Sunday, January 17, 2010

पांढरी

ताड ताड फुटाणे फोडत चुल जळत होती. माझी नजर गेल्या तासाभरापासून जाळावर स्थिरावलेली. बुबुळं जिव्हाळणाऱ्या आगीच्या तालावर नाचत होती. कानात भाकरी थापण्याचा थप थप थप थप आवाज घुमत होता. मी मान वर केली. माय चुलीशेजारच्या वट्यावर दोन्ही पायाच्या अंगठ्यात काठवट धरुन भाकरी थापत होती. पिठाळलेल्या हातानं बांगड्या मागं सारत ती काठवटीतल्या पिठात पाणी टाकायची. मळून मळून भाकरीच्या मापाचा गोळा करायची. लईच झाला तर तेवढा कमी करुन काठवटीच्या कानाला लावून ठेवायची. पुढच्या गोठ्यात घेण्यासाठी. मग गोळ्याखाली कोरडं पिठं पसरुन दोन्ही हातांनी काठवटीत गोल गोल फिरवत बडवत बसायची. थप थप थप सुरु रहायची. भाकरीचा तव्याच्या मापाचा चंद्र झाला, की तो तव्यावर पालथा व्हायचा. मग तापलेला तवा आणि फुललेला विस्तव त्यांची कामं चोख करायचे.

चूलीत काडक्‍या सारीत होतो. बारिकशी पेटती काडी हाती घेऊन गोल गोल फिरवणं, हा माझा चुलीपुढचा उद्योग. माय त्याला कोलत्या खेळणं म्हणती. माझा खेळ सुरु झाला की, ""कोलत्या नको ख्यळू... नाय तर चड्डीत मुतशील रातचं.'' हे मायचं बोलणं ठरलेलं असायचं. आत्ता मात्र ती कसल्या विचारात आहे, कोणास ठावूक. माझ्या कोलत्या खेळण्याकडं तिचं अजिबात लक्ष नाही. हातची कोलती खाली न टाकता मी तिला विचारतो, ""ंमाय वो... आपल्या घराच्या भिती कधी लिपायच्या ? पोपडं निघालत सगळं. भुई उखानलीये. धाब्याची पांढरी गळाया लागली आता. ""यडा हाईस का?'' माय माझ्यावरच उखडली. ""आरं, इथं काय आपूण कायमचं राहणार का आता. ह्य घर जुनं झालं. आण्‌ गावात तरी क्वॉनाचं धाब्याचं घर ऱ्हायलंय का आता? आता आपल्याला शिमिटाच्या, सिलॅपच्या घरात ऱ्हायला जायचं. काच नको श्‍यान ग्वाळा करुन सारवायचा आण्‌ पोचारा फिरवत बसायचा.'' पण घराच्या इटा उघड्या पडाया लागल्यात. लिपाया पायजेत ना. ""आभाळं फाटलंय. कुठं कुठं लिपणार हायीस तु. बाप ह्य घर पाडायचं म्हणतोय, आण्‌ ल्येक निघालाय भिती लिपाया. बघ तुझं तुच.'' असं म्हणून माय पुन्हा खाली मान घालून भाकरी थापायच्या नादी लागली.

माझं घर. माझ्या बापाचं आन्‌ त्याच्याही बापाचं घर. मारुतीच्या देवळाजवळंच. कौलारु. दुमजली. पांढऱ्या मातीचं. बाहेरुन पूर्णपणे शेणा मातीच्या काल्यानं सारवलेलं. एखाद्या मोठ्या देवळासारखं. पिढ्यान पिढ्याच्या सुख दुःखाचं साक्षिदार. गाभाऱ्याच्या ठिकाणी झोपायच्या खोल्या. त्याच्या शेजारीच स्वयंपाकघर. मंडपाच्या ठिकाणी दिवाणखाना आणि प्रवेशद्वाराच्या जागी मोठा ओटा. बाहेरुन कोणी आलं की पहिल्यांदा ओट्यावरचं टेकणार. मग तो कोणी सोयराधायरा असो की एखादा भिक्षूक. घराच्या मागच्या बाजूला मोठी बाग. आईला स्वयंपाकाला पुरेल एवढा भाजीपाला पिकतो त्यात. घराच्या चारी बाजूला मोकळीच मोकळी जागा आणि वर निळं आभाळ... आमचं घर सोडलं तर खेडेगाव असूनही आजूबाजूला सिमेंटच्या इमारतींचे जाळं वाढू लागलेलं. दाटी वाढत असतानाही आमचं घर मात्र आत्तापर्यंत ऐटीत ताठ उभं होतं. एखाद्या जुन्या पुराण्या लेण्यासारखं. स्वतःच्याच कस्तूरी गंधात मग्न. पण आता इथून पुढंच काय खरं नव्हतं. तसं पाहिलं तर मारुतीचं मंदीर गावाच्या वेशीवर किंवा वेशीबाहेर असतं. पण तीन-चार दशकांपूर्वी गावच्या वेशीवरुन नारायणगाव-शिरुर तालुका महामार्ग गेला आणि गाव हळूहळू रस्त्यावर आला. आमचं मळ्यातंल शेत आणि घर गावाला भिडलं. वेशीवरला मारुती आता गावात राहतो.

एवढ्यात मला बाजूलाच काही तरी उकरण्याचा आवाज आला. हात्तीच्या, हिला काय अवदसा आठवली. या बाईनं चक्क माझ्या घरातंच माती उकरायचं काम चालवलंय. स्वतःचं घर पोचारायला ही माझ्या घराची माती उकरतेय म्हणजे काय. घर अजून पाडलेलं नाही आमचं. जिवंत उभं आहे. मी इथं उखनलेली भुई, भितीचं पोपचं, विटा लिपायच्या गोष्टी करतोय आणि ही माती उकरतेय. कोलती तशीच टाकून तिच्या दिशेने झेपावलो. तोपर्यंत तीनं माती उकरुन भिंतीला खिंडार पाडलं होतं. तिचं डोकं आणि हात त्या खिंडारात होते. मी मोठ्या जोमानं तिच्या कमरेला विळखा घालून बाहेर खेचलं. अरे बापरे, ही तर अगदी माझ्या माय सारखीच दिसती. मी चाट पडलो. माय तर भाकरी थापतेय. मग ही कोण. मी निरखून पाहिलं. तिच्या अंगाखांद्यावर पांढरी सांडली होती. मी रागानं लाल झालो. चुलीकडं पाहिलं. भाकरीची थपथप सुरुच होती. ""माय वो... लवकर ये. ह्यो बघ ही काय करती.'' माय ओट्यावरुन उठली आणि माझ्या हातातील त्या बाईचा चेहता झरझर बदलू लागला. क्षणात रापला. म्हातारा झाला. ""आरं, ही तर तुपली मोठीमाय. मपली सासु. तुपली आजी रं. पाया पडते सासुबाय.'' म्हणत माय तिच्या पाया पडाया लागली. मी अचंबित. हाताची पकड सैल. आजी तर माझ्या जन्माआधीच मेलेली. मग आता कोठून उपटली. असो माय म्हणतेय आजी तर आजी. मला काय. ""आरं कधी मधी दिसत्यात त्या घरात माती उकरताना... सगळं कसं सपान वाटातं. पण पाया पडलं की झालं. ती तिच्या वाटंनं आन्‌ आपण आपल्या. पाय पड तिच्या आन्‌ यं इकडं जाळ म्होरं साराया.'' माय पुन्हा भाकरी थापाया बसली. माझ्या हातीतील पांढरीने माखलेली आजी लहान लहान होत चालली होती. मोठ्या फुग्यातील हवा सोडावी तशी. आता तर ती चार वर्षाच्या मुलीएवढी झालीये. एकदम डिक्‍टो निरमाच्या जाहिरातीतील मुलीसारखी. गोंडस. फ्रॉकही तसाच घातलाय तिनं.

आजी माझा हात धरुन चुरचुरत म्हणाली, ""मला आपलं घर दाखिव... घरभर फिरुन आण मला.'' मी तिच्या बगलेत दोन्ही हात घालून तिला उचललं. कडेवर घेतलं. आता ती माझ्या छातीशी मुडपलेल्या उजव्या हातावर निवांत बसली आहे. तिचे पाय माझ्या पोटाला, कमरेला टोचताहेत. डाव्या हाताचा विळखा माझ्या मानेभोवती टाकून ती घर न्याहाळतेय. आमचा फेरफटका सुरु झालाय. आजी मला घरातील एका एका जागेच्या भिंतीच्या तुळयांच्या, दगडा विटांच्या गोष्टी सांगतेय. आत्तापर्यंत कधी माझ्या नजरेलाच पडले नाही, असं माझं घर ती मला नव्याने दाखवतेय. जे मला पूर्णतः अपरिचित आहे. मी आता अनोळखी होत चाललोय या घरात. नव्याने ओळख करुन घेतोय. उत्सुकतेनं, नवलाईनं तिला प्रश्‍न विचारतोय. ती प्रत्येक उत्तरासाठी माझ्याच हातावर बसुन माझे गालगुच्चे वसुल करतेय.

आम्ही आता दिवाणखान्यात आलोय. गेल्या चार पाच पिढ्यांच्या कर्त्या पुरुष व महिलांच्या जोड्यांचे फोटो तिथं लावलेत. माझ्या आई-बापाचा फोटो तिथं अद्याप लागलेला नाही. ""इथंच तुपल्या माय बा चं लगिन झाले.'' (लग्न आणि दिवाणखान्यात असा प्रश्‍न मी आजीला विचारु शकलो नाही.) ""रातभर वरात चालली व्हती इथं. म्या नववारी शालू आन्‌ मोत्याच्या दागिण्यानं मढले व्हते नुसती. वटीत गहू आन्‌ खोबऱ्याच्या वाट्या. लखलखाट व्हता नुसता. आता बघ कसं झालंय. पोपडं निघालंत पार घराचं. त्याकडं पाह्यला तुपल्या बा ला यळ नाय. श्‍यानामातीच्या भिंतींना इसरला तो. चल बाह्यर दावते तुला, काय चालंलय इथं त्ये.''आता आम्ही घराबाहेरच्या रस्त्यावर होतो. घराकडे बोट दाखवत ती मला म्हणाली, ""पाय काय दिसतंय तूला त्ये.'' मी पाहिलं, आता आमचं घर आमचं राहिलं नव्हतं. त्याच्या दोन्ही बाजूने दोन मोठ्या इमारती उभ्या राहील्या होत्या. एका इमारतीचे मोठे सिमेंटचे खांब माझ्या मातीच्या घरात घुसलेले होते. छप्पर कौलांना खाली दाबत होतं. दोन्ही इमारतींवर एकावर एक मजले चढविण्याचं काम सुरु होतं. सारा परिसर इमारतींनी दाटीवाटीनं व्यापला होता. आमच्या जुन्या घराचा काळ जवळ आल्याचं स्पष्ट होतं. गावातील मातीच्या शेकडो घरांवर सिमेंटच्या, लोखंडी जाळ्यांच्या, सळया, गजांच्या घरांनी आक्रमण केलं. एखाद्या टोळधाडीसारखं. तेच आक्रमण आता आमच्या घरावरही झालं होतं. ते थोपवायला आजी अपूरी पडत होती.

""तुपला बा इथं शिमिटात लोखंडाच्या कांबा घालून पैशाचं मजलं उभारणार हाय. लोखंडाचं पिंजरं करणार आन्‌ त्यात भाड्याची माणसं भरणार. बिचारं साळंतलं मास्तर, परगावची पोरं, तलाठी, वायरमन, भैयं अशी माणसं खुराड्यामधी येऊन आडाकणार. खुराड्यांना ना रंग ना रुप. तुपल्या बा ला फक्त पैका हवाय. कलिचा भस्म्या रोग झालाय त्याला. आपलं कौलामातीचं घर पाडून शिमिटाचं ठोकळं मांडून खिसा भरायचाय त्याला. तो पोटात ऱ्हायला तव्हा माती खायचं डव्हाळं लागलं व्हतं मला. घराच्या भितीची पांढरी खाल्ली म्या. भुई चाटली. वावरात तुपल्या आजाची नजर चुकवून शाळूच्या ताटाच्या बुडाला आडाकल्याली काळी माती जिभंची सालटं निघंस्तोवर चाकली. त्या मातीवं तुपला बा नऊ म्हैनं नऊ दिस पोसला. आन्‌ आता...

आजीनं आता मला इमारतीच्या आत चलण्याचा हुकूम केला. मी तिला हातावर घेऊन जिना चढण्याची कसरत करु लागलो. आत जिकडं तिकडं सिमेंटचे काळपट ढिग पडलेले. वाळूचे डेपो लागलेले. वर वर जाईल, तसा जिना अरुंद होत गेला. दुसऱ्या मजल्यावर तर जेमतेम एक माणूस निट चालू शकेल एवढाच रस्ता होता. इमारतीची बांधणी सुरु आहे की, पाड्याचं काम सुरु आहे असा प्रश्‍न पडण्यासारखी अवस्था होती. पाऊल टाकणंही असह्य झाल्यावर मी परत फिरलो. हातावरील आजी मान वळवून त्या ढिगाऱ्याकडं पाहत होती.

""पयली आपल्या घरात महिना न्‌ महिना लॉकं राहून जायची. पावसाळ्यात नंदीवालं, मरियाईवालं मुक्कामी असायचं. तुपल्या आजानं कधी धंदा मांडला नाय भाड्याचा. दुनीया बदलली म्हून काय आपूण बी आपलं संस्कार, वागणं आन्‌ इचार बदलायचं. ज्यानं माती चाखली त्यालाच फरक कळणार माती आन्‌ शिमिटातला. सारावलेल्या भितीची माय तुमच्या शिमिटाच्या ठोकळ्यांना कशी येणार. शिमिटाच्या भितींवर मायंचा हात फिरणार हाय का कधी. जुन्या घराच्या कणाकणात मपल्या हाताल्या रेघा मिसळल्यात. जित्या जागत्या घरावं नांगर कसा फिरवणार तुपला बा... कसं व्हायचं त्याचं त्यालाच म्हाईत.'' आजी अशी अवचीत आली तशीच कुठं तरी गडापली. पण तिचं शेवटंच वाक्‍य बराच वेळ माझ्या डोक्‍यात घुमत राहीलं. त्यापाठी मी ही घुमत राहीलो. घराभोवती. मातीभोवती.

माझ्या बापानं आमचं जुनं घर पाडायचं नक्की केलं. पाडलं. आम्ही आता नव्या घरात रहायला गेलोय. अजून मी त्या घराला घर म्हणत नाही. म्हणावसंही वाटतं नाही. एव्हाना नव्या इमारतींचे पहिले चार पाच मजले भाडेकरुनी भरलेत. बारा गावची बारा बेणी त्यात गोळा झालीत. मजले अजूनही वाढत आहेत. मी इमारतीच्या बाहेर उभा आहे. उपग्रहाच्या नजरेनं तिच्याकडं पाहतोय. गावभर इमारतीच इमारती झाल्यात. एकीलाही बाहेरच्या बाजूने गिलावा नाही. साऱ्या कशा उघड्या, नागड्या, बोडक्‍या. सिमेंटचे ठोकळे उघडे पडलेल्या. मारुतीचं देऊळ आता हरवलंय. जिकडं तिकडं फक्त इमारतीच इमारती. सगळ्या कशा अपूर्ण. अधुऱ्या. अधाशी. आकाशाच्या दिशेनं वाढत चाललेल्या. आकाशाच्या पोटात सळया खुपसू पाहणाऱ्या.

अचानक मला भास झाला. माझ्या बापाच्या इमारती जमीनीकडं कलू लागल्यात. माझी आजी इमारती पाडण्यासाठी त्यांना विरुद्ध बाजूने जोरजोरात धडका देतेय. दोन्ही हातांनी धरुन जोरजोरात हलवतेय. आजीच्या धक्‍क्‍यांनी इमारतीला चिरे जाताहेत. ती आता इरेला पेटलीय. इमारत कलत चाललीये. तिच्या गॅलरीत आरामखुर्ची टाकून पेपर वाचत पडलेले आमचे चितळे मास्तर, तळाशी काळ्या भगुल्यात पाणी तापवण्यात मग्न असलेले भय्ये आणि सर्वात वरच्या मजल्यावर भाडे गोळा करत असलेला माझा बाप... कुणालाच त्याचा गंध नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. त्यांच्या डोळ्यांवर सिमेंटचा पडदा चढलाय. मग त्यांना कळणार तरी कसं, आपली खुराडी पडताहेत ते. इमारतीनेही ते त्यांना का सांगावं, तिचं आणि त्यांचं नातं तरी काय ?

कासराभर. जवळजवळ कासराभर लांब मी उभा आहे. माझ्या बापाच्या इमारती आता सात आठ मजल्यांच्या झाल्यात. विरुद्ध बाजूने एक पांढरी आकृती इमारतींना जोरजोराने ढकण्याची पराकाष्ठा करत आहे. गिलाव्यानं, सिमेंटनं आता आपली जागा सोडायला सुरवात केलीय. कोण म्हणतं सिमेंटमध्ये जीव असतो. तसं असतं तर त्यानं निर्णायक क्षणी विटांची साथ सोडली असती का. लोखंडी यंत्रांनी भट्टीतून चुरुन काढलेल्या, आगीत जाळलेल्या आणि ते कमी म्हणून की काय त्यात सळ्या खूपसून तयार केलेल्या वस्तूंमध्ये जिव असेलच कसा. मग त्या तुमच्या जगण्याशी समरस कशा होणार. इथं मातीच पाहिजे. माणसाच्या जगण्याशी, झगडण्याशी आणि शरीराशी नातं सांगणारी. आपलं नातं, इमान मातीशी आहे. माती म्हणजे धर्म, इमान आणि आईपण. सिमेंट म्हणजे व्यवहार. फक्त व्यवहार. ज्यात भावना नाही तो व्यवहार.

इमारत झुकू लागली होती. पोटच्या मातीचा जोर लावून आजी तिला ढकलत होती. मी हतबल होतो. मातीची ओढ होती. पण त्याच वेळी बापाचं भविष्य इमारतीसोबत झुकताना दिसत होतं. तो मात्र भाडं गोळा करण्यात मग्न होता. आई सिमेंटच्या घरात नेहमीप्रमाणं मान खाली घालून स्टीलच्या परातीत भाकरी थापून एलपीजी गॅसवर टाकत होती. तिला आता शेण माती गोळा करुन भिंती सारवण्याची गरज राहीली नव्हती. इमारतींचे मजले वाढतंच होते. 10 वा झाला. 12 वा झाला. मी पुन्हा हतबल. ना माझ्या मातीच्या भिंती वाचवू शकलो, ना आता या सिमेंटच्या पडत्या भिंती सावरु शकत होतो. मजले वाढतंच होते.

इमारतीचा शेंडा पूर्णपणे आडवा व्हायला आला होता. आभाळ भरुन आलं होतं. विजांच्या कडकडाटात ढग एकमेकांवर आदळत होते. मी लोकांना ओरडून सांगतोय... बिल्डींग पडायला लागलिये, पळा पळा. पण कोणाचंही लक्ष माझ्याकडं नाही. कोणी पेपर वाचतंय. कोण क्रिकेट खेळतंय. तर कोणी भाजी निसता निसता भान विसरून कुजक्‍या काजक्‍या गप्पांचे उकीरडे चाळत आहेत. मी मोबाईलवरुन सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण नेहमीप्रमाणं सर्वांचेच फोन व्यस्त. व्यस्तपणामुळं स्वतःचं मरण जिवंतपणे अनुभवण्याचंही नशीबी नाही यांच्या. यांना शेवटानंतरही कळणार नव्हतं, शेवट कसा झाला ते.

आजूबाजूच्या सर्व इमारती कोसळणाऱ्या इमारतींकडं पाहून टाळ्या वाजवत होत्या. छिन्न विछिन्नपणे हसत होत्या. भांडवलदारांचीच पिलावळ ही, यांना काय... माझ्या बापाच्या इमारती सळणार म्हणजे यांच्या मालाला तेजी येणार. ढिगारा उचलण्याचे कंत्राट निघणार, मेलेल्या शेकडो लोकांना जाळायचं म्हणजे मैताच्या सामानाचा तुटवडा. मग बाजारात पुन्हा तेजी. पुन्हा नव्या इमारतीचे पुर्ननिर्माण. त्यासाठी सिमेंट हवं, लोखंड हवं. तथाकथीत गृहनिर्माण उद्योगाला पुन्हा एकदा चालणा मिळणार. बांधकाम उद्योगात बुम येणार. टाळ्या वाजवणार नाहीत तर काय करणार या. माती थोडीच आहे, मृत्यूनं शहारायला...

इमारतींनी आता शेवटचा आचका दिला. सिमेंटचा चुरी, विटा, ठोकळे, लोखंडी गॅलरी धडाधडा कोसळू लागल्या. वरच्या मजल्यावरील माणसं खाली भिरकावली गेली. आजीचं तांडव सुरु झालं होतं. गोंधळ नाही. आरडाओरडा नाही. सर्व काही पूर्वनियोजित. सुत्रबद्ध. माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही भूईसपाट होत होतं. भाकरी थापणारी आई, भाडं गोळा करणारा बाप आणि भाडेकरुही. पण मी काहीच करु शकलो नाही. की, मुद्दामच काही केलं नाही. अंगावर जोराच्या जलधारा बरसू लागल्या. आणि मी भानावर आलो. सुसाट वेगानं इमारतींच्या ढिगाऱ्यांकडं पळत सुटलो. तोपर्यंत ढिगाऱ्यांचा गाळ व्हायला सुरवात झाली होती. सर्वत्र सळ्या, सिमेंट, विटांचा खच पडला होता. सिमेंटचा गाळ पाण्यात वाहण्यास सुरवात झाली होती. माझी चार वर्षाची आजी त्या गाळात खेळत होती.

6 comments:

Yawning Dog said...

Bharee ahe re goshta Santosh. Class!

leena said...

Apratim......

prashant ghule said...

naadbaad re........ tu ladh re amhi aahot mage........

mani said...

व्यस्तपणामुळं स्वतःचं मरण जिवंतपणे अनुभवण्याचंही नशीबी नाही यांच्या. यांना शेवटानंतरही कळणार नव्हतं, शेवट कसा झाला ते he far fakkad lihalas bagh. maja ali vachattana!

Binary Bandya said...

faarch chhan aahe...

Vinod L Gunjal said...

naad khula .......... sir

lai bhari, excellent stuff.

i am waiting for a moment when your books or novel will be published.

keep it up.

regards,
vinod gunjal