Thursday, February 12, 2015

माऊली

माऊली...
योग्याची माऊली
सुखाची सावली
इत्यादी इत्यादी सगळं खरं....

पण खरं सांगा माऊली
हे सगळं का सहन केलं ?
मान्य आहे तुमचं अवहेलनंपण
पण तोच तर होता पाया
तुमच्या विश्वात्मकतेच्या सिद्धांताचा...

मग का धरलात हट्ट
का केलात जिवाचा आटापीटा
वाळीतून जातीत जाण्याचा... ब्राम्हण्यासाठी...
खरंच का ते एवढं प्यारं होतं ?

भेद निर्मुलन तर राहीले दूर
घरवापसीच्या विकृत प्रथेत
देह झिजवला सगळा

एवढी हौस होती ब्राम्हण्याची ?
का कशासाठी ?
का नको वाटलं इतरांसारखं
सामान्य बहिष्कृत जगणं...

का नाही चालवलात माऊली ?
विठ्ठलपंतांच्या विद्रोहाचा वारसा

चालती भिंत, बोलता रेडा
खरं खोटं तुम्हालाच ठावूक
पण काय मिळालं मान झुकवून
जातीपायी माती खावून ?

का नाही पेटवला विद्रोहाचा अंगार
गितेत लिहीलेला नव्हता म्हणून...
की पुराणांत दाखला नव्हता म्हणून...

आणि शेवटी हाती उरलं तरी काय...
भावंडांची कलेवरं... भावार्थदिपीका ?
हत्या की.समाधी ? सत्य की घुसडाघुसड ?

एवढा उदोउदो, मग का गडपली समाधी
एक मात्र खरं...
तु षंढ केल्या पिढ्या
मारले प्रश्न, सवाल
मोडल्या माना उठणार्या...
कदाचित अजानताही...

माहीत नाही तुला कोणी
लावलं माऊलीचं लेबल...
अन्यथा तुझा पान्हा पिणारांनी
माझा तुका बुडवला नसता...

(संतोष डुकरे, पुणे)

No comments: