Wednesday, November 11, 2009

बाजारवाट

पहाटं तिनच्या सुमारास कोंबड्यानं पहिली बांग दिल्याबरोबर झुंबराबाईनं चुलीत काडक्‍या सरकवायला सुरवात केली. रात्री राखेत गाडलेल्या विस्तवाला फुकणीनं फुकर मारुन चुल पेटविण्याची तिची नेहमीचीच धडपड सुरु झाली. दगडूनं एव्हाना शेणकूर आवरुन बैलं जोगवायला सुरवात केली होती. फुंकणीचा आवाज ऐकून भाऊ जागा झाला आणि थेट चुलीपुढं जावून बसला. ""भावड्या उठ, इथं डुलक्‍या नको घेऊ. न्हाई तर बाजाराला उशीर व्हईल. उठ आन्‌ गोधाड्यांच्या घड्या कर पहिल्या.'' आईनं बाजाराचं नाव काढताच भाऊचं कान टवकारलं. काही न बोलता पालथ्या मुठीनं डोळं चोळत तो आंथरुण-पांघरुणांच्या घड्या करायला उठला. ""बाह्येरच्या चुलीवर पाणी तापलंय. आंघुळ करुन घे लगेच आणि तुझ्या बापाला तप्यालं भरुन ठेव तापाया.'' आईच वाक्‍य संपेपर्यंत भावड्यानं तपेलं बादलीत उपडं केलं होतं.

आज बैल बाजाराला न्यायचा असल्यानं दगडूच्या घराला नेहमीपेक्षा दोन तास आधिच जाग आली होती. गेल्या दोन बाजारी टाळलं, पण आता भाऊ हट्‌टाला पेटल्यानं दगडूनं त्याला बाजारला न्यायचं कबुल केलं होतं. पहिल्यांदाच बाजार बघाया मिळणार म्हणून भावड्या खुशीत होता. याच खुशीत त्यानं काल संध्याकाळीच बैलासाठी वझंभर घास आणि दोन कवळ्या मका कापून आणली. बैल काथ्याने घासून धुवून काढला. मांगाच्या सदूला बोलावून शिंगं साळून घेतली. त्यांना सोनेरी लावली. भावड्या वयानं 12-13 वर्षाचा. काळा सावळा पण तरतरीत. पठ्ठ्या घरी नेहमी खाकी हाप चड्डी आणि बनियानमध्ये असायचा. शाळेत जाताना त्याच हाफ चड्डीवर पांढरं शर्ट चढवलं म्हणजे झालं. कामाला वाघ. चार बैली नांगर एकट्यानं हाकायला तो नुकताच शिकला होता. चाव्हरी आसुड आणि गोफण वाजविणारा मळ्यातील तो एकमेव पोरगा होता. वावरात दारी धरणं आणि औत काठी करण्यात भावड्या लहान वयातच तरबेज झाला होता. पाचवीत असलेल्या भावड्याला शाळेत कोंडल्यासारखं व्हायचं. बरोबरीची पोरं गोट्या, विटी दांडू आणि क्रिकेट खेळत असताना हा गाई बैलांसाठी गवत कापत असायचा. कामाला माणसंच कमी असल्यानं दुसरा पर्यायही नव्हता म्हणा.

नेहमी चार बैल झुलत असलेली दगडूची दावण आता राजा आणि थैमान्या या दोन बैलावर आली होती. त्यात उन्हाळ्यात थैमान्यानं बसकण मारली आणि दगडूचं धाबं दणानलं. बैल आत्ताच इकावा तर उन्हाळ्यात गिऱ्हाईक कमी, शिवाय भावात मंदी. त्यामुळं आगुठीला थैमान्याला बेल्ह्याचा बाजार दाखवून नवाट गोऱ्हा आणण्याचा दगडूचा विचार होता. उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यावर दोघं बापलेक बैलाचं नाक मुसक्‍या दाबत नागरणीला जुंपले. नागरणी झाल्यावर महिना दोन महिनं बैलाला आराम मिळाला. त्यामुळे आगुठीला बसणार नाही अशी दगडूची अटकळ होती. मात्र थैमान्यानं धरलेली खोड जायचं नाव घेईना. त्यामुळं आता ऐन आगुठीत दगडूच्या बाजारवाऱ्या सुरु झाल्या होत्या.

दगडूच्या मळ्यातून वाहणारी कुकडी नदी व तिच्या पलिकडचं फारिस्ट ओलांडलं की दिड तासावर बेल्ह्याचा बाजार. दर सोमवारी भरायचा. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार ही त्याची ओळख. याशिवाय म्हशीं, घोडे व गाढवं, शेळ्या मेंढ्या, किराणा व भाजीपाला असे बाजाराचे अनेक भाग आहेत. आजूबाजूच्या आठ दहा तालुक्‍यातील लोकांची तेलामिठापासून कपडालत्त्यापर्यंतची खरेदी याच बाजारात होते. बैल बाजारातील नेहमीच्या व्यापाऱ्यांनी मोक्‍याच्या जागा बळकाविल्यानं शेतकऱ्यांना बैल विकायचा असेल तर दिवस उगायच्या आत बाजारात पोचून मोक्‍याची जागा मिळवणं जिकिरीचं असतं. नाही तर मग वाऱ्या कराव्या लागत. गेली दोन बाजार दगडूनं हा अनुभव घेतला होता. त्यामुळं आज भाऊला बरोबर घेवून त्यानं तांबडं फुटायच्या आतचं कासरा सोडला.

बैलाला पुढं घालून दोघं बाप-लेक रस्ता कापू लागले. वाट अंधारी असली, तरी पावलाखालची होती. बैलालाही वाटंचा अंदाज होता. रातकिड्यांच्या, कोल्ह्यांच्या आणि कुत्र्यां भुपाळीत पावलं पडतं होती. अधी-मधीच कोंबडं सुर लावत होतं. एखाद्या घराजवळून एकदोन कुत्री रात्रभराच्या जाग्रणानं तारवान्या सुरात भैरवी आवळंत मागं यायची आणि गप निघुन जायची. चाबूक भावड्याच्या हाती देवून दगडूनं थैमान्याला पुढं घातला. बाप लेक भराभर पावलं उचलू लागले. नदीच्या काठालाच शेजारचा गंगाराम बुवा दत्त म्हणून उभा होता.

""काय रं दगडू आज परत बेल्ह्याला का? आनं भावड्याला साळा नाय का आज. ध्यान दे याच्याकडं. काल बळीराम हाकताना पाह्यला. प्वार साळंत जातंय, पण भुमिती काय बरुबर नाय त्याची ! नांगराचं तास वाकडं-तिकडं व्हतयं आजून.'' तंबाखूचा बटवा दगडूच्या हाती देत गंगारामानं बैल थोपटला. ""आरं तात्या भुमीती चांगली हाय त्याची, पण बैलानं सगळं गणितच बिघडवलंय. दोन चार मुलडाणं झाली की बसकण मारतंय. नाक त्वांड दाबल्याशिवाय उठायचं नाव घेत नाही. वैताग आणलाय पार त्यानं. आगुठी हातची चाललीय. दोन बाजार केलं. पण लईच पडून मागितला. म्हणलं पुढच्या बाजारी बघु. आज इकूनच येणार हाय'' गंगारामाला बटवा परत करत दगडूनं बैलाला चाबकाच्या दांडीने ढुशी मारली.

आत्तापर्यंत गप्प असलेलं भावड्याचं तोंड फॉरेस्ट ओलांडून पक्का रस्ता सुरु झाल्याबरोबर मोकळं झालं.
""दादा, थैमान्या इकल्यावर लगेच नवा बैल घ्यायचा ना आपल्याला?''
""आधी हा तर खपू दे...'' दगडू.
""आन्‌ नाय खपला तर...'' भावड्या.
""सकाळी सकाळी नाट लावू नको. त्वा एवढा सजवलाय त्याला बाजारात पोचल्याबरुबर खपलं असं वाटतंय आज. बाकी यपाऱ्याच्या हातात''"

"बैल आपला, इकणार आपण, घेणार दुसरा शेतकरी मंग यापाऱ्याच्या हातात काय?''"
"बाळा, यपाऱ्याच्या हातात बाजार असतूय. आपण जाणार वर्षा दोन वर्षानं बाजारात. त्यांचा रोजचा राबता. आपल्याला यापाऱ्यांचे छक्के पंजे यपाऱ्यालाच माहीत असत्यात. त्यामुळं यापाऱ्याकडून बैल इकल्याला बरा पडतो. आणं आपण स्वतः इकाय गेलं की कमी भावात मागणत्यात बैल.''"

"यपारी बैल कसा काय इकितो?'' भावड्या.
बाजारगावातील माणसं आणि इतर बाजारातील यपारी बाजारात आसतात. त्याबरुबर दलाल पण असत्यात. पुर्वी बारा बलुतंदार लॉकं दलालीत लई असायची. आता अस्वलं पाळायची बंद झाल्यापासून ते पण दलाली करत्यात. आपल्या भागात जोशी, नंदीवाले, घिसाडी अशा समाजातील जास्त लॉकं दलालीचा धंदा करत्यात. बाजारातलं काय माहीत नसंल तर दलाल लई कामा यतो. तो जनावराला गिऱ्हाईक सापडून आणतो. त्यांन्ला आपला बैल निट दाखवितो. यव्हारात मध्यस्ती करतो. बैल घ्यायचा आसंल तर पाहिजे तसा आणि तेवढ्या किमतीचा बैल सापडून देतो. सौदा जूळून देण्याचं आणि पैसं देण्याघेण्याची हमी घेण्याचं काम दलाल करतो. त्याला 100-200 रुपये दलाली दिली म्हणजे झालं. सगळा यव्हार गुपचूप रुमालाखाली नायतर फेट्याखाली व्हतो.

पण दादा रुमालाखालचा यव्हार नक्की कसा व्हतो. भावड्या.
यपारी आणि दलाल एकमेकांच्या हातात हात घेतात. त्यावर रुमाल, फेटा, उपारणं नायतर नेहरुचा घोळ टाकून हात लपवत्यात. एकमेकांची बोटं दाबून किंमत सांगून सौदा होतो. बोटांची भाषा प्रत्येक बाजारात वेगळी असते. जेव्हा व्यवहार हजारात चालला आसंल, तेव्हा बैल बाजारात रुमालाखालची चार बोटं म्हणजे चार हजार रुपये, दहा हजारात वार्ता चालू असेल तेव्हा दोन बोटं म्हणजे 20 हजार रुपये व चार बोटं म्हणजे 40 हजार रुपये. शेळ्यांच्या बाजारात दोन बोटं म्हणजे दोन हजार आणि म्हशींच्या बाजारात चार बोटं म्हणजे 40 हजार रुपये आसं समजायचं. चार बोटं दाबून बोटांच्या मध्ये आडवे बोट दाबले म्हणजे 45 हजार रुपये. नक्की काय सौदा झाला ते आपल्याला काय कळत नाही. मग आपला दलाल सांगेल तसं झालं, असं समजायचं.

मग, दलाल आपल्याला फसवणार नाही का? इति. भावड्या.
""दलाल मधिच पैसं खाऊ शकतो, पण त्याला इलाज नाय. भरवशाचा, वळखीचा दलाल पाह्यचा हाच इलाज. सगळ्याचं बाजारात असाच व्यवहार व्हतो. ह्य फायद्याचं पण हाय म्हणा. यवहार गुपचुप झाल्यानं बाजारात बैलाचा भाव नक्की काय चाललाय हे कुणाला समजत नाय. समजा सौदा जुळला नाही तर दुसऱ्या गिऱ्हाईकांना नक्की कितीवर सौदा फसला हे समजत नाही. त्यामुळं पुढचं गिऱ्हाईक पहिल्या गिऱ्हाईकापेक्षा जास्त किंमत दिऊ शकतं. एखाद्यानं 10 हजाराला मागितल्याला बैल दुसरा मानुस पंधरा हजारालाही मागू शकतो. यामुळं उघड किंमत सांगून बैल विकता येत नाही. दलाल हुशार आसंल तर बैल दाखवीताना दात तुटलेला आसंल तर तुटक्‍या दातावर अंगठा दाबून दात दाखवतो. अंगाला, मानंला कुठं लागल्यालं आसंल, त्याला काही खोड असंल तर अंगावर गुलाल टाकत्यात. त्यामुळं लागल्यालं लक्षात येत नाही. मारका बैल आसंल तर त्याला आदल्या दिशी संध्याकाळी बेदम मार देत्यात मार खाल्लेला बैल बाजारात गरीब गाईसारखं उभा राहतो. व्यहारांत फसविल्याचं लक्षात येईपर्यंत यवहार पूर्ण झालेला असतो. ठरलेला यवहार मोडता येत नाही. पुन्हा त्याला बाजाराला घेवून जावं लागतं. त्यामुळं वळखीचा दलाल मधी असलेल्या फायद्याचा आसतं.

''पण, यव्हार करताना यपारी बोलत नाहीत का?
बोलत्यात ना. पण मराठीत नाय. बेल्ह्याच्या बाजारातंल यपारी याकाम्याकांशी पारशिक भाशेत बोलतात. "पारशी' भाशेतील शब्द जास्त वापरत्यात म्हणून पारशीक. आपल्याला पारशीतला ओ की ठो कळत नाही, म्हणून पारशीक. डल्ला म्हणजे तीन हजार, "नाकी' म्हणजे चार हजार, म्हणजे 10 हजार, एम म्हणजे 11 आन्‌ 15 हजार म्हणजे गिरी पंजा असं ठोकताळं हायंत.

तुम्हाला कसं काय माहीत हे सगळं... भावड्या.
आपल्या गावच्या जोश्‍यानं सांगितलं व्हतं. आज तोच आपला बैल इकूव देनार हाये.लई बैल आसतील बाजारात?सिजन नुसार गर्दी आणि भाव असतात बाबा. साखर कारखाने सुरु होतात तव्हा भाद्या बैलांचे भाव जोरात आसत्यात. पुशी पुनवंला कोकणातील म्हशाची यात्रा आसती. तव्हाच्या बाजारात तिकाडलं शेतकरी लहान बैल विकात घेत्यात त्यामुळं लहान बैलांना लई भाव असतो. आगुठीला, पेरणीच्या काळात सगळंच बाजार कडाक आसत्यात. एक चांगली बैल जोडी घ्यायची म्हणलं तर 50 हजार रुपये पुरत नाहीत. एका बैलाला कमीत कमी 20 हजार रुपये लागतात. टायर गाडीचं, शर्यतीचं, औताकाठीचं बैल यगळं यगळं आसत्यात. नवाट बैलांना कायमचं उठाव आसतू. म्हताऱ्यांना कसाबी घेतो.

पण दादा, म्हातारा बैल कसा वळकायचा...
भावड्याबैलाचं दात पाह्यलं की त्याचं वय लगेच कळंत. त्याच्या तोंडात खालच्या बाजूला आठ दात असतात. वरच्या बाजूला दात नसतात. खालचं आठ दात चार चारच्या गटात असतात. मध्यभागी फट असते. दुधाचा एकही दात पडला नसंल तर त्या बैलाला "आदत' म्हणायचं. दुधाचं दात बारीक आसत्यात. नंतर उगविलेले दात मोठे आसत्यात. खालच्या जबड्यातील मध्यभागचे दोन दात पहिल्यांदा पडल्यालं असलं तर त्या बैलाला "दुसा' म्हणतात. चार दात पडले की त्याला "चौसा' म्हणतात. चौसा बैल गाई लावायला सगळ्यात चांगला असतू. चौशा बैलाकडून लावली तर गाई शक्‍यतो उलटत नाही. सहा दात पडलेल्या बैलाला "सायदाती' बैल म्हणतात. बैलाला सायदाती म्हणजेच अंडील झाल्यावर चाप देतात. चाप दिलेला बैल गाईवर उडत नाही.

मग दादा, आपल्या घिसाड्याचा बैल चौसा नाय का? त्याच्याकडून दोनदा लावूनपण कौशी उलाटली.
भावड्यांनं दगडूला मधीच थांबवत आपला प्रश्‍न रेटला.
आरं, तो भडवा एकाच दिवशी 15-20 गाया लावतो. सगळ्याचं थोड्या गाभण राहतील. ज्याची गाई सकाळी लवकर जाती ती राहती गाभण. तुला लौकर उठाया नको, पाच सहा गाया लागल्यावर आपली गाई कशी गाभण राहील. म्हणं घिसाड्याचा बैल चौसा नाय का? जातो मी उद्या त्याचं दात बघायला.''

भावड्यानं गाई उलटल्याची आठवण करुन दिल्यावर त्याला फटकारुन दगडू पुन्हा बैलाच्या दातांबद्दल सांगायला लागला, ""बैल दोन वर्षाचा व्हायच्या आत त्याचं दात पहिल्यांदा पडतात. एकादा टाळूला निबार आसला तर जास्त टाईम लागतो. त्यानंतर दर सहा महिन्यांनी दोन दात पडतात, आणि नवीन उगवत्यात. 15 - 16 वर्षाचा होईपर्यंत बैल औताची काम चांगली करतो. गंगातात्याच्या बैलासारखी रगाट बैलं असतील तर 18-19 वर्षापर्यंतही चांगलं काम करतात. 20-22 वर्षाचा झाल्यावर बैल म्हातारपणानं मरतो.''

मग आपला थैमान्याचं वय किती आसलं ?
या मढ्याला काय झालंय. आसलं 12 -13 वर्षाचा. एवढ्यात याच्या आंगावरची माशीही उडत नाही. आरं औताला बैल कसा गुलाम पायजे.

पण दादा, गुलाम बैल वळकायचा कसा ?
गुलाम बैलाची कात पातळ आसती, शेपूट वरपासून खालपरयत बारीक असती. शेपंचा कांदा लांबट आणि भरिव असतो.शेपंचा कांदा म्हणजे ? हे बघ, शेपटाच्या सगळ्यात खालचा शेपटीचा काळा गोंडा हाये ना त्याच्या आतल्या भागाला जिथं शेपटी संपती आणि फक्त केसं आसत्यात त्या काळ्या भागाला शेपंचा कांदा म्हणत्यात. गुलाम बैल तरतरीत आसतो. आपला लठ्ठ्या बघ अंगावर कासरा टाकला तरी थिर चाललाय. गुलाम बैल असता तर अंगावर कासराच काय पण माशीला पण बसू देत नाही. खडा मारल्याबरोबर बैलाची कात कशी थरथरा हालली पायजे. बाजारात बैल चालून दाखवावा लागतो. त्याच्यात काही खोट हाये का ते पाहतात. गुलाम बैल चालायला लागला तर त्याचा मागचा पाय पुढच्या पवलाच्या पुढं पडतो. बैलाचा खुर भक्कम, आटोपशिर पाहीजे. पसराट खुराच्या बैलाला वेगात चालता येत नाही. खुर जेवढे बारीक असतात तेवढी बैलाला गती जास्त असते. नख्या जुळून पाहीजेत.

दादा, बेल्ह्याचा बाजार क्वॉनचा हाय ?
क्वॉनाचा म्हणजी. बाजार समितीचा. बाजार समिती सरकरची आन्‌ सरकार आपलं हायं, असं म्हणत्यात. कशाचं काय भोंगळ्याला नागडं करायचा धंदा सगळा. बाजारात बैल उभा करायच्या जाग्येचं भाडं 5 रुपय द्यावं लागत्यात... आपल्याला. बैल इकल्यावर बाजार समितीकडं पावती कराया लागती. विकत घेणाऱ्यांनं बाजार समितीला यव्हाराच्या एक ट्‌क्‍का कमीशन दयावं लागतं, असा नियम हाय म्हणत्यात. पण ते कमीशन वाचविण्यासाठी यापारी निम्याच किमतीचा व्यव्हार झाल्याचं दाखवतो. त्याचा तोटा आपल्याला व्हतो. पावती फाडणाऱ्याला 50 रुपडं दिलं की यापाऱ्याचं काम व्हतं. आपण जाणार वर्षातून एकदा, मंग आपलं कोण अैकणार. आपण फकस्त गप बसायचं. यापारी लइदा पावती फाडल्याइनाच बैल बाजारातून बाहेर काढत्यात. पुन्हा पावती फाडणारानं आडवलं तर त्याला 100 रुपडं द्याचयं. आशा यव्हारात यपारी लइदा पैसं बुडवत्यात, पुढच्या बाजारी पैसं देण्याचं वायद करत्यात. आन्‌ इसरुन जात्यात. आपण बसायच्या ख्याटा घालत. त्यामुळं आत्ताच निट ध्यान दिवून बाजाराच्या गमजा शिकून घ्ये. रोज रोज काय आपण बैल इकाया यनार नाय, आन्‌ मी काय 10-10 याळा सांगत बसणार नाय.

दादा, नंग्या म्हणत व्हता बाजारात पिक्‍चरमधी आसत्यात तसं पुलिस आसत्यात. मला दाखवशिल...
आता भावड्याच्या मागण्या सुरु झाल्याचं दगडूनं ताडलं. पोलिस दाखवल्यावर तो एक एक मागणी करुन डोकं खाईल, हे ध्यानात घेवून दगडू गप्प बसला. एव्हाना ते बाजारात दाखल झाले होते. दिवस हातभर वर आला होता. दगडूनं बाजारात मध्यावर उंचावट्याची जागा बघुन खुटी ठोकली. व्यापाऱ्यांचं मोहोळ बैलाभोवती फेर धरु लागलं होतं. प्रत्येक व्यापाऱ्याला बैल फिरवून दाखवण्याची कसरत भावड्याच्या अंगावर पडली होती. ये पोरा... सोड कासरा... हॅ... र्थ्ब्र... र्थ्ब्र.... हॅ... दोन तिन व्यापारी आपले भगवे फेटे उडवत बैलामागं धावत... एखादा हातच्या चाबकाचा जोरदार फटका बैलाच्या पायाखाली ओढी, नखीवर वादीचा जोरदार फटका बसल्यानं पाय झाडं बैल मुसंडी मारी आणि मग भावड्याची अधीकच तारांबळ होई. दिवसभर असंच चालू राहीलं.

संध्याकाळपर्यंत दोन डझन व्यापाऱ्यांना बैल दाखवून दाखवून भावड्या थकला. रडकूंडीला आला. दगडूचाही नाईलाज झाला होता. गेल्या वेळेपेक्षाही यावेळी बैल पाडून मागीतला जात होता. दगडू खोट खायला तयार नव्हता. चाल ढकल करता करता संध्याकाळी सहाला बाजार उठला. दगडूनं खुटीचा कासरा सोडला. बैलानं घराची वाट धरली. बापलेकांचे धुळमाखल्या नजरा थैमान्याच्या शेपंवर थिरावल्या आणि मुकी प्रश्‍नचिन्हं वाढत गेली. बाजारवाट पुन्हा सुरु झाली होती.

Wednesday, September 30, 2009

कॉर्पोरेट

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे औरंगाबाद बसने एव्हाना नगर ओलांडले होते. रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. दोन तासांचा प्रवास होऊनही अद्याप रफिकच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सताड उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या काळ्या नगरी प्रकाशाशी त्याचा मुक संवाद सुरु होता. गाडी तिच्या आणि त्याच्याही अंतिम स्थळी पोचण्यास अद्याप आणखी किमान तीन तासांचा अवधी होता. तोपर्यंत रफिकच्या डोक्‍यात विचारांचे पाळणे हलतच राहणार होते.

रफिक मोमिन. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील निमगाव गावातील शेतकरी शिक्षकाचा ऐन पंचविशितील एकूलता एक कृषी पदवीधर मुलगा. कुटुंब धर्माने मुस्लिम असले तरी घरात कुरणाएवढाच किंवा काकणभर त्याहून सरस गिता, ज्ञानेश्‍वरी आणि गाथेला स्थान आणि मान. वडील माध्यमिक शिक्षक. गिता अभ्यासात त्यांचा हात उत्तर पुणे जिल्ह्यात कुणी धरत नाही. गितेवरील व ज्ञानेश्‍वरीवरील त्यांची रसाळ विवेचनं ऐकत रफिक लहानाचा मोठा झाला. घरी पाच एकरावर द्राक्ष बागा, एक लहानचा डोंगर, त्याच्या अंगाखांद्यावरील दोनशे सिताफळाची आणि अगणित करवंदाची झाडं. दोन म्हशींमुळं घर कायम दुध दुभत्यांनं भरलेलं. वावरातील ढेकळांनी गुडघे आणि घोटे फोडून घेत चार बैली नांगर हाकता हाकता रफिक शेतीची धुळाक्षरं शिकला.

कृषी पदवी शिक्षणासाठी तो कोकण कृषी विद्यापीठात दाखल झाला. कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील केशवसुत, साने गुरुजी यांच्या पदस्पर्शाने पुलकीत झालेल्या दापोली, हर्णेच्या सागरी भुमीत चार वर्षांच्या कृषीमय वास्तव्याने त्याच्यातील संवेदनशिलता, भावनीक हळुवारपणा अधिकच कोमल झाला. पदवीनंतर या संवेदनशिलता चटके देवू लागली. राज्य सेवेतून कृषी विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर नोकरी मिळवायची आणि शेतकरीभिमुख प्रशासन राबवून शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य करायचं हे त्याचं स्वप्न त्यासाठी रात्रीचा दिवस करायची तयारी. मात्र राहुरी कृषी विद्यापीठात एक वर्षे पॅरासाईट म्हणून रात्री जागवूनही शासन राज्य सेवा परिक्षा जाहीर करत नसल्याने रफिकनं एमबीए करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील प्रतिथयश खासगी महाविद्यालयातून कृषी उद्योग व्यपस्थापनात मार्केटींग मध्ये स्पेशलायझेशन करत तो एमबीए झाला. शेवटच्या सहामाहीत किर्ती ऍग्रो इंडस्ट्रीज या राज्यातील प्रमुख खते, बियाणे व किटकनाशके उत्पादक कंपनीने मंदीच्या काळातही त्याला पाच लाख रुपये वार्षिक पगाराचा प्रस्ताव दिला. ऐन मंदीत दोन लाखांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळविलेला तो महाविद्यालयाचा एकमेव विद्यार्थी ठरला. औरंगाबाद विभागात त्याची नेमणूक झाली. निकाल हाती पडल्याबरोबर आता नोकरीत रुजू होण्यासाठी तो औरंगाबादला निघाला होता.

रफिक औरंगाबादेत दाखल झाला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. कंपनीच्या मुख्यालयात जावून पहाटे चार वाजता तो हॉटेलमध्ये कंपनीने बुक केलेल्या आपल्या रुममध्ये दाखल झाला. आपला हुद्दा काय, नक्की काम काय करायचे आहे. हाताखाली किती लोक असतील, बॉस किती आणि कसे आहेत, याबाबत त्याच्या डोक्‍यात विचारांचे थैमान चालले होते. कंपनीने अद्याप कसलीच कल्पना दिली नव्हती. रुजू झाल्यावरच जबाबदारी देण्यात येणार होती. रुजू झाल्याचे पत्र हाती पडल्यानंतर त्याने त्यावर नजर फिरवली आणि त्याच्या हाताला थरकाप सुटला. नकळत ओठांतून शब्द सुटले... अरे बापरे !

कंपनीच्या बियाणे विक्री विभागाचा औरंगाबाद विभागाचा विभागप्रमुख म्हणून त्याच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कंपनी प्रामुख्याने बिटी कापूस, सोयाबिन आणि पालेभाज्यांचे बियाणे उत्पादित करत होती. बियाण्याची सुमारे 80 टक्के विक्री औरंगाबाद विभागात होती. शेतकऱ्यांमध्ये कंपनीची चांगली प्रतिमा होती. मात्र दर वर्षी विक्रीचे अव्वाच्या सव्वा उद्दीष्ट, कामाचा अति ताण, सुमारे दहा जिल्ह्यांमध्या सततची भ्रमंती व विक्रीवाढीचा ताण, विक्रीत घट आल्यास वरिष्ठांच्या शिव्या प्रसंगी पगारात कपात यामुळे या ठिकाणी काम करण्यास कोणीही उत्सूक नव्हते. अगदी कंपनीत 20-20 वर्षे काढलेले वरिष्ठ व्यवस्थापकही औरंगाबादकडे फिरकण्यास तयार नव्हते. त्यामुळे कंपनीने नवीन कार्यक्षम व्यवस्थापकाची निवड केली होती. आत्तापर्यंत घरच्या वावरात नांगराच्या मुठी हाती धरणारा रफिक आता किर्ती सिडच्या मार्केटींग विभागाच्या मुठी आवळणार होता. वावर नांगरण्यासाठी चार बैल व त्यांना ढिले पडू न देण्यासाठी हाती आसूड एवढी सामग्री होती. कंपनीत त्याच्या नियंत्रणाखाली 10 जिल्हे व त्यातील सुमारे 100 माणसे, त्यांना ढिले पडू न देण्यासाठी एक चारचाकी गाडी त्याच्या हाती सोपविण्यात आली. कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत सातत्य राखतानाच किमान 10 टक्के वाढीचे उद्दीष्ट त्याला देण्यात आले होते. विशेषतः बिटी बियाण्याच्या विक्रीमध्ये वाढ करण्याचे काम त्याला करायचे होते. याबरोबरच वरिष्ठ आणि कनिष्ठांशी योग्य सुसवाद राखत त्याला स्वतःचे करीअर घडवायचे होते. हेच मुख्य आव्हाण होते. कारकिर्दीच्या सुरवातीला एकढ्या मोठ्या आव्हाणाला सामोरे जाण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही माठे असतात. असे उद्दीष्ट साध्य करताना यश मिळाले तर ते आयुष्य घडविते आणि अपयश आले तर ते आयुष्यातून उठविते. जॉयनिंग लेटरवर सही करताना त्याच्या हाताला कंप सुटला तो यामुळे. तरीही उद्दीष्ट पुर्तीसाठी दात ओठ खावून त्याने सही केली. कामाला सुरवात झाली.

पहिले दोन दिवस सर्व सहकाऱ्यांशी ओळख, यापुर्वी झालेले काम, कामाची पहाणी, बैठका यामध्येच गेली. अद्याप त्याचे बावरलेपण पुरते गेले नव्हते. अशातच रफिकच्या कामाचा तिसरा दिवस-रविवार उजाडला. कंपनीच्या मार्केटींग विभागाचे राज्य प्रमुख डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आपल्या सेवानिवृत्तीबद्दल संध्याकाळी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये कंपनीतील मार्केटींग विभागाच्या जिल्हा ते राज्य पातळीवरील सर्व सहकाऱ्यांसाठी विशेष पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीचे निमंत्रण मिळाले आणि रफिकच्या डोक्‍यात ज्वाच्या ताटांना अमरवेलाने गुंडाळून न सुटणारा गुंता करावा, त्याप्रमाणे विचारांचा गुंता झाला. पार्टीला कपडे कसे घालायचे, बुटाचे फाटलेले सोल कसे लपविता येईल, काटे आणि चमच्यांनी हातात डिश धरुन कसं खायचं असे एक ना अनेक अशा अनेक प्रश्‍नांची बांडगुळं डोक्‍याला लटकू लागली, पार्टी संपल्याशिवाय ही बंडगुळं निघणं शक्‍य नव्हतं.

रात्री नऊच्या सुमारास तो हॉटेलच्या गार्डनमध्ये पोहचला. एव्हाना बहुतेक सर्वजन दाखल झाले होते. रफिकला आपल्या हाताखालील 10 जिल्हा प्रतिनिधी आणि वरिष्ठ व्यवस्थापक वगळता सर्वच जण अनोळखी होते. तो पोहचल्याबरोबर त्याचे जिल्हा प्रतिनिधी त्याला अभिवादन करुन गेले. तसा तो पार्टीत उपस्थित सर्व व्यवस्थापकांमध्ये वयाने सर्वात लहान होता. वरिष्ठांना नमस्कार करुन तो विभागिय व्यवस्थापकांच्या कळपात सहभागी झाला. पार्टीला सुरवात झाली होती. पार्टीत तीन गट पडले होते. सर्व जिल्हा प्रतिनिधी एका लाबलचक टेबलाभोवती गोळा होऊन मद्याचे पेले भरविण्यात मश्‍गुल होते. विभागिय व्यवस्थापकांचा गप्पांचा आणि फिरक्‍यांचा मौसम ऐन भरात आला होता. गेल्या हंगामात टारगेट पूर्ण करण्यात कोणाची कशी फाटली, जालन्यात वापराची अंतिम मुदत संपलेली बिटीची पाकीटे कशी खपविली, खतांसोबत किटकनाशकांचे लिंकिंग चांगल्या पद्धतीने केल्यास विक्री किती वाढू शकते, आदी विषयांना उधाण आले. राज्यपाळीवरील निवडक व्यवस्थापक मंडळी हिरवळीवर मांडलेल्या बांबुच्या आकर्षक खुर्च्यांमध्ये बसून मद्याचे घोट रिचवत रिचवत गंभिर चर्चांमध्ये मग्न होती. स्टार्टरच्या वाट्या काचेच्या ताटल्यांमध्ये नाचू लागल्या होत्या. बसल्या बसल्या एका हातातील चमच्याने चिनी मातीच्या वाट्यांमधील चिकन सुप ढवळत आणि दुसऱ्या हाताने बिअरचा सिप घेत काहींच्या गप्पा सुरु होत्या.

या सर्व बाजारात रफिक कावरे बाबरेपणाने उभा होता. चिकन सुप त्याला आवडत नव्हते अशातला भाग नव्हता, पण आज कंपनीतील तिसरा दिवस आणि लगेचच वरिष्ठांच्या बरोबरीने पार्टी त्याच्या अंगवळणी पडत नव्हती. आत्तापर्यंत फारसं उच्चभ्रू शहरी वारं न लागल्यानं त्याला सारं काही कृत्रीम कृत्रीम वाटत होतं. काही तरी खुपत होतं. एक वेगळीच अस्वस्थता, अधुरेपणा त्याला सतावत होता. नदीच्या डोहात भर उन्हात उंडारणाऱ्या म्हशींच्या कळपात एखादं भित्रट कोकरु अडकावं, तशी त्याची अवस्था झाली. या उंची पार्टीत तो बाहेरचा नव्हता, पण अद्याप आतलाही झाला नव्हता. पाण्यात उतरुनही तो पूर्ण कोरडा होता. पार्टी बॉय डॉ. पटवर्धन साहेब सर्वाना मद्यपान करण्याचा आग्रह करत फिरत होते. अचानक त्यांचे लक्ष रफिककडे गेलं. पार्टीत सहभागी झालेल्या सुमारे 80 जणांमध्ये फक्त या एकमेव पोराने अद्याप मद्यपान सुरु केलेले नाही, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने लगेच हेरलं. त्यांनी हाक मारली, ""ओ जंटलमन !!! कम हिअर.''

""क्‍या हुआ. कुछ कमी रह गई क्‍या.'' डॉ. पटवर्धन आपल्या खर्डेदार आवाजात रफिकला म्हणाले.

""नही सर, सब कुछ बहुत अच्छा है.''

""तो फिर तुम पी क्‍यो नही रहे. ये बात ठिक नही यार, चलो आ जाओ हम दोनो चिअर्स करते है.''

""स्‌ स्‌ सर मी य्‌ंत कधीच घेतलेली नाही. स्वारी सर, पण मी घेऊ शकत नाही. तुम्ही घ्या सर. मी थम्स अप घेतो.''

""अबे तु नक्की ऍग्रीकॉस आहेस ना? म्हणे घेवू शकत नाही. कलंक आहेस तू सर्व ऍग्रीकॉसला. तुला काय वाटतं, कंपनीत काय फक्त तु एकटाच सज्जन आहेस? आम्ही सर्वजन बेवडे आहोत? ऍगीकॉसनं कसं सिंहसारखं आपल्या मस्तित रहावं. कामाच्या वेळेला काम आणि एन्जायमेंटच्या वेळेला एन्जॉयेट. इथं बघ सगळे मस्तपणे इन्जॉय करत आहेत. मी तुझ्या बापापेक्षाही जास्त वयाचा आहे. त्यामुळे माझं ऐक बेटा, हीच वेळ आहे. एन्जाय कर. उद्यापासून तुझं काम आहेच. मग तुझे बॉस शिव्या घालून तुझ्याकडून सेल्स करुन घेतील. नाऊ जस्ट एन्जॉय यार. चल आजची रात्र माझ्या नावाने सेलिब्रेट कर. लेट्‌स चिअर्स.''

""नही सर मी नाही पिऊ शकत. सर प्लिज, तसं नाही पण मी कधीच पिलेलो नाही.'' रफिक.

""अबे तू ? साल्या मी तुला एवढे हात जोडले. तू आमच्यापेक्षाही शहाणा झाला का रे ?'' समजून सांगूनही रफिक घेत नाही हे पाहून डॉ. पटवर्धनांनी आता आपल्या अधिकाराचा हुकमी एक्‍का बाहेर काढला. ""आयुष्य गेलं आमचं मार्केटींगमध्ये. कुणी कधी नाही म्हणालं नाही मला आणि तू मला अव्हेरतोस. आज कंपनीतील माझा शेवटचा दिवस, असा अपमान करतोस काय माझा. काय तुझी पोस्ट काय आपल्या कंपनीत.?''

""सर मी टेरोटरी मॅनेजर आहे''

""कधी पासून ?''

""सर दोनच दिवस झालेत.''

""ह्‌ं दोनच दिवस झालेत आणि तरी एवढा तोरा !!! गाव कोणतं तुझं''

""सर जुन्नर, नारायणगाव.''

""अरे तुम्ही पुण्या-नाशिकवाले तर साऱ्या जगाला वाईन, बिअर पाजता आणि पिण्याची टेस्ट नाही अजून. शाम्पेनवाले शामराव चौगुले तुमचेच ना आणि किंगफिशरवाल्या विजय मल्यांची वायनरीपण तुमच्याकडेच ना? उद्या जर विजय मल्यानं तुला त्याच्या बाजरीपासून तयार केलेल्या बिअरचा राज्याचा विक्री प्रमुख केला तर न पिताच विकशील काय? बेटा मार्केटींग आणि मॅनेजमेंट लेक्‍चरला बाकडे रंगवून आणि वन नाईट शो करुन येत नाही. ते अंगात मुरावं लागतं, जगावं लागतं. समोरची व्यक्ती तिचा कल पाहून वागावं लागतं. एखाद्या दगडाकडूनही अपेक्षित काम करुन घ्यावं लागतं. तू आत्ता वागतोयसं त्यावरुन मार्केटींगमध्ये तुला भविष्य आहे, असं वाटंत नाही, पाहू किती दिवस टिकतोयस आणि कसं काम करतोस ते.''

एव्हाना सगळी पार्टी रफिक आणि पटवर्धनांभोवती जमा झाली. अनेकांच्या फेसाळलेल्या प्याल्यांतील बुडबुडे ओठांच्या स्पर्शाशिवायचं शांत झाले होते. याने रंगाचा बेरंग केला, या भावनेने सर्वजण रफिककडं पाहत होते. त्यालाही अपराध्यासारखं वाटू लागलं. सर्व बाजूंनी दबाव वाढत असूनही अतापावतो आपल्या नकारावर तो ठाम होता. पार्टीचे निमंत्रण मिळाल्यापासून त्याला याच बाबीचा धसका होता. आता मात्र धसक्‍याचा पोटशुळ झाला होता. पायातील तुटक्‍या बुटाच्या शेंड्याला अंगठ्याने टोकारत तो डॉ. पटवर्धनांसमोर खाली मान घालून उभा होता. ते मात्र या नवख्या पोरासमोर हार मानायला तयार नव्हते.

डॉ. पटवर्धनांनी आता त्यांनी शेवटचा वार केला... ""ये आता बस्स झालं. चल निघ इथून. ये चला निघा सगळे. पार्टी बंद. हा घेत नाही मग काय अर्थ आहे.'' आता मात्र रफिकच्या पायाखालचं गवत सरकलं. त्याच्या शेजारीच उभ्या असलेल्या त्याचे वरीष्ठ अधिकारी पी राजेंनी त्याला लगेच चिमटा काढला. हतबल झाल्यानं रफिकनं सरळ पटवर्धनांचा हातच धरला. ""स्वॉरी सर, आय एम रिअली स्वारी, तुम्हाला दुखविण्याचा उद्देश नव्हाता. मी लगेच घेतो सर.'' ""यस !!! ये हुयी ना बात.'' डॉ. पटवर्धनांनी प्रदिर्घ झटापटीनंतर विजयी झालेल्या मल्लाच्या आवेशानं रफिककडं पाहीलं. तो घामेजला होता.

""तु नशीबवान आहेस. आयुष्यात पहिल्यांदा पितोयस आणि ते ही एवढ्या मोठ्या लोकांच्या पंगतीला बसून. सुरवातीला थोडं कडवट लागेल मग हळू हळू मजा येईल. घे. काय घेणार? बिअर, रम, जिन? अरे, पहा हा कोणती घेतोय ते.'' सर्वाना सुचनावजा आदेश सोडून साहेब आपला पेला उंचावत बारच्या दिशेने वळले आणि रफिकने धसक्‍याचा सुस्कारा सोडला. मात्र पिण्याला हो म्हणून आगीतून फुपाट्यात पडल्याची जाणिव त्याच्या अंगावर काटा आणून गेली.

गेल्या सात वर्षात चालून आलेले मोहाचे शेकडो क्षण त्याच्या डोळ्यांसमोरुन क्षणार्धात चमकून गेले. पदवीच्या चार वर्षात समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात आणि काजू फेणीच्या सानिध्यात राहूनही रफिकनं कधी फेणीला हात लावला नाही. प्रयोगशाळेत अनेकदा वाईन तयार करुनही तिच्या थेंबाला कधी जिभ लावली नाही. हर्णेच्या धक्‍क्‍यांवर आणि गणपती पुळ्याच्या पुळणीवर वाळूत पसरल्या पसरल्या "अरे कुत्र्यांनो दारु पिऊ नका, मरसाल' असे मित्रांना शेकडो वेळी जिव तोडून सांगितलं होतं. मित्र घ्यायचे आणि हा त्यांचा चकणा संपवायचा. एखाद्याचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले, तर हा त्यांना खांदा देत सावरत होस्टेलवर घेवून यायचा. त्यामुळं त्यांनाही तो हवा असायचा. आज मात्र त्याला इथं खांदा देणारं इथं कोणी नव्हतं.

राजेंनी प्याल्यात किंगफिशर ओतली आणि प्याला त्याच्या हाती दिला. एव्हाना रफिकची मानसिक तयारी झाली होती. चिअर्स यंग मॅन म्हणत राजेंनी आपला प्याला उंचावत त्याच्या पेल्याला भिडवला. पार्टी आपल्या मस्तीत दंग झाली होती. रफिकनं मान फिरवून दात ओठांवर घट्ट दाबत डोळे मिटून प्याला ओठाला लावला. आभाळ दाटलं. डोकं, कान, नाक भरुन आलं. ओठांवरील प्याल्यात डोळ्यांतून मुक्तपणे ओघाळणारी आसवं लपवित त्यानं बिअरचा घोट घशाखाली उतरविण्यास सुरवात केली. बंद डोळ्यांतील बुबुळापुढं शाळेत गाडगेमहाराजांचा व्यसनमुक्तीचा धडा शिकविणारे वडील आणि चुलीवर भाकरी थापता थापता ""बाळा सगळं कर पण आयुष्यभर बाटलीला हात लावू नको!'' असं वारंवार सांगणारी आई चमकून गेली. डोळ्यांतील आणि घशातील वाढता कडवटपणा काळजापर्यंत सलत गेला...

Wednesday, September 2, 2009

रात्र

दिवस गेला
रात्र गेली
रान दिव्याची
वात गेली

दिव्याची वात
सुखाची राख
दुःखाच्या गंगेत
वाहतंच राहिली

साथीची साथ
आखडता हात
काकणांची कणकण
बंद झाली

घंटेचा नाद
टाळ्यांची साद
देवळाच्याही गाभाऱ्यात
रात्र झाली...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, जानेवारी 2005)

कशासाठी ?

झटली काया
विटले मन
कशासाठी ?
कोणासाठी ?

श्रावणातल्या सरीसाठी
छटाकभर पोटासाठी
आसुरलेल्या ओठांसाठी
अन करकरणाऱ्या मोटेसाठी...

आटवली माया
काळजाची छाया
कशासाठी ?
कोणासाठी ?

थरथरणाऱ्या लाटेसाठी
लटपटणाऱ्या वाटेसाठी
धगधगणाऱ्या राखेसाठी
अन हिरमुसलेल्या हाकेसाठी...

ताक भात
निरोपाचा हात
कशासाठी ?
कोणासाठी ?

ओघळणाऱ्या डोळ्यांसाठी
दाबलेल्या हुंदक्‍यासाठी
सळसळणाऱ्या पदरासाठी
अन वखवखलेल्या जिवनासाठी...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 2005)

असं का...

देवळाच्या गाभाऱ्यात
देव सुखरूप
भट सुखरूप
घंटा मात्र भक्ताच्या डोक्‍यावर .... असं का ?

सुग्रिवाची आस
वालीला फास
रामाच्या राज्यात
सितेला वनवास ... असं का ?

प्रेमाच्या अंगणी
कुत्र्यांची काशी
चोरांच्या दुनियेत
संन्याशाला फाशी ... असं का ?

पुनवेच्या राती
चांदण्यांच्या वाती
तुमच्या आमच्या हाती
फक्त आशेची वाटी... असं का ?


संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 20 फेब्रुवारी 2005)

तुला पाहता पाहता

तुला पाहता पाहता
मी मलाच विसरुन गेलो
रस्त्यावर आयुष्याच्या
उताराने घसरत गेलो...

जिवनाच्या खड्ड्या खड्ड्यात
पावलो पावली अडकत गेलो
तुझ्या खोट्या आशेपाई
थिनगिनेही भडकत गेलो...

प्रकाशाच्या आशेनं
मी रात्र रात्र जागत गेलो
रात्र कधी संपलीच नाही
मी अंधारातच झोपी गेलो...

संतोष (20/1/2005, हॉटेल ओंकार, सरळगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे)

शेवटी मी एकटा

कुणास ठावूक कसा
पण एक दिवस असा उगवतो,
सर्व जग कसं
उदास, भकास वाटू लागतं...
आपण जगात एकटेच
एकाकी निराधार फिरत आहोत,
वाट चुकलेल्या जहाजासारखं...
एका उंचच उंच कड्यावरुन
कुणीतरी ढकलून देतय,
समोर दिसतोय काळाकुट्ट अंधार
त्या अंधारात भविष्य फिरतंय
फिरताना मला दिसतंय
पण मी काहीच करु शकत नाही
शेवटी मी एकटा
निराधार... एकाकी...
या जगाच्या अंधारात
खोल खोल चाललोय
या ओळखीच्या गर्दीतही
हरवत.. फसत चाललोय
कदाचित...
पुन्हा कधीच न सावरण्यासाठी
एकटा... एकाकी...

संतोष (4 ऑगस्ट 2005, येगाव, ता. चिपळून, जि. रत्नागिरी)

Tuesday, September 1, 2009

तू माझ्याकडं

- तू माझ्याकडं
मी तुझ्याकडं
असं किती दिवस
नुसत पाहतच रहायचं
डोळ्यातले भाव
ओठात दाबून
नुसत झुरतं रहायचं...

खुलू जे ओठ तुझे
अश्रू माझे टिपण्यासाठी
पाणावू दे डोळे तुझे
भाव माझे जाणण्यासाठी...

मी तुझ्या वाटेकडं
तू माझ्या हाकेकडं
आणखी किती वर्षे
नुसतं पाहतच रहायचं
ओठात हासू आणि
डोळ्यात आसू ठेवून
नुसतं झुरतच रहायचं...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 2004)

अबोल प्रीती

तुझी माझी अबोल प्रीती
कधी कुणाला कळलीच नाही
ना तुझी मला,
ना माझी तुला...

माझ्या प्रेमाचं मुकं पाखरू
तुझ्या अंगणी फिरकलंच नाही
ह्दये पेटून सुद्धा
ओठ कधी फुललेच नाहीत...

धरती आभाळाच्या मधे
ढग कधी फिरकलेच नाहीत
उन्हामागून पावसाळे गेले
पण श्रावण कधी बरसलाच नाही

माझे धेय्य तुझ्यापाशी
तुझे धेय्य माझ्यापाशी
पण साद कधी मिळालीच नाही
रस्ते कधी जुळलेच नाहीत...

तुझी माझी अबोल प्रीती
कधी कुणाला कळलीच नाही
ना तुझी मला,
ना माझी तुला...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 2003)

मोरपिसाच्या फटींतून

माझ्या मनात तुझं येणं जाणं
असंच सुरु असतं.
कधी वाऱ्यावर वरात
तर कधी वरातीत वारे
वेळी अवेळी घुमतच असतं...

तुझ्या आठवणींचे वादळ
मला असंच उधळंत असतं.
उधळून जाण्याची नशा
उधळून टाकण्याची अदा
अन उध्वस्त होण्याची हौस
सारं काही स्मरत असतं...

आठवणींचे मोरपीस
विस्मृतीची गोधडी
आलटून पालटून फिरतच असते.
मोरपिसाच्या फटींतून
गोधडीच्या ठिगळांतून
तुझंच रूप पाझरत असतं...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 2003)

चकवा...

खरच का मी एकटा आहे...
या जगाच्या उकीरड्यावर
पडलेला अस्ताव्यस्त,
स्वप्नं पाहत उद्याची

खरचं का कुणी नाही...
मला हात देणारं
दुखःतही माया चाखविणारं

...कुणी नाही मग कोण करतं
पाठीमागून वार माझ्या,
कुणी नाही मग होतो कसा
अर्ध्या वाटेत घात माझा

कुणी नाही मग असेल का हा...
माझ्या मनाचा शब्दच्छल सारा
की, असेल माझ्या भाग्याचा
हा जिवघेणा चकवा...

संतोष (कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, 2002)

Monday, August 31, 2009

सपार

श्‍याकारायचं व्हतं सपार औंदा
पन्हाळ्या व्हत्या सावरायच्या,
कौशी झालती ययाला आन
हौशी व्हती दुधाला...

श्‍याजाऱ्याचा ऊस तुटला
पाचाट क्‍यालं ग्वाळा,
हौशा मधिच लचाकला आन
काडी लागली वमानाला...

कसा कायनु, पण आखाड लांबला
पाण्या इना पेरा ग्याला,
वळ्हया झाल्या खपाट्या आन
कुसाळं म्हसोबाच्या टाळूला...

महिनाभर दावण तगली
मंग बाजार केला बेल्ह्याचा,
ग्वाठा झाला "खाटा' आन
कासरं, घंट्या सांदिला...

हत्ती पडला सरणावं
सपरात चिखल श्‍यानाचा,
आडावळा कुजक्‍या शेवरीचा आन
वास श्‍याना मुताचा

- संतोष डुकरे (ILS, pune. 31-8-09)

(ही कविता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील ग्रामीण व वयस्कर शेतकऱ्यांच्या बोलीभाषेत आहे. तथाकथित नागरी आणि शुद्द मराठी भाषेत त्याचा समर्पक भावार्थ पुढीलप्रमाणे ः सपार - छप्पर, श्‍याकारायचं - शेकारायचे, व्हते - होते, औदा - चालू वर्षी, पन्हाळ्या - छपरावरुन पाणी गळते... ती छपराची सर्वात खालची कड, व्हत्या - होत्या, कौशी व हौशी - म्हशी, आन - प्रत्यय, एक गावरान हेल, श्‍याजाऱ्याचा - शेजाऱ्याचा, पाचाट - उसाची वाळलेली पाने, क्‍यालं - केलं, ग्वाळा - गोळा, हौशा - बैलाचे नाव, लचाकला - लचकला, काडी - आग, वमानाला - छप्पर शेकारण्यासाठीची लाकडे, तुऱ्हाट्या इ., कायनु - काय माहित, आखाड - आषाढ, इना - विना, पेरा - पेरणी, ग्याला - गेला, वळ्हया - विशिष्ट पद्धतीने रचून ठेवलेल्या वाळलेल्या चाऱ्याचा ढीग, कुसाळं - माळरानावरचं चाऱ्यासाठी निरुपयोगी असलेलं गवत, म्हसोबा - देव, दावण - ओळीने गुरे बांधण्याची जागा, मंग - मग, बेल्ह्याचा - जुन्नर तालुक्‍यातील (जि. पुणे) गुरांचा सर्वात मोठा बाजार, ग्वाठा - गोठा, खाटा - अनुत्पादक, वांझ, कासरं - जनावरे बांधण्याचे किंवा बैलांना बांधण्याचे दोरखंड, घंट्या - घंटी, घुंगरमाळा इ., सांदिला - घरातील अंधारा व अडगळीचा कोपरा, हत्ती पडला - हत्ती नक्षत्राचा पाऊस पडला, श्‍यानाचा - शेणाचा, आडावळा - दोन पाखी (दोन बाजूला उतरत्या) घराचा किंवा गोठ्याचा छपराखालील मुख्य वासा, शेवरीचा - शेवरीच्या झाडाचा, या झाडाचे लाकूड फारसे टिकावू व ताण सहन करणारे नसते, लवकर कुजते व मोडते.)