Saturday, February 9, 2013

डासांच एक टोळकं...

बाजार समितीत मुक्यानं फिरणार्या
काळ्या कपिला गाईच्या पाठीवरील
डासांच एक टोळकं
परवा सरकारकडं गेलं...

म्हणे माय बाप सरकारा
घात झाला घात झाला घात झाला
आम्हाला न्याय द्या, वाचवा
आमच्या पिढीजात हक्कावर
आपल्या लोकशाहीत गदा आलिये...

गेली 30 वर्षे आम्ही शोषतोय
या गाईच्या नसानसातील रक्त
आता तो आमचा हक्क झालाय
अन् तुम्ही म्हणता 8-10 ऐवजी
फक्त 2-4 टक्के रक्त प्या
हा कुठला न्याय...

हे पहा सरकारी दस्तऐवज
पुरावे, दाखले आणि अहवालही
पिढ्यानपिढ्या आम्ही इथं असल्याचे
आणि रुढीनुसार पोट भरत असल्याचे
त्याचा सेसही तुम्हाला देतोच की...

गाय शेपटी उडवणार, शिंगे रोखणार
पण ते किती मनावर घ्यायचं
बा सरकारा तु नाही ऐकलं
तर न्यायालयात जाऊ, उच्च, सर्वोच्च
पण आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे...
न्याय मिळेपर्यंत गाईच्या अंगावरुन हलणार नाही

डासांचे कावे, दावे सुरुच आहेत
सरकारचे विचार मंथन सुरुच आहे
बाजारात काळ्या कपिलेचा सांगाडा
पिढ्यानपिढ्या झुलतोच आहे...

(संतोष, 8 फेब्रुवारी, बुधवार पेठ)

Sunday, January 13, 2013

असंही कधी कधी...

आज तुझ्या नसल्यानं, माझं असणं नसल्यासारखं
नुसतं नुसतं नुसतं, काही नाही रितं सारं...
मोकळ्या घराच्या आडवळ्यावर बकालपण भकासपण
सांदी कोपर्यात तुझ्या आठवणी दाटलेल्या कोंबलेल्या

तु होतीस तेव्हा अंगाखांद्यावर, पोटाओठावर
खेळलीस बागडलीस मोहरलीस फुललीस
तो ऋतू आता रिता, रित्या मिठीत माझ्या

तु होतीस तेव्हा हास्याचं खळाळ, खेळकर, खोडकर
खट्याळ, लाघव, आर्जव, मार्दव, कणोकण
घट्ट मिठी अविवेकी चुंबन थरथर अधर
आज शोधतोय तुझ्या पाऊलखुणा घरभर अंगभर

वाटतंय तु आहेस इथं कुठं तरी सोबत माझ्या
वाटतंय आता चावशील कानाला
आणि गुंफशील ओठात ओठ
समरसून हरपून
वाटतंय तु आहेस, जरी तु नाहीस, रित्या मिठीत माझ्या...

ऐकतोय गझल पावसाची, प्रेमाची, विरहाची
गालिब, इक्बाल, हफीझ, शकील, गुलाम, जगजित, अबिदा
संथ धुंद मस्त लयीत काळजात आत आत घुसणारी
तिच्यासह भास तुझा माझा अनादी अनंत... अवघे आसमंत !

संतोष.

अल्लडपणा, दुसरं काय.

शिंपलेली तू ती ती रात्र सारी
अजुनही मनी गंधताहे
केवड्याचा मंद गंध वाहे
श्वाश गंध उरी शोधताहे...

तु गेलीस आणि माझ्या आयुष्याचा
उघडा बोडका डोंगर झाला
तू गेलीस आणि सारं रानं भान
शिवार माझं पोरकं झालं
जळत्या क्षणांचा तप्त लाव्हा
ओंजळीत माझ्या उपडा झाला
तुझ्या आठवांच्या लाटेवर
आत्मा माझा पोरका झाला

येथिल का गं तू परतून पुन्हा
अवचित बेभान सरीसारखी
अल्लड अवखळ सरीसारखी
ओल्या बेभान लाटेसारखी
 हरपून सारं रान भान
तुझ्या माझ्या प्रितीसाठी...

विजयाचे विराट डंके
अन् सृष्टीचेहे साम्राज्य सारे
तुझ्या विना हे सुने सुने

शिपलेली तू ती रात्र सारी
अजूनही मनी गंधताहे
सरली सारी जरी साथ तरीही
तव नाद नभी गुंजताहे...

संतोष.