Thursday, February 12, 2015

तासात बैल बुळकांडला...

तंगारला वो तंगाटला
उभ्या रानात भंगाटला
शिवळाटीला झुंजाळला
तासात बैल बुळकांडला

रंगात रंग वशिंड धड
शेणखाती कात शिंदाडी बाक
रगीत रगात बुंडाळला
तासात बैल बुळकांडला

लाखाचं बारा हाराचा भारा
वावरात किटाडं ढळंना मुलडानं
माथ्याव बोकडं उंडारला
तासात बैल बुळकांडला

वैरणीला कहार कोपरीवं भार
भंगार भडूशी लटमाळला
गुरांच्या बाजारी फुकारला
तासात बैल बुळकांडला

दिल्ली काय न् गल्ली काय
सगळ्याच बैलांचे ढेकळात पाय
बुळगाट बैल बुळकांडणार
आठवडी बाजार खळखळणार

(संतोष डुकरे, पुणे)

सुधारणेचं मढं

सालं हे सुधारणेचं मढं
आणि मढ्याचं वझं
पेलायचं कसं ?
वहायचं कसं ?

पावलोपावली
पडताहेत बेड्या
साखळदंड,
साखरदंड,
नुसतेच दंड
मढं थंड
बंड थंड

शाहूजी आले... विषमतेला झटले
फुलेजी आले... विषमतेला झटले
बाबाजी आले... विषमतेला झटले
झटाझट झटापट झपाझप

पिढ्यानपिढ्या रपारप
मातीचा गाळ, गाळाचं गटार
गटारात कमळ, कमळावर लक्ष्मी

लक्ष्मी आली... विषमतेला झटली
विषमतेची पिलावळ.. विषमतेत घुसली
समतेच्या तोंडात विषमतेचा जयघोष
जय विषमता... जय विष-मता

सालं हे सुधारणेचं मढं
आणि मढ्याचं वझं
पेलायचं कसं ?
वहायचं कसं ?

(संतोष डुकरे, पुणे)

तुमचं तुम्हालाच लखलाभो...

तुम्ही गप्प आम्ही गप्प
ओठातल्या ओठात
शब्द न् शब्द ठप्प...

गप्प रहा
बोलायचं काम नाय
आमच्या आमच्या धर्मात
तुमचा काही राम नाय

स्वधर्म निंदा, नालस्ती, अपशब्द
ब्रम्हद्रोह, गोद्रोह, धर्मद्रोह अधम पाप
पाप पाप लेवून पाप, पापी माजलाहे
द्रोहाच्या विद्रोहाला देहदंड, आत्मदंड

चुप रहा गप्प रहा
बोलला तर... थोबाड फोडू
हसलास तर... दात पाडू
पादलास तर... गांड मारू

पांडुंनी पाहत रहावं
अांडूंनी भोगत रहावं
आंडूपांडूंच्या जगात
गांडूंनी जगत रहावं...

तुमचे धर्म तुमच्या जाती
तुमच्या तुम्हालाच लखलाभो...

(संतोष डुकरे, पुणे)

एक दिवस... लवकरच...

जातीनं धर्माची खोलून मारल्यावर
धर्मगुरू पेटले, निखारले, विझले
जातीचा गंडा, धर्माचा गांजा
क्षणात झिंगाट गंडेगांजाडू

पण मौका सभी को मिलता है...

भुकंपाचा एक धक्का
लाटेचा एक तडाखा
एक दिवस
लवकरच...

ढासळतील सार्या भिंती
कोसळतील कळस
हलवत राहतील उपटे
भग्न ढिगार्यात घंटा

तेव्हा खदाखदा हसत
जगण्याच्या नशेत
निस्सिम निधर्मी जग
सुखासुखी भोगेन म्हणतोय...

(संतोष डुकरे, पुणे)

तुमची हौस भागू द्या...

घामा घामातूनही पेटताहेत
रक्तळले मळे
विहीरी थारोळी
पाट वाफे
सरी रोपटं.. कुस्करलेलं...

