Thursday, July 16, 2015

कामांधांच्या कळपात

टँक्सिवाला, रिक्शावाला, शिक्षक
डॉक्टर वा कुणी परिचित
हिंस्र श्वापदांच्या घोळक्यात
माझं लेकरू पोलक्यात...
क्रिडा शिक्षकाकडून विनयभंग
आश्रम शाळेत अत्याचार
स्कूल बसमध्ये छेडछाड
अपहरण, अँसिड, बलात्कार
माझी लेक फिरतेय
रानटी कामांधांच्या कळपात...
रस्ते, शाळा, आवार, बाजार
पावलो पावली सापळे शिकार
उंबऱ्याबाहेर काट्यांचे फास
षंढ समाज, बघे हजार
तुझं मात्र बरंय साल्या
तु पोराचा बाप...
तु बिनधास्त, पोरगा बिनधास्त
इथं जिवाला घोर रोजचाच...
माझी लेक फिरतेय
रानटी कामांधांच्या कळपात...
(संतोष डुकरे, पुणे)
👆 परममित्र गणेश कोरे व त्याची लाडकी लेक सई यांना समर्पित 😔

विकृती

कुणीतरी विकृत चाळा करतं
आपण त्याला आदेश समजतो
कधी गुरूचा, धर्माचा, जातीचा,
शिवबाचा नाही तर सायबाचा...
डोईची अक्कल, पायची वहाण
पिढ्यानपिढ्या पोथ्यांवर गहाण
आपल्या धडावर दुसऱ्याचं डोकं
आंधळं दळतं कुत्र तुप पोळी खातं
भिक्कार भनंग व्यास हव्यास
आमच्या आमच्यातच लढाईचा माज
बिनडोक अस्मितेवर विकृतांची तुंबडी
आपल्याच तलवारींवर आपलीच मुंडकी
आपण फक्त जय म्हणायचं...
रावबांचा जय, सायबाचा जय
होयबाचा जय, नायबाचा जय
पुन्हा हात खाली, मानकटावर जू
शिरा धमन्या वाहणार गुलामीचा पू
हे असं आणखी किती पिढ्या चालायचं
विकृतांचं गाडं मानकुटी वहायचं
आपल्या घामा रक्ताच्या सड्यावं
त्यांच्या द्वेषाचं मळं कुठवर पोसायचं ?
(संतोष डुकरे, पुणे)

पडिक

मॉन्सून मागं रानोमाळ हिंडताना
लक्षात कसा आला नाही
माझ्या शेतात वारा घुमलेला...
उंबराच्या खोडावं चिक्कूंच्या आळ्यात
काजव्यांच्या फुटल्यात फांद्या
लखलखाट पाना कोंबात...
मी फिरत होतो दाजीपूरात
चांदण्यांच्या झाडाच्या शोधात
काळजापुढं काळीज खोलतं व्यथा
मी टिपून सारा गर्भ, सांगतो कथा
पाऊस नुकसान कर्जाचा भुंगा
मॉन्सूनभोवतीचा खाटा पिंगा
दादा म्हणाले भाऊ मेथी गेली आपली...
थंड संथ लयदार हेलकावता वारा
नारळाच्या झावळ्या झोंबकळत्या
आंब्या जांभळीच्या रित्या कुशी
पेरत्या मुठीत चांदण्या रित्या
नजरभर खाटं आभाळ, भुकिस्ता वारा
मॉन्सून आला झोडपून गेला वाफसा बेतात
टमटाचा बाग पडला, बाजरी भिजली
मुंगसं सुद्धा खाईनात भुईमुगाचं मॉड
कठणा मठणाचं करायचं काय, बाजार की पाभार
पावसाचं खरंय भाऊ, पण ठाकरं सोडून चालल्यात काम
पाऊस बदललाय, अडचणी बदलल्यात
वारा घुमतोय माणसं घुमत्यात
बदलाच्या लाटांवरती
पिकं मानसं सारीच डुलत्यात...
तरीही...
पावसाचं गणित, पिकाचा हिशेब व शेवटचा प्रश्न
यंदा इनमती पडिक ठेवायची ना आपली ?
- संतोष डुकरे, २६ जून १५, पारगाव - जुन्नर

गजर गाड्याचा

आता आभाळाकडं पाहवत नाही
सगळं मोकळं मोकळं मोकळं
मध्येच एखादं ढगाड
ते ही वाऱ्यावर उनाड
मातीची ओल चालली खोल
अंकुरण्याआधीच सुकताहेत कोंंब
मॉन्सूनच्या झुल्यावर
आशा निराशेचा हेल
बडा ढग पोकळ पाणी
वारा अजूनही आरद बेरसा
पंचांग, घट, आयएमडीचा दिर्घ पल्ला
कशात काय न् कशाचं काय
गजर गाड्याचा निवद शेंगुळ्याचा

(संतोष डुकरे, 1 जुलै 15, नगर)

Wednesday, July 15, 2015

कांजा

कांजा पावरा
एकला जगला
भाग भाग भागला
थकला, सातपुड्यात विसावला 
कांज्या अधिक बायकू बरोबर पोरं
पोरांची रांग, वंशाला भांग, जगण्याला थांग
थांगाच्या आशेनं पै पाहूण्यांची रांग
मग एकट्या कांजाचा कांजापाडा झाला
सातपुड्याच्या पिसाट पावसात खडा झाला
चिखलावं थांपून चिखल, भेंड्यांनी रचावी भिंत
तसा हा भेंडा झाला, उरावं उभं भिताड...
खरंच... कांजा माणूस नाही, भिताड हे...


(संतोष डुकरे, शिरपूर - धुळे, कांजा पाड्यावर)

पावरी

ती जागा सोडून चार दिवस झाले
अजूनही मन तिथंच घुटमळतंय
शेणामातीत सारवलेल्या बांबूच्या काड्या
सागवानी चौपाईला विणलेल्या दोऱ्या
चांदीच्या बांगड्यांचा मंद नादंकार
कमरपट्ट्याच्या लयीला, पैजनं जोडव्यांची साथ
पापण्यातून पापण्या, बुब्बुळांची चुळबुळ
जगण्याची आसक्ती, अन् स्वातंत्र्य स्वच्छंदी
नजरेच्या नात्याला ना नाव ना बंध
त्या दोघींचं... अवघं अस्तित्व बेधुंद
अवखळ लाघव कांतीचे अर्जव पदराची वळवळ
रानच्या पाखरांची उभ्या रानात सळसळ
लेक-माय की सासू-सुनबाय
ठावूक नाही..
रांजली गांजली की भिंगर भिवरी
ठावूक नाही
रुतून बसलिये काळजात फक्त
पावरी कृती, आकृती, अदा, मर्यादा !
(संतोष डुकरे @ सातपुड्याच्या कुशीतील कुठला तरी पावरी पाडा, जळगाव)

पाझंर

फोक म्हणता सोक नाय
रान मातला वापसा
किटाडाच्या किटाडांत
बीज पडला रापला
ढगाड येतं गरजून जातं
वारं येतं भुकून जातं
थेब थेंबही गळंना
रानाची तहान भागंना
चाललंय ह्ये आसं चाललंय
आन तुला पाह्यजे कासरा
लेका हाय तिकडं बरा हाय
सान सकाळ घोर नाय
जमिन जुमला पिकं जित्राबं
पळून कुठं चालल्यात काय
तु फिरला परत म्हणून
ढगाला पाझंर फुटलं काय
जमतंय तव्हर वढत राहील
पिकतंय तसं पिकत राहील
घाई नको करू मानंवं घ्यायची जुकाट
मी हरल्यावर तुलाच लढायचंय मुकाट
आमचं चालत्यात हातपाय
तव्हर जग फिर तराट
मग हायेच पाचिला पुजल्यालं
शिवळाटी, कासरं, फराट...
(संतोष डुकरे, पारगाव, ११ जुलै १५, रात्री १०.४५)