Wednesday, July 27, 2011

गंध ओला...

गंध ओला, स्पर्श ओला
चिंब मने, भिजताती...
धुंद राती, चुंब राती
स्वप्नं सारी, हसताती...

श्‍वास दंग, देह दंग
रंग नवे, भरताती...
ओटी पाटी, उरी पान्हा
कोंब नवे, फुटताती...

(संतोष, 27 जुलै 2011, सकाळी 10, पुणे-सातारा हायवेवर)

Tuesday, July 12, 2011

आषाढ घनात...

नदीच्या मळ्यात
उसाच्या रानात
एक पाखरु भिरभिरते...

आषाढ घनात
पाझर डोळ्यांत
सजनाच्या सयीने तळमळते...

(संतोष, 12 जुलै 2011, धायरी, पुणे)

थेंबाचं दान...

फेकून सारी लक्तरं
ढगांनी असं मुक्त व्हावं
आशा दाटल्या पापण्यांना
थेंबा थेंबाचं दान द्यावं...

मॉन्सूनच्या ढगांना
अशी अवेळी कळ यावी
ढेकळा ढेकळात यावे प्राण
कोंबांनी नभी झेप घ्यावी...

हवा-पाण्याच्या नाकावर
असं उभारी पिक यावं
तोडून सारे संकेत
जगण्याचं नवं गित गावं...

(संतोष, 11 जुलै 2011, धायरी, पुणे)

मॉन्सूनच्या वाटेवर...

मॉन्सूनच्या वाटेवर
रात दिस चातकाचा
द्रोणीय स्थिती; वाऱ्यांचे झोत
किनारी कमी दाबाचे पट्टे

डोक्‍यात चक्राकार वारे
मनात पश्‍चिमी चक्रावात
जगण् झाल मॉन्सून
अनिश्‍चित अकल्पित...

वाऱ्याच्या वेगावर
आता रोजचीच घासाघीस
चमड्याची, धुराची, थेंबांची
पेरणीआधी मोडलेल्या कोंबांची

ऐन खरीपात चालतो
क्रुर नक्षत्रांचा खेळ
बीज अंकुरण्याआधी
काहुरवेळ, काळवेळ...

थेंबा थेंबाचा संघर्ष
कोंब, मांस, मनं झडलेली
रापलेल्या तना-मनात
आशा दुबार पेरलेली..


मॉन्सूनच्या वाटेवर
आषाढीचे उपवास... बारोमास !!!

(संतोष, 11 जुलै 2011, धायरी, पुणे)

Friday, March 11, 2011

तुझ्या आठवांची सय

तुझ्या आठवांची सय,
सय फिर फिर फिरं
जगी तळपत्या सुर्या,
रितं रितं आसमानं...

तुजा मंद धुंद गंध,
गंध दर दर वळं
डोळा आसं भिज मन,
मन तिळ तिळ झुरं...

राना रानामधी शिळ,
शिळ घन घन घुमं
घुमसान पांदी फांदी,
फांदी थर थर थरं...

आठवांचं रितं जातं,
जातं घर घर फिरं
कण कण भरडून
पिठ मण मण भर...

(संतोष, 8 मार्च 2011, धायरी, रात्री 1.45)

Thursday, March 10, 2011

तु अकाली बाई झाल्यावर...

काल,
तुझ्या अल्लडतेसह
उधळले पावसाचे चार चिंब थेंब,
सिटीप्राईडचे नाईट शो
पावसात भुरुभुरतं नाईट रायडिंग
आणि टपरीवरच्या चहासाठी
साऱ्या कोथरुडची पायपिट...

चतुश्रृंगीच्या पायऱ्यांवरील
खिचडीचे अर्धेर्धे घास...
क्षण तास प्रहर दिवसांशी
कवितेनं फुललेले श्‍वास

माझ्या कवितांवरुन फिरणारं
तुझ्या पापण्यांचं मोरपिस...
ओठांची थरथरती फुंकर
आणि पाठीवरची घट्ट बोटं...

आज,
तु अकाली बाई झाल्यावर...
मुकं आभाळ, मुकी कविता
मुक्‍या कवितेवर, मुक्‍या पापण्या
मुक्‍या साऱ्या भाव भावना
नुसतं मुकं मुकं जगणं...

दोन पावलांची अखंड पायपीट
रात्र रात्र अवकाळी पाऊस, पानझड
अन्‌ आठवणींचा चिखल नुसता
आपल्या मैत्रीच्या समाधीवर...