Sunday, June 15, 2014

मी काही जगातला पहिला बाप नाही !

गेला बाजार शेकडो युगं
नियतीचे पाढे घोकून
अगणित वृक्ष वनात
झडतात बीज फोकून

सालोसालचं बिजारोपन 
शेडा बुडखा वाढ झाड
फुलन फलन प्रजनन
बाप्याचा बाप, बाईची आई

मी काही जगातला पहिला बाप नाही !
तरी लेकराची माया, सर म्हणता सरत नाही !

(संतोष, १५ जून १४, कोथरुड, रात्री १२)

भिती स्वप्न

तुमच्या पैकी कुणी स्वप्नांचे अभ्यासक, विश्लेषक असाल किवा तुम्हाला स्वप्नांमधील संकेत समजत असतील तर मला आज पडलेल्या या स्वप्नाचा अर्थ सांगावा ही विनंती....

मी आणि माझे दोन मित्र... त्यातील एक रमेश करंडे पारगावच्या एसटी स्टॅंडवर अंधार पडता उतरलो. घरुन फोन आलेला... रस्त्यात वाघ आहेत रात्री येऊ नका. रमेश घाबरला. जायला नको म्हणायला लागला. मी आग्रह केला. चल रे मी आहे, वाघ काय खातात काय. हा नाय हा नाय करता करता रमेश आम्हा दोघांसह निघाला. ओढ्याच्या रस्त्याला लागलो... एकेक वाघ दिसायला लागला. अत्यंत शांतपणे आम्ही पुढे जायला लागलो. रम्या गडबड करायला लागला. मी त्याला दाबून धरले. सगळं कर पण गडबड, गोंधळ करु नको, बोंबलू नको. आपण गपचुक निघून जावू.

एक वाघ ओलांडला. मुक्ताईच्या देवळाजवळ दुसरा वाघ, श्रीरामच्या घराजवळ तिसरा. असे करत करत हाडकीत आलो. आता इथे सिंह होते. उत्तरोत्तर रम्याचा गोंधळ, कुडकुडणं आणि तणतणं वाढत होतं. वाघांना चकवत त्यांच्यातून मार्ग काढत काढत रम्याला सांभाळणं माझ्या आवाक्याबाहेर होऊ लागलं होतं... पण अत्यंत शांतपणे रस्ता कापतच होतो. रम्याचा जळफळाट सुरु होता. अनेकदा तो वाघांच्या तोंडाजवळच थांबून वाद घालायचा. अखेर गंगाराम फाट्याजवळील सिंह ओलांडून कारभारी तात्याच्या घरामागिल वाघालाही आम्ही चकवलं. माझ्या घरी पोचलो. दार बंद आणि ओट्यावर आणखी दोन तीन वाघ बसलेले.

आता रम्याला असह्य झालं. तो माझ्या कंट्रोलमधूनही सटकला आणि वाट सुटेल तिकडं पळायला लागला. टाेमॅटोच्या, मकेच्या वावराकडं... वाघांनी कान टवकारले आणि रम्यामागे लागले. आत्ता काय करायचं... मी फावडं उचलून वाघांमागं धावलो. पुढे पाहतो तर मका रवखळल्याली. रम्या दिसेना. एकदम गायब. वर भुईमुगाच्या वावरात तीन वाघ आणि एक जरा खवल्याखवल्याचा वाघापेक्षा लांब पण त्याच साईजचा प्राणी वाघांबरोबर रम्यासारखाच गोंधळलेल्या, कुडकुडलेल्या, तणतणलेल्या अवस्थेत झुंजत होता.

रम्याच्या घरच्यांना आता काय सांगायचं याचं प्रचंड टेन्शन घेऊन मी जागा झालो... आत्ता बोला !

वर्दी

सकाळी सकाळी काॅलेजला निघायच्या टायमालाच वर्दी आली. आज इनमतीत सदूच्या पोराची पाची. तीन पिक्चर पाहिजेत. एक मराठी, दोन हिंदी. संध्याकाळी ९ पर्यंत पोचा. पिक्चर नऊ म्हणजे नऊला सुरु झाला पाहिजे. २५० रुपये नक्की. डोक्यात गणगण सुरु झाली.

मस्तपैकी स्वतःच्या कमाईवर दोन पेट्रोल बुलेट घेऊन डांबरी रस्त्याने डुगडुगडुगडुग करत फिरायचं. हे शाळेत असल्यापासून दाद्याचं आणि माझं काॅमन स्वप्न. शेवटी दादूनी नी मी फायनल केलं. आपल्या सगळ्यात आवडीचं काम पिक्चर पाहणं. मळ्यात, गावात, पंचक्रोशीत पाची, वाढदिवस, जत्रा बित्रा कुठंच कोणताच पिक्चर आपण सोडत नाय. रात्रभर पिक्चर असल्यावर व्हीसीआर वाल्यापासून घरमालकापर्यंत सगळी झोपत्यात पण आपण दोघंच जागं आसतो. लोक पैसं पण लय देत्यात पिक्चर आणायला. आपणही गुपचूप कुणालाही कळू न देता हाच धंदा करायचा.

सुरु झाला धंदा. एक दिवस आधीपर्य़ंतच्या वर्द्या घ्यायच्या. १०० रुपये एका पिक्चरचे. मंचरला संगमवाल्यानं फेकून देण्यासाठी बाजूला काढलेल्या २५-३० जुन्या कॅसेट त्यानं मला मित्र म्हणून भेट दिल्या. १० रुपये भाड्याने कोणतीही कॅसेट मिळायची. व्हीसीआर १०० रुपये भाड्याने मिळायचा. टिव्हीची अडचण होती. बेल्हा आणि मंचरच्या दोघा जणांनी ती दूर केली. सगळं जुगाड जमावलं आणि नेहमीच्या पंटरांना सांगून ठेवलं... वर्दी असेल तर सांगा.

अखेर सदुची वर्दी आली. सद्या महापंटर. तो आधीच म्हणे... बघा, हिंगे डाक्टर, तुक्या, बांगर, संगमवाला या सगळ्यांना सोडून तुमाला वर्दी देतोय. कॅसेट यकदापण आडाकली नाय पायजे. काही कुटाणा झाला तर तुमचं तुम्ही बघा, माझं काही नाही. तीन पिक्चरचे २५० रुपये देईल. (म्हणलं २५० तं २५० धंदा सुरु तं व्हईल.) पण घरापासून लाईटचा खांबडा बराच लाब हे... आकडा तुमचा तुला टाकावा लागंल. च्या आयला आता हे नवीन झ्यांगाट उभं राहीलं. कॅसिटी, टीव्ही हाये पण आकड्याची वायर तर नाय आपल्याकं... पण दादू ठाम होता. आयला, आपलं स्वप्नं पूरं करायचं तर ही वर्दी पूरी करायलाच पाहिजे.

गाठलं बंडोबाचं दुकानं. सिंगल वायरचे दोन बंडल घेतली. मग डबल केली. बोर्ड घेतला. झाली सगळी तयारी. दाद्यानं त्याच्या सायकलला मागे कॅरिजला दोन लाकडं उभी बांदून त्यावर टीव्ही बांधला. मी व्हीसीआर, कॅसेट, वायरी माझ्या सायकलं आडकवल्या आणि बांधा बांधानं ढकलंत ढकलंत इनमती गाठली. रामाच्या घरापासून खांबळा तर बराच लांब... वायर पुरंना. मग दादू म्हणे... आपण डबल एेवजी सिंगलच वायर टाकू. डायरेक्ट मेन. आणि घरापशी बारीक खड्डा खांडून आर्थिंग देवू. दुसरा पर्यंयच नव्हता.

टाकला आकडा. आर्थिंगही दिली. टिव्ही सुरु झाला, व्हीसीआरमध्ये कॅसेट सरकवली आणि माहेरची साडी सुरु झाली... आमच्या स्वप्नपूर्तीचा महामार्ग खुला झाला. माणसं चांगलीच रंगात आली पण... विक्रम गोखलेनं अलका कुबलकडं पाठ फिरवली आणि आमची साडेसाती सुरु झाली. पहिल्यांदा आर्थिंग कमी पडायला लागली, टिव्ही झटकं मरायला लागला. त्यात कॅसेटही गुतायला लागली. भरिस भर म्हणून दोन दारुडी लय डॉकं खायला लागली.

आता काय करावं... बाया घाई करायल्या लागल्या. ए निट लावा ना टिव्ही... आम्हाला एवढाच पिक्चर पाहून घरी जायचंय झोपाया... तरी मी सांगत होतो तुक्याला वर्दी द्या म्हणून... ये त्या टिव्हीला फटका मारुन बघ... च्या आयला व्हीसीआरला पण फटका मारल्याशिवाय चालत नाय... गोंधळ वाढत घेला आर्थिंगला पाणी घालायला गेलेला राम्या आकड्याच्या मेन लाईनला चिटकला... ह्यो ठणाणा... दाद्या आकडा वढायला पळाला... मी कुठं होतो काहीच समजणा. मागं वळून पाहिलं तर सद्याच्या भावाचं पोरगं त्यांच्या बांधाच्या भांडणाचा राग आमच्या टिव्हीवर काढत होतं... काचा फुटल्या तरी हटत नव्हतं बेनं. मी जिवाच्या आकांतानं ओरडत होतो... पण सारा आवाज कंठात तुंबलेला. आवाज फुटला तेव्हा सगळ्या स्वप्नाला घाम फुटला होता !

जागरण गोंधळ

जागरण गोंधळ घातल्याशिवाय तुमची मोटर काय निट चालणारच नाय. इतकी वर्ष झाली सरकारनं परयत्न केलं, तुमच्या नवर्यानं परयत्न केलं, मोटरी बदलल्या, डिपीच्या लायनी बदल्या, लिंक बदललं, वायरमन बदललंय... पण काही गुण आलाय ? नदीवर मोटर चालू करुन गडी वावरात बारं द्यायला येईतव्हर मोटर बंद पडतीच ना... 

