Tuesday, December 30, 2014

तोरणा ते राजगड नाईट ट्रेक

खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक....
पण तेवढ्यात मनानं उभारी दिली
दोन पावलं टाक
मग देवानं फिल्डिंग लावली
योगायोग जुळले...

पाबे घाटात
विजांचा कडकडाट
थेंबांचा धोपट्या मार
अंधार भेदून काळिज धडकवणारा
ढगांचा जिवघेणा गडकडाट
निर्जन रस्त्यावर बुलेटची धडधड...
खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक...

तोरण्याच्या पायथ्याला
वेल्ह्यात शुकशुकाट
नुकताच धो धो बरसल्याच्या
अस्ताव्यस्त खूणा
तशातच रेटली पावलं
पहलेच वळण रॉंग टर्न
पुन्हा योगायोग
दोन जण बँटरी घेवून पलिकडच्या डोंगरावर..
पावलं फिरली वाट घावली...
दोन तासांची अखंड पायपीट चढणीवर
जिव पोटर्यांत ठेवून पावलं चिकटली कपारींना
बोटं घोरपडीच्या नख्या
तोरणा सर...
दाटलं आभाळ, नभातून धुक्याचा वर्षाव...
जेवलो. वाटलं मुक्काम करावा
पुन्हा दोन शब्द, पुन्हा दोन पावलं
नवी उभारी, नवा जोम
एका टोकाहून दुसरे टोक...
जिवघेणा दीड तास...
मानव आणि मानवतेचा दुष्काळ
निसर्गाच्या हजार छटा
प्रेमाची, लोभ, राग, दणका, हसू, आसू, सारं काही..
ओले गवत, ओल्या वाटा
ओली झाडे, शेवाळलेला खडक
बेकडांच्या भेदरल्या उड्या
सापाची पोटपाण्याची धडपड
त्यात तडफडणारी, घसरणारी, पुन्हा रोवली जाणारी आमची चार पावलं...
खरं तर हजारदा वाटलं...
रद्द करावा हा ट्रेक...

गडाच्या पश्चिम टोकावरुन
हातभर खडकाला पाठ पोट घासुन
जिव अंगठ्यात रोवून
निधड्या छातीने दिली फाईट
आणि दरडावले कड्या कपारींनाही
पुढे याल जर कोणी
चिरडून टाकू कळीकाळ
हा शिवबाचा इरादा आहे...
गोठलं सारं आसमंत
ढगांच्या वेढ्यातून सोडवला चंद्र
गुलाम चांदण्यांना मुक्त श्वास
काट्यांची झाली फुले
कारव्यांच्या झाल्या कमानी
अन् स्वागताला गवतांचे तुरे...
खरं तर हजारदा वाटलं...

बरोब्बर बाराच्या ठोक्याला
तोरण्याला पाठ लावून
धरली वाट राजगडाची
राजांच्या गडाची, गडांच्या राजाची
राजा माझा काळजाच्या आत
जपून ठेवलेला केवडा
त्याच्या आठवांवर
आमच्या रक्तांचा सडा
ओढ लागली जिवा
राजांच्या भेटीची, गडाच्या भेटीची
पावलात आलं बळ, रक्तात सळसळ...
दोन तास सुसाट पळत
ओलांडलं मोठं जंगल
गवता झाडांत हरवलेल्या रानवाटा
झाल्या क्षणात जिवंत
पानाफुलात अडकलेले हुंदके
तना मनावर उपडे झाले
भिजली सारी कापडं
नखशिखांत ओल ओलं खोलवर
मनात उसळती वादळं
उरात भेटीची ओढ अनावर
निम्म्या टप्प्यावर, डांबरी रस्त्यावर...
खरं तर हजारदा वाटलं...

टेकली पाठ खिंडीला
डोळा काळ झोप
स्वप्नीही राजगडाची ओढं
प्रचंड तडफड, खाडकन जाग...
इथं तर लाखदा वाटलं...
पण पुन्हा दोन शब्द...
मनात पेटता पलिता
भरला विडा मँगो बाईटचा
गडी सुसाट पुन्हा
डोंगरांची डोकी रगडण्यापेक्षा
पोटापोटाला गुदगुल्या करू म्हणून मारला वळसा...
जिवघेणा... अंत पाहणारा, दाखवणारा..
मिटलेल्या वाटा, हरवलेल्या वाटा
काट्या कुट्यांनी बळकवलेल्या वाटा
धबधब्यांनी गिळलेल्या वाटा
चंद्रप्रकाशात आत्ममग्न वाटा
नखरेल नारीसम खुणावणार्या वाटा
मोहाच्या वाटा, करुणेच्या वाटा
सुखाच्या वाटा, दुखःच्या वाटा
स्वतःच्या धुंदीत जगावर थुंकणार्या वाटा
झोंबलो, झटलो, चढलो, हेंदकळलो,
घसरलो, उठलो, बिलगलो, रांगलो,
वणव्याने ओथंबून झिंगत राहीलो, झुलत राहीलो
वाटा धुंडाळत, वाटा तुडवत, वाटा शोधत, वाटा बनवत...
खरं तर हजारदा वाटलं...

दीड दोन तासाची अखंड अनोखी बेडर पण एकाकी झुंज...
दोन जिवाची... एका धेय्याशी
गर्द एकांतात चांदण्यात चमकणारी संजिवनी
साद घालत होती पावलोपावली
दगड गोट्यांतून, धबधब्यांतून
शेवाळातून, गवताच्या भाल्यांतून
निष्प्राण होवून पडल्या खोडा खोडातून
एकच साद एकच गाज
राजगड राजगड माझा राजगड
ओटीपोटाला कळ आल्यावर
जसे येतात प्राण कंठात
तशी अत्यंतीक तळमळ
शेवटच्या चार क्षणात
शेवटच्या दांड्याची वाट
जिवा सुखावून गेली
भेटली स्पष्ट दिशा
मनं हरखून गेली... दृष्टीक्षेपात
प्राणसखा जिवाचा जिवलग सह्यकडा राजगड !
खरं तर हजारदा वाटलं...

समोर आहे ती संजिवनी,
की बालेकिल्ला की सुवेळा...
तनामनाची दिशाभूल
पायांना मात्र दहा हत्तींचं बळ...
एक प्रदक्षिना, दोन प्रदक्षिणा...
सलाम दंडवत प्रणाम नमन
उजवी घालून डाव्या हाताला
संजिवनीवर थेट चढाई
व्याघ्र दरवाजा, पाण्याची गच्च टाकी
टेहाळणी बुरूज, बुरुजावर झेपा टाकणारं एकटं पाखरू
काळजाचा ठाव घेणारी त्याची फडफड
युगायुगाचा साक्षिदार असावा कदाचित
प्राणसखा राजगड

बसलो उठलो चालू पडलो
लावून पायधूळ माथ्याला
वळसा बालेकिलेल्याला
वाटेवर अगणित फुलांचा
गुलाबी वर्षाव दुतर्फा फुलाफुलांचे ताटवे
जणू राजांच्या आदेशानं
राजगड सजला स्वागताला
प्रणाम सदरेला, पाठ पायरीला
तासाभराची राजेशाही झोप...

भल्या पहाटे गडावर पखरण फुलांची
सडे कोवळ्या सुर्यकिरणांचे
अन् कणाकणात रोमांच घुमवणारा राजगडी वारा...
पारणं फिटलं... तनाचं, मनाचं, डोळ्यांचं, आत्म्याचं...
आत्म्याचा आत्म्याशी मुक संवाद
थोडंसं गुज, हितगुज
आणि राजांनी टाकलेली पाठीवरची थाप
ताठ कणा... मान आन वसा वारसा
पाठीशी बांधून मराठी विश्व
मावळ्यांनी धरली वाट...
मंतरलेल्या, भारलेल्या उमललेल्या फुललेल्या मनानं ४५ मिनिटात गुंजवणी

पुन्हा योगायोग...
दोघांसाठी एक जिप...
बदलाबदली करत पुन्हा तोरण्याच्या पायथ्याला...
एक प्रदक्षिणा पूर्ण
एक स्वप्न पुर्ण
हजार हत्तींचं बळ
हजार युगांचा अनुभव
काठोकाठ भरून शिदोरी
मराठेशाहीची स्वप्ने गाठीला...
जय जिजाऊ, जय शिवराय !!!

-- संतोष डुकरे (तोरणा ते राजगड नाईट ट्रेक, १० व ११ ऑक्टोबर २०१४ च्या रात्री, तुषार डुकरे सोबत पूर्ण केल्यानंतर)

No comments: