Thursday, March 12, 2015

गोवंश हत्याबंदी पुराण

सिद्धपुराण !
समुळ गोवंश आता, स्टेट लेवल पेटंटेड
गो-माता, गो-पिता, गो-पुत्र, गो-कन्या
देव, धर्म, वंश, वृद्धी सर्व हक्क संरक्षित
वाकडी नजर पंचकाची कैद, रोकडा दंड

भासपुराण !
चौकाचौकात भास, माणसांचे मांस
विचारांना बत्त्या, शेतकरी हत्या
विधवांचा विलाप, लेकराचा टाहो
शासकीय आलाप, देवच पाहो

उदासपुराण !
घरोघरी चालूद्या, उत्सर्जनाचा धंदा
धन्याला धतूरा, गो-गुर्जींना मलिदा
पिढ्या न् पिढ्या, ओढतोय खटारा
तरी आमच्या घरावं, फिरवा खराटा

धर्मपुराण !
गोरक्षणाय, खलनिग्रहनाय
धर्मरक्षणाय, पांढरे हत्ती
गोरक्षा, धर्मरक्षा, हेरक्षा, तेरक्षा
हाती नांगर, त्याची पाताळी राख

धाकपुराण !
जर हात उचललात गो मातेवर
चाबूक उचललात बैल बापावर
वंशरक्षक येतील दंगल करतील
चौकाचौकात गातील मंगलगाणी

विटाळपुराण !
विटाळी गाईस स्पर्ष नको बाई
शुद्धीसाठी मुत्र गाईच्याच ठायी
वृषभाचे सत्व दिग्विजयासी ठावे
शुभ मुहुर्ता वळू कलेनेची घ्यावे

विकासपुराण !
शेणाला बैल, मुताला गाय
विर्याला वळू, घरच्या घरी
गोवंश हत्याबंदी, येता दारी

स्तुतीपुराण !
गोमाता, गोपिता, गोलेकरांचा जय..
गोप्रतिपालक राजाधिराज नरेंद्रकी जय...
गोवंशप्रतिपालक राजाधिराज देवेंद्रकी जय...
इती गोवंश हत्याबंदी कायदेयज्ञ फलोत्सुती....

आेम शांती शांती शांती शांती शांतीही...

(संतोष डुकरे, पुणे)

Tuesday, March 10, 2015

ग्रंथ... धर्मग्रंथ

एक ग्रॅम अफु घ्या
त्यात पाव ग्रॅम गांजा मिळवा
पावशेर दुधात मिसळा घुसळा
वर त्यात चवीपुरती भांग टाका
आणि हा कैफाचा प्याला
एका दमात रिता करा
मग हातातल्या टाकानं
पानं, पट, पत्रावळ्या
दिसेल ते खरडत रहा
इतिहास घडवा... इतिहास चढवा
इतिहास मढवा... इतिहास लढवा
तोंडाचा वास जाईस्तोवर
खर्डेघाशीचा देव होईल
देवाला धर्म लागेल
धर्माला ग्रंथ लागेल
आणि तुमच्या बाडाचं आयुष्य
कधीतरी सार्थकी लागेल
तुम्ही फक्त पित रहा
तुम्ही फक्त लिहीत रहा
पिता पिता लिहा
लिहीता लिहिता प्या
हागता मुतता झवता
लिहा लिहा लिहित रहा
आमच्या बोकांडी
पिढ्यान पिढ्या चढत रहा
एकामागून एक या
एकटे या दुकटे या
टोळ्यांनी या... ठेक्यांनी या...
चढत रहा...
आम्ही नाही म्हणत नाही तोवर
तशी आम्हाला सवयच नाही म्हणा
तुमचं तुम्ही चालू द्या...
उतत रहा मातत रहा
घेतला वसा घुसवत रहा
आम्ही फक्त वाट पाहतो...
तुम्हीच सांगितल्याप्रमाणे...
यदा कदा या मुर्दाडांना
ग्लानी येईल जेव्हा केव्हा
तेव्हा तुम्ही अवतार घ्या...
आम्ही भडवे होत राहू...
बडवे चढवून घेत राहू...
मग आमचा देव येईल
देवासोबत धर्म येईल
धर्मासोबत ग्रंथ येईल
तुमच्या बाडांचं मुखमैथून
आम्ही कंठभर जोगवत राहू...

(संतोष डुकरे, पुणे)

वांझोटं जिनं... सर्वोत्तम जिनं...

मी आता थांबतो
चालून तरी काय होणार
एक घाव दोन तुकडे चार टोकं
बोललो ही असतो मोठ्यानं
पण शब्दांनी गाभ राहणार
मी अनौरस बाप होणार
आणि माझ्या लेकराची माय
अकाली विधवा होणार
म्हणून आपलं गप रहायचं
मुक्यानं मुकीला मुकाट झवायचं
ना गाभाचं भ्यॉव, ना गाभडायची चिंता
वांझोटं जिनं... सर्वोत्तम जिनं...
(संतोष डुकरे, पुणे)

मारामार...

डोकं सुन्न... मेंदू सुन्न...
तरीही चाललंय ते बरं चाललंय
हात धरले... प्रश्न मिटला
पाय बांधले... प्रश्न मिटला
ओठ शिवले... प्रश्न मिटला
पण साला या मेंदूचं काय तरी कराया पायजे...
डोळे मिटता येतात कधीही
तसा मेंदू मिटता यायला हवा होता
स्वतःच स्वतःच्या बुद्धीवर
करावे लागणारे बलात्कार तरी वाचले असते
मेंदू थंड करायला
पोथ्या पुराणं भिकारचोट ग्रंथ
सारीच षंढ, मेंदूभेदी, घरफोडी
तुमच्या धर्मात काही उतारा असला तर सांगा...
आमच्याकडं सगळीच मारामार
(संतोष डुकरे, पुणे)

लाव्हा

लाव्हा उसळतो राहतो गाभ
अखंड अभेद्य अक्षय गाभा
लाव्हा थंडला की फक्त झिज... 
कणाकणानं क्षणाक्षणानं...

काळ छाताडावर थैथैल्यावर
हे दगडही गाभडतात साले...
पण त्यासाठीही कोटी वर्ष उलटावी लागतात...
गाडलेल्या जाणीवा रोमारोमानं फुलाव्या लागतात...

कनाकणानं झिजल्यावर गाभ्याचा खडक
खडकाचे दगड, दगडाची माती, मातीची मृदा...
गाभ्याच्या सत्वानं नवा गाभ धरण्यास सक्षम...
रापल्या तापल्या ढगाकडून गर्भाधान, बिजांकुर..

पण...आता मातीविनाही शेती करतात लोकं
कोटी कोटी वर्षांची झिज, भिज, रुज
मातीमोल ठरतेय क्षणात
धगधगताहेत वणव्यामागून वनवे
पेटल्या जंगलात जगण्याचा धूर आसमंतात

(संतोष डुकरे, पुणे)

फकिरा

आला दिवस गेला दिवस
हरेक रात्र कोजागिरी
जग मारुन फाट्यावर
पृथ्वीच्या पाठीवर मस्त फकिरा....

पुर्वी ही मस्त सोय होती राव
जग नको, त्याला जग पोसायचं
पोसणारांना नव्हत्या जाती, नव्हते धर्म
देणारा देत होता... फकिरा भोवरत होता

अणू रेणूच्या मर्यादा झोकून
जबाबदाऱ्यांची बेगडी ओझी फेकून
फुलायचंय... व्यक्त व्हायचंय स्वतःसाठी
नको तीच ती झवझव,
नी सो कॉल्ड समाजसुधारकांचे बलात्कार...

अनंत प्रांत, देश, भाषा, फॉर्म... अनिर्बंध
गेले ते दिवस, राहील्या त्या पाऊलवाटा...
आज साला पोटा चोटाच्या भुकेत
होतो आत्म्याचा गर्भपात रोजच्या रोज
(संतोष डुकरे, पुणे)

महामारी

तुटक्या काटकीच्या आधारानं
वेलीनं वृक्षावर झेप घ्यावी
चढावं चढावं चढत रहावं
आणि मग घ्यावा त्याचाच घोट
पारंब्यांचा शोक... अधांतरी...

दुखःच्या महाउत्सवात उधळलेला
पाहणाराला दिसेल वटवृक्ष वठलेला
वेलीचा गळफास, दृष्टीआड सृष्टी
नरडीच्या घोटाला आहुतीची भुकटी
हे भलतच व्हायला लागलंय...

खांद्यावर घेतलं की कानात मुततंय
इथपर्यंत ठिक होतं...
पण आता मुत्राचंच करुन विर्य
कानाला ठेवलंय गर्भार
आणि घालू पाहताहेत जन्माला, विकृतीची पिलावळ...

आता प्रसूतीच्या पहिल्याच झटक्यात
फाटणार गर्भाशय, वठणार महावृक्ष
तुझ्या माझ्याच आडोश्यानंच
कोंबा कोंबावर बेझूट वार...
हर बार, बार बार, हरेक बार

तुमचा आमचा परमार्थ
पिढ्यानपिढ्या असाच चालणार
बंद झापडांना महामारी भोगणार
रामकृष्ण हरी म्हणत
तुम्ही आम्ही टाळ कुटणार

(संतोष डुकरे, पुणे)

उंबरे फोडिस्तोवर...

ग्यानबा तुकात
राम कृष्ण पंढरीनाथात
तुम्ही आम्ही अडकलोय
बडव्या भडव्यांच्या चकव्यात

गिरवत बसलोय पिढ्यानपिढ्या
तिच ती बाराखडी
तेच आकार तेच उकार
निरर्थक निर्गून निराकार

सारं काही तेच ते अन् तेच ते
चाकोरीची चकार करतेय बोथट धार
बडव बडव बडवतोय मृदुंगाचे थोबाड
टाळांची कुटाकुट बुक्क्यांचा महापूर

अंगारे धुपारे धुप अगरबत्त्या
नामस्मरण जयघोष काकडा जागर
आरत्या सांजारत्या साहित्य पौराहित्य
नुसत्या घोकपट्टीनंही म्हणे आयुष्याचं सोनं

चालू द्या ज्यांचं चाललंय दुकान
पोकळ उराडांवर सारंच महान
सोवळ्या ओवळ्यांचा होवू द्या खेळ
गाभाऱ्यांचे उंबरे फोडीस्तोवर...

(संतोष डुकरे, पुणे)