हात हलले... खटाक...
ओठ हलले... फटाक...
डोळे हलले... बटाक...
केस हलले... कटाक...

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पापांची गणना कोण करी
चित्रगुप्त झाला गुप्त
देव इंद्र स्वैराचारी

सांब म्हसणात दंग
कृष्ण राधेच्या महाली
कंसवनी फिरे नागडी
सत्ताभोगांची रंडकी

तुमची हौस भागू द्या एकदाची
उद्या तुमची तिरडी उठवूच...

(संतोष डुकरे, पुणे)

दिव्य स्वातंत्र्य

आपण आपली निट घालायची
दुसर्याला त्याची घालू द्यायची
स्वातंत्र्याची दिव्य ज्योत
अशीच तेवत ठेवायची

झेंड्याचा दांडा गोतास काळ
प्रश्न विचारील त्याच्या गांडीत फाळ
काळाची कुर्हाड, कुर्हाडीला धार
ज्याचा त्याचा हात, ज्याचे त्याचे वार

मनगटावर हात, गळ्यावर हात
उरावर हात, श्वासावर हात
शब्दांची घुसमट, बलात्कार वार
ढेकळांच्या गर्दीत शिकारी फार

लाचारांची झुंड, भोगटांची झंड
संपता संपत नाहीत वासनांध
मुंडकी पडतात, रांगा सरतात
झुंडीच्या जत्रा दररोज भरतात
झुंड झटत राहते
झुंड झोंबत राहते
लचके तोडत राहते
समोरासमोरचे... दिसेल त्याचे...

आपण आपली आडोशाला निट घालायची
दुसर्याला त्याची घालू द्यायची
स्वातंत्र्याची दिव्य ज्योत
अशीच तेवत ठेवायची...

आ त्थू या स्वतंत्र जिंदगानीवर...

(संतोष डुकरे, पुणे)

माऊली

माऊली...
योग्याची माऊली
सुखाची सावली
इत्यादी इत्यादी सगळं खरं....

पण खरं सांगा माऊली
हे सगळं का सहन केलं ?
मान्य आहे तुमचं अवहेलनंपण
पण तोच तर होता पाया
तुमच्या विश्वात्मकतेच्या सिद्धांताचा...

मग का धरलात हट्ट
का केलात जिवाचा आटापीटा
वाळीतून जातीत जाण्याचा... ब्राम्हण्यासाठी...
खरंच का ते एवढं प्यारं होतं ?

भेद निर्मुलन तर राहीले दूर
घरवापसीच्या विकृत प्रथेत
देह झिजवला सगळा

एवढी हौस होती ब्राम्हण्याची ?
का कशासाठी ?
का नको वाटलं इतरांसारखं
सामान्य बहिष्कृत जगणं...

का नाही चालवलात माऊली ?
विठ्ठलपंतांच्या विद्रोहाचा वारसा

चालती भिंत, बोलता रेडा
खरं खोटं तुम्हालाच ठावूक
पण काय मिळालं मान झुकवून
जातीपायी माती खावून ?

का नाही पेटवला विद्रोहाचा अंगार
गितेत लिहीलेला नव्हता म्हणून...
की पुराणांत दाखला नव्हता म्हणून...

आणि शेवटी हाती उरलं तरी काय...
भावंडांची कलेवरं... भावार्थदिपीका ?
हत्या की.समाधी ? सत्य की घुसडाघुसड ?

एवढा उदोउदो, मग का गडपली समाधी
एक मात्र खरं...
तु षंढ केल्या पिढ्या
मारले प्रश्न, सवाल
मोडल्या माना उठणार्या...
कदाचित अजानताही...

माहीत नाही तुला कोणी
लावलं माऊलीचं लेबल...
अन्यथा तुझा पान्हा पिणारांनी
माझा तुका बुडवला नसता...

(संतोष डुकरे, पुणे)