लाईट झटकं मारती म्हणून आटो बसवलं. किती आॅटो झालं सा मयन्यात. पडयाय का फरक... बाई दोष लायटीत नाय, मसनीत नाय... जागंत हाय. तिकडं बबन सराची मोटर चांगली चालती आन् तुमची झटकं हानती आसं का... तुमची मोटर जिथं हाय ना... ती जागा चांगली नाय. तुमच्या नवर्याला हे पटणार नाय. पण तिथं जागरण गोंधळ घातल्याशिवाय गुण नाय यायचा ! आज नाय तं उद्या पण तुमाला जागरान गोंधळ घालावाच लागंल...

गुलाब आपलं लाॅजिक ठकूबाईला पटवून देत होता. ठकूलाही पटत होतं. गुलाब म्हणतोय ते बरोबर आहे ते. पण पोरांच्या बापाला सांगायचं कसं. त्याला तं हे काय पटत नाय. नको नको म्हणता डग्या डोहावं मोटर बसवली. तेथून पाच किलोमिटर अंतरावर पिंपरखेडच्या शिवंला पाईप लाईननं पाणी उचललं. अान् चार सा म्हयन्यातच लाईटच्या झटक्याची साडेसाती मागं लागली. अॅटो टाकला तं उडतो आन् लाकूड लावून मोटर चालवली तं जळती. लाईट टिकलीच तर फुटबाॅल हवा धरतो आणि मोटर मोकळीच फिरत राहती. एक ना अनेक डोकेदुखी. पिक हाती यायचं आणि पाण्याच्या ताण्यानं जायचं. कोथंबीर सुकली, मेथीला झटका बसला. मका कडवळानं ताण सहन केला म्हणून नाही तर जर्शी पण आटल्या असत्या. सुखाचा जिव दुखात पडयाय. करावं काय...

बाई मी सांगतो... गुलाबच्या आवाजानं ठकुची तंद्री मोडली. एका जागराण गोंधळाचं पाच हजार रुपये घेतो. पण तुमचं आमचं रिलेशन आणि तुमची नड जाणतो. तुम्ही मला दोन हजार रुपये द्या. बाकी गोंधळाला लागणारं सामान तं तुमच्या घरीच हे... तुमच्या धन्याला बी सांगायची गरज नाय. तुम्ही मला खर्चाचे पैसे आणि सामान द्या. तुम्ही पण नदीला यायची गरज नाही. मी चांगल्या राती जावून जागरण गोंधळ करतो. १०० टक्के तुमची मोटर चालणार. नाय चालली तर आयुष्यात परत खंजरी हातात धरणार नाय...

गुलाब दाणं पिशीत भरुन भंडारा लावून गेला आणि ठकुबाईची गणगण सुरु झाली. पोरांच्या बापाला जागरणं गोधळाला तयार करावं की गुलब्याला गपचुप उरकून घ्यायला सांगावं... पैशाचं काय आईनं दिलेलं दोन मणी ईकता येतील गपचूप वाटलं तं. पण आपल्या पोटात तं काय राह्यचं नाय... आज ना उद्या मोटरीच्या खोक्याजवळ जागरण गोंधळ झाला हे त्यांना कळणारंच. नसता उद्योग करण्यापेक्षा आत्ताच सांगू... अकलीच्या खात्यात करुन टाका गोंधळ म्हणून. व्हवून व्हवून काय व्हईल जातील मोटर आन् आटोच्या जळाजळीत एवढं पैसं गेले तिथं आणखी दोन हजार जातील...

टिप्पूर चांदण्यात वट्यावं रातचं जेवण उरकत आलं... तसा ठकुबाईनं हळूच विषय काढला. आता वं काय करायचं लायटीचं. काय करायचं... जे सगळ्यांचं व्हईल ते आपलं व्हईल. आपण काय मुख्यमंत्री लागून गेलोय का... पण मी काय म्हन्ते... एकदा जागरण गोंधळ घालून पायचा का....

त्याच्या आयचा भोसडा त्या गुलब्याचे. आयघाला तुझ्यापशी येवून पन पिळाकला का... थांब उद्या पाटलाला सांगून घोडाच लावतो त्याला. सालं नेमकं दुपारच्या टायमाला बाप्यंमाणूस घरी नसलं आसा टाईम बघुन बायांना गाठतं आन् मोटारीजवळ जागरान गोंधळ घालायचं सागंत बसतं. दगड्याच्या बायकूनं गळ्यातलं डॉरलं इकून गपचुप घातला गोंधल परवा. आता फरक नाय पडलाय म्हून बसलीय बोंबलत. त्याच्या आयला बांबला त्याचे... उद्या माजच मोडतो साल्याचा... ठकुचा नवरा काय काय तणतणत राह्यला...

इकडं भांडी आवरता आवरता ठकुच्या उरातली धडधड वाढत होती अन् खरकटा हात वारंवार गळ्यातल्या दोन मन्यांकडं जात होता !