जागत्या घरावं नांगर कसा फिरवणार तुपला बा... कसं व्हायचं त्याचं त्यालाच म्हाईत.'' आजी अशी अवचीत आली तशीच कुठं तरी गडापली. पण तिचं शेवटंच वाक्‍य बराच वेळ माझ्या डोक्‍यात घुमत राहीलं. त्यापाठी मी ही घुमत राहीलो. घराभोवती. मातीभोवती.

माझ्या बापानं आमचं जुनं घर पाडायचं नक्की केलं. पाडलं. आम्ही आता नव्या घरात रहायला गेलोय. अजून मी त्या घराला घर म्हणत नाही. म्हणावसंही वाटतं नाही. एव्हाना नव्या इमारतींचे पहिले चार पाच मजले भाडेकरुनी भरलेत. बारा गावची बारा बेणी त्यात गोळा झालीत. मजले अजूनही वाढत आहेत. मी इमारतीच्या बाहेर उभा आहे. उपग्रहाच्या नजरेनं तिच्याकडं पाहतोय. गावभर इमारतीच इमारती झाल्यात. एकीलाही बाहेरच्या बाजूने गिलावा नाही. साऱ्या कशा उघड्या, नागड्या, बोडक्‍या. सिमेंटचे ठोकळे उघडे पडलेल्या. मारुतीचं देऊळ आता हरवलंय. जिकडं तिकडं फक्त इमारतीच इमारती. सगळ्या कशा अपूर्ण. अधुऱ्या. अधाशी. आकाशाच्या दिशेनं वाढत चाललेल्या. आकाशाच्या पोटात सळया खुपसू पाहणाऱ्या.

अचानक मला भास झाला. माझ्या बापाच्या इमारती जमीनीकडं कलू लागल्यात. माझी आजी इमारती पाडण्यासाठी त्यांना विरुद्ध बाजूने जोरजोरात धडका देतेय. दोन्ही हातांनी धरुन जोरजोरात हलवतेय. आजीच्या धक्‍क्‍यांनी इमारतीला चिरे जाताहेत. ती आता इरेला पेटलीय. इमारत कलत चाललीये. तिच्या गॅलरीत आरामखुर्ची टाकून पेपर वाचत पडलेले आमचे चितळे मास्तर, तळाशी काळ्या भगुल्यात पाणी तापवण्यात मग्न असलेले भय्ये आणि सर्वात वरच्या मजल्यावर भाडे गोळा करत असलेला माझा बाप... कुणालाच त्याचा गंध नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. त्यांच्या डोळ्यांवर सिमेंटचा पडदा चढलाय. मग त्यांना कळणार तरी कसं, आपली खुराडी पडताहेत ते. इमारतीनेही ते त्यांना का सांगावं, तिचं आणि त्यांचं नातं तरी काय ?

कासराभर. जवळजवळ कासराभर लांब मी उभा आहे. माझ्या बापाच्या इमारती आता सात आठ मजल्यांच्या झाल्यात. विरुद्ध बाजूने एक पांढरी आकृती इमारतींना जोरजोराने ढकण्याची पराकाष्ठा करत आहे. गिलाव्यानं, सिमेंटनं आता आपली जागा सोडायला सुरवात केलीय. कोण म्हणतं सिमेंटमध्ये जीव असतो. तसं असतं तर त्यानं निर्णायक क्षणी विटांची साथ सोडली असती का. लोखंडी यंत्रांनी भट्टीतून चुरुन काढलेल्या, आगीत जाळलेल्या आणि ते कमी म्हणून की काय त्यात सळ्या खूपसून तयार केलेल्या वस्तूंमध्ये जिव असेलच कसा. मग त्या तुमच्या जगण्याशी समरस कशा होणार. इथं मातीच पाहिजे. माणसाच्या जगण्याशी, झगडण्याशी आणि शरीराशी नातं सांगणारी. आपलं नातं, इमान मातीशी आहे. माती म्हणजे धर्म, इमान आणि आईपण. सिमेंट म्हणजे व्यवहार. फक्त व्यवहार. ज्यात भावना नाही तो व्यवहार.

