Friday, March 11, 2011

तुझ्या आठवांची सय

तुझ्या आठवांची सय,
सय फिर फिर फिरं
जगी तळपत्या सुर्या,
रितं रितं आसमानं...

तुजा मंद धुंद गंध,
गंध दर दर वळं
डोळा आसं भिज मन,
मन तिळ तिळ झुरं...

राना रानामधी शिळ,
शिळ घन घन घुमं
घुमसान पांदी फांदी,
फांदी थर थर थरं...

आठवांचं रितं जातं,
जातं घर घर फिरं
कण कण भरडून
पिठ मण मण भर...

(संतोष, 8 मार्च 2011, धायरी, रात्री 1.45)

Thursday, March 10, 2011

तु अकाली बाई झाल्यावर...

काल,
तुझ्या अल्लडतेसह
उधळले पावसाचे चार चिंब थेंब,
सिटीप्राईडचे नाईट शो
पावसात भुरुभुरतं नाईट रायडिंग
आणि टपरीवरच्या चहासाठी
साऱ्या कोथरुडची पायपिट...

चतुश्रृंगीच्या पायऱ्यांवरील
खिचडीचे अर्धेर्धे घास...
क्षण तास प्रहर दिवसांशी
कवितेनं फुललेले श्‍वास

माझ्या कवितांवरुन फिरणारं
तुझ्या पापण्यांचं मोरपिस...
ओठांची थरथरती फुंकर
आणि पाठीवरची घट्ट बोटं...

आज,
तु अकाली बाई झाल्यावर...
मुकं आभाळ, मुकी कविता
मुक्‍या कवितेवर, मुक्‍या पापण्या
मुक्‍या साऱ्या भाव भावना
नुसतं मुकं मुकं जगणं...

दोन पावलांची अखंड पायपीट
रात्र रात्र अवकाळी पाऊस, पानझड
अन्‌ आठवणींचा चिखल नुसता
आपल्या मैत्रीच्या समाधीवर...