Tuesday, March 10, 2015

महामारी

तुटक्या काटकीच्या आधारानं
वेलीनं वृक्षावर झेप घ्यावी
चढावं चढावं चढत रहावं
आणि मग घ्यावा त्याचाच घोट
पारंब्यांचा शोक... अधांतरी...

दुखःच्या महाउत्सवात उधळलेला
पाहणाराला दिसेल वटवृक्ष वठलेला
वेलीचा गळफास, दृष्टीआड सृष्टी
नरडीच्या घोटाला आहुतीची भुकटी
हे भलतच व्हायला लागलंय...

खांद्यावर घेतलं की कानात मुततंय
इथपर्यंत ठिक होतं...
पण आता मुत्राचंच करुन विर्य
कानाला ठेवलंय गर्भार
आणि घालू पाहताहेत जन्माला, विकृतीची पिलावळ...

आता प्रसूतीच्या पहिल्याच झटक्यात
फाटणार गर्भाशय, वठणार महावृक्ष
तुझ्या माझ्याच आडोश्यानंच
कोंबा कोंबावर बेझूट वार...
हर बार, बार बार, हरेक बार

तुमचा आमचा परमार्थ
पिढ्यानपिढ्या असाच चालणार
बंद झापडांना महामारी भोगणार
रामकृष्ण हरी म्हणत
तुम्ही आम्ही टाळ कुटणार

(संतोष डुकरे, पुणे)

No comments: