Sunday, November 30, 2008

अंगारा

दिवसाच्या आकांक्षांना
रात्रीचा मोका
मनाच्या हिंदोळ्याला
काळजाचा झोका

मनही फाटलं
काळीज तुटलं
जीवन मात्र
झुलतच राहिलं...

सारं सरलं
खाली उरलं
फाटकी झोळी
काळा अंगारा...

---संतोष डुकरे (College Of Agriculture, 2005)

Friday, November 28, 2008

सारं काही तसंच आहे

आहे का अजून तुझ्या
गालावरती खट्याळ रुसवा
ओठांवर रक्तीमा अन..
नेत्रांची अस्वस्थ लवलव
थोडी हुहुर मनाची
माझ्यासाठी...

उडते का अजूनही
उनाड ओढणी वाऱ्यावरती
लवतो का अधेमधे
आठवणीने डावा डोळा
कधीमधी... माझ्यासाठी...

अजूनही धरतेस का,
सोमवार निरंकार,
अजूनही भांडतेस का
मित्रांशी माझ्यावरुन अन..
अजूनही रडतेस का
रात्र रात्र हिरमुसून
कधीमधी... माझ्यासाठी...

तुझं मला ठावूक नाही
तुला आता नवं नातं
आणि हातात नवा हात
पण मी मात्र तसाच आहे
तोच आहे अजून
त्याच प्रेमाच्या धुक्‍यात...

तिच आहे आठवण
आणि तोच विरह
तिच माझी जगण्याची
केविलवाणी धडपड
तुझ्याविना...

सारं काही तसंच आहे...
तसंच आहे अजूनही
कोरड्या पावसातील भिजत रहाणं
स्वप्नांच्या ओहळात
वेळी अवेळी डुबत रहाणं
तुझ्यासह... तुझ्याविना...

आता रोजचीच ही कातरवेळ
उदास व्याकूळ आठवणी
आणि हा एकांत
तुझ्याविना... जिवघेना...

सारं काही तसंच आहे
सारं काही तेच आहे
तेच शब्द ह्दयात
आणि तोच सल मनात
सारं काही तसंच आहे
सारं काही तसंच राहिल...

-संतोष डुकरे (BVB, Kothrud, Pune, 2007)