परवाचा, 6 जुलैचा सायंकाळी साडेपाच सहाचा किस्सा आहे. दिंडी पुण्यात होती. संध्याकाळी हनुमंतचा फोन आला. पालिकेत विशेष काही नाही. तुला भेटायला येतोय. भूक लागलीये. काही तरी खाऊ. माझी झाली पंचायत. मी सकाळी घाईत घरी पाकीट विसरलो होतो. बफर स्टॉक होता. पण त्याला मी शक्यतो आपत्कालीन परिस्थितीशिवाय हात लावत नाही. त्यामुळे मी हनमाला सांगितलं. सर, माझ्याकडे आज पैसे नाहीत. खायचा नाश्ता पाण्याचा वांदा आहे. पण तुम्ही या आपण मार्ग काढू....
माझ्या डोक्यात वेगळाच मार्ग होता. गेली चार वर्षे मी पुण्यात दिंडीच्या काळात माझी मेस बंद करतो. शहरभर भक्तांसाठी प्रसादालये सुरू असतात. बातमीदारी करता करता पोटपूजाही त्यात होते. चार दिवस प्रसादाने (खिचडी, केळी, राजगीऱ्याचे लाडू इ) पोटाची काळजी नसते. शिवाय खानावळीचे पाणी चपाती खाण्यापेक्षा बरं ना. यंदा नवीन घराजवळच्या मावशीकडून सकाळी घरून बाहेर पडतानाच डबा घेत असल्याने दिंडीत प्रसाद घेण्याची वेळ आली नव्हती. म्हटलं चला हनमा जोडीला आहे, खिशात पैसाही नाही तर मग पांडुरंग कधी कामाला येणार. जय जय राम कृष्ण हरी.
हनमा आला. आम्ही शनिवारवाड्याच्या समोर गेलो. बोलायचं होते आणि खायचंही होते. शनिवारवाड्याच्या उजवीकडं लाल महालाच्या बाजूच्या गेटवर पीर बाबाचा दर्गा आहे. त्याच्या शेजारी कठड्यावर वारकऱ्यांमध्ये जाऊन बसलो. या जागेवर कायम 2-3 पोलिस बसलेले असतात. आज नव्हते. थोड्या वेळाने दोन लोकांनी राजगिऱ्यांचे लाडू 2 गोणी भरून आणल्या. पण वाढी आमच्यापर्यंत येण्याआधीच लाडू संपले. गप्पा मारून आम्ही कंटाळलो होतो. म्हटलं पाटील चला आता... आपण फक्त पाटील राहिलो. चला तुम्ही तुमच्या वाटेला लागा, मी माझ्या लागतो. पांडुरंग काय पावत नाय आज आपल्याला. असं म्हणून मी सहज मान खाली गेली. बुटांकडे पाहत होतो. तेवढ्यात माझं लक्ष कठड्याला खेटून धुळीत पडलेल्या 50 रुपयांच्या नोटेकडं गेलं. पहिल्यांदा खरंच वाटलं नाही, की ते पैसे आहेत. दुसऱ्यांदा वाटलं खोटे आहेत. तिसऱ्यांदा वाटलं फाटलेले असतील. म्हणून नीट तपासून पाहिले. एकदम ओके नोट होती.
डोक्यात विचार आला कुणाचे असतील. नोटेला तीन आडव्या घड्या होत्या. आम्ही अर्धा तास तेथे बसलो होतो. तेवढ्यात तीन दिंड्या तेथे विसावा घेऊन पुढे गेल्या होत्या. त्यामुळे कुणा वारकऱ्याचे पैसे असतील तर परत करणं अशक्य होते. आणि नेहमी इथे बसणाऱ्या पोलिसांचे पैसे असतील तर ते त्यांना परत करण्यात काही पांडुरंग नव्हता. आता माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक - ती नोट पांडुरंगाचा प्रसाद म्हणून जपून ठेवायची. दोन - ती नोट खर्च करायची.
नोट देवाचा प्रसाद म्हणून जपायची तर मी देव मानत नाही. त्याऐवजी महात्मा फुल्यांची निर्मिकाची कन्सेप्ट मला भावते. दिवसभर मी पालखीच्या पावलांनी.... ट्रॅफिक केलं जाम सारं.... असं गाणं गुणगुणत मी फिरत होतो. कारण शनिवारवाड्यापासून सेंट्रल बिल्डींगला जायला मला दीड तास लागला होता. पावसाच्या रिपरिपीत गाडीचं हॅंडल, क्लच, ऍक्सिलेटर दाबू दाबू दोन्ही हात लाल झाले होते. वारकऱ्यांविषयी आत्मीयता असली तरी का कोण जाणे पण वारीचं फारसं सुखःदुखः नाय वाटत मला. मला कशाचं सुख दुःख वाटतं हे अजून मलाच समजलेलं नाही.
माझा सख्खा मावसभाऊ मी कॉलेजला असताना वारला. मला सख्खा भाऊ नाही. पण तो सख्ख्या भावाहून जवळचा होता. आम्ही दोघांनी किती तरी धिंगाणा केला होता. पुण्यात प्रत्येक दिवाळी,उन्हाळ्यात तो मला भरपूर पिक्चर दाखवायचा. फिरवायचा. तो गेल्याचं कळलं, पण मला अजिबात रडू आलं नाही. जाऊन त्याचं शेवटचं दर्शन घ्यावं असंही वाटलं नाही. उलट त्या संध्याकाळी मी कॉलेज ग्राऊंडवर जाऊन कब्बडी खेळत बसलो. त्याच्या दहाव्याला गेलो तेव्हाही मला रडू आलं नाही. मला रडावासं वाटलंही नाही. लाजेखातर मी खालचा ओठ दाताने जोरात चावला. तेव्हा कुठे माझ्या डोळ्यातून पाणी आलं. पण त्यानंतर आठच दिवसांनी मी कॉलेजमध्ये बसलो होतो. लेक्चर सुरू होते. मी दारातून बाहेर पाहिलं. लांबवर भाताची शेतं पसरलं होती. आणि कॉलेजसमोरच्या खाचरात एक कोकणी म्हातारा अंघोळ करत होता. काळाकुट्ट. त्याची हाडं न काडं मला लांबूनही मोजता येत होती. चेहरा पार खपताडात गेला होता. मला एकदम गलबलून आल. आणि भर क्लासमध्ये माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या संततधार धारा वाहू लागल्या. थांबता थांबेनात. मी तसाच ओघळत्या डोळ्यांनी क्लासबाहेर पडलो. तेव्हापासून मला माझं कोडं पडलंय. सख्खा भाऊ मेला, रडलो नाही... आणि कोण कुठला जखापडा म्हातारा... त्याला पाहून रडतो बसलो. अजून कोडं सोडवतोय.
पांडुरंगाचंच काय पण तसं मला कोणत्याच देवाचं वावडं नाही. वेडही नाही. आईमुळे मारुती मनात बसलाय आणि आता तो माझा मित्र झालाय. त्यामुळे त्याला नाही टाळू शकतं. पण बाकी सर्व देव मी फाट्यावर मारून फिरतो. मी घरी कधीही देव पुजत नाही. देव्हाऱ्यात धुळीचा थर साचतो. आई कधी कधी मेटाकुटीला आली की सणावाराला तिच्या समाधानासाठी देवावर तांब्याभर पाणी ओततो. तेवढंच.
जेजुरीचा खंडोबा आमचं कुलदैवत. पण गेल्या 10-15 भेटीत मी फक्त एकदा तळी भरली. ती सुद्धा आईची आठवण आल्याने, तिला वाईट वाटेल, एकदा तरी भरावी म्हणून. बाकी मला देवापेक्षा त्याच्या भक्तांच्या भावना व देहबोली वाचण्यात जास्त रस असतो. प्रत्येक माणूस न बोलता खूप काही सांगत असतो. त्याच्या न कळत त्याला समजून घेण्यात वेगळाच आनंद असतो. त्यामुळं कधी कधी कंटाळा आल्यावर मी शिवाजीनगर एस टी स्टॅंड वर जाऊन माणसं वाचत बसतो. जेजुरीगडावर मी फक्त एकदा गाभाऱ्यात गेलोय. मी देवाचे लांबून थेट दर्शन घेण्याची एक जागा शोधलिये. दिपमाळेजवळ सर्वांत बाहेरच्या बाजूला एक जागा अशी आहे, की जेथून गाभाऱ्यात कितीही गर्दी असली तरी थेटपणे खंडोबाच्या पाया पडता येत. त्याच्या नावाने भंडारा लावला, की आपण माणसं वाचायला मोकळे.
अशा पार्श्वभूमीवर ही नोट देवाचा प्रसाद म्हणून मी सांभाळून ठेवणं शक्य नव्हतं. हनंमंतालाही ते पसंत नव्हतं. कुणा गरजवंताला नोट दान करावी, तर या क्षणी सर्वांत जास्त गरजवंत आम्ही दोघे होतो. आणि दान तिच गोष्ट करावी, ज्यात तुमचा घाम आहे. त्यामुळे आम्ही उठलो. शनिवारवाडा चौपाटीवर गेलो. दोन ओली भेळ आणि एक कांदा उत्तप्पा खाल्ला आणि आमची पावले आपापल्या हापिसाच्या दिशेने चालू लागली. माझ्याच नकळत माझी पाचवी दिंडी पांडुरंगाच्या पाया न पडताही त्याच्या प्रसादाने पूर्ण झाली होती.
(ता. क. - त्याच रात्री बफर स्टॉकमधून "अलका'ला स्टॉर्म वॉरिअर्स हा चित्रपट पाहिला.)
Wednesday, July 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment