Saturday, February 9, 2013

डासांच एक टोळकं...

बाजार समितीत मुक्यानं फिरणार्या
काळ्या कपिला गाईच्या पाठीवरील
डासांच एक टोळकं
परवा सरकारकडं गेलं...

म्हणे माय बाप सरकारा
घात झाला घात झाला घात झाला
आम्हाला न्याय द्या, वाचवा
आमच्या पिढीजात हक्कावर
आपल्या लोकशाहीत गदा आलिये...

गेली 30 वर्षे आम्ही शोषतोय
या गाईच्या नसानसातील रक्त
आता तो आमचा हक्क झालाय
अन् तुम्ही म्हणता 8-10 ऐवजी
फक्त 2-4 टक्के रक्त प्या
हा कुठला न्याय...

हे पहा सरकारी दस्तऐवज
पुरावे, दाखले आणि अहवालही
पिढ्यानपिढ्या आम्ही इथं असल्याचे
आणि रुढीनुसार पोट भरत असल्याचे
त्याचा सेसही तुम्हाला देतोच की...

गाय शेपटी उडवणार, शिंगे रोखणार
पण ते किती मनावर घ्यायचं
बा सरकारा तु नाही ऐकलं
तर न्यायालयात जाऊ, उच्च, सर्वोच्च
पण आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे...
न्याय मिळेपर्यंत गाईच्या अंगावरुन हलणार नाही

डासांचे कावे, दावे सुरुच आहेत
सरकारचे विचार मंथन सुरुच आहे
बाजारात काळ्या कपिलेचा सांगाडा
पिढ्यानपिढ्या झुलतोच आहे...

(संतोष, 8 फेब्रुवारी, बुधवार पेठ)