Tuesday, March 10, 2015

उंबरे फोडिस्तोवर...

ग्यानबा तुकात
राम कृष्ण पंढरीनाथात
तुम्ही आम्ही अडकलोय
बडव्या भडव्यांच्या चकव्यात

गिरवत बसलोय पिढ्यानपिढ्या
तिच ती बाराखडी
तेच आकार तेच उकार
निरर्थक निर्गून निराकार

सारं काही तेच ते अन् तेच ते
चाकोरीची चकार करतेय बोथट धार
बडव बडव बडवतोय मृदुंगाचे थोबाड
टाळांची कुटाकुट बुक्क्यांचा महापूर

अंगारे धुपारे धुप अगरबत्त्या
नामस्मरण जयघोष काकडा जागर
आरत्या सांजारत्या साहित्य पौराहित्य
नुसत्या घोकपट्टीनंही म्हणे आयुष्याचं सोनं

चालू द्या ज्यांचं चाललंय दुकान
पोकळ उराडांवर सारंच महान
सोवळ्या ओवळ्यांचा होवू द्या खेळ
गाभाऱ्यांचे उंबरे फोडीस्तोवर...

(संतोष डुकरे, पुणे)

No comments: