Tuesday, December 30, 2014

तोरणा ते राजगड नाईट ट्रेक

खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक....
पण तेवढ्यात मनानं उभारी दिली
दोन पावलं टाक
मग देवानं फिल्डिंग लावली
योगायोग जुळले...

पाबे घाटात
विजांचा कडकडाट
थेंबांचा धोपट्या मार
अंधार भेदून काळिज धडकवणारा
ढगांचा जिवघेणा गडकडाट
निर्जन रस्त्यावर बुलेटची धडधड...
खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक...

तोरण्याच्या पायथ्याला
वेल्ह्यात शुकशुकाट
नुकताच धो धो बरसल्याच्या
अस्ताव्यस्त खूणा
तशातच रेटली पावलं
पहलेच वळण रॉंग टर्न
पुन्हा योगायोग
दोन जण बँटरी घेवून पलिकडच्या डोंगरावर..
पावलं फिरली वाट घावली...
दोन तासांची अखंड पायपीट चढणीवर
जिव पोटर्यांत ठेवून पावलं चिकटली कपारींना
बोटं घोरपडीच्या नख्या
तोरणा सर...
दाटलं आभाळ, नभातून धुक्याचा वर्षाव...
जेवलो. वाटलं मुक्काम करावा
पुन्हा दोन शब्द, पुन्हा दोन पावलं
नवी उभारी, नवा जोम
एका टोकाहून दुसरे टोक...
जिवघेणा दीड तास...
मानव आणि मानवतेचा दुष्काळ
निसर्गाच्या हजार छटा
प्रेमाची, लोभ, राग, दणका, हसू, आसू, सारं काही..
ओले गवत, ओल्या वाटा
ओली झाडे, शेवाळलेला खडक
बेकडांच्या भेदरल्या उड्या
सापाची पोटपाण्याची धडपड
त्यात तडफडणारी, घसरणारी, पुन्हा रोवली जाणारी आमची चार पावलं...
खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक...

गडाच्या पश्चिम टोकावरुन
हातभर खडकाला पाठ पोट घासुन
जिव अंगठ्यात रोवून
निधड्या छातीने दिली फाईट
आणि दरडावले कड्या कपारींनाही
पुढे याल जर कोणी
चिरडून टाकू कळीकाळ
हा शिवबाचा इरादा आहे...
गोठलं सारं आसमंत
ढगांच्या वेढ्यातून सोडवला चंद्र
गुलाम चांदण्यांना मुक्त श्वास
काट्यांची झाली फुले
कारव्यांच्या झाल्या कमानी
अन् स्वागताला गवतांचे तुरे...
खरं तर हजारदा वाटलं...

बरोब्बर बाराच्या ठोक्याला
तोरण्याला पाठ लावून
धरली वाट राजगडाची
राजांच्या गडाची, गडांच्या राजाची
राजा माझा काळजाच्या आत
जपून ठेवलेला केवडा
त्याच्या आठवांवर
आमच्या रक्तांचा सडा
ओढ लागली जिवा
राजांच्या भेटीची, गडाच्या भेटीची
पावलात आलं बळ, रक्तात सळसळ...
दोन तास सुसाट पळत
ओलांडलं मोठं जंगल
गवता झाडांत हरवलेल्या रानवाटा
झाल्या क्षणात जिवंत
पानाफुलात अडकलेले हुंदके
तना मनावर उपडे झाले
भिजली सारी कापडं
नखशिखांत ओल ओलं खोलवर
मनात उसळती वादळं
उरात भेटीची ओढ अनावर
निम्म्या टप्प्यावर, डांबरी रस्त्यावर...
खरं तर हजारदा वाटलं...

टेकली पाठ खिंडीला
डोळा काळ झोप
स्वप्नीही राजगडाची ओढं
प्रचंड तडफड, खाडकन जाग...
इथं तर लाखदा वाटलं...
पण पुन्हा दोन शब्द...
मनात पेटता पलिता
भरला विडा मँगो बाईटचा
गडी सुसाट पुन्हा
डोंगरांची डोकी रगडण्यापेक्षा
पोटापोटाला गुदगुल्या करू म्हणून मारला वळसा...
जिवघेणा... अंत पाहणारा, दाखवणारा..
मिटलेल्या वाटा, हरवलेल्या वाटा
काट्या कुट्यांनी बळकवलेल्या वाटा
धबधब्यांनी गिळलेल्या वाटा
चंद्रप्रकाशात आत्ममग्न वाटा
नखरेल नारीसम खुणावणार्या वाटा
मोहाच्या वाटा, करुणेच्या वाटा
सुखाच्या वाटा, दुखःच्या वाटा
स्वतःच्या धुंदीत जगावर थुंकणार्या वाटा
झोंबलो, झटलो, चढलो, हेंदकळलो,
घसरलो, उठलो, बिलगलो, रांगलो,
वणव्याने ओथंबून झिंगत राहीलो, झुलत राहीलो
वाटा धुंडाळत, वाटा तुडवत, वाटा शोधत, वाटा बनवत...
खरं तर हजारदा वाटलं...

दीड दोन तासाची अखंड अनोखी बेडर पण एकाकी झुंज...
दोन जिवाची... एका धेय्याशी
गर्द एकांतात चांदण्यात चमकणारी संजिवनी
साद घालत होती पावलोपावली
दगड गोट्यांतून, धबधब्यांतून
शेवाळातून, गवताच्या भाल्यांतून
निष्प्राण होवून पडल्या खोडा खोडातून
एकच साद एकच गाज
राजगड राजगड माझा राजगड
ओटीपोटाला कळ आल्यावर
जसे येतात प्राण कंठात
तशी अत्यंतीक तळमळ
शेवटच्या चार क्षणात
शेवटच्या दांड्याची वाट
जिवा सुखावून गेली
भेटली स्पष्ट दिशा
मनं हरखून गेली... दृष्टीक्षेपात
प्राणसखा जिवाचा जिवलग सह्यकडा राजगड !
खरं तर हजारदा वाटलं...

समोर आहे ती संजिवनी,
की बालेकिल्ला की सुवेळा...
तनामनाची दिशाभूल
पायांना मात्र दहा हत्तींचं बळ...
एक प्रदक्षिना, दोन प्रदक्षिणा...
सलाम दंडवत प्रणाम नमन
उजवी घालून डाव्या हाताला
संजिवनीवर थेट चढाई
व्याघ्र दरवाजा, पाण्याची गच्च टाकी
टेहाळणी बुरूज, बुरुजावर झेपा टाकणारं एकटं पाखरू
काळजाचा ठाव घेणारी त्याची फडफड
युगायुगाचा साक्षिदार असावा कदाचित
प्राणसखा राजगड

बसलो उठलो चालू पडलो
लावून पायधूळ माथ्याला
वळसा बालेकिलेल्याला
वाटेवर अगणित फुलांचा
गुलाबी वर्षाव दुतर्फा फुलाफुलांचे ताटवे
जणू राजांच्या आदेशानं
राजगड सजला स्वागताला
प्रणाम सदरेला, पाठ पायरीला
तासाभराची राजेशाही झोप...

भल्या पहाटे गडावर पखरण फुलांची
सडे कोवळ्या सुर्यकिरणांचे
अन् कणाकणात रोमांच घुमवणारा राजगडी वारा...
पारणं फिटलं... तनाचं, मनाचं, डोळ्यांचं, आत्म्याचं...
आत्म्याचा आत्म्याशी मुक संवाद
थोडंसं गुज, हितगुज
आणि राजांनी टाकलेली पाठीवरची थाप
ताठ कणा... मान आन वसा वारसा
पाठीशी बांधून मराठी विश्व
मावळ्यांनी धरली वाट...
मंतरलेल्या, भारलेल्या उमललेल्या फुललेल्या मनानं ४५ मिनिटात गुंजवणी

पुन्हा योगायोग...
दोघांसाठी एक जिप...
बदलाबदली करत पुन्हा तोरण्याच्या पायथ्याला...
एक प्रदक्षिणा पूर्ण
एक स्वप्न पुर्ण
हजार हत्तींचं बळ
हजार युगांचा अनुभव
काठोकाठ भरून शिदोरी
मराठेशाहीची स्वप्ने गाठीला...
जय जिजाऊ, जय शिवराय !!!

-- संतोष डुकरे (तोरणा ते राजगड नाईट ट्रेक, १० व ११ ऑक्टोबर २०१४ च्या रात्री, तुषार डुकरे सोबत पूर्ण केल्यानंतर)

इंद्रायणी...

इंद्रायणी...
का कोण जाने पण मला ही नेहमी गुढ वाटते
गुढ गर्भार उचंबळलेली घुसमटलेली
जणू काही सांगू पाहताहे...
शतकानुशतके सोसलेले आघात
पाहीलेले दाहलेले अनंत अनामिक क्षण
युगा न् युगाचा मुक प्रवास...

पाहिले असतील तिनं माऊलीचे हाल
त्या माथ्यावर कोसळणारे वखवखलेले हात
निवृत्ती न्याना सोपान मुक्ताईनं
ढाळलेले अश्रू फोडलेले टाहो
निष्पाप जिवांची होलपट वर्षानुवर्षे... समाधिनंतरही
ज्यांनी फेकलं शेण त्याच हातांना
माऊलीच्या नावानं जेवणावळी झोडून
थोबाड धुतानाही पाहिलं असेल...

तुका माझा खरा सांगाती इंद्राणीचा
तोच खरा पुत्र वांझोट्या पोटी रत्न
तुका जन्मला, तुका वाढला
इंद्रायणीत रोवून पाय
तुका आकाशाला भिडला...
हरखली असेल इंद्रायणी माय...
अन् धाय मोकलून रडलिही असेल
गाथांचे कलेवर लेवून...

पाहिले असतील सारे डाव, कट, कारस्थाने
त्यात अग्नीपुष्पासम फुलणारे तुक्याचे अक्षर अभंग
तुका संपविण्याचे सारे मार्ग व्यर्थ ठरलेलेही पाहिले असतील
पाहिला असेल रामेश्वर भटाचा तळतळाट, थयथयाट
तुका संपत नाही म्हटल्यावर केलेला विष्णूनामाचा गजर...
संपत नाही म्हणून बगलेत घुसून
म्हणे रामेश्वर भट... तुका विष्णू नाही तुजा ?
तुका इंद्रायणी नाही दुजा की...
तुका विष्णू नाही तुजा...
कोण विष्णू, कुठचा विष्णू...

जन्माजन्माची सांगाती, रक्तावाहीनी श्वासवर्धीनी
ठरली परक्याची परकी पोरकी
जरी सांभाळले डोहात अभंग उदरीच्या गर्भासारखे...
अन् तिच्याच काठी घुमतोय गजर...
तुका विष्णू नाही दुजा...

रडली असेल आतल्या आत
गलबलले असतील डोह न् डोह
एका डोळी तुका, दुजा डोळी न्याना
आठवांचे अनंत भार, सुख कमी दुखः फार

गदगदल्या अंतकरणी
आता तरी बोल दोन शब्द काही...
असा किती काळ बसू तुझ्या काठी
माते... तुझं मुकं दुखः झेलाया...
मी तुका नाही, न्यानोबा नाही...

-- संतोष डुकरे, १३ आॅक्टोबर १४, संध्याकाळी ७, इंद्रायणी काठी

पाहंट पहाटं सिंहगडावर...

थंडगार दव दल थंडगार
झिंगाट झोंबता गडकरी वारा
त्या प्रशस्त झोपडीत त्यांच्या
चार वाळका, दोन खाटा
एकमेकाला बिलगलेली दोन जोडपी
बाकी सारी चिल्ली पिल्ली बिल्ली भौ

रात रौंदाळ रानवाटांवर, अवचित पायरव
काळोख तुडवून समाधिस्त
दहा पावलं अथक पायरत
ओलीच्या शोधात त्या प्रशस्त झोपडीत

रांजणावरचा अर्धा तांब्या
गटगट रिता नरडीत सुक्या
झोपडीत वाकळंत बिलगत ढुसंत
काकणं कणकण इरकली सळसळ
जुनाट कंठी नवाट शब्द... चहा पाहिजे ?

परतीचे पायरव पांथस्त पांगट
झोपडीत पुन्हा सामसुम सुगंधित
खुल्या नवी खुला शालिन शृंगार
पाहटं पहाटं मंद धुंद
दव दल थंडगार
सिंगहडावर...

संतोष डुकरे, सिंहगडावर, २२ आॅक्टोबर १४, पुणे

आता लिहावच लागेल..

लिहिनारानं लिहून ठेवलंय
सांगणारानं सांगून ठेवलंय
तुमच्या आमच्यासाठी आता
खाली काय घंटा उरलंय..?

पोथ्या पुराणांची बाराखडी
वेद वृचांची उजळणी
व्रत वैैकल्याची पोपटपंची
अगदी सत्य नारायणाची भोंदूगिरीही

लिहिनाराचं लिहून झालंय
सांगणाराचं सांगून झालंय
तुमच्या आमच्यासाठी खाली
आता काय घंटा उरलंय... ?

एक नर बाकी वानर
एक सुर बाकी असूर
सुधारकांना संहारण्या अवतार
बलात्कार्या स्वर्ग, बळीला पाताळ..?

लिहिनारांनी घोळ घातला
सांगणारांनी तो रुढ केला
तुमच्या आमच्यासाठी आता
खाली फक्त घंटा उरलाय...

आता घंटा घनाघन वाचवावाच लागेल
दणादण टोल ठोकावाच लागेल
खोटेपणाची एेतिहासिक वाळवी
सत्य ठणकावून काढाविच लागेल...

आता एेकनारांना बोलावच लागेल
बोलणारांना लिहावंच लागेल
खरा खुरा जाज्वल्य इतिहास
तुम्हा आम्हाला मांडावाच लागेल...

तुम्हा आम्हाला लिहावंच लागेल...

-- संतोष डुकरे, ५ नोव्हेंबर २०१४, पुणे

या झोपडीत माझ्या...

राजा जरी मी माझ्या
या संपन्न झोपडीचा
बायकामुलास लाज वाटे
फाटक्या प्राक्तनाची माझ्या

जरी माझिया महाली
एेश्वर्य विलास साफल्याचा
रिती पोकळी फक्त ती
त्यांची भूक भागवाया

माझ्या झोपडीत नाही
इंटरनॅशनल स्कूल
स्विमींग पूल, पार्क
आऊटींग हाॅटेलिंग

नव्यांच्या गरजा अनंत
गरजांची भूक अथांग
त्या भस्म्यात सारी
जगती धुंदीत कफल्लक

संघर्ष नव्या जुन्याचा
रंगलाय झोपडीत
नव्याचे नवे गाणे
जुने झापडे विराने

कुणी का घालावा
लगाम पाखरांना
त्यांची नवी क्षितीजं
नवी झोपडी तयांना

गेले उडून सारे
या झोपडीतून पक्षी
उरले रिते वासे
रित्या झोपडीत माझ्या

माझा मी मस्त आहे
माझं एकट्याचं आसमंत
पुन्हा दाटला स्वर्ग सारा
या झोपडीत माझ्या

वनव्यानंतर जरी
फुटे पालवी खोडांना
मी ही तसाच बुडखा
फुटे पालवी मनाला

मन धुंद गंध हरपे
हरपे देह भान वय
कळी काळाच्या छाताडावं
रोवलेत दोन्ही पाय

- संतोष डुकरे, १३ नोव्हेंबर १४, पुणे

विद्रोह

आता इंच इंच लढवू
हे निशान विद्रोहाचे
झेलून वार सारे
रक्षिण्या झोपड्या रे

होवो अनंत ठिकर्या
या जाज्वल्य मस्तकाच्या
पेटून उठो मेंदू मेंदू
रसद झोपडीतून माझ्या

मी लढेन झुंजेल
पडेलही कड्या कपारी
निशान फडकत राहील
झोपडीच्या मुख्य कमानी

हे निशान विद्रोहाचे
हे निशान स्वमुक्तीचे
तोडून पिढ्यांची गुलामी
हे मुक्तीगित स्वातंत्र्याचे

या झोपडीत माझ्या
अशी पहाट उगावी
सारं आसमंत उजळून
प्रभा दश दिशा फैलावी

हे अनंतकण प्रकाशाचे
पाचवतील संदेश सारे
हा वारा चराचर गाईल
माझे गाणे विद्रोहाचे

उलथतील खांब सारे
विषवृक्ष पोसलेले
कळीकाळातून विझतील
वणवे पिढ्या पिढ्यांचे

माझ्या पाऊलखूणांचे
बनतील महामार्ग
आज समोर ठाकणारे
वाटसरु उद्याचे सारे

मी पेरतोय विद्रोह
या मढेल्या मातीत
उद्या मढेल ही माती
माझा विद्रोह लेवून

विद्रोह तुकोबाचा
विद्रोह शिवबाचा
विद्रोह तुझा माझा
विद्रोह जगण्याचा

विद्रोहानं मढ्या मढ्याला
असं पेटवावं आत आतून
गावोगाव पेटाव्यात चिता
मुक्ती मिळावी हरेक मढ्याला

ही मढी गुलामीची
ही मढी गुलामांची
आंधळ्यावानी जगणारी
ही मढी पिढ्या पिढ्यांची

जळू द्या सारी पुटं
झडू द्या काजळी विद्रोहात
हात जोडून खुलेल पुढे
नवं जगणं, नवं विश्व सारं

संतोष डुकरे, १३ नोव्हेंबर १४, पुणे

रक्ताच्या थारोळ्यात...

आता विर जागे होतील
शस्त्रांना चढेल धार
दीन दीन घुमतील आरोळ्या
गनिमांच्या कंठ किंकाळ्या...

दिसला गनिम की काप
दिसला शत्रू की काप
दिसला विरोध की काप
दिसलं मुंडकं की काप
नुसतं काप, फक्त काप
सप सप सपासप काप काप काप

तलवारीला रक्त लागलं की
ती विसरेल जात धर्म
चौकाचौकात रक्ताळतील
शांतीची पांढरी बाळं

म्हणे देव धर्माच्या रक्षणा
विरांनी धरलं शस्त्र
पण शस्त्राला नसतो धर्म
नसते जात नसतो पंथ
ते मागत राहते रक्त, फक्त रक्त रक्त
अखेरच्या थेंबापर्यंत, श्वासापर्यंत, शस्त्रापर्यंत

कुणासाठी कशासाठी
कोण लढला, कोण पडला
कोणाचा धर्म कोणाचा जीव
भेदाभेदाच्या बळावर
फक्त रक्त दमनाचा महापूर
पाजाळताहेत शस्त्र
होताहेत वार
सप सप सपासप... काप काप काप

शतकानुशतके हेच सुरु आहे
कधी खुलेपणाने, कधी छुपेपणाने
मुंडकी उडताहेत आकाशी
विचार सांडताहेत तळाशी

शस्त्रांच्या बळे मुडद्यांचे खळे
लढताहेत मुडदे, पडताहेत मुडदे
खळ्या खळ्यात साचतेय
मुडद्यांची रास...
तुमचा आमचा श्वासोच्छोवास
रक्ताच्या थारोळ्यात...

-- संतोष डुकरे, ३० डिसेंबर १४, सायंकाळी ७.१५, पुणे

खरं तर काहीच नाही...

खरं तर काहीच नाही
तुझ्या माझ्यात आता
ना माझी तू
ना तुझा मी...

तरीही मन गुंगलेलं
कानाेकानी गणगण
काळीज सैरभैर
पापणी फडफड
तनामनात काहूर
अनादी अनंत...
खरं तर काही नाही
तुझ्या माझ्यात आता

तुझी मळलेली वाट
वाटेवर दोन पावलं
थर साचल्या धुळीत
कणाकनाचा पायरव
दवादवात साकळलेले
अनंत क्षण आभाळभर...
खरं तर काहीच नाही
तुझ्या माझ्यात आता

तु चुंबिल्या ओठांवर
आता सिगारेटचे थर
तु छेडील्या तारांवर
पराचेच कावळे तारभर
तु सोडल्या स्वप्नांवर
मी आजही स्वार मनभर...
खरं तर काहीच नाही
तुझ्या माझ्यात आता

तू गंधाळून गेली
माझी पाषाण सुमने
त्या गंधीरंध्री घुमतो
मी श्वास वेडा भ्रमरे
जरी हजारदा तू विटली
मी ही शाल पांघरलेली
खरं तर काहीच नाही
तुझ्या माझ्यात आता

संतोष डुकरे, ३० डिसेंबर २०१४, सायंकाळी, पुणे

Wednesday, August 20, 2014

तू दिवा लाव...

मी भिरभिरतो कड्याकपारी
डोंगरदर्यांत बेभान बेफाम
सय, लय, पायरव, पाझर
रित्या क्षणांचा निस्सिम शोषक

स्तब्ध प्रारब्ध तू निळ्या आकाशी
केविलवाणी निशा बेलगाम जराशी
रित्या आशेच्या रित्या गाभारी
तू दिवा लाव...

तुझ्या माझ्या पाऊलखुना
पुन्हा तिच पावलं क्षितिजी
लपेटता, झोकांडता वारा
शिळ आसमंती अस्मानी

मालवल्या श्वासांनी
फोडावा टाहो अवचित
तसा तुझा माझा एकांत
भरल्या कंठात निपचित
तू दिवा लाव...

मेंदूत मुंग्यांची अखंड वळवळ
उरात श्वास घरघर थरथर
विझत्या ज्योतिची नाहक फडफड
रात्रभर दीनदीन मिनमिन...

- संतोष, २० आॅगस्ट १४, सकाळ, पुणे

Sunday, June 15, 2014

मी काही जगातला पहिला बाप नाही !

गेला बाजार शेकडो युगं
नियतीचे पाढे घोकून
अगणित वृक्ष वनात
झडतात बीज फोकून

सालोसालचं बिजारोपन 
शेडा बुडखा वाढ झाड
फुलन फलन प्रजनन
बाप्याचा बाप, बाईची आई

मी काही जगातला पहिला बाप नाही !
तरी लेकराची माया, सर म्हणता सरत नाही !

(संतोष, १५ जून १४, कोथरुड, रात्री १२)

भिती स्वप्न

तुमच्या पैकी कुणी स्वप्नांचे अभ्यासक, विश्लेषक असाल किवा तुम्हाला स्वप्नांमधील संकेत समजत असतील तर मला आज पडलेल्या या स्वप्नाचा अर्थ सांगावा ही विनंती....

मी आणि माझे दोन मित्र... त्यातील एक रमेश करंडे पारगावच्या एसटी स्टॅंडवर अंधार पडता उतरलो. घरुन फोन आलेला... रस्त्यात वाघ आहेत रात्री येऊ नका. रमेश घाबरला. जायला नको म्हणायला लागला. मी आग्रह केला. चल रे मी आहे, वाघ काय खातात काय. हा नाय हा नाय करता करता रमेश आम्हा दोघांसह निघाला. ओढ्याच्या रस्त्याला लागलो... एकेक वाघ दिसायला लागला. अत्यंत शांतपणे आम्ही पुढे जायला लागलो. रम्या गडबड करायला लागला. मी त्याला दाबून धरले. सगळं कर पण गडबड, गोंधळ करु नको, बोंबलू नको. आपण गपचुक निघून जावू.

एक वाघ ओलांडला. मुक्ताईच्या देवळाजवळ दुसरा वाघ, श्रीरामच्या घराजवळ तिसरा. असे करत करत हाडकीत आलो. आता इथे सिंह होते. उत्तरोत्तर रम्याचा गोंधळ, कुडकुडणं आणि तणतणं वाढत होतं. वाघांना चकवत त्यांच्यातून मार्ग काढत काढत रम्याला सांभाळणं माझ्या आवाक्याबाहेर होऊ लागलं होतं... पण अत्यंत शांतपणे रस्ता कापतच होतो. रम्याचा जळफळाट सुरु होता. अनेकदा तो वाघांच्या तोंडाजवळच थांबून वाद घालायचा. अखेर गंगाराम फाट्याजवळील सिंह ओलांडून कारभारी तात्याच्या घरामागिल वाघालाही आम्ही चकवलं. माझ्या घरी पोचलो. दार बंद आणि ओट्यावर आणखी दोन तीन वाघ बसलेले.

आता रम्याला असह्य झालं. तो माझ्या कंट्रोलमधूनही सटकला आणि वाट सुटेल तिकडं पळायला लागला. टाेमॅटोच्या, मकेच्या वावराकडं... वाघांनी कान टवकारले आणि रम्यामागे लागले. आत्ता काय करायचं... मी फावडं उचलून वाघांमागं धावलो. पुढे पाहतो तर मका रवखळल्याली. रम्या दिसेना. एकदम गायब. वर भुईमुगाच्या वावरात तीन वाघ आणि एक जरा खवल्याखवल्याचा वाघापेक्षा लांब पण त्याच साईजचा प्राणी वाघांबरोबर रम्यासारखाच गोंधळलेल्या, कुडकुडलेल्या, तणतणलेल्या अवस्थेत झुंजत होता.

रम्याच्या घरच्यांना आता काय सांगायचं याचं प्रचंड टेन्शन घेऊन मी जागा झालो... आत्ता बोला !

वर्दी

सकाळी सकाळी काॅलेजला निघायच्या टायमालाच वर्दी आली. आज इनमतीत सदूच्या पोराची पाची. तीन पिक्चर पाहिजेत. एक मराठी, दोन हिंदी. संध्याकाळी ९ पर्यंत पोचा. पिक्चर नऊ म्हणजे नऊला सुरु झाला पाहिजे. २५० रुपये नक्की. डोक्यात गणगण सुरु झाली.

मस्तपैकी स्वतःच्या कमाईवर दोन पेट्रोल बुलेट घेऊन डांबरी रस्त्याने डुगडुगडुगडुग करत फिरायचं. हे शाळेत असल्यापासून दाद्याचं आणि माझं काॅमन स्वप्न. शेवटी दादूनी नी मी फायनल केलं. आपल्या सगळ्यात आवडीचं काम पिक्चर पाहणं. मळ्यात, गावात, पंचक्रोशीत पाची, वाढदिवस, जत्रा बित्रा कुठंच कोणताच पिक्चर आपण सोडत नाय. रात्रभर पिक्चर असल्यावर व्हीसीआर वाल्यापासून घरमालकापर्यंत सगळी झोपत्यात पण आपण दोघंच जागं आसतो. लोक पैसं पण लय देत्यात पिक्चर आणायला. आपणही गुपचूप कुणालाही कळू न देता हाच धंदा करायचा.

सुरु झाला धंदा. एक दिवस आधीपर्य़ंतच्या वर्द्या घ्यायच्या. १०० रुपये एका पिक्चरचे. मंचरला संगमवाल्यानं फेकून देण्यासाठी बाजूला काढलेल्या २५-३० जुन्या कॅसेट त्यानं मला मित्र म्हणून भेट दिल्या. १० रुपये भाड्याने कोणतीही कॅसेट मिळायची. व्हीसीआर १०० रुपये भाड्याने मिळायचा. टिव्हीची अडचण होती. बेल्हा आणि मंचरच्या दोघा जणांनी ती दूर केली. सगळं जुगाड जमावलं आणि नेहमीच्या पंटरांना सांगून ठेवलं... वर्दी असेल तर सांगा.

अखेर सदुची वर्दी आली. सद्या महापंटर. तो आधीच म्हणे... बघा, हिंगे डाक्टर, तुक्या, बांगर, संगमवाला या सगळ्यांना सोडून तुमाला वर्दी देतोय. कॅसेट यकदापण आडाकली नाय पायजे. काही कुटाणा झाला तर तुमचं तुम्ही बघा, माझं काही नाही. तीन पिक्चरचे २५० रुपये देईल. (म्हणलं २५० तं २५० धंदा सुरु तं व्हईल.) पण घरापासून लाईटचा खांबडा बराच लाब हे... आकडा तुमचा तुला टाकावा लागंल. च्या आयला आता हे नवीन झ्यांगाट उभं राहीलं. कॅसिटी, टीव्ही हाये पण आकड्याची वायर तर नाय आपल्याकं... पण दादू ठाम होता. आयला, आपलं स्वप्नं पूरं करायचं तर ही वर्दी पूरी करायलाच पाहिजे.

गाठलं बंडोबाचं दुकानं. सिंगल वायरचे दोन बंडल घेतली. मग डबल केली. बोर्ड घेतला. झाली सगळी तयारी. दाद्यानं त्याच्या सायकलला मागे कॅरिजला दोन लाकडं उभी बांदून त्यावर टीव्ही बांधला. मी व्हीसीआर, कॅसेट, वायरी माझ्या सायकलं आडकवल्या आणि बांधा बांधानं ढकलंत ढकलंत इनमती गाठली. रामाच्या घरापासून खांबळा तर बराच लांब... वायर पुरंना. मग दादू म्हणे... आपण डबल एेवजी सिंगलच वायर टाकू. डायरेक्ट मेन. आणि घरापशी बारीक खड्डा खांडून आर्थिंग देवू. दुसरा पर्यंयच नव्हता.

टाकला आकडा. आर्थिंगही दिली. टिव्ही सुरु झाला, व्हीसीआरमध्ये कॅसेट सरकवली आणि माहेरची साडी सुरु झाली... आमच्या स्वप्नपूर्तीचा महामार्ग खुला झाला. माणसं चांगलीच रंगात आली पण... विक्रम गोखलेनं अलका कुबलकडं पाठ फिरवली आणि आमची साडेसाती सुरु झाली. पहिल्यांदा आर्थिंग कमी पडायला लागली, टिव्ही झटकं मरायला लागला. त्यात कॅसेटही गुतायला लागली. भरिस भर म्हणून दोन दारुडी लय डॉकं खायला लागली.

आता काय करावं... बाया घाई करायल्या लागल्या. ए निट लावा ना टिव्ही... आम्हाला एवढाच पिक्चर पाहून घरी जायचंय झोपाया... तरी मी सांगत होतो तुक्याला वर्दी द्या म्हणून... ये त्या टिव्हीला फटका मारुन बघ... च्या आयला व्हीसीआरला पण फटका मारल्याशिवाय चालत नाय... गोंधळ वाढत घेला आर्थिंगला पाणी घालायला गेलेला राम्या आकड्याच्या मेन लाईनला चिटकला... ह्यो ठणाणा... दाद्या आकडा वढायला पळाला... मी कुठं होतो काहीच समजणा. मागं वळून पाहिलं तर सद्याच्या भावाचं पोरगं त्यांच्या बांधाच्या भांडणाचा राग आमच्या टिव्हीवर काढत होतं... काचा फुटल्या तरी हटत नव्हतं बेनं. मी जिवाच्या आकांतानं ओरडत होतो... पण सारा आवाज कंठात तुंबलेला. आवाज फुटला तेव्हा सगळ्या स्वप्नाला घाम फुटला होता !

जागरण गोंधळ

जागरण गोंधळ घातल्याशिवाय तुमची मोटर काय निट चालणारच नाय. इतकी वर्ष झाली सरकारनं परयत्न केलं, तुमच्या नवर्यानं परयत्न केलं, मोटरी बदलल्या, डिपीच्या लायनी बदल्या, लिंक बदललं, वायरमन बदललंय... पण काही गुण आलाय ? नदीवर मोटर चालू करुन गडी वावरात बारं द्यायला येईतव्हर मोटर बंद पडतीच ना... 

लाईट झटकं मारती म्हणून आटो बसवलं. किती आॅटो झालं सा मयन्यात. पडयाय का फरक... बाई दोष लायटीत नाय, मसनीत नाय... जागंत हाय. तिकडं बबन सराची मोटर चांगली चालती आन् तुमची झटकं हानती आसं का... तुमची मोटर जिथं हाय ना... ती जागा चांगली नाय. तुमच्या नवर्याला हे पटणार नाय. पण तिथं जागरण गोंधळ घातल्याशिवाय गुण नाय यायचा ! आज नाय तं उद्या पण तुमाला जागरान गोंधळ घालावाच लागंल...

गुलाब आपलं लाॅजिक ठकूबाईला पटवून देत होता. ठकूलाही पटत होतं. गुलाब म्हणतोय ते बरोबर आहे ते. पण पोरांच्या बापाला सांगायचं कसं. त्याला तं हे काय पटत नाय. नको नको म्हणता डग्या डोहावं मोटर बसवली. तेथून पाच किलोमिटर अंतरावर पिंपरखेडच्या शिवंला पाईप लाईननं पाणी उचललं. अान् चार सा म्हयन्यातच लाईटच्या झटक्याची साडेसाती मागं लागली. अॅटो टाकला तं उडतो आन् लाकूड लावून मोटर चालवली तं जळती. लाईट टिकलीच तर फुटबाॅल हवा धरतो आणि मोटर मोकळीच फिरत राहती. एक ना अनेक डोकेदुखी. पिक हाती यायचं आणि पाण्याच्या ताण्यानं जायचं. कोथंबीर सुकली, मेथीला झटका बसला. मका कडवळानं ताण सहन केला म्हणून नाही तर जर्शी पण आटल्या असत्या. सुखाचा जिव दुखात पडयाय. करावं काय...

बाई मी सांगतो... गुलाबच्या आवाजानं ठकुची तंद्री मोडली. एका जागराण गोंधळाचं पाच हजार रुपये घेतो. पण तुमचं आमचं रिलेशन आणि तुमची नड जाणतो. तुम्ही मला दोन हजार रुपये द्या. बाकी गोंधळाला लागणारं सामान तं तुमच्या घरीच हे... तुमच्या धन्याला बी सांगायची गरज नाय. तुम्ही मला खर्चाचे पैसे आणि सामान द्या. तुम्ही पण नदीला यायची गरज नाही. मी चांगल्या राती जावून जागरण गोंधळ करतो. १०० टक्के तुमची मोटर चालणार. नाय चालली तर आयुष्यात परत खंजरी हातात धरणार नाय...

गुलाब दाणं पिशीत भरुन भंडारा लावून गेला आणि ठकुबाईची गणगण सुरु झाली. पोरांच्या बापाला जागरणं गोधळाला तयार करावं की गुलब्याला गपचुप उरकून घ्यायला सांगावं... पैशाचं काय आईनं दिलेलं दोन मणी ईकता येतील गपचूप वाटलं तं. पण आपल्या पोटात तं काय राह्यचं नाय... आज ना उद्या मोटरीच्या खोक्याजवळ जागरण गोंधळ झाला हे त्यांना कळणारंच. नसता उद्योग करण्यापेक्षा आत्ताच सांगू... अकलीच्या खात्यात करुन टाका गोंधळ म्हणून. व्हवून व्हवून काय व्हईल जातील मोटर आन् आटोच्या जळाजळीत एवढं पैसं गेले तिथं आणखी दोन हजार जातील...

टिप्पूर चांदण्यात वट्यावं रातचं जेवण उरकत आलं... तसा ठकुबाईनं हळूच विषय काढला. आता वं काय करायचं लायटीचं. काय करायचं... जे सगळ्यांचं व्हईल ते आपलं व्हईल. आपण काय मुख्यमंत्री लागून गेलोय का... पण मी काय म्हन्ते... एकदा जागरण गोंधळ घालून पायचा का....

त्याच्या आयचा भोसडा त्या गुलब्याचे. आयघाला तुझ्यापशी येवून पन पिळाकला का... थांब उद्या पाटलाला सांगून घोडाच लावतो त्याला. सालं नेमकं दुपारच्या टायमाला बाप्यंमाणूस घरी नसलं आसा टाईम बघुन बायांना गाठतं आन् मोटारीजवळ जागरान गोंधळ घालायचं सागंत बसतं. दगड्याच्या बायकूनं गळ्यातलं डॉरलं इकून गपचुप घातला गोंधल परवा. आता फरक नाय पडलाय म्हून बसलीय बोंबलत. त्याच्या आयला बांबला त्याचे... उद्या माजच मोडतो साल्याचा... ठकुचा नवरा काय काय तणतणत राह्यला...

इकडं भांडी आवरता आवरता ठकुच्या उरातली धडधड वाढत होती अन् खरकटा हात वारंवार गळ्यातल्या दोन मन्यांकडं जात होता !

Sunday, January 19, 2014

वझं उतरलं...

बाई नवर्याच्या हाताला हात लावा
ठरलेली दक्षणा देवावर ठेवा
आणि म्हणा, वझं उतरलं...

गोंधळाचं, काळू बाईचं
भैरोबाचं, तुमच्या देवाचं...
वझं उतरलं...

म्हणा, देवा...
चुकलं माकलं पदरात घे
भोळ्या भक्ताला माफ कर
केलं कार्य गोड माणून घे
वझं उतरलं...

मल्हारी राया...
भक्त लय लांबून आलाय
जागरण गोंधळ झालाय
तळी भंडार उधळलाय
वझं उतरलं...

गोंधळाचं, काळू बाईचं
भैरोबाचं, तुमच्या देवाचं
वझं उतरलं...

बोला मार्तंड मार्तंड जयमल्हार
सदा आनंदाचा येळकोट

(जेजुरी, 19 जानेवारी 14, रात्री 9.30)