इमारत झुकू लागली होती. पोटच्या मातीचा जोर लावून आजी तिला ढकलत होती. मी हतबल होतो. मातीची ओढ होती. पण त्याच वेळी बापाचं भविष्य इमारतीसोबत झुकताना दिसत होतं. तो मात्र भाडं गोळा करण्यात मग्न होता. आई सिमेंटच्या घरात नेहमीप्रमाणं मान खाली घालून स्टीलच्या परातीत भाकरी थापून एलपीजी गॅसवर टाकत होती. तिला आता शेण माती गोळा करुन भिंती सारवण्याची गरज राहीली नव्हती. इमारतींचे मजले वाढतंच होते. 10 वा झाला. 12 वा झाला. मी पुन्हा हतबल. ना माझ्या मातीच्या भिंती वाचवू शकलो, ना आता या सिमेंटच्या पडत्या भिंती सावरु शकत होतो. मजले वाढतंच होते.

इमारतीचा शेंडा पूर्णपणे आडवा व्हायला आला होता. आभाळ भरुन आलं होतं. विजांच्या कडकडाटात ढग एकमेकांवर आदळत होते. मी लोकांना ओरडून सांगतोय... बिल्डींग पडायला लागलिये, पळा पळा. पण कोणाचंही लक्ष माझ्याकडं नाही. कोणी पेपर वाचतंय. कोण क्रिकेट खेळतंय. तर कोणी भाजी निसता निसता भान विसरून कुजक्‍या काजक्‍या गप्पांचे उकीरडे चाळत आहेत. मी मोबाईलवरुन सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण नेहमीप्रमाणं सर्वांचेच फोन व्यस्त. व्यस्तपणामुळं स्वतःचं मरण जिवंतपणे अनुभवण्याचंही नशीबी नाही यांच्या. यांना शेवटानंतरही कळणार नव्हतं, शेवट कसा झाला ते.

आजूबाजूच्या सर्व इमारती कोसळणाऱ्या इमारतींकडं पाहून टाळ्या वाजवत होत्या. छिन्न विछिन्नपणे हसत होत्या. भांडवलदारांचीच पिलावळ ही, यांना काय... माझ्या बापाच्या इमारती सळणार म्हणजे यांच्या मालाला तेजी येणार. ढिगारा उचलण्याचे कंत्राट निघणार, मेलेल्या शेकडो लोकांना जाळायचं म्हणजे मैताच्या सामानाचा तुटवडा. मग बाजारात पुन्हा तेजी. पुन्हा नव्या इमारतीचे पुर्ननिर्माण. त्यासाठी सिमेंट हवं, लोखंड हवं. तथाकथीत गृहनिर्माण उद्योगाला पुन्हा एकदा चालणा मिळणार. बांधकाम उद्योगात बुम येणार. टाळ्या वाजवणार नाहीत तर काय करणार या. माती थोडीच आहे, मृत्यूनं शहारायला...

इमारतींनी आता शेवटचा आचका दिला. सिमेंटचा चुरी, विटा, ठोकळे, लोखंडी गॅलरी धडाधडा कोसळू लागल्या. वरच्या मजल्यावरील माणसं खाली भिरकावली गेली. आजीचं तांडव सुरु झालं होतं. गोंधळ नाही. आरडाओरडा नाही. सर्व काही पूर्वनियोजित. सुत्रबद्ध. माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही भूईसपाट होत होतं. भाकरी थापणारी आई, भाडं गोळा करणारा बाप आणि भाडेकरुही. पण मी काहीच करु शकलो नाही. की, मुद्दामच काही केलं नाही. अंगावर जोराच्या जलधारा बरसू लागल्या. आणि मी भानावर आलो. सुसाट वेगानं इमारतींच्या ढिगाऱ्यांकडं पळत सुटलो. तोपर्यंत ढिगाऱ्यांचा गाळ व्हायला सुरवात झाली होती. सर्वत्र सळ्या, सिमेंट, विटांचा खच पडला होता. सिमेंटचा गाळ पाण्यात वाहण्यास सुरवात झाली होती. माझी चार वर्षाची आजी त्या गाळात खेळत होती.

Sunday, January 10, 2010

पाणगळ

गद्धे पंचविशी ते पस्तीशीतील तरुणांचं जगणं एखाद्या पाणझडी जंगलाप्रमाणे असतं. एकादा का एखादं पान गळालं की, सगळीच झाडं बोडकी. मग हाती राहत फक्त कडाक्‍याच्या झळा झोसत पडून राहणं. तापणं. आतल्या आत कुजणं. शेड्यापासून देठापर्यंत कणाकणानं चुरा होणं. आणि अवचीत कुठून एखादी आशेची सर आली की, याच तावून सुलाखून निघालेल्या चुऱ्याचे खत वापरुन तरारुन उठणं. जंगलाचं तरी बरं... त्याची झडण्याची, तापण्याची, कुजण्याची आणि तरारुन उठण्याची काळ वेळ ठरलेली असते. वयाचा दोष असा की कोणता दिवस पाणगळीचा आणि कोणता अंकुरण्याचा हे सांगता येत नाही. माझा तो दिवस मात्र पाणगळीचाच होता.

खुप कंटाळा आला होता धावपळीचा. रोज नवी सुरवात आणि त्याच दिवशी शेवट. रोज उठतोय आणि पळतोय. कशाच्या मागे, कशासाठी ते ठावूक नाही. स्पर्धा करतोय. लढतोय. सगळ्यांशीच. जगाविरुद्ध लढण्याचं काही वाटतं नाही... पण स्वतःविरुद्धच लढण्याची वेळ आल्यावर काय करायचं. स्वतःला कोणाच्या फुटपट्टीनं मोजायचं. बरं, मोजायचं तरी का ? एक ना हजार सवाल... त्याला कारण काय काहीही पुरतं. मी कोणत्या निराशेत होतो, लक्षात नाही पण ध्यान वेगळंच होतं एवढं खरं. तशातंच ते तिघे भेटले.

रमेश पानसरे. माझा पहिली ते चवथीपर्यंतचा वर्गमित्र. त्यानंतरच्या आमच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास भिन्न वाटांनी झाला. मात्र मैत्री कायम राहीली. अडीच वर्षांपूर्वी तो पुण्यातील प्रसिद्ध आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेवून वकिली जगाच्या बाजारपेठेत दाखल झाला. सध्या एका नामांकित "लिगल फर्म' मध्ये नोकरी करतोय. पगार किमान महिना 20 हजार रुपये. वय वर्षे 26 पूर्ण. 27 सुरु. परवा रात्री अचानक भेटला. भरभरुन बोलला. बोलतच राहीला. पानगळ आणखी वाढली.

कसं आहे ना संतोष, आपण फक्त पळतोय. थांबायला, मागे वळून पहायला वेळचं नाही. अरे, काही नाही... फक्त पळतोय. लहानपणापासून शिकायचं, शिकायचं आणि उर फाटेस्तोवर शिकायचं. कशासाठी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. पुण्यात राहून जगायचं म्हटलं... तर ते सर्वात महत्वाचंही आहेही म्हणा. इथं महिन्याला 15-20 हजार रुपये कमवायलाच लागतात. एकदा नोकरी सुरु झाली की गाडी आणि फ्लॅटचे वेध लागतात. मग वन बिएचके अपुरा वाटू लागतो. गावावरुन चार लोकं आली तर काय करायचं? त्यासाठी फ्लॅट दोन बिएचकेच पाहिजे. महिन्याला पाच हजार आणखी कमवले तर दोन बिएचके नक्की घेता येईल. मग होतात फ्लॅटचे हप्ते सुरु. काही काळ गेला की चारचाकी गाडी हवी. ती सुद्धा पाच लाखाच्या आतली नको. गाडी काय पुन्हा पुन्हा घेणार का आपण? उशीरा घेऊ हवं तर. पण घेऊन घ्यायची तर 15 लाखाच्या आसपासचीच हवी. अजून भरपूर काही. लक्षातच येत नाही आपल्या की ये सगळं मायावी, व्यर्थ आहे. नक्की कशाच्या मागे धावतोय रे आपणं?

संतोष, माणसाची जात अशी आहे ना... त्याला "थोडं' मिळालं, की लगेच "लई'ची हाव सुटते. गरजा आपोआप फुगतात. मग त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला फुगावं लागतं. नाकी तोंडी फेस येई पर्यंत धावावं लागतं. आपल्याच डोळ्यांसमोर आपली फरपट होत असतानाही संवेदना मारुन सहन करावं लागतं. विसरुन जातो की आपण कोण आहोत. कशासाठी जगत आहोत. किंबहूना जगायचं कसं हेच नेमकं विसरतो. आपलं जगणं आपलं राहत नाही. ते होतं "आपल्या' हप्त्याच्या फ्लॅटचं... हप्त्याच्या गाडीचं... मुलांच्या शाळेच्या फी चं. आयुष्याच्या एका वळणावर हे सगळं लक्षात येतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. आयुष्याच्या उतारवयात या पद्धतीने उद्धस्त, उद्विग्न झालेली अनेक लोकं मी गेल्या अडीच तीन वर्षात पाहिलीत. नको वाटतं हे पावलो पावली उध्वस्त होत जाणं.

सालं, हे शहरातील जगणं म्हणजे एकाद्या चक्रव्युहात फसल्यासारखं आहे. एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला की तुमचं आयुष्य तुमचं राहत नाही. ते खेळणं होतं दुसऱ्याच्या हातातलं. मानकुट मोडल्याशिवाय त्यातून सुटका नाही. अशी शहरी मानमोडी झालेल्या लोकांना निवृत्त (की, बाद) झाल्यावर गावच्या मातीची आणि मोह माया विरहीत जगण्याची ओढ लागते. तुला एक ताजं उदाहरण सांगतो. आपल्याच कॉलेजचे एक माजी विद्यार्थी. अतिशय हुशार. पहिली सहा वर्षे एकही "केस' मिळाली नाही. किरकोळ कामे करत न्यायालये बदलत दिवस काढत होते. शेवटी सात वर्षांनी केस मिळाली. तोपर्यंत त्यांच्या आयुष्याची केस वाचविण्याचे दिवस उलटले होते. अविवाहीत राहीले. आज पंचेचाळीशीत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी खिशात फक्त कायद्याची पदवी घेऊन फिरणाऱ्या या माणसाकडे आज पुण्यात मोठा प्रशस्त बंगला, चार पाच अलिशान कार आणि भरपूर काही आहे. शहरातील एक अग्रगण्य वकील म्हणून त्यांची ओळख आहे. महिन्याची कमाई किमान विस लाखांच्या पुढे असावी. सगळं काही असूनही आज त्यांना थांबावंसं वाटतंय. सध्या सर्व संपत्ती दान करुन हिमालयात जाण्याचे त्यांचे नियोजन सुरु आहे. त्यांचं म्हणंणही हेच आहे. नकळत चक्रव्युहात अडकलो. फसलो. आत्ता कुठे जाग आलिये. त्यामुळे चक्रवुह तोडण्याची ही संधी मला वाया घालवायची नाही. संतोष, आता तु मला सांग... तु आणि मी काय करायचं ? कसं जगायचं ?

शैलेश देशमुख याची व्यथा रमेश पेक्षा वेगळी नाही. वेगळा आहे त्याचा प्रश्‍न. शैलेस माझ्याबरोबरच दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर काही काळ त्याने पुण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. एमपीएससी, युपीएससीचा अभ्यास केला. परिक्षा दिल्या. सर्व काही करुन झाल्यावर आता घरी पूर्णवेळ शेती करतोय. प्रगतीशिल शेतकरी आहे. वय 26.

काल त्याचा फोन आला. मला लग्न करायचे आहे. आई आणि बहिनीची संमती आहे. शेजारच्या गावची मुलगी पण पाहीली आहे. बी.ए. आहे. दिसायला एकदम चुनचुनीत. तिचा बाप म्हणतो की, आधी गंध लावून लग्न नक्की करा. पण माझा बाप तयार नाही. त्यांचा विरोध आहे. एवढ्यात लग्न नको म्हणतात. आत्तापर्यंत तालुक्‍यातील शेकडो पोरापोरींची लग्न लावली पण स्वतःच्या मुलाचं मन त्यांना कळत नाही. भाऊ तु काहीही कर पण त्यांना समजावून सांग. लग्नाला तयार कर. उद्या माझ्या हातून काही वेगळं घडलं तर मला नाव ठेवू नको.

शैलूचे वडील माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना समजावून सांगावे ही त्याची अपेक्षा चुकीची नव्हती. मात्र या वेळी समस्या नाजूक होती. त्याच्या वडीलांच्या भुमीकेशी मी समरस होतो. कारण, नवरदेव अजून स्वतःच्या पायावर ठामपणे उभा नाही. याच्या हातात एखाद्या मुलीचा हात देणं म्हणजे तिला जाणून बुजून दरीत लोटल्यासारखं होतं. याला माझी तयारी नव्हती. मी त्याला म्हणालोही.. शैलू, तुझ्या पप्पांचं म्हणणं बरोबर आहे. तुला आणखी एक दोन वर्षे दम धरायला काय हरकत आहे. तुझं शेतीतलं करीअर आता कुठे मार्गी लागतंय. एक दोन हंगाम यशस्वी कर मग ते स्वतःहून लग्नाचा विषय काढतील. मी त्यांना समजावू शकत नाही. आणि एवढाच उताविळ झाला असशील, तर तुच समजाव ना.

ते ही करुन पाहीले. दोन्ही गाल आणि हात सुजले आहेत माझे. पुन्हा ती चुक करणार नाही. राहीली गोष्ट करीअरची. ती फुटपट्टी लावली ना, तर माझ्या बापानं तरी कुठं अजून स्वतःचं करीअर घडवलं आहे. आयुष्य शेतीत काढलंय. पण एक पिक धड नाही. तीन वर्षात डाळिंबाची निम्मी झाडं मेली. यांच्याच्यानं एकही सांधता आलं नाही. दर वर्षी डोळ्यांसमोर हजारो रुपयांचं नुकसान होतं. गावच्या राजकारणात मोठा मान आहे म्हणे यांना. पण अजून साधा आमच्या आळीचा ग्रामपंचायत सदस्य होता आलेलं नाही. तुला काय कळणार... दिवसभर शेतात हाडं मोडून घाम गाळल्यावर संध्याकाळी कसं वाटतं ते. प्रश्‍न फक्त लैगिंक समाधानाचा नाही. शंभराच्या दोन तीन नोटा फेकल्या की कुठंही मिळते ते. मला माझ्या स्वतःच्या मानसाचा "सपोर्ट' हवा आहे. आत्तापर्यंत ज्यांना माझं समजायचो तेच परक्‍यासारखी वागू लागल्यावर दुसरं काय करणार. मला नवं नातं हवंय. विश्‍वासाचं. तुला तरी माझं दुखः कसं कळणार म्हणा. पुण्यात सदानकदा पोरींच्या घोळक्‍यात फिरतोस. इथं ढेकळांमध्ये मला दिवस काढावे लागतात. अवघड झालंय सगळंच. एक दिवस तुलाही कळंल, आपण काय गमावलंय ते. मग हळहळ करत बसू नको म्हणजे झालं. बघ, घरी ये आणि सांग बापाला समजून जमलं तर

शैल्याचा फोन बंद झाला तरी त्याचं शब्द मेंदू कुरतडत होते. त्याच्या गनगणीतून बाहेर येतोय न येतोय तोच कर्णपिशाच्च (मोबाईला डॉ. आनंद यादव सरांनी दिलेले मराठी नाव) पुन्हा एकदा घुमू लागले. विशाल तुपे बोलत होता. मी कोथरुड डेपोला आहे. मुलाखत चांगली झाली आहे. खुप भुक लागलिये. दहा मिनीटात कावेरीला ये. विशाल पाडुरंग तुपे. मु. पो. सटाणा, जि. नाशिक. कृषी पदवी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी (बीएस्सीऍग्री, एमबीए). गेल्या दोन वर्षात सहा कंपन्या बदलल्या. कारणं वेगवेगळी. कधी कंपनीची प्रॉडक्‍ट भंगार तर कधी बॉस. ""साली अपनी जिंदगी झॉंट बन गई है'' हा त्याचा स्वतःचं जगणं सांगण्याचा एका वाक्‍याचा फंडा.

वैताग आलाय यार भाऊ या नोकऱ्यांचा आता. पण केल्याशिवाय पर्याय नाही. विशालनं चिकन करीचा "सिप' घेता घेता सांगायला सुरवात केली. एमबीएसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते मागे लागले आहेत. पाच सहा वर्षे 25-30 हजाराची नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. वर्षाला 4-5 लाख मिळायलाच पाहिजेत. जवळ पैसे साचले तर स्वतंत्रपणे काही तरी करता येईल. सध्या मी टाय घातलेला सुटा बुटातला भिकारी आहे. डोक्‍यात ज आहे, नाही असं नाही. पण ते विकायचं तर जगाच्या बाजारात सध्या मंदी आहे, असं म्हणतात. तुच सांग काय करणार. मुली सांगून येतात. घरच्यांचा आग्रह आहे. मलाही लग्न करावं वाटतं. नाही असं नाही. पण तरीही आणखी चार पाच वर्षे विचार करु शकत नाही. माझ्या वडीलांच लग्न 21 व्या वर्षी झालं. मी 31 व्या वर्षी करणार.

तू बरं केलंस. नोकरीला प्राधान्य देऊन अधी मधी शेतीपण पाहतोस. सगळीकडं बट्‌टयाबोळ आहे. नोकरी वाल्याला वाटतं, शेती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. एक दाणा पेरला की त्यातून हजार मिळतात. शेतकऱ्याला वाटतं नोकरदाराचं जगणं अलिशान, ऐशोआरामी आणि मान सन्मानाचं आहे. सगळं फालतू आहे यार. मी दोन्हींकडून पोळून निघालोय म्हणून सांगतो. काहीच सुखाचं नाही. सदा टांगती तलवार. नोकरीत "बॉस' पावलोपावली गांड मारण्यास टपलेला, तर शेतीत निसर्ग. ज्याचा कोडगेपणा आणि सहन करण्याची क्षमता जास्त तोच टिकणार. नाही तर आहेच रोजचीच झवझव.

आपला मुख्य दोष काय माहीत आहे का? तो हा की आप मध्यमवर्गीय ते कनिष्ट मध्यमवर्गीय घरांमध्ये जन्माला आलो. कधी कधी वाटतं टीना अंबानीचा कुत्रा म्हणून जन्माला आलो असतो तरी बरं झालं असतं. आपली जगण्याची पातळी आणि जिवघेण्या संघर्षाचं नशीब सटवीनं कपाळावर "परमनंट मार्करनं' कोरुन ठेवलंय. आपण फक्त लढत, झगडत रहायचं. मलो तरी एक नंबर लढलो म्हणायचं. सकारात्मक विचारांची, शुन्यातून गडगंज संपत्ती गोळा केलेल्यांची पुस्तक घोकायची आणि त्यांच्यामागून आपणही आपलं आयुष्य घडवू अशी जिद्द (?) धरुन धावत रहायचं. लढत रहायचं संधी मिळविण्यासाठी... स्वतःविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, बॉसविरुद्ध, कंपनीविरुद्ध, समाजाविरुद्ध आणि बऱ्याच कशाकशाविरुद्ध. महाराजांचे मावळे ना आपणं. लढायचं. लढण्यातील आणि त्यातील जगण्यातील सौंदर्य भोगायचं. जगण्यावर बलात्कार झाले तरी.

खोलीवर आलो. आत्तापर्यंत झाली एवढी पाणगळ खूप झाली होती. दररोज संध्याकाळी असतं त्यापेक्षाही अधिक डोकं सुन्न झालं होतं. राहून राहून कावेरीवाल्याच्या कोंबडीची आठवण होत होती. बिचारी आमच्यासाठी आज फुकाची बळी गेली. माझ्या तीन मित्रांपाठोपाठ ती माझा चवथा मित्र किंवा मैत्रीण असती तर तिची पाणगळ कशी असती? तिनेही तिच्या जगण्याची अतृप्तताच घोकली असती का आमच्यासारखी. की पक्षी म्हणून स्वतःचा अल्पजिवीपणा स्विकारुन काही नवी दिशा असती तिची? पुन्हा विचार आला... अरे ती कसले दुखः करणार. तिच्या आयुष्याचा तर महोत्सव झाला. कदाचीत आपण नाही तर दुसऱ्या कुणी तरी खाल्लीच असती ना. नाहीतर तिचा "चिकन करी' ऐवजी "भुर्जी मसाला' झाला नसती कशावरुन. कारण काही का असेना... ती जन्माला आली. तिच्या वाट्याला आलेलं भलं बुरं आयुष्य धुंद होऊन जगली. कोणापुढं रडली नाही की दुसऱ्याला दोष देत बसली नाही. बरं... मेली तरी अजून माझ्या डोक्‍यात अजून कलकलाट करतेय. पाणगळ आणि अंकुरणं हाच जर जगण्याच्या उत्सव आणि महोत्सव असेल तर हे तरी वेगळं काय आहे. रमेश, विशाल, शैलेश आणि कोंबडीला अंकुर फुटले होते. कदाचीत आता माझी वेळ आहे...