Thursday, March 12, 2015

गोवंश हत्याबंदी पुराण

सिद्धपुराण !
समुळ गोवंश आता, स्टेट लेवल पेटंटेड
गो-माता, गो-पिता, गो-पुत्र, गो-कन्या
देव, धर्म, वंश, वृद्धी सर्व हक्क संरक्षित
वाकडी नजर पंचकाची कैद, रोकडा दंड

भासपुराण !
चौकाचौकात भास, माणसांचे मांस
विचारांना बत्त्या, शेतकरी हत्या
विधवांचा विलाप, लेकराचा टाहो
शासकीय आलाप, देवच पाहो

उदासपुराण !
घरोघरी चालूद्या, उत्सर्जनाचा धंदा
धन्याला धतूरा, गो-गुर्जींना मलिदा
पिढ्या न् पिढ्या, ओढतोय खटारा
तरी आमच्या घरावं, फिरवा खराटा

धर्मपुराण !
गोरक्षणाय, खलनिग्रहनाय
धर्मरक्षणाय, पांढरे हत्ती
गोरक्षा, धर्मरक्षा, हेरक्षा, तेरक्षा
हाती नांगर, त्याची पाताळी राख

धाकपुराण !
जर हात उचललात गो मातेवर
चाबूक उचललात बैल बापावर
वंशरक्षक येतील दंगल करतील
चौकाचौकात गातील मंगलगाणी

विटाळपुराण !
विटाळी गाईस स्पर्ष नको बाई
शुद्धीसाठी मुत्र गाईच्याच ठायी
वृषभाचे सत्व दिग्विजयासी ठावे
शुभ मुहुर्ता वळू कलेनेची घ्यावे

विकासपुराण !
शेणाला बैल, मुताला गाय
विर्याला वळू, घरच्या घरी
गोवंश हत्याबंदी, येता दारी

स्तुतीपुराण !
गोमाता, गोपिता, गोलेकरांचा जय..
गोप्रतिपालक राजाधिराज नरेंद्रकी जय...
गोवंशप्रतिपालक राजाधिराज देवेंद्रकी जय...
इती गोवंश हत्याबंदी कायदेयज्ञ फलोत्सुती....

आेम शांती शांती शांती शांती शांतीही...

(संतोष डुकरे, पुणे)

No